प्रत्येकाच्या मनात भूत या कल्पनेबद्दल अनामिक भीती आणि कुतूहल लपलेलं असतं. लहानांपासून थोरांपर्यंत कोणीसुद्धा याला अपवाद नाही. जगभरातील सर्व संस्कृतींमध्ये नक्की सापडणारी गोष्ट म्हणजे “भूत”. नुसत्या शब्दोच्चारानेच मनात कुठेतरी भीतीची लाट उत्पन्न होते. आपल्या पूर्वजांनी घाबरून “भीती” हा शब्द उच्चारताना तो “भूत” असा उमटला आणि “भूत” हा शब्द तयार झाला, असा एक न सापडलेला शोध. लाखो पुस्तकं, कथा या भुतांवर लिहिल्या गेल्या आहेत. कदाचित देवापेक्षा मोठा वाचकवर्ग या भुतांचा असावा. या भुतांनी कित्येक नट, संगीतकार, गायक यांना, चित्रपटांपासून टीव्ही सिरीयल्सपर्यंत सर्व प्रकारातील कलाकारांना पोटं भरायला भरपूर खाद्य पुरवलं आहे.
सर्वमान्य मराठी संकल्पनेनुसार भूतं ही पांढऱ्या रंगाची असतात. हीच भूतं जिवंत माणसं असताना घडोघडी रंग बदलतात, अशी जरी तुमची तक्रार असली तरी भूतात परिवर्तन झाल्यावर बिचाऱ्यांना फक्त एकाच रंगावर समाधान मानावं लागतं. त्यांना पांढऱ्या रंगाचं कापड कोण पुरवतं याचा शोध चालू आहे. ही भूतं चालण्यापेक्षा हवेत तरंगत जाणं पसंत करतात. या भुतांना गुरुत्वाकर्षणाचा त्रास कसा काय होत नाही, कोण जाणे? न्यूटनचं भूत तरंगतं का चालतं? … एक सहज शंका. हाही शोध चालू आहे.
किरकोळ हातचलाखीयुक्त जादूचे खेळ यांना चांगले अवगत असतात. प्रत्येक भुताची काहीतरी अतृप्त इच्छा असायलाच हवी, असा हिंदू संस्कृतीत आग्रह आहे. तरीपण मला अशी बरीच भूतं ज्ञात आहेत, जी बिनकामाची, रिकामटेकडी उगाचच पिंपळाच्या झाडावर किंवा विहिरीत निवांत लटकत पडलेली असतात. काही भूतं बरीच निरर्थक कामं करीत असतात. उगाच मोकळी खुर्ची हलवायची, रिकाम्या झोपाळ्याला झोका द्यायचा, किचनमधली भांडी पाडायची, दरवाज्याला कडी लावत जायचं किंवा सगळे झोपले की हातात मेणबत्ती घेऊन फिरायचं… उद्दिष्टहीन जगणं… नाही, मरणं!
अजून एक महत्त्वाचा शोध… एकदा का तुमचं माणूसातून भूतात रूपांतर झालं की तुमचा आवाज बदलतो. तुमचा घसा कायमचा बसतो आणि साधंसोपं बोलणंसुद्धा कठीण होऊ शकतं. गायकांच्या भुतांचा आवाज कसा असेल, हा फालतू प्रश्न उपस्थित करू नये. तर त्यांच्या आवाजाला घाबरून न जाता, तो केवळ भुतांचा नाईलाज समजून सहानुभूती व्यक्त करावी, अशी सुज्ञ वाचकांना विनंती. गंमत म्हणजे काही कलाप्रेमी भूतं सुमधुर आवाजात गाणं गात हिंडत असतात. अशी भूतं बोलताना मात्र त्यांचा घसा बसलाय, हे लक्षात येतं. हा असाच एक शोध!
कोणी तरी शीतं समोर टाकून भूतं बोलवण्याचा प्रयोग यशस्वी करून दाखवलाय म्हणे; पण ती शीतं त्या भुतांनी खाल्ल्याचा पुरावा अजून सापडलेला नाही. काही मंडळींनी रक्त पिणारी भूतं असं काही वर्णन करून ठेवलंय. कदाचित पाण्याचं दुर्भिक्ष्य! महापालिकेचे पाणी त्यांना मिळत नसावे. बंर मग शिल्लक राहिलेल्या शरीराचं ही भूतं काय करतात, याचा अजून उलगडा झालेला नाही. संशोधन चालू आहे.
जाऊ दे! भुतांवर फार विज्ञान खर्च नको करायला. लहानपणी शाळेत भौतिकशास्त्र हा विषय भुतासारखाच भीती दाखवत दरवर्षी मानगुटीवर बसलेला असायचा. याच कारणावरून या विषयाचं नाव भौतिक पडलं असावं… एक न सापडलेला शोध!
या भुतांचं आवडतं पार्किंगचं ठिकाण म्हणजे वडाचा अथवा पिंपळाचा डेरेदार वृक्ष. गावाबाहेरील थंड वाऱ्यानं त्यांना मुळीच थंडी वाजत नाही. कदाचित यांचं शरीर पातळ पापुद्र्यासारखं असल्यामुळे वाऱ्यानं झाडपाल्यासोबत आपणसुद्धा उडून जाऊ, अशी यांना भीती असावी. याच कारणासाठी ते स्वतःला झाडावर लटकवून घेतात. आला वाऱ्याचा झोत की घ्यायचा एखादा झोका; आणि झाड सोडायचं नाही. आंबा, पेरू, चिक्कू अशा इतर वृक्षांवर यांची उपस्थिती अत्यल्प आढळते… एक सर्वेक्षण!
ही भूतं कधी घड्याळ वापरत नाहीत, तरीपण वेळेच्या बाबतीत अतिशय कडक! रात्रीचे बारा वाजले की यांची रात्रपाळी सुरू होते. दिवसभर उन्हाची कामं करायला त्यांना नकोसं वाटत असावं. पण रात्री बारा वाजले की लगेच कामाला लागतात. कर्तव्य म्हणजे कर्तव्य! कमकुवत दिसणाऱ्या भुतांच्या अंगात शक्ती येते ती अमावस्येला. याचा अर्थ ही भूतं चंद्रावरसुद्धा नजर ठेवून असतात. जसजसा चंद्र छोटा होऊन प्रकाश कमी होत जाईल, तसतशी यांची शक्ती वाढत जाते आणि चंद्र मोठा होऊ लागला की यांची शक्ती घटत जाते. चंद्रप्रकाशामुळे भरती येते आणि अमावस्येला ओहोटी येते, हे शिकलो होतो. पण भुतांचं हे उलटं तंत्र जरा शोधमोहीमेच्या बाहेरचं आहे.
या भुतांच्या कुवतीनुसार त्यांची विभागणी विविध प्रकारांमध्ये केलेली असते. त्यांच्या विभागणीनुसार त्यांना कामं वाटून दिलेली असतात. प्रत्येकानं आपापली भूमिका पार पाडली की झालं. गाणी म्हणणे, वाटसरूंना भीती दाखवणे अशा किरकोळ जबाबदाऱ्या पार पाडताना दिसतात. संपूर्ण भूतव्यवस्था याच तत्त्वावर अविरत चालू असते. त्यामध्ये कधी गडबड, गोंधळ, भांडणं, जातीयवाद, मूकमोर्चे असे प्रसंग दिसून येत नाहीत. हा एक महत्त्वाचा शोध!
एक प्रसिद्ध पावलेला स्त्रीलिंगी भुतांचा प्रकार म्हणजे “हडळ”. भुतांचीच एक बहीण म्हणा हवं तर! ही हडळ काहीशी विद्रूप दिसते. शिवाय तिचा अवतारसुद्धा अजागळ आणि विचित्र असणं अपेक्षित असतं. स्त्री असूनसुद्धा त्यांच्या शक्ती मध्ये तसूभरही कमतरता आढळणार नाही. आवर्जून नोंद करण्याची गोष्ट म्हणजे स्त्रीयांना समान हक्काचा कायदा भूतसंस्कृतीत सापडतो. हा एक उल्लेखनीय शोध! या हडळ जमातीचा पुल्लिंगी प्रकार म्हणजे पिशाच्च! हे लोक तसे घाबरट! कुणाच्या अध्यात ना मध्यात! कुठंतरी गावाबाहेर लांब यांचं वास्तव्य! चुकून एखादा माणूस त्यांच्या वस्तीत गेला, तरच ही पिशाच्च त्यांच्याशी नातं जोडतात. एका शोधकर्त्याचा अनुभव!
हडळीची मानवी स्त्री साथीदार म्हणजे चेटकीण. समस्त चेटकीणी या म्हाताऱ्या, लांब टोकदार नाकाच्या आणि कुबड असलेल्या असणं आवश्यक असतं. तरुण अथवा जेन झी लोकांना या व्यवसायात प्रवेश बंदी आहे. या महिला वर्गाकडे माणसाचं पोपटात आणि पोपटाचं माणसात असे परिवर्तन करण्याची कला अवगत असते. महत्त्वाचं म्हणजे या चेटकीणीचं घर अतिशय गलिच्छ व किळसवाणं असतं. तिच्याकडे स्वच्छतेसाठी झाडू नसतो, अशातला भाग नाही. पण त्या झाडूचा वाहन म्हणून उपयोग केला जातो. या कारणानं घरातली स्वच्छता होऊ शकत नाही. कृपया अशी एखादी चेटकीण आपणास भेटल्यास तुमचे पोपटात रूपांतर होण्याआधी तिला एखादा फिलिप्सचा व्हॅक्यूम क्लिनर भेट द्यावा, ही विनंती.
चीनच्या भुतांची एक वेगळीच गंमत. ही भूतं बेडकासारख्या उड्या मारत चालतात. ही भूतं भारतीय भूतांसारखी प्रगत नसल्यामुळे तरंगत प्रवास करीत नाहीत. यांना तांदूळ आणि मांजर यांची भीती वाटते. बाकी वाघ समोर आला, तरी घाबरणार नाहीत. आणि महत्त्वाचं म्हणजे ही भूतंसुद्धा चिनी लोकांसारखीच दिसतात.
पाश्चिमात्य भुतांचेही बरेच प्रकार. त्यांचा आवडता रंग काळा. काही प्रसिद्ध पावलेले प्रकार म्हणजे झॉम्बी, हॅलोविन, ड्रॅक्युला इत्यादी. या सर्व प्रकारांतील भूतांना माणसाला पकडून त्याच्या मानेवर दोन दात रुतवायला फार आवडते. या भुतांचा आवडता प्राणी म्हणजे लांडगा. चंद्राला पाठीमागे धरून उर्ध्व बांग दिली की या सर्व भुतांची शक्ती जागृत होते. हा एक पाश्चिमात्य शोध!
झॉम्बी प्रकारातील भुतांची गोष्ट थोडी वेगळी. या भुतांना डोक्याचा भाग जरा कमीच म्हणायला हरकत नाही. सतत गुरगुरत फिरत असतात आणि माणूस तावडीत सापडला की त्याच्या मानेचा मुका घेतात. माणसाशी उगाचच झोंबाझोंबी करतात म्हणून त्यांचं नाव झॉम्बी पडलं असावं, असा एक न पडताळलेला शोध!
सर्व भूतांच्या प्रकारांत एका गोष्टीचं साधर्म्य आढळते. प्रत्येकजण कशाला ना कशाला तरी घाबरतो. पाश्चिमात्य भुतांना क्रॉसची भीती वाटते, तर भारतीय भुतांना हनुमान चालीसेची. आपला उपाय किती सोपा आहे! हनुमान चालीसा पाठ केली की झालं! उगाच तो क्रॉस सांभाळत बसायला लागत नाही.
इतक्या संशोधनानंतरही खरीखुरी भूतं सापडलेली नाहीत; पण माणसाच्या मनातील भीती मात्र सहज सापडू शकते. एकदा भॉऽऽऽक! करून ने तपासून पहा.
वास्तविक पाहता द्वेष, मत्सर, ईर्ष्या, क्रोध, हाव हीच खरी भूतं आहेत. त्यांच्यापासून सुटका जी व्यक्ती करू शकेल, तिला कोणतीच आणि कधीच भीती स्पर्श करू शकणार नाही.

No comments:
Post a Comment
Name:
Message: