प्रत्येक कुटुंबाला वर्षातून किमान एकदातरी कुठेतरी लांब फिरायला जावे असे सतत वाटत असते. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून एक विश्रांती हवीशी वाटते. शिवाय काहीतरी नवीन पाहून, अनुभवून पुन्हा एकदा जोमाने कामाला लागू अशी आशा असते. दमलेल्या आयुष्याला एका ट्रिपचा रिचार्ज मारणे हे अतिआवश्यक असते. आमचे कुटुंब यातून सुटलेले नाही. वर्षातून किमान एकदा कुठेतरी भेट देऊन तिथल्या स्थानिक व्यवसायांना वृद्धिंगत करण्याचे हे राष्ट्रीय कर्तव्य आम्ही अनेक वर्षे चोखपणे पार पाडीत आलो आहोत.
सहलीला जाण्याचे ठरल्यानंतर सर्वप्रथम प्रश्न येतो.. कुठे जायचे? सर्वांची मते घेतली जातात आणि एकमताने बायकोने ठरवलेल्या ठिकाणीच जाण्याचे ठरते. त्यानंतर महत्त्वाचे काम म्हणजे संपूर्ण प्रवासाचे प्लॅनिंग - कोणत्या दिवशी निघायचे ते कुठे राहायचे, काय पाहायचे, शिवाय कुठे काय खरेदी करायची या सर्व गोष्टींचा आराखडा बनवण्याची अवघड जबाबदारी बायकोवर येऊन पडते. मी मात्र फक्त सोपी कामं माझ्याकडे ठेवतो. तिकीटं काढणे, हॉटेलचे बुकिंग करणे आणि शॉपिंग करून झाल्यावर काउंटरवर बिलं भरणे इत्यादी.
बॅगा भरणे हा एक मोठा प्रोजेक्ट असतो. माझ्या मुली आणि बायको यांची एक नेहमीची तक्रार - प्रवासात घालायला कपडेच नाहीत. जे आहेत ते पूर्वीच्या ट्रिपमध्ये घातल्यामुळे ते सगळ्या फोटोत आले आहेत. आता आम्हाला नवीन कपडे घ्यायलाच हवेत. तुमचं काय! तुम्हीतर कित्येक वर्षांपासून सेमच कपडे घालता. आम्हाला नवीन कपडे ताबडतोब घ्यावेच लागतील. अशा युक्तीवादाचे तात्पर्य नवीन कपडे खरेदीमध्ये होते. अशा संवादाला सांसारिक शास्त्रामध्ये नवऱ्याकडून किंवा वडिलांकडून संमती मागणे असे म्हणतात.. असा गैरसमज जनमानसात पसरला आहे. वास्तविक ती केवळ निर्णयाची अधिकृत सूचना असते. अजून एक महत्त्वाचे निरीक्षण - जाताना सहज भरलेली बॅग परत येताना भरूच शकत नाही. त्यामुळे चाणाक्षपणे बायकोने एक दोन फोल्डेबल बॅग्ज बरोबर घेतलेल्याच असतात. त्यामुळे परतीला बॅगांची संख्या वाढलेली असते.
प्रवासाच्या ऐनवेळेपर्यंत सर्व कामे आटपणे चालूच राहते. दूधवाला, पेपरवाला, कामवाली यांना सुट्टी देणे, सर्व आवश्यक वस्तू बॅगेत भरणे अशी सर्व महत्त्वाची कामे शेवटच्या क्षणापर्यंत चालूच राहतात. आठ दहा दिवस बाहेर राहणार असल्याने सर्व झाडांची काळजी कोण घेणार अशी चिंता दूर करण्यासाठी शेजारी धावून येतात.
अखेरीस सर्व तयारी झाली की प्रवासाचा दिवस उगवतो. ऑफिसचे फोन आता आठवडाभर घ्यायचे नाहीत या वचनावर आमचा प्रवास सुरू होतो. घरापासून एअरपोर्टला पोहोचेपर्यंत मला चार फोन आलेले असतात. कितीही छान तयारी केली तरी काहीतरी विसरलेच पाहिजे असा कदाचित योग्य नियोजनाचा भागच असावा. त्यात जर शंकेखोर मुलीने बोर्डिंगच्यावेळी प्रश्न विचारला “आई, गिझर बंद केला होता ना?” तर मात्र संपूर्ण प्रवासात गिझर डोक्यात चालूच राहतो.
बऱ्याचदा इप्सित स्थळी पोचण्यासाठी विमान प्रवासाच्या बरोबरीने टॅक्सीचा प्रवास सुद्धा क्रमप्राप्त असतो. आधीच ठरवलेला टॅक्सी चालक वाट पाहत उभा असतो. आपल्याला तो विमानतळाच्या दारात उभं करून कुठेतरी लांब उभी केलेली टॅक्सी आणायला निघून जातो. तब्बल अर्धा तास ताटकळल्यानंतरच त्याच्या टॅक्सीचे दर्शन घडते.
माझे एक निरीक्षण - भारतात तुम्ही कोणत्याही भागात फिरायला जावा. सर्व टॅक्सीवाले एकसारखेच वागतात. त्यांच्या अशा वर्तनाचा आणि त्यांचे राज्य, भाषा, वर्ण, रंग-रूप यांचा काहीही संबंध नसतो. स्थानिक राजकारणापासून ते तेथील संस्कृतीचा त्यांचा गाढा अभ्यास असतो. या चालकाच्या मते, ते आणि त्यांचे मित्रमंडळी हेच फक्त टॅक्सीची सर्वोत्तम सर्व्हिस देऊ शकतात. बाकी सर्व टॅक्सीवाले हे भुरटे आणि पैसे उकळण्यासाठी धंदा करतात. केवळ तो एकटाच हा व्यवसाय अगदी सचोटीचा करतो, असे त्याचे ठाम मत असते. गाडीमध्ये जर छानशी गाणी लावा अशी विनंती केलीच तर फक्त त्यांच्याच आवडीची गाणी वाजवली जातात. वाटेत जर भूक लागली आणि एखाद्या हॉटेलपाशी थांबण्याची विनंती केली तर फक्त त्यांच्याच आवडीच्या हॉटेलच्या दारीत गाडी थांबवली जाते. तिथं पोचायला अजून दोन तास लागले तरी चालेल. एकंदरीत या चालक वर्गाची मनमानी आणि मर्जी सांभाळतच प्रवास पार पाडावा लागतो.
हॉटेलवर चेक-इन केल्यानंतर सर्वांचा जिव्हाळ्याचा एकच प्रश्न असतो.. वायफायचा पासवर्ड काय आहे? जणू काही त्याशिवाय आपला श्वासच कोंडून जाण्याची दाट शक्यता असते. चुकून माकून एखाद्या हॉटेलवरील वायफाय चालत नसेल तर ते हॉटेल ताबडतोब शून्य रेटिंगमध्ये गणले जाते. रूमवर पोचल्यावर साधारणपणे दोन गट पडतात. एक गट उत्साहात तयार होऊन बाहेर भटकायला सज्ज होतो तर दुसरा गट दमून आता जरा विश्रांती घेतो या मताचा असतो. अर्थातच माझा गट दुसरा आणि बायकोचा पहिला. मुलींना माझ्या गटात सामील व्हायचे असते पण ऐनवेळी आईच्या दबावाखाली त्यांची मतफोडी होते.
जेव्हा घरी असतो तेव्हा आवरून तयार होण्याचा क्रम मी प्रथम, बायको दुसरी आणि मुली शेवटी असा असतो. पण सहलीला गेल्यावर क्रम बदलतो. बायको प्रथम, मी दुसरा आणि मुली शेवटीच. पाच मिनिटांत आवरतो म्हणणाऱ्या माझ्या मुली किमान अर्धा तास लावतात. अजून एक शाश्वत सत्य… हॉटेलमध्ये मिळणारा कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट “आत्ता भूक नाही” या सबबीवर कमी करणाऱ्या मुलींना पुढील निव्वळ एका तासात प्रचंड भूक लागते. या अनुभवासाठी त्यांच्या वयाची मर्यादा नाही.
बायकोची आज कोणती ठिकाणे बघायची याची एक चेकलिस्ट तयार असते. त्यात फारशी कोणी ढवळाढवळ केलेली तिला खपत नाही. हे खूप छान आहे, त्याचे युट्युबवर रिव्ह्यू खूप सुंदर आहेत.. या दाखल्यांसमोर आम्ही आमची शस्त्रे टाकून तह पत्करलेला असतो. मुली लहान असताना काही वेळातच कंटाळायच्या आणि रडायच्या, आता पण कंटाळतात आणि परतीचा हट्ट करतात. मी मात्र मुकाट्याने आज्ञेचे पालन करीत चेकलिस्टला न्याय देतो. “आता हे शेवटचे ठिकाण” या नावाखाली आम्ही अजून तीन चार ठिकाणे पाहूनच हॉटेलवर परततो. खरी मजा येते जेव्हा एखादे नवीन ठिकाण यादीत ॲड होते. मुली, ड्रायव्हर आणि मी विरोधात असलो तरी बायकोची बाजू घेऊन मला ड्रायव्हरवर दमदाटी करावी लागते. मुलींवर आईची दमदाटी झाली की ते नवीन ठिकाणसुद्धा आमच्या अजेंडामध्ये ॲड होऊन जाते.
मुली मोठ्या झाल्यापासून त्या आणि त्यांची आई यांची एक स्वतंत्र टोळी बनली आहे. प्रत्येक ठिकाणी आपण ते पहायला आलोय का फक्त फोटो काढायला आलोय अशी शंका येईपर्यंत दीडशे ते दोनशे फोटो काढले जातात. मला बऱ्याच फोटोंमध्ये जबरदस्तीने ओढले जाते आणि कृत्रिम हास्य दाखवत मी पण फोटोंच्या महासागरात वाहवत जातो. तरीसुद्धा मला सतत “बाबा, फोटोत जरा हसा.” अशा सूचना मिळत असतात. हसण्याची अट माझ्या मुलींना नसते. फोटोत काहीतरी चित्रविचित्र चेहरे करून, जीभ बाहेर काढून किंवा अतरंगी पोज घेऊन फोटो काढल्याबद्दल त्यांचे त्यांच्या आईला प्रचंड कौतुक! माझ्या एकाच पोजवर मात्र असंख्य टिकास्त्रे!!
“पुढचा पॉइंट इथंच आहे”.. असं आश्वासन देत टॅक्सीवाला आम्हाला किमान पंचवीस किलोमीटर घेऊन जातो. प्रवासाच्या सुरुवातीच्या तासाभरातच कंटाळलेल्या जीवांना पुढील सात आठ तास तो प्रवास नकोसा वाटतो. प्रत्येक स्थळाला भेट देत असताना माझे लक्ष सर्वांवर असते. उगाच कुणी रेंगाळू नये आणि मागे राहून कोणी चुकू नये इतकीच माफक अपेक्षा. पण म्युझियम असो वा एखादे उद्यान, फोटो काढत टाइमपास करण्याची माझ्या कुटुंबाला प्रचंड हौस! मी मात्र मेंढरं हाकणाऱ्या मेंढपाळासारखा सतत ओरडत राहतो. वेळेचे भान हा केवळ माझा विषय असतो आणि बाकीच्यांनी तो ऑप्शनला टाकलेला असतो. परतीला थोडा जरी उशीर झाला तर ड्रायव्हरच्या माझ्याकडे तक्रारी सुरू होतात आणि त्याला समजावताना माझी मात्र दमछाक होते. अखेरीस जास्तीचे पाचशे रुपये देऊन त्याची उपकारफेड करावी लागते.
सहलीमधील खरेदी हा एक राष्ट्रीय चर्चेचा विषय आहे. मला खरेदीपेक्षा निसर्गसौंदर्य कॅमेऱ्यात व डोळ्यात बंद करायला आवडते. माझ्या कुटुंबाला मात्र कपडे खरेदी किंवा स्थानिक वस्तू खरेदीमध्ये प्रचंड रस. सहलीपूर्वी केलेल्या खरेदीचा या नवीन खरेदीशी तसा तात्त्विकदृष्ट्या कोणताही संबंध नसतो. आणि वस्तूंचे विचाराल तर त्या विकत घेताना जितक्या प्रेमाने न्याहाळल्या जातात, त्याहून कैकपटीने अधिक घृणेने त्यांना काही महिन्यांतच अडगळीतून उचलून फेकताना पाहिले जाते. त्या फोल्डेबल बॅग्ज दुथडी भरून वाहण्यात या वस्तू आणि कपडे यांचा सिंहाचा वाटा असतो.
सर्व स्थळांना योग्य न्याय देत आम्ही ट्रिपच्या अखेरच्या दिवसापर्यंत पोचतो. आठ-दहा दिवस कसे भुर्रकन उडून गेले याची खंत सर्वजण बोलून दाखवतात. मी मात्र माझे लाखभर रुपये कसे भुर्रकन उडून गेले या हिशोबात असतो. एखादे युद्ध जिंकल्याच्या आविर्भावात आम्ही विमानतळावर तीन-चार तास लवकरच पोचतो. तिथल्या लाउंजमध्ये मला एकट्यालाच प्रवेश असल्याने विमानतळावरच टाइमपास करण्याचा निर्णय घेतो. सबवे, बर्गर किंगपासून कन्नू की चाय आणि बेस्ट ऑफ साऊथ यांचे हजार-दोन हजारचे देणे देऊन टाकावे लागते. मागील जन्माचे देणे… अजून काय?
एक विदारक सत्य… वर्षभराच्या धकाधकीचा शिणवटा घालवण्यासाठी सहलीला जाऊन आम्ही इतके दमून येतो की परतल्यावर आम्हाला अजून दोन दिवस सुट्टी काढून घरातच मस्तपैकी विश्रांती घ्यावीशी वाटते. सहलीचा सगळा थकवा, खर्च आणि गोंधळ विसरायला साधारण सहा महिने लागतात. आणि मग पुन्हा एकदा घरात चर्चा सुरू होते… ‘यावेळी कुठे जायचे?’


No comments:
Post a Comment
Name:
Message: