Monday 19 February 2018

औषध

या घटनेला पंधरा एक वर्षे लोटली असतील. मी असाच कुठेतरी सेल्स काॅलवर भटकत होतो. सोलापूरहून एक संध्याकाळची ट्रेन पकडून पुण्याच्या दिशेने जात होतो. आयत्या वेळी माझी ट्रिप ठरल्यामुळे मिळेल त्या ट्रेनचे बुकींग केले होते. निव्वळ नावालाच तो एसी डबा होता. आतमधे एक कुबट वास दरवळत होता. पाठीला लॅपटाॅपची बॅग आणि हातात एक ओढायची बॅग अशा थाटात डब्यात चढताना माझा पाय सटकला आणि गुडघ्याच्या खाली जरा मार बसला. मी पटकन स्वत:ला सावरलो आणि डब्यात शिरलो. मध्यम वर्गीय सवयीप्रमाणे गर्दी नसली तरी पब्लीक ट्रान्सपोर्ट मधे गडबड करीत चढण्याची वाईट सवय लागली होती. तिचाच परीणाम पायावर नोंदला गेला होता. दुखऱ्या पायाने सीट नंबर शोधून काढला. डब्याच्या जवळपास कुठेच टिसी नामक प्राण्याची चिन्हे दिसत नव्हती. अथवा एखादा रेल्वेचा स्टाफ पण नव्हता. संडासच्या पॅसेज मधे कोणी उभा राहीला तर भयंकर वासानं मुर्छा येऊन पडला असता; तरीपण कोणी दिसतो का हे मी पाहून आलो. वास्तविक एसी डब्यात उशी पांघरूण देतात, पण आज माझ्या नशिबात कोणतीच सोय लिहून ठेवली नव्हती

त्याकाळी कंपनीच्या कामासाठी मला बरंच फिरावं लागत असे. जाॅब सेल्सचा असल्या मुळे क्लाएंट जिथं असतील तिथं मजल दरमजल करीत फिरण्या शिवाय गत्यंतर नसायचे. देशाच्या काना कोपऱ्यात पसरलेल्या ट्रेनच्या जाळ्याचा पुरेपुर फायदा मला होत होता. माझ्या कंपनीचे सर्व क्लाएंटस हे मॅन्युफॅक्चरींग प्लँटस असल्यामुळे प्रत्येक प्रवास हा दूर गावा बाहेरचा असायचा. आजचा प्रवास हा सोलापूर ते पुणे होता.

अतिशय मंद गतीने ट्रेन सुटली. तशी डब्यामधे तुरळक गर्दी होती. पण जसजसा सूर्य मावळतीला निघाला तशी डब्यातील गर्दी अधिकच कमी होत गेली. डब्यातले मंद आणि फडफडणारे दिवे डब्यातील अस्वच्छता झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न करू लागले. माझ्या कंपार्टमेंट मधे मी एकटाच होतो तर शेजारच्या कंपार्टमेंट मधे कोणीतरी जबरदस्त आवाजात घोरत झोपला होता. त्याच्या अधून मधून अडखळणाऱ्या घोरण्याच्या आवाजात डब्यातले फॅन आपले अस्तित्व ऐकवत होते. साधारण आठ साडे आठच्या सुमारास ट्रेन मधेच थांबली. बाहेर किर्र अंधार पसरला होता. डोळ्यात बोट घातलेलं सुध्दा दिसणार नाही इतका अंधार होता. कदाचित आभाळ आल्यामुळं चंद्राला सुध्दा लपून बसावे लागले होते. दहा मिनीटे झाली तरी हलायचे लक्षण दिसेना. मी कंटाळून दरवाज्याकडं गेलो. हलकेच दार उघडून बाहेर डोकावले. लांब पर्यंत नागमोडी उभी असलेली ट्रेन दिसत होती. थोडाफार प्रकाश ट्रॅकच्या शेजारीच दिसत होता. बाकी सगळीकडं काहीच नाही. नक्की शेजारी शेत आहे का नदी आहे; डोंगर आहे का पठार आहे काहीच अंदाज येत नव्हता. इतक्यात कोणीतरी ट्रेन च्या शेजारून चालत जाताना दिसला. मी ओरडूनच विचारलंकाय झालं हो? सिग्नल नाही काय?” त्यानं मागं वळून हातवारे करून सांगितलंआत बसा लौकर! कोणतरी ट्रेन मधून पडून मेलंय!” त्याच्या शब्दात वैताग समजत होता. “कशाला येतात मरायला! #*^@&$”

मी दरवाजा पुढं ढकलून पुन्हा माझ्या जागेवर जाऊन बसलो. थोड्या वेळात ट्रेन सुटली. मी पण निश्वास टाकला. पुणे साधारण अकरा पर्यंत येईल असा माझा अंदाज होता. थोड्या वेळात आवरा आवर करू असा विचार करून बसलो. इतक्यात माझ्या कंपार्टमेंटच्या आणि शेजारच्या कंपार्टमेंटच्या दरम्यान कोणाची तरी हालचाल जाणवली. मघाशी तिथं कोणीच नव्हतं आता हे कोण या विचारानं मी तिथला लाईट लावला. अंधूक प्रकाशात एक चाळीशीची खेडवळ व्यक्ती बसलेली दिसली. डोक्यावर पांढरं फडकं आणि अंगावर घोंगडं गुंडाळून बसलेली दिसली. मी तर अचानक दिसलेल्या त्या माणसाला पाहून घाबरलोच. आवाजात जमेल तेवढा कठोरपणा आणत मी दरडावून विचारलेकोण रे तू? तिकीट काढलंयस का?... टिसी! टिसी! ऽऽटिसी जवळपास कुठंच नाही याची कल्पना होती तरी मी उसनं अवसान गोळा करीत होतो. माझ्या या पवित्र्यामुळं तो माणूस गडबडला. डोळ्यातून त्याच्या अश्रू ओघळू लागले. “सायेब! म्या लगेच जातू. आवं जरा ऐका तर म्या काय म्हणतूया.” मी त्याला पुढच्या स्टेशनला उतरण्याची आज्ञा देऊन थोड्या वेळासाठी बसण्याची अनुमती दिली

आसपासची मंडळी घोरण्याच्या मैफलीत गुंग होती. या माणसानं माझं काही बरं वाईट केलं तर कोणाला पत्ता पण लागणार नाही या कल्पनेनं मी शहारलो. त्याला मी बाहेर जाऊन बसण्याची सुचना केली तरी तो चटकन हलेचना. माझ्या पायाला बसलेला मुका मार ठणका मारत होता. त्याला काहीतरी खायला हवं असेल किंवा पैसे हवे असतील असा मी विचार केला. बॅगेतून चिवड्याचं पाकीट काढून त्याच्या समोर ठेवलं. त्यानं नको म्हणत ते पुन्हा माझ्याकडंच सरकवलं. मी तिथंच राहू दिलं, म्हणलं नंतर घेईल. खिशातून पन्नास रूपये काढून त्याच्यासमोर धरले. आता मात्र तो जरा चिडल्या सारखा वाटला. “सायेब! म्या भिकारी नव्हं! माजी हिकडं दौंड जवळच थोडी शेती हाय. घरला माय आजारी हाय. तिचं अवशीध आनाया पुण्याला  चाललोय. बगा!” त्यानं कनवटी ला लावलेली ओषधाची चिठ्टी काढून समोर धरली. घामानं भिजलेला आणि मळलेला एक कागद त्यानं माझ्याकडं सरकवला. मला त्यातलं काही कळत नसलं तरी उगाचच तो कागद हातात घेऊन औषधाची नावं वाचण्याचा मी प्रयत्न केला. डाॅक्टरचं नाव नीटसं लागत नव्हतं पण औषधाची नावं दिसली. “काय झालंय तुमच्या आईला?” मी तू वरून तुम्ही वर आलो होतो. “अवं गेले दोन हप्ता झालं अंग भाजतया. तालुक्याच्या कालेज मधे आमच्या गावचा एक मास्तर हाय. त्याचंच अवशीध देत होतो. काल पासनं तिनं पार मानच टाकलीया. गावातल्या सरकारी दवाखान्यात डाॅक्टर नव्हता पर तिथल्या कंपांउडर कडून हे अवशीध लिहून आणलंया.” मी तर थक्कच झालो. “तुम्ही चांगल्या डाॅक्टरला दाखवला असता तर बरी झाली असती ना! नक्की कसला ताप आहे हे त्या कंपांउडर ला कसं कळेल?” माझ्या बोलण्याकडं त्यानं फारसं लक्ष दिलं नाही. “आता काय माय जगंल असं वाटत नाही बगा!” मला या बोलण्यानं कसंतरीच झालं. मी धीर देण्याच्या शब्दात बोललोअसा विचार करू नका. औषधं घेतली की नक्की बरी होईल.” यावर तो हसला. त्याचं हसणं मला केविलवाणं वाटलं. “जाऊंद्या! आता कायबी हुवायचं नायी. म्हातारी मरायाचीच होतीमला मात्र त्याचं बोलणं आवडलं नाही. “असं बोलू नये.” असा धीर देण्याचा प्रयत्न केला. त्याचं लक्ष डब्यात इकडं तिकडं गेलं. “तुमच्या डब्यात कोणीबी धक्का देत नाहीत हो! तिकडं जनरल मदी शिराया जागा नाय. अवं दारातच बसलो होतो. पण जागा होईना म्हणून इकडं आलो.” मला त्याचा बद्दल सहानभुती वाटू लागली. माझ्या पायावरची जखम अजून ठणकत होती.   जखमेला निरखतच त्याला बोललो. “टिसी कुठं आहे माहीत नाही. पुणं येईल थोड्या वेळात! तुम्ही बसा पुण्यापर्यंत. पण टिसी आला तर तुम्हाला दुसऱ्या डब्यात जावं लागेल.” त्यानं माझ्या बोलण्याकडं दुर्लक्ष केलं आणि पायाकडं बघितलं. “पायाला हे काय बडीवलंय!” असं म्हणत त्यानं त्याचा शेतात कामं करून रापलेला हात माझ्या जखमेवरून फिरवला. हाताचा एकदम थंड स्पर्श मला विचीत्र वाटला. मी त्याच्या अचानक झालेल्या स्पर्शानं दचकलो आणि मागं सरकलो. पुणे थोड्या वेळात येणार म्हणून आवरून बसलो. अजूनही या माणसावर पुर्ण विश्वास नव्हता; त्यामुळं बॅग सोडून जरा पाय मोकळे करावे म्हणलं तर ते ही शक्य नव्हतं. बॅगेतून सकाळचाच पेपर काढून पुन्हा एकदा चाळू लागलो. तशी त्याच्या वर नजर ठेऊन होतोच पण पेपर मधे डोकं घालण्याचा प्रयत्न करीत होतो. क्षणभर माझी नजर त्याच्यावरून हटली आणि पेपरमधे गेली. पण दुसऱ्या क्षणाला पाहीलं तर तो तिथं बसलेला नव्हता. मी वाकून डब्याच्या पॅसेज मधे शेजारच्या कंपार्टमेंट मधे पाहीलं पण तो कुठेच दिसेना. चालू गाडीत अचानक कुठं गेला काही कळेना. त्याची ती औषधाची चिठ्ठी तशीच तिथं पडलेली होती. मला वाटलं कुठंतरी संडासात गेला असेल म्हणून मी त्याला शोधायचा नाद सोडून दिला. परत येऊन घेईल ती चिठ्ठी असा विचार करून ती तिथंच सोडली



आता पुणे स्टेशनात गाडी शिरत होती. बॅग आवरून गाडी थांबण्याची वाट बघू लागलो. माझ्या पायाची जखम दुखायची पुर्ण थांबली होती. माझे मलाच आश्चर्य वाटले. पंन्नासची नोट आणि चिवड्याचं पाकीट तसेच पडलेले होते. ते पण उचलून बॅगेत टाकले. मी पुणे स्टेशन वर उतरलो. प्लॅटफाॅर्म वर थोडीफार गर्दी दिसत होती. माझ्या गाडीतून बरीच जनता उतरत होती. स्टेशनच्या बाहेर पडण्याच्या दरवाज्याच्या दिशेने चालू लागलो. प्लॅटफाॅर्मवर थोडं अंतर चालून गेल्यावर मी स्ट्रेचर वरून कोणाला तरी गाडीतून उतरवताना पाहीले. तिथं थोडी गर्दी होती. मी थांबून पाहू लागलो आणि हाबकलोच. त्या स्ट्रेचर वर तर तीच व्यक्ती दिसत होती. अंगावर तेच घोंगडं, डोक्याला तेच मळकट फडकं. तिथल्या पोलिसाला विचारलंकाय झालं हो याला?” पोलीसानं तोंडातला तंबाखू चा तोबरा रेल्वेच्या ट्रॅकवर थुंकत मला सांगितलं..”गाडीतून पडला आणि मेला की ह्यो! दारू पिऊन लटकत्यात आणि आमास्नी कामाला लावत्यात. आता करा याचा पंचनामा! ह्यो कोण, कुठला कायबी ठाव नायी!”

No comments:

Post a Comment

Name:
Message: