Saturday 17 March 2018

श्रीदेवी, बाथटब आणि मी

सवयी प्रमाणे मी झोपेतून जाग आल्यावर सर्वप्रथम फोन पाहीला आणि एक दु:खद धक्काच बसला. चांदनी गर्ल श्रीदेवीचे निधन झालेले वाचून खुपच वाईट वाटले. आणि क्वचितच सौ बरोबर एकमत झाल्याने दोघानी मुकपणे चहा पिला. मुकाट्याने आवरून मी ऑफीसला गेलो पण सौ मात्र दु: सागरात बुडालेलीच होती. सोशल मिडीया वर आणि इंटरनेटवर श्रीदेवीच्या गाण्यांच्या आणि चित्रपटांच्या क्लिप्स पहात एक दोन दिवस कसे गेले समजलेच नाही.

हळू हळू बातम्या येत गेल्या तसे श्रीदेवीच्या मृत्यूचे रहस्य उलगडत गेले. बोनी कपूरवर संशय व्यक्त झाल्यावर समस्त नवरे मंडळीचा उध्दार ऐकावा लागला. जणू काही जगातील सर्व नवरे मंडळींनी मिळूनच कूट कारस्थान रचले आहे. अखेरीस सुदैवाने बोनी कपूर निर्दोष असल्याची बातमी आली आणि मी सुटकेचा निश्वास टाकला. तरीपण नवऱ्यांवर केलेल्या लाख आरोपांवर यत्किंचीतही खेद अथवा माफी कुठेही कोणीही व्यक्त केली नाही. काय करणार! पुरषाचा जन्म! अखेरीस श्रीदेवीची बातमी या स्पष्टिकरणावर स्थिरावली की तिचा मृत्यू हा अति मद्यपान केल्यावर बाथटब मधील पाण्यात बुडून झाला. आता मात्र पुरषाच्या ऐवजी कधी मद्याचा तर कधी बाथटबाचा जाहीर निषेध सुरू झाला. माझ्या बराचशा मित्रांचे मद्याची चालू असलेली अवहेलना पाहून मन द्रवले आणि एका संध्याकाळी शांतपणे एकत्र येऊन शोक व्यक्त करण्याचा कार्यक्रम करण्यात आला. मद्याची चाललेली कुचंबणा मी समजू शकतो पण बिचाऱ्या बाथटब चा काय दोष? साबणामुळं पाय घसरला असेल, किंवा पाण्यात पडलेला साबण शोधायला जास्त वेळ लागला असेल, किंवा कदाचित पाण्यात रूपयाचं नाणं पडलं असेल ते शोधण्यात वेळ गेला असेल, किंवा शाॅपिंग करून शिणवटा आल्याने चुकून डोळा लागला असेल... काहीही घडू शकते. पण त्या बिचाऱ्या बाथटबाला का दोष देता.

पण या बाथटब प्रकरणाने आमच्या घरामधे एक भीतीचे सावट उत्पन्न केले. आमच्या घरामधे दोन बाथरूम आणि सहा माणसं आहेत. एका बाथरूम मधे बाथटब आहे तर दुसऱ्यात शाॅवर आहे. आई बाबा वयाचा दाखला सादर करून फक्त शाॅवर चेच बाथरूम वापरतात. या घटनेपर्यंत मुलाना बाथटब चे आकर्षण होते. मला सौ ला बाथरूम निवडीचा हक्क दिला गेला नव्हता. उपलब्धते प्रमाणे वापर या तत्वावर प्रवेश मिळत असे. पण या बाथटब प्रकरणाने घरामधे एक दहशतीचे वातावरण निर्माण केले. घरातील प्रत्येकाला अगदी दिवसा ढवळ्या सुध्दा बाथरूम मधे एकट्यानं जायची भीती वाटू लागली. पण बाथरूम हे स्थान असे आहे की तिथे कितीही भीती वाटली तरी एकट्यानेच जावे लागते. या मुळे सर्वांचा फक्त एकाच बाथरूमचा वापर सुरू झाला. माझा दश वर्षीय छोकरा तर दात घासण्यासाठी सुध्दा बाथटबवाल्या बाथरूम मधे जाण्यास नकार देऊ लागला. मला पण त्या बाथटब मधे उगाचच पडेन का काय अशी भीती वाटू लागली. एकदा माझी आई बाथरूमच्या दारात पाय ठेचकळून पडली आणि तिचा पाय मुरगळला. माझ्या षोडश वर्षीय मुलीनं मला ऑफीसमधे फोन करून वर्दी देताना या कृत्यामधे बाथटब चा हात असण्याची शक्यता वर्तवली

अशाच या दहशतीच्या वातावरणात मी मात्र तानाजी मालूसरे प्रमाणे बाथटब वाल्या बाथरूमचा वापर करू लागलो. छोकऱ्याने मला बाबा तुम्ही पण पडाल अशी सुचना दिली. तर कन्येने बघूया तरी नक्की काय होतंय अशा भावनेने मला प्रोत्साहन दिले. आई ने मला दरडावून वापरण्याचा सल्ला दिला. सौ नेसगळे म्हणतायत ना मग कशाला वापरताय?” असा पोकळ सल्ला दिला. मी बाथरूम मधे गेलो की दर दोन मिनीटाने आई मला हाक मारू लागली. मुलं दारावर बडवून माझ्या प्रतिसादाची अपेक्षा करू लागली. बाथरूम मधील शांतता भंग झाल्यामुळे माझा सर्वच व्यक्तिगत विधींचा आनंद पुरता नष्ट झाला. यमुनाजळी खेळ करणाऱ्या गवळणींना बालकृष्णाच्या खोड्यानी किती त्रास झाला असेल याचा काहीसा अनुभव मी घेतला.

अशातच एकदिवस साबणानं बुळबूळीत झालेल्या टबातून बाहेर येताना माझा पाय सटकला आणि मी तोंडावर पडलो. धडामऽऽ! असा आवाज झाला आणि बाहेर आई, सौ इत्यादी लोकांच्या तोंडचे पाणी पळाले. मी अजून जीवंत असून सुध्दा माझ्या बद्दलचा शोक माझ्या कानाला ऐकावा लागला. पाठीतून आलेली कळ सहन करीत मी ओरडूनअजून मी आहेअशी वर्दी दिली. त्यावेळी बाहेरचा शोक थांबला. मी उठून गडबडीत आवरून बाहेर आलो. सर्वांचे सांत्वन केले. मी ठिक आहे हे पाहून सर्वांचा भ्रमनिरास झाला. एकंदरीत बाथटब प्रकरण अंगावर येऊ लागले होते. आईने मला ताबडतोब तो टब काढून टाकायला सांगितला. “तू काय तरूण आहेस रे! आम्ही पडलो तर...” अशी भीती वजा धमकी पण मला देण्यात आली. मी पन्नाशीला आलो तरी मला कोणी तरूण म्हणल्याने मला थोडेसे बरे वाटले. पण पाठ चांगलीच रगडून निघाली होती.

ऑफीसमधे लंच टेबलवर हा विषय छेडला. काही विद्वान मंडळींच्या मेंदूतून सुपिक कल्पना मिळण्याचे हे हमखास ठिकाण. एकानं सल्ला दिला कीसरळ ती अडगळीची खोली करून टाक.” दुसऱ्या एका विद्वानानं सुचवलं कीसर्वाना पोहण्याच्षा क्लासला घाल.” मग कोणीतरी शंका उपस्थित केली, “बाथटब मधे पोहण्याचे क्लास असतात का?”. बराच वेळ शांत बसलेल्या हुशार सहकाऱ्याने यावर हसून एक सल्ला दिला. “अरे! सोप्पंय! माझ्या घरातील बाथटबा जवळ मी सरळ बार लावून टाकला.” या सांगण्यावर बाकीचे हुशार उडालेच. एकानं बाथरूम मधील बार पाहण्याची इच्छा दर्शवली. तर दुसऱ्याने कलेक्शन काय काय ठेवलंयस या बद्दल उत्सुकता दाखवली. तिसऱ्याने उद्या आंघोळीला तुझ्याकडेच येतो असे पण सांगून टाकले. “अरे पण तुझा पिऊन श्रीदेवी होईल ना!” या माझ्या भोळ्या प्रश्नावर त्या बारवाल्या विद्वानाने अखेरीस कपाळाला हात लावून सांगितले कीबार म्हणजे आधारासाठी दांडा रे!”. मला त्याच्या बोलण्यात तथ्य वाटत होते. तसेही आईच्या सांगण्यानूसार टब काढून टाकणे हा भलताच महागडा उपाय होता. त्यापेक्षा भिंतीवर आधारासाठी एक बार लावून घेणे सोपे काम होते. दुसऱ्या दिवशीच एका हॅंडी मॅन ला पाचारण करण्यात आले. त्याला पंन्नास डाॅलरची दक्षिणा देऊन वीस डाॅलरचा एक आधाराचा बार भींतीवर मारून घेतला. जनमानसातली भीती नष्ट होण्यासाठी मी दुखऱ्या पाठीने बाथटबात स्नान करू लागलो. माझ्या पावलावर पाऊल ठेवून माझ्या मुलाने तो ही धाडसी असल्याचा दाखला दिला. अशा प्रकारे हळू हळू एक दोन महिन्यात बाथटब नामक थरार नाट्यातून कुटूंबाची सुटका करण्यात मी यशस्वी झालो.

3 comments:

Name:
Message: