शहरीकरणाच्या लाटेमध्ये टुमदार घर, बंगला इत्यादी संकल्पना आता कालबाह्य होऊ लागल्या आहेत. आजकाल तर स्वप्नात सुद्धा बंगला परवडत नाही. पोर शिकून कमवायला लागलं की त्याचं पहिलं स्वप्न असतं एक छानसा फ्लॅट! मध्यम वर्गीय पोराचं स्वप्न.. इतकंच परवडू शकतं. माझ्या माहितीतल्या समस्त मित्र व नातेवाईकांनी त्यांच्या कुवतीनुसार किमान एखादातरी फ्लॅट घेतलेला आहे. 1BHK असो वा 4BHK असो.. प्रत्येकाला आपापल्या फ्लॅटचे प्रचंड अप्रूप असते. क्षेत्रफळात फरक असला तरी मालकीहक्काच्या भावनेत नसतो. पुलंच्या शत्रूपक्षात सर्वांची टुमदार स्वतंत्र घरं होती. आमच्या पिढीत मात्र प्रत्येकाची ओळख ही विंग आणि फ्लॅट नंबरनेच होते. क्वचितच कोणी सेलिब्रिटी बंगल्यात राहणारा भेटेल.
मध्यमवर्गीय माणसाच्या आयुष्यात दोन गोष्टी अबाधित असतात, पहिला बॅंकेचा हप्ता आणि सोसायटीचा मेंटेनन्स! दोन्हींपासून कोणाचीच सुटका शक्य नाही. तर अशा या फ्लॅट च्या मालकी हक्का बरोबरीने येते ती सोसायटी. पुलंच्या चाळीचीच एक आधुनिक आवृत्ती! इथे बरीच मंडळी माझ्या मताला विरोध दर्शवून आमची चाळच कशी भारी होती याचे गोडवे गाऊ लागतील. पण मी ते मान्य करून पुढे सरकतो. सोसायटी म्हणजे वेगवेगळ्या स्वभावाची साठ-सत्तर कुटुंबं एका इमारतीत सोडून त्यांच्यावर विधात्याने केलेला एक सामाजिक प्रयोग आहे असे म्हणायला हरकत नाही.
माझ्या आयुष्यात मी अनेक सोसायट्यांचे पाणी प्यायले आहे आणि असंख्य शेजाऱ्यांना सख्खे मानले आहे. व्हॉटसॲप बनण्याच्या आधी पासून मी अनेक सोसायट्यांच्या सोशल लाईफ मध्ये सोसेल तसा सहभागी झालो आहे. AGM च्या घमासान चर्चेपासून ते दिवाळीच्या फराळा पर्यंत, बारशापासून ते अंतिम संस्कारापर्यंत सर्व प्रकारच्या सोहळ्यांचा मी साक्षीदार बनलो आहे. सोसायटी मधील किस्से हे त्याच्या शहरावर ठरत नसतात, तर ते ठरतात तिथं राहणाऱ्या नमुनेदार लोकांमुळे.
सोसायटी बनण्याच्या आधी पासूनच सोसायटीमध्ये गट बनायला सुरू होतात. समविचारी मंडळी एकत्र येऊन स्वतंत्र बैठका घेऊ लागतात. बैठका चहा पासून सुरू होतात आणि खूपच गंभीर चर्चेचे रूपांतर दारूत होऊ शकते. कधीकधी तर असे अनेक गट जन्माला येतात. पण गंमत म्हणजे एकमेकांची एकमेकांना कानोकान खबर नसते. अशाच गटांचे पुढे जाऊन रूपांतर कॉंग्रेस आणि बीजेपी अशा पक्षांत होते. प्रत्येकाचा उद्देश अतिशय स्वच्छ असतो पण त्याना दुसऱ्या पक्षातले लोक हे कामचुकार आणि भ्रष्ट दिसू लागतात. सोसायटीचे बांधकाम आणि सुविधा बिल्डरने पुरवल्या असल्या तरी त्याचे सुंदर घरकुलात रूपांतर करण्याचे उद्दिष्ट या प्रत्येक पक्षासमोर असते.
सोसायटीच्या अस्तित्वाला खरा अर्थ येतो जेव्हा पहिली कमिटी निवडून येऊन कार्यभार स्वीकारते. त्यांच्या खांद्यावर संपूर्ण सोसायटीची जबाबदारी येऊन पडलेली असते. सुरूवातीच्या काळात कमिटीचा प्रत्येक मेंबर इमाने इतबारे कामं चोख पाडू लागतो.. पण कालांतराने त्यांना सोसायटीच्या मिटींग साठी वेळ मिळणे मुश्किल होऊन जाते. महिन्यातल्या एका रविवारी ठरलेल्या मिटींगच्या वेळेतच बऱ्याच जणांच्या घरी पाहुणे येतात, भाजी आणायला जावे लागते किंवा मुलांचा अभ्यास घ्यावा लागतो. सुरूवातीचा ओसंडून वाहणारा उत्साह हा निव्वळ एक ते दोन महिन्यात आटतो. नाखुशी असली तरी मजबुरीने का होईना पण सेक्रेटरी आणि चेअरमन यांची सुटका होऊ शकत नाही. “कीं घेतले व्रत न हें अम्हीं अंधतेने ॥ लब्धप्रकाश-इतिहास-निसर्ग-मानें ॥” या चालीवर त्याना त्यांचा कार्यकाल पार पाडावाच लागतो.
सोसायटीचे सेक्रेटरी आणि चेअरमन या जबाबदाऱ्या भलत्याच विचित्र! “बिनपगारी हमाली” अशी तक्रार करणाऱ्यां सेक्रेटरी बद्दल इतर लोक मात्र “आपल्या बापाची सोसायटी समजतो काय?” अशी सोज्वळ तक्रार करताना दिसतात. वॉचमन झोपला, पाणी गेलंय, कचरा पडलाय, सफाई कामगार आले नाहीत, कोणाकडे चोरी झाली, नो पार्किंग मध्ये कोणीतरी गाडी लावली… करा सेक्रेटरीला फोन! तो बिचारा घरातली कामं सोडून पळतोय सोसायटी सांभाळायला. एवढं होऊनही त्याच्यावर आरोप भ्रष्टाचाराचे, मनमानीपणाचे, निष्क्रियतेचे… असो.
सोसायटीचा वार्षिक महोत्सव म्हणजे AGM. साधारण पणे लोकसभेच्या निवडणुकांचा उत्साह सर्व सभासदांच्या चेहऱ्यावर दिसत असतो. एक गट इतका निरूत्साही की ठरवून त्यादिवशी बाहेरगावी निघून जातात. काही लोक तर इतके उत्साही की आठवडाभर आधी तयारी सुरू करतात. एका आठवड्यात बरीच मंडळी अर्थतज्ञ, बांधकाम तज्ञ, संविधान तज्ञ, नैतिकतेचे संरक्षक, किंवा अगदीच काही नाही जमले तर human rights चे कार्यकर्ते अशा विषयात प्राविण्य प्राप्त करतात. AGM च्या दिवशी गुण्यागोविंदाने नांदणारी ही सर्व मंडळी एकमेकांच्या जीवावर उठतात. काही सभासद तर निव्वळ याच उद्देशाने आलेले असतात… आज माझा दिवस! या कमिटीच्या चुका दाखवल्याशिवाय माझ्या जन्माचे सार्थक होणार नाही.
असं म्हणतात की प्रेम, युद्ध, राजकारण आणि सोसायटी मध्ये कुटनीतीसाठी कोणतीही सीमा ठरलेली नसते. एखाद्या विषयावर भांडण करू नये असा कोणताही नियम इथे ठरलेला नसतो. कुत्र्यांच्या भुंकण्यापासून ते वरच्या बाल्कनीतून खालच्या मजल्यावर टाकलेल्या कचऱ्यापर्यंत कोणताही विषय विकोपाला जाऊ शकतात. रात्री कोणीतरी फटाके वाजवले, घराच्या दारातली रांगोळी पुसली, त्यांच्या घरातील मांजरी आमचा कचरा विस्कटून गेली.. अशा असंख्य प्रकारचे विषय इथे पुरतात. सोसायटीचा मेंटेनन्स भरणाऱ्या प्रत्येकाचा एक गाढा समज नव्हे दृढ विश्वास असतो की अख्ख्या सोसायटीमध्ये केवळ तो एकटाच प्रामाणिकपणे मेंटेनन्स भरतो आणि संपूर्ण सोसायटीतचा खर्च हा केवळ त्याच्यामुळेच चालतो. बाकीचे सर्व निव्वळ फुकटचा उपभोग घ्यायला बसले आहेत. काही मंडळी तर अशी गेंड्याच्या कातडीची असतात की वर्षानुवर्षे मेंटेनन्स देत नाहीत पण तक्रार करायला सर्वात मोठा आवाज त्यांचाच असतो. अशावेळी पाचपोच नसलेली बरीच मंडळी त्याच्या तक्रारीला बगल देत त्याच्या थकबाकीची चारचौघात वाच्यता करून त्याला खजील करायला धजत नाहीत.
सोसायट्यांना खरा जीवंतपणा आला तो व्हॉटसॲपच्या ग्रुपमुळं! प्रत्येकापर्यंत पटकन पोचण्याचा सरळ साधा आणि सोपा मार्ग! या ग्रुपमुळे आपणाला ती व्यक्ती न पाहताच त्याच्या स्वभावाचे पैलू सहज उलगडून दिसतात. पाण्याच्या तुटवड्याच्या निरर्थक वाद घालणारे लोक दिसतात. गाडी आमच्या लॉटमध्ये का पार्क केली यावर वादळ उठवणारे दिसतात. अंधारात एखादा अनोळखी चेहरा दिसला तर चोर किंवा भूत पाहिल्याचा कांगावा करणारे लोक दिसतात. अनोळखी गाडी दोन दिवस दिसली तर त्याचे फोटो टाकून सर्वाना जागरूक राहण्याचे सत्कार्य करणारे सापडतात. सुप्रभात पासून जीवनविषयक मूलतत्वे, हरवलेल्या छत्री पासून ते अमेरिकेचे आर्थिक धोरण, सोसायटीच्या आवारातील पोरांच्या गोंगाटातील खेळापासून ते फिफा विश्वचषक… कोणत्याही विषयावर इथे सखोल चर्चा होते. प्रत्यक्षात तोंडावरील माशी उठवू न शकणारा या ग्रुपवर मात्र प्रगाढ पंडित बनून “युक्ती सांगेन चार” या थाटात बोलत असतो.
आमचा एक शेजारी आणि त्याचे कुटुंब हे प्रचंड मांजर प्रेमी होते. त्याने एका मांजरीला आणि तिच्या पिल्लावळीला आमच्या मजल्यावरील लिफ्ट लॉबीमध्ये छान उबदार असे घर करून दिले. ते मांजर आणि त्याची पिल्ले आपल्याच बापाची सोसायटी असल्याप्रमाणे वावरू लागले. बऱ्याच प्राणीप्रेमी कुटुंबांनी त्यांना इतके लाडावून ठेवले की ते त्यांचा मजला सोडून खायला न देणाऱ्या घरांच्या दारात मलमूत्र विसर्जन करू लागले. खायला घालणारे आणि खायला न घालणारे असे दोन गट पडले. त्या मार्जार कुटुंबीयांना लिफ्टची सवय झाली. कोणी लिफ्टमध्ये गेले तर मांजरं सुद्धा आत घुसायची. मांजरं फक्त माणसाळतातच असं नाही तर ती लिफ्टाळतात सुद्धा! असं म्हणायला हरकत नाही. एकदा आमच्या मजल्यावर एक उंदीर आला तेव्हा मात्र अख्खे मांजर कुटुंबीय घाबरून लपून बसले होते अशी आख्यायिका आहे.
एकदा आमच्या सोसायटी मध्ये कोणाच्या तरी घरासमोरचे चप्पल चोरीले गेले. गंमत अशी की जोडीपैकी एक होते आणि दुसरे गायब होते. त्याच्या मालकानं अक्षरशः घर नव्हे सोसायटी डोक्यावर घेतली. प्रत्येक घराची बेल वाजवून दुसऱ्या चपलाचा शोध घ्यायला सुरवात केली. त्याने शिल्लक असलेल्या चपलीचा फोटो व्हॉटसॲप ग्रुपवर टाकून “याची जोडीदार चप्पल कोणी पाहिली असेल तर ताबडतोब परत द्यावी.” असा प्रेमळ आग्रह पण केला. आता त्याची ती एकच चप्पल घेऊन कोणाला काय फायदा होणार होता? आमचे दुसरे एक शेजारी त्यावेळी परदेशात होते. त्यानी हा सर्व प्रकार व्हॉटसॲप वर वाचला आणि काळजीपोटी बऱ्याचजणांना फोनकरून चपलाची खबर घेतली.
खरं सांगू, इतके असूनही सोसायटी लोकांना एक चांगला शेजार देते. लोकांचे संबंध इतके दृढ होतात की ते एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होतात. सख्ख्या भावाच्या आधी धावून येणारे हेच ते शेजारी असतात. कदाचित याच कारणामुळे सख्खे शेजारी असा शब्द बनला असावा. सोसायटीमध्ये खरा उत्साह संचारतो जेव्हा गणपती येतो. सर्व भांडणं, रूसवे फुगवे विसरून मंडळी एकत्र येतात. भरभरून वर्गणी देतात. अगदी घरच्या गणपती प्रमाणे सोसायटीच्या गणपतीची मनोभावे पूजा करतात. गुणप्रदर्शनाच्या कार्यक्रमात सोसायटीतील तरूण तरूणी एकमेकांच्या ओळखी घनिष्ठ करतात. त्यातूनच कुठेतरी नवीन सोसायटी जन्माला येत असते.
सोसायटीत भांडणं होतात. आवाज चढतात. व्हॉट्सॲपवर वाद होतात. AGM मध्ये आरोप होतात. तरी एखाद्या घरात रात्री अचानक अडचण आली की बेल सर्वात आधी शेजाऱ्याच्याच दाराची वाजते. तेव्हा कळतं, सोसायटी ही फक्त सिमेंटची इमारत नसते; ती कुंपणात राहणाऱ्या माणसांची असते.








