Sunday 27 May 2018

जावे मस्कतासी

जगातले सर्व देश फिरून पहावेत अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. पण काही ठराविक देशां बद्दल लोकांची विशिष्ट मते बनलेली असतात. आखाती देशां बद्दल असाच काही विचार आपल्या मराठी मध्यम वर्गीय मानसिकतेवर ठसलेला आहे. आखाती देश म्हणले की वाळवंट, उंटावर बसलेले अरब, भरपूर सोने आणि पैसा, छावण्यांवर रंगलेल्या रंगेल मैफीली आणि बंदूकीच्या गोळीवरचा कायदा असा काहीसा समज मी सुध्दा करून घेतलेला होता. माझे कामाचे स्वरूप सिंगापूर ते जपान आणि चायना ते ऑस्ट्रेलिया अशा भौगोलिक पट्ट्यात असल्यामुळे आखाती देशात जाण्याचा प्रसंग तसा कधी नाहीच. पण काही कारणाने माझ्याकडे एक ओमानचा प्रोजेक्ट चालून आला.

घरात या देशाचे नाव ऐकून जरा भीतीचे वातावरण तयार झाले. काही अनुभवी सहकाऱ्यानी मला ओमान बद्दल बऱ्याच चांगल्या अनुभवाची यादी सादर केली. तर काहीनी या आखाती देशात कशी दहशत आहे याचे वर्णन सांगितले. मी दोन्ही बाजू ऐकून अधिकच गोंधळून गेलो. अखेरीस ओमानच्या प्रोजेक्ट मॅनेजर ला फोन लावून शहानिशा करायचे ठरवले. त्यानं तर माझी भीती ऐकून मला वेड्यातच काढायला चालू केले. अतिशय सुरक्षित आणि आधुनिक देश आहे, अद्ययावत सर्व सुख सोयींनी युक्त असा देश असून मस्कत नावाच्या राजधानीतच आपले काम आहे. निव्वळ तीन चार आठवड्याचा प्रश्न आहे. भारतीय पध्दतीचे बरेच रेस्टाॅरंट उपलब्ध असल्यामुळे जेवण खाण्याची बरीच रेलचेल आहे इत्यादी इत्यादी. पोटाचा प्रश्न सुटत असेल तर बाकीचे प्रश्न दुय्यम आहेत अशी काहीतरी खुणगाठ बांधली आणि मी ठाम निर्णय घेतला. घरच्यांचा विरोध पत्करून या देशी जाण्याचा निर्णय घेतला.

माझा व्हिसा, विमानाचे तिकीट, हाॅटेलचे बुकींग, पिकअप टॅक्सी सर्व सोपस्कार ओमानच्या ऑफिसने व्यवस्थित रित्या पार पाडले. माझ्यावर फक्त प्रवासाची जबाबदारी सोडली होती. ठरलेल्या तारखेला आणि वेळेला मी प्रवास पार पाडून मस्कत मुक्कामी दाखल झालो. दिवसा उजेडी पोचत असल्यानुळे विमानातून मस्कतचे विहंगम दृष्य दिसले. संपूर्ण शहर डोंगरांनी वेढले गेले आहे. पण सगळे डोंगर बोडके आणि करपलेले दिसत होते. गवताच्या काडीचाही कुठे लवलेश दिसत नव्हता. तरीपण या देशा बद्दल उत्सुकता शिगेला पोचलेली होती. नव्या कोऱ्या विमानतळावर उतरल्यावर ओमानी संस्कृतीचे दर्शन घडू लागले. आर्थिक सुबत्तेच्या देशात माणसांची कमी होती. ठिक ठिकाणी काळा बुरखा घातलेल्या महिला (आत महिलाच असाव्यात) आणि पांढरा झब्बा उर्फ झगा घातलेले दाढीवाले मियाँ फिरत होते. परदेशी जनता पण बरीच दिसत होती पण शक्यतो त्यानी सुध्दा अंगभर कपडे घालून या देशाची संस्कृती जपलेली होती. जागोजागी उंटांची चित्रे दिसत होती. विमानतळा बाहेर टांगेवाल्या प्रमाणे उंटस्वार दिसले तरी त्यात नवल वाटले नसते. पण तसं काही घडलं नाही. लांबच्या लांब टॅक्सिच्या रांगेतून एक टॅक्सी पकडून हाॅटेलवर पोचलो.

दुसऱ्या दिवसा पासून प्रोजेक्ट चे काम सुरू झाल्यामुळे मान वर करून पहायला सवड नव्हती. तरीपण हाॅटेल ते साईट साधारण ४० मिनीटाच्या प्रवासात सुबक, आखिव-रेखिव मस्कत शहराचे दर्शन होऊ लागले. रस्ते, दुतर्फा इमारती, माॅल्स... सर्व काही अगदी नवेकोरे. कुठेही घाण अस्वच्छता मुळीच नाही. नेमका मे महिना गाठून गेल्यामुळं सूर्यदेव भलतेच प्रसन्न झाले होते. दुपारच्या घडीला साधारण ४५ ते ४७ तापमान असे. सकाळी साडे पाच वाजताच लख्ख सूर्यप्रकाश पडलेला असे. संध्याकाळी सात वाजून गेले तरी बाहेर उजेड दिसत असे. आमचे तसे सर्व काम एसी मधेच असल्यामुळे आम्हाला फारसा त्रास नव्हता. पण जर कोणी चुकून दुपारी बाहेर गेलाच तर डोक्यातून धूर येईल असे वाटू लागे. हवेत आद्रता काहीच नसल्यामुळे उन्हाचे चटके हे तप्त भट्टीत हात घातल्या प्रमाणे असे. शहराच्या चहू बाजूनी वेढलेले बोडके डोंगर या उन्हाने करपून गेल्या सारखे दिसत होते. हे असे डोंगर दुरूनही मुळीच साजरे वाटत नव्हते.

या देशांमधे आठवड्याची अखेर शुक्रवारने होते. पाच दिवस काम करणाऱ्या कचेऱ्यांमधे शुक्रवार शनिवार अशी सुट्टी असते. रविवारच्या दिवशी सगळी मंडळी आपल्या सोमवारची लगबग करीत आपापली कचेरी गाठतात. जगापेक्षा असं काहीतरी वेगळं करण्यात याना कोणती धन्यता मिळते अल्ला जाणे. पण प्रार्थनेचा दिवस शुक्रवार असल्यामुळे या अशा प्रश्नांना स्थान नाही. दुबईमधे सर्व टॅक्सीवाले हे भारतीयच असतात त्यामुळं तिथं बिनधास्त हिंदी मधे पत्ता सांगून इप्सित स्थळ गाठता येते. ओमान मधे तशी सुविधा नाही. ओमान मधे सर्व टॅक्सीवाले हे स्थानिक ओमानी अरबच असतात. त्याना हिंदी अथवा इंग्रजीचा फारसा गंध नसतो. क्वचित काही सापडतात जे जुजबी हिंदी बोलू शकतात. अशावेळी साहीर लुधियानवी, जावेद अख्तर अशा हिंदी कम उर्दू कवीश्रींची बरीच मदत होते. मालूम? माफी! इन्शा अल्ला! असले काहीतरी शब्द फेकून संवाद साधता येतो. एका शब्दात संवादाची कला आपोआप विकसीत होते. खरी तारांबळ उडते उजवा किंवा डावा सांगताना. आजही मला देहना बाया यामधे गोंधळ होतो. आधीच टॅक्सी वाल्याचं हिंदी कमकवूत त्यात जर आपल्याकडून असा गोंधळ झाला तर तो भलताच वैतागतो. बिचाऱ्याला त्याचा वैताग सुध्दा आमच्या पर्यंत पोचवता येत नाही. त्यामुळे आम्ही निवांत! अरबी भाषेत काहीतरी बरळत गप मुकाट्यानं गाडी हाकतो.

एकदा मी आणि माझा एक मराठी सहकारी टॅक्सीने जाण्यासाठी निघालो. टॅक्सी वाल्या ओमानी मामाला मी लिहून घेतलेला पत्ता दाखवला. त्यानं इंग्रजी वाचण्याची असमर्थता दर्शवली. माझा सहकारी हार मानायला तयार नव्हता. त्यानं गुगल मॅप वर तो पत्ता दाखवला. त्यातून जरी मामाना काही बोध होणं अपेक्षित असलं तरी ते अधिकच गोंधळलेले दिसू लागले. पुन्हा त्यांच्याच डोक्यात काहीतरी चमकलं असावं. गोल टोपीच्या आत चमकल्यामुळं मला नीटस दिसलं नाही. त्यानं त्याचा मोबाईल उघडून काहीतरी पत्ता शोधला आणि होकारार्थी मुंडी हलवून आम्हाला टॅक्सीत बसायची विनंती वजा जबरदस्ती केली. त्याच्या फोनवरचा मॅप अरेबीक भाषेत होता आणि सहकाऱ्याचा इंग्रजीत. इन्शा अल्लाह! मला तरी दोन्ही चित्रांमधे कुठेच साम्य दिसत नव्हते. तरीपण लोकाग्रहास्तव आम्ही मामांच्या अरेबीक शब्दांचा (काहीतरी वल्लाह! वल्लाह!) मान ठेऊन स्थानग्रहण केले. टॅक्सी भरधाव मस्कत ओलांडून बरीच दूर वर आली. खिडकीतून सगळे रस्ते पहात आम्ही आमचे गुगल तपासत होतोच. एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली ती म्हणजे वाटेत लागणाऱ्या प्रत्येक रस्त्याचे भागाचे नाव अल पासून सुरू होतं. अल कुरम, अल मलिह, अल कुलेह, अल महा... अशा कठिण प्रसंगी भगवंताचे नामस्मरण व्हावे हा एकच उद्देश असावा. भले तो भगवंत अल्लाह का असेना! सहकाऱ्याला जाणिव झाली की आम्ही कुठंतरी भरकटलोय. त्यानं त्याच्या मोबाईल वरून मामाना पुन्हा काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला. मामानी तिरक्या  नजरेतून मोबाईलची स्क्रिन निरखली आणि काहीतरी बडबडायला सुरवात केली. पुढच्या चौकातून तो यु टर्न घेऊन पुन्हा मागे फिरला. पुणेरी भाषेतआधीच नीट पत्ता सांगायला काय होतंय?” असं काहीतरी तो बडबडला असावा असा माझा अंदाज. त्यानंतर सहकाऱ्यानं त्याच्या गाडीच्या दिशेचा पुर्ण ताबा घेतला आणि अखेरीस ते ठिकाण गाठलेच. लांबचा फेरफटका जणू आमच्यामुळेच पडला असा दावा करीत त्या मामानी रियाल अधिक उकळला. या उपर एका कागदावर काहीतरी गिरगटून आम्हाला असा सल्ला दिला की हा कागद टॅक्सिवाल्याना दाखवा म्हणजे ते तुम्हाला नीट सोडतील. त्या कागदावर त्यानं मॅप काढला होता का अरेबीक भाषेत लिहलं होतं याचा आम्हाला मुळीच बोध झाला नाही. तो कागद समोर कोणत्या दिशेत धरावा याचेही ज्ञान आम्हाला नव्हते. तरीपण आम्ही त्याचे शतश: आभार मानले आणि त्याला चालता केला.

कोणत्याही देशाबद्दल बोलताना त्यांच्या खाद्य संस्कृती बद्दल बोलता विषय संपुच शकत नाही. खाऊ गिरी मधे सुध्दा हा देश मुळीच मागे नाही. हरीस, कबाब, बिर्याणी आदी बरेच पदार्थ ओमानी चवींचे प्रात्यक्षिक देतात. अर्थात मांसाहारी पदार्थांची यांच्याकडे बरीच रेलचेल आहे पण माझ्यासारख्या पापभिरू माणसासाठी शाकाहारी पर्याय पण उपलब्ध आहे. या देशाचे राष्ट्रिय खाद्य म्हणजे खजूर. अतिशय उच्च दर्जाचे खजूर सर्व दुकानातून विकायला ठेवलेले असतात. मी तर ऐकलंय की काही खजूरांच्या बागांमधे फुकट प्रवेश दिला जातो आणि हवे तेवढे खजूर तुम्ही खाऊ शकता. ओमानी संस्कृती मधे पाहुण्याला सतत कावा (ओमानी काॅफी) देण्याची पध्दत आहे. कोणत्याही मोठ्या दुकानात गेलं की तिथं छानशा सुरईमधे कावा भरून ठेवलेला असतो. खरेदी होई पर्यंत आपण घोट घोट तो कावा घशाखाली ढकलण्याची मुभा असते. शिवाजी महाराज्यांच्या गनिमी काव्याचा इथं काही संबंध नसावा असा माझा समज आणि सुरई मधून हा कावा देणाऱ्या नोकराला हे लोक कावेबाज म्हणत असावेत असा माझा गैरसमज! अजून एक ओमानी संस्कृतीचा नमुना म्हणजे ओमानी हलवा! अशी ही मिठाईची दुकानं जागोजागी दिसतात. या दुकानांमधे मस्त पैकी बैठक घालून सरंजामी बडदास्त ठेवलेली असते आणि विविध प्रकारच्या मिठाया टेबलावर मांडून ठेवलेल्या असतात. लाजता प्रत्येकजण सुमधूर हलव्याची मिठास जीभेवर सोडत असतो. मिठाई विकत घेण्याची सक्ती नसते. आम्ही पण बऱ्याचदा अशी भेट देऊन जीभेचे चोचले पुरवले. अखेरीस भारताचा मान राखण्यासाठी पाव किलो मिठाई चौघांच्यात मिळून विकत घेतली

आपल्या मनामधे या अरब देशवासीयांबद्दल काहीही कल्पना असल्या तरी प्रत्यक्ष अनुभवावरून माझे मत असे आहे की, ओमानी लोक हे शांत स्वभावाचे, मितभाषी आणि तसे बऱ्यापैकी कामात चोख असतात. माझ्या सहकाऱ्यांची मतं काहीशी भिन्न आहेत. त्यांच्या मते ओमानी व्यक्ती आळशी आणि कामचुकार असतात. कारण त्याना विमानतळावर इम्रिगेशनला भलता त्रास झाला होता. माझा अनुभव मात्र उत्तम होता. खाणे, मित्र परीवारास भेटणे अशा गोष्टींमधे या ओमानी मंडळीना उत्साह वाटतो. रमादान च्या काळात मात्र दिवसभरच्या उपवासामुळे काहीसे निष्क्रिय होतात. घरी शांत पडून राहणं त्याना पसंत असावं. मला या ओमानी लोकांमधे दोन प्रकार दिसतात. एक तर काळे लोक किंवा गोरे पान लोक. मी ऐकलेल्या कारणावर विश्वास ठेवणं कठीण. ओमानी लोकाना परदेशी स्त्रियांबरोबर लग्न करण्याची भलती हौस! ज्या लोकानी आफ्रिकन मुलींशी लग्न केली त्याना काळी मुलं झाली. या उलट ज्यानी गोऱ्या मुलींशी लग्न केले त्यांची मुलं गोरीपान उंचीपुरी झाली. काही ओमानी लोकानी कोकणी मुलीं बरोबर संसार थाटला आहे असं म्हणतात. मला असं सांगण्यात आलं की एखादा अरब जर शुध्द मराठीत बोलला तर आश्चर्य वाटण्याची गरज नाही. फक्त इतकंच समजावं की त्याची माता ही आपली देशभगिनी असावी. सर्वांची दाढी मात्र रेखीव, बांधा उंच आणि प्रत्येकाच्या अंगात पांढरा झब्बा. प्रत्येकाच्या डोक्यावर गोल टोपी सुध्दा नक्की! सर्वाना टोपीत पहाण्याची सवय झाल्यामुळे कधी कोणी टोपीविना भेटला तर ओळखूनच यायचा नाही. किळसवाणा प्रकार इतकाच की कित्येकदा ऑफीसच्या वाॅश रूम मधे या मंडळीना मी चप्पल काढून झगा वर घेऊन बेसिन मधे पाय धुताना पाहीलं आहे

अशा या मस्कत शहरातला मुक्काम पुन्हा कधी होईल याची शक्यता थोडी कमीच होती. एक वेगळा अनुभव म्हणून या शांत सुबक शहराची प्रतिमा कायमच स्मरणात राहील हे नक्की.

आजही कोणी झब्बेवाला आणि गोल टोपीवाला माणूस भेटला तरसलाम वालेखुम!” असे शब्द आपोआप बाहेर पडतात.

3 comments:

  1. वाह, काय खूब वर्णन केलं आहे सर.भारतीय लोकांचा दबदबा असलेलं एक उत्तम शहर असा म्हणू शकतो. आपल्याला फिरायला घेऊन गेलेल्या इसमा बद्दल पण असाच एक लेख वाचायला आवडेल.

    ReplyDelete
  2. खुप छान! माझा एक मित्र पण मस्कतला राहून आलाय, त्याला पण ते शहर आवडलं.

    ReplyDelete

Name:
Message: