Wednesday, 24 June 2026

नाभिका रे

सामान्यतः केस वाढल्याची जाणीव इतरांना प्रथम आणि स्वतःला शेवटी होते. बायको, मुलं किंवा मित्र जेव्हा यावर भाष्य करतात तेव्हा आपल्याला नाभिकाची आठवण होते. प्रत्येक पुरुषाच्या आयुष्यातील सर्वात कंटाळवाण्या दोन घटना, त्या म्हणजे दाढी आणि केशकर्तन! या घटना पुढं ढकलता येतात पण टाळता येत नाहीत.

आठवड्यातून दोन-तीन वेळा धारदार खोरे चेहऱ्यावरून क्रूरपणे फिरवावे लागतेच आणि महिन्यातून एकदा तरी न्हाव्यासमोर मान तुकवावी लागतेच. काही नशीबवान पुरुषांना देवाने टकलाचे वरदान दिल्यामुळे त्यांचा हा त्रास वाचतो. तरीपण साधारण चाळीशीला पोहोचेपर्यंत सलूनचे उंबरठे झिजवावे लागतातच. आमच्या खानदानात कोणीच टकले नसल्यामुळे माझ्या कपाळी नाभिक समुदायाचे जन्मजन्मांतरीचे नाते टिकून आहे.

केस कापणे हा पुरुषाच्या डोक्यावर करण्यात येणारा एक सामाजिक संस्कार आहे. तुम्ही अनेक गोष्टी त्याग करू शकता पण केशकर्तन पूर्णतः टाळू शकत नाही. केस वाढल्याची वर्दी सर्वप्रथम बायकोला लागते आणि मग एक हक्काची आरामाची रविवार सकाळ सलून व्यवसायाला प्रदान करावी लागते. अशावेळी मात्र टक्कल न पडल्याची खंत आवर्जून वाटते. लहानपणी केस वाढवण्याची इच्छा उराशी बाळगणाऱ्या पुरुषांना चाळीशीनंतर जे काही उरले आहेत तेवढे तरी टिकावेत एवढीच माफक अपेक्षा राहते.

सलूनमध्ये शक्यतो रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशीच भेट देणारा मी! तिथली तोबा गर्दी पाहून मला वाटते की भारताच्या लोकसंख्या वाढीपेक्षा केशवाढीचा प्रश्न अधिक ज्वलंत आहे. आजकाल सलून एअरकंडिशन्ड असतात. पण तिथं बसायला जागा मिळेलच याची खात्री नसते. मुकाट्याने दुकानाच्या बाहेर टाकलेल्या बाकड्यावर बुड जमवावे लागते. मुख्य नाभिकाला किती वेळ लागेल असं विचारले तर एकच उत्तर, “साहेब, हे दोन झाले की लगेच तुम्हाला घेतो.” त्या दोनमध्ये प्रत्येकी दाढी, कटिंग, हेड मसाज, फेशियल, हेअरडाय असे सर्व सोपस्कार दडलेले असतात. प्रत्येकी सुमारे तासभर या न्यायाने दोन तास वाट बघणे क्रमप्राप्त असते. फाजीलपणे “मी नंतर येतो” असा शहाणपणा केला तर परत आल्यावर तुमचा नंबर पुन्हा एकदा शून्यापासून चालू होतो. “साहेब, काय करायचं, ही सगळी कधीची वाट बघत इथंच बसलीत.” अशी समजूत काढली जाते. त्यामुळे मी तिथेच ताटकळत वाट पाहणे पसंत करतो.


आपल्यासारखी बरीच मंडळी वाट पाहणाऱ्यांमध्ये सामील असतात. काही मंडळी समोर टाकलेली मासिकं चाळत असतात, काही समोर लावलेल्या टीव्हीवरील टुकार चित्रपट पाहण्यात मग्न असतात तर काही मंडळी फोनवरील रील्स बघत गालातल्या गालात हसत असतात. याहून वेगळी अजून एक कॅटेगरी असते. ते लोक सुसाट आत घुसतात, नाभिकाचा कंगवा किंवा पाण्याचा फवारा केसांवर मारतात. कामात व्यस्त असलेल्या नाभिकाबरोबर मित्रत्वाच्या गप्पा मारतात. हक्कानं त्याच्या पाठीवर थाप मारून निघून जातात. जिथे आपण मान खाली घालून बसतो अशा ठिकाणी हे लोक ताठ मानेने वावरतात; यालाच वरपर्यंत ओळख असणे असे म्हणतात.

आपला नंबर लागल्यावर एक स्वर्गीय आनंद होतो. गडबडीने मी नाभिकासमोरील खुर्चीत विराजमान होतो. बसमध्ये चढल्यावर खिडकीशेजारील सीट मिळावी किंवा लग्नात जेवायला पहिल्याच पंगतीत जागा मिळावी, तसा हा आनंद होतो. काही मंडळींचे नक्की कोणत्या नाभिकाकडून केस कापायचे यावरही प्राधान्य ठरलेले असते. त्यासाठी ते अधिक वेळ प्रतीक्षा करायलाही तयार असतात. मी अशा लोकांचे कौतुक करत, माझा नंबर लवकर लागला या आनंदात खुर्चीत विराजमान होतो. ज्याप्रमाणे “वदनि कवळ घेता” या श्लोकाचा तुम्ही काय खाताय याच्याशी काहीही संबंध नसतो, त्याप्रमाणे “केस केवढे कापायचे?” या प्रश्नाचा वास्तविक केवढे केस कापायचे या गणिती मोजमापाशी काहीही संबंध नसतो. ती एक फक्त औपचारिकता असते. तुम्ही काहीही सांगा, तो नाभिक आणि तुमचे नशीब हेच तुमच्या केसांचे भविष्य ठरवतात. राज्याभिषेक सोहळ्यात जसे डोक्यावर किरीट बसवले जाते तसे आपल्या गळ्याभोवती एक सुवासिक वस्त्र गुंडाळले जाते. त्या पवित्र वस्त्राने आजवर अनेक रंगाचे, वयाचे आणि वासाचे केस झेललेले असतात. आपल्या स्वच्छतेच्या संकल्पना अशा केशसंस्कारामध्ये आणायच्या नसतात. आता तुमचे हात, फोन आणि डोकं संपूर्णपणे नाभिकाच्या नियंत्रणात गेलेले असते. अहो! साधी शिंक आली तरी तुम्हाला नाभिकाची परवानगी घ्यावी लागते.

तुमच्या डोक्यावर होणाऱ्या शस्त्रक्रियेबरोबरीने नाभिक तुमच्याशी संवाद सुरू करतो. “कसे आहात? ऑफिस कसे काय? यंदा उन्हाळा फार वाढलाय हो!” आणि त्यानंतर तुम्ही फक्त “हो”, “बरोबर आहे”, “खरंय!” याशिवाय काहीच बोलू शकत नाही. पण नाभिक मात्र समाजकारण, अर्थकारण, आंतरराष्ट्रीय मुद्दे, हवामानशास्त्र या सर्व विषयांवरील प्रगाढ पांडित्य आपल्यासमोर उलगडत जातो. “तुम्हाला कसं काय हो, हे सगळं माहीत?” हा प्रश्न विचारण्याचे माझ्यात तरी धारिष्ट्य नसते. पण जर कोणी तसं विचारलंच तर.. “अहो! ते आपले पाटील साहेब आहेत ना, अहो… ते हो! त्या पलीकडच्या सोसायटीतले… ते आपलेच कश्टंबर!” अशा प्रसंगी ते पाटील एका पतसंस्थेत क्लार्कचे काम करतात हा उलगडा करण्याचे कोणाचेच धाडस नसते.

सोसायट्यांमधील भानगडींपासून दिल्लीतील राजकारणापर्यंत कोणताही विषय घ्या…  हा नाभिक अतिशय आत्मविश्वासाने बोलू शकतो. या नेत्याचा नक्की काय डावपेच आहे आणि त्याने कसा मास्टरस्ट्रोक खेळला, या सर्व आतल्या गोटातील बित्तंबातम्या या नाभिक वर्गाला माहिती असतात. अहो! फक्त राजकारणच नाही तर माझ्या समोर एका सज्जन व्यक्तीला त्वचारोग आणि उपचार, आहारशास्त्र, आरोग्यदायी जीवनशैली अशा अनेक विषयांवर त्याने अधिकारवाणीने सल्ले दिलेले मी पाहिले आहेत.

केस कापून झाल्यावर आपल्याला जो आरसा दाखवून “कसं झालंय?” हा प्रश्न विचारला जातो, तो केवळ एक शिष्टाचार असतो. तुमच्या अभिप्रायावर इथे कोणत्याही कृतीची शक्यता नसते. तुम्हाला आवडो वा न आवडो, जे आहे ते स्वीकारावेच लागते. नाभिकाला दिलेले “छान!” हे उत्तर खोटे बोलणे होऊ शकत नाही. याला आलेल्या परिस्थितीला आनंदाने स्वीकारणे असे म्हणतात.

कटिंग संपल्यावर आपल्यासमोर दोन पर्याय ठेवले जातात. दाढी आणि हेड मसाज. मला हेड मसाज प्रचंड आवडतो. पैसे देऊन डोक्यावर मार खाण्याचा हा जगातील बहुधा एकमेव लोकप्रिय प्रकार असावा. वास्तविक या संपूर्ण संस्कारातील तोच एक माझ्या आवडीचा भाग आहे. एक लयबद्ध आवाज करत डोक्यावर आघात होऊ लागतात. तेव्हा मेंदूमधील सर्व वाहिन्या आणि मज्जातंतू कार्यरत होतात. हा कार्यरत झालेला मेंदू पुढील दहा मिनिटांत पुन्हा निष्क्रिय होत असेल तर कृपया बिचाऱ्या नाभिकाला दोष देणे योग्य नाही. तो तुमच्या मेंदूचाच दोष असू शकतो.

केस कापून आल्यानंतर पहिल्या दोन दिवसांत आपण स्वतःला आरशात खूप वेळा पाहतो. तिसऱ्या दिवसापासून पुन्हा सगळं विसरून जातो. मग आयुष्य पूर्ववत सुरू होते. आणि एक दोन महिन्यांनी कोणीतरी आपल्याला आठवण करून देते.. केस वाढलेत. आता बघवत नाही.

No comments:

Post a Comment

Name:
Message: