Thursday 8 February 2018

वर्क फ्रॉम होम

प्रत्येक नोकरदाराचं एक स्वप्न असतं. घरी बसून पगार मिळण्याची सोय व्हावी. गुगल सारख्या मोठ्या कंपन्यानी ऑफीसलाच घर बनवून दिलंय असं मी ऐकलंय. माझ्या ऑफीसच्या कामासाठी युरोपात कधी जावं लागलं तर तिथं माझ्याच कंपनीतली मंडळी घरातूनच काम करताना दिसतात. त्याना माझे ऑफीस त्यासाठी वेगळा भत्ता पण देते असं मी ऐकल आहे. माझ्या कामाच्या स्वरूपात आणि एशियन संस्कृतीत असलं सुख माझ्या नशिबात नाही असं मानून मी स्वत:ची समजूत घालून घेतली. युरोपातून नुकत्याच बदली करून सिंगापुरात आलेल्या आमच्या ऑफीसमधल्या एका हुशार सहकाऱ्याने इथली आमची कामगार अवस्था पाहून आमच्यासमोर भलताच खेद व्यक्त केला. इतक्यावरच थांबता त्याने त्याच्या मॅनेजर कडून आणि HR कडून खास सुट घेतली. त्याला आठवड्यातून तीन दिवस घरून काम करण्याची मुभा देण्यात आली. आम्ही सर्व त्याला परीस गवसल्याप्रमाणे त्याचे कौतुक करीत होतो आणि स्वत:च्या नशीबाला अजून एकदा दोष देत होतो
अशा परीस्थितीवर एक आश्चर्याचा सुखद धक्का देण्यासाठी म्हणा अथवा cost cutting म्हणा; आमच्या HR ने असा फतवा काढला की जर तुमच्या मॅनेजर ला मान्य असेल तर तुम्ही घरून काम केले तर चालू शकेल. पण कोणताही स्वतंत्र भत्ता दिला जाणार नाही. जरी भत्ता नाही मिळाला तरी चालेल पण असा ऑफीशियल राजमार्ग खुला करून दिल्यावर ऑफीसमधे एक उत्साहाचे वातावरण पसरले. काही खडूस लोकानी नाराजी व्यक्त केली तर काही मंडळीनी कंपनीची आर्थिक परीस्थिती आता गंभीर होत जाणार असे सुतोवाच केले. एका पुणेरी चायनीज सहकाऱ्याने तर फारच मौलिक सल्ला दिला. घरून काम करत असला तरी अधून मधून HR ला तोंड दाखवत जावा नाहीतर हे लोक तुमची गरज नाही समजून कामावरून काढून टाकतील. पुणेरी चायनीज म्हणजे बुध्दीने वर्तणुकीने पुणेरी पण जन्माने चायनीज. अपुणेरी तथा हुशार नसलेल्या वाचकांसाठी हा खुलासा. एकंदरीत ऑफीसमधे महिला वर्ग तसेच तरूण वर्गात भलतेच चैतन्य पसरले. जणू जादाचा बोनस मिळाल्याचा आनंद त्याना दिसू लागला. रोजची ट्रेनची कटकट वाचली, घरातील काही कामं उरकता येतील, साईड बाय साईड मुलांचा अभ्यास घेता येईल आदी बरेच प्लॅन अनेकजणांच्या मनात बनू लागले. काही मंडळीना त्याना दिसणारा रोजचा आवडता चेहरा आता दुर्मिळ होणार याचे आतून वाईट वाटले पण चेहऱ्यावर आनंदच दाखवावा लागला.

मी आनंद व्यक्त करावा की दु: या संभ्रमात होतो. बायकोलाच विचारून ठरवावं अशी खुणगाठ मनाशी बांधली. पटकन घरी फोन केला पण सौ च्या दहा मैत्रीणी घरी बसलेल्या होत्या; त्यामुळे तीने मी बिझी आहे सांगून माझा फोन कट करून टाकला. किमान दोन तीन तास मला माझे मत राखून ठेवावे लागणार याचे टेन्शन आले. माझ्या बाॅसने माझ्याजवळ येऊन धीरगंभीर आवाजात सल्ला दिला. हे बघ संदीप, तुम्ही कोणी घरून काम करण्याच्या विरोधात मी नाही रे! पण कामं वेळेत पुर्ण झाली पाहीजेत. मला सतत फाॅलोअप करायला लागू नये. मी त्याच्या हो ला हो मिळवून त्याचा होकार आहे असा अर्थ घेतला. माझा एक जवळचा मित्र जवळ आला. त्याने कदाचित माझी घालमेल ओळखली आणि मला धीर देण्याचा प्रयत्न करीत म्हणाला. अरे काही चिंता करू नको रे! मिळालेल्या संधीचे सोने कर. मस्त निवांत उशीरा उठायचं. ब्रेकफास्ट करून लॅपटाॅप उघडायचा. आंघोळीची घाई करायची नाही. बायकोला चहा दे, पाणी दे अशी आज्ञा सोडायची. आपण रोज कसे राबतो ना त्याची घरच्याना जरा कल्पना येईल. मला त्याचं सगळं पटत होतं फक्त ते आज्ञेचं जमेल का नाही याची खात्री नव्हती.

घरात ही बातमी कशी द्यायची याची मनातल्या मनात उजळणी करीत मी घरी पोचलो. अगदी जवळ येऊन ठेपलेल्या परीक्षेमुळं कन्येचा अभ्यास आणि सौ चे टेन्शन टिपेला पोचलेले होते. इतक्या मोठ्या गंभीर विषयासमोर माझ्या क्षुल्लक बातमीची किंमत काहीच नसल्यामुळे मी आवंढा गिळून गप्प बसलो. सगळ्यांची जेवणं, टिव्ही वरील उत्कंठावर्धक धारावाहीका आणि सगळी आवरा आवर झाल्यावर मला थोडा अवधी मिळाला. सौ तरीपण बिझीच दिसत होती; पण माझं ऐकण्यासाठी तिचे कान रिकामे दिसले. मी अखेरीस बातमी फोडली. आमच्या ऑफीसमधे वर्क फ्राॅम होम ची मुभा दिली असल्यामुळे मी उद्यापासून घरातूनच काम करेन. अगदीच काही महत्वाचे काम असेल तर ऑफीसात चक्कर मारेन. सौ नेउगाच चेष्टा करू नकोसअशी प्रतिक्रिया दिली. कन्येने तरवाह! सो लकी! बाबा, आम्हाला पण स्टडी फ्राॅम होम असं का करत नाहीत?” असा तात्विक प्रश्न विचारला. मी कन्येकडे दुर्लक्ष करून सौ ला आनंद झालाय या कल्पनेनेअगं खरंच मी उद्या घरातून काम करेन.” असं समजवायचा प्रयत्न केला. सौ ने हातातले काम क्षणभर थांबवून माझ्यावर कटाक्ष टाकला. “कशाला काहीतरी खुळ! तुम्ही गप मुकाट्याने उद्या ऑफीसला जावा. उगाच सर्वाना मी काय उत्तर देऊ?” मला याचा उलगडा होईना की हिला सर्व असे काय यक्ष प्रश्न विचारतील की ज्याचे उत्तर देणे खुप कठीण काम आहे! अखेरीस मी निश्चय केला आणि ते मी निक्षून सांगून बेडरूम मधे झोपायला निघून गेलो.

दुसऱ्या दिवशी नेहमीच्या सवयीप्रमाणे सहाचा गजर झाला. मी पटकन आवरून पळावं असा विचार करून उठलो पण तितक्यात लक्षात आले की अरेच्या आज तर घरातूनच काम रायचं आहे. मी लगेच पांघरूण ओढून झोपून टाकलो. आठ वाजता सौ ने उठवले. “मुलं शाळेला गेली. चहा कधीचा करून ठेवलाय. तो पुन्हा गरम करून देते. लौकर उठ. ब्रेकफास्ट तयार आहे. घरातून काम करणार आहे ना? रजा नाहीये ना?” मी लगेच कामाचे भान ठेऊन पटकन उठून आवरलो आणि ब्रेकफास्ट करून बरोबर नऊ ला लॅपटाॅप चालू केला. ऑफीसच्या कम्युनिकेटर वर वर्क फ्राॅम होम असे स्टेटस सेट केले आणि कामाला लागलो. बाॅसला घरूनच काम करीत असल्याची बातमी दिली. माझे इमेल, फोन चालूच होते इतक्यात टिव्हीचा आवाज आला. सारेगम मधील होतकरू गायक घशाला त्रास देऊ लागला. माझे कामात लक्ष लागेना. मी बेडरूम मधे जाऊन बसलो आणि दरवाजा पुढं ढकलला.

थोड्याच वेळात सौ माझ्यासमोर मेथीची पेंडी ठेवून गेली. तिकडं बोलत बोलत एवढी मेथी निवडून ठेव. दुपारी मी छान पराठे करून घालते. मेथी नंतर लसूण, कोथिंबीर यांचा पण नंबर लागला. एक आदर्श पती या नावाखाली मलापण मी कुठंतरी उपयोगी पडतोय याचा खुप आनंद झाला. या दरम्यान चार वेळा बेडरूमचा दरवाजा उघडा टाकून सौ गेली आणि मला जागेवरून उठून तो बंद करावा लागला. थोड्यावेळाने कदाचित कामवाली बाई आली असावी याचा मला अंदाज आला. माझा एक ऑफीसचा काॅल चालू असतानाच तिने व्हॅक्युम क्लिनर चालू केला. अतिशय महत्वाच्या विषयावर चर्चा चालू असताना अचानक उद्भवलेले ध्वनी प्रदुषण काॅल मधील प्रत्येकाच्या कानापर्यंत पोचले. मी कसाबसा काॅल संपवून व्हॅक्युम क्लिनर थांबण्याची वाट पाहू लागलो. आता कदाचित थांबला वाटतं असं समजून फोन करायला जावं तर पुन्हा व्हॅक्युम क्लिनर दुसऱ्या खोलीतून ओरडू लागायचा. कामवालीनं मला घरात बघून उगाचच चेहऱ्यावर नाराजी आणली आणि बेडरूमचे काम अर्धवट करून निघून गेली. तिच्या या हलगर्जीपणाबद्दल मी ओरडून घेतले ते वेगळेच.

आता दुपारची जेवणाची वेळ झाली होती. सकाळ पासून फारशी काहीच कामं झाली नव्हती. तितक्यात सौ ने जेवायला बाहेर बोलावले. मी पडत्या फळाची आज्ञा मानून भरपेट जेऊन घेतले. मस्त जेवण जेऊन अंतरात्मा तृप्त झाला. पुन्हा लॅपटाॅप उघडून बसण्याचे त्राण डोळ्यांच्या पापणीत राहीले नाहीत. सौ ला मी फक्त वीस मिनीटानी हाक मार असे वचन घेतले आणि बेडवर पडून डोळे मिटले. त्या वीस मिनीटाचे दीड तास कसे झाले मला कळलंच नाही. मुलीनं मला बाबा उठा असं कानात ओरडून सांगितल्यावर मी पटकन उठलो. सौ च्या मते तिनं एकवीस ते पंचवीस व्या मिनीटा पर्यंत अथक परीश्रम घेतले पण मीच ढिम्म हललो नाही. कदाचित तिच्या हाकेपेक्षा माझ्या ब्रह्मानंदीच्या टाळीचा आवाज मोठा असावा. मी मनाशीच खजिल झालो. तोंड धुऊन पटकन लॅपटाॅप उघडून बसलो. दिड दोन तासात ढिगभर इमेल कोसळल्या होत्या. माझी मुलगी शाळेतून आली होती. तिची सतत माझ्या खोलीत लुडबूड चालू होती. बाबा सतत दार बंद करून लॅपटाॅपवर काय करतायत याची उत्सुकता तिला स्वस्थ बसू देत नव्हती. स्क्रीनवर बोटं लावून काहीतरी असंबध्द वाचण्याचा आणि मला उगाचच हसण्याचा तिचा प्रयत्न चालू झाला. कितीही दुर्लक्ष केलं तरी कामात तिचा अडथळा येऊ लागला. मी सौ ला बोलावून हिला बाहेर घेऊन जा अशी नम्र विनंती केली. बिचारी देवासारखी गुणी पोर आहे आणि तिचा तुम्हाला कसला आलाय त्रास! असं पुटपुटत तिला ती बाहेर च्या खोलीत उचलून घेऊन गेली. माझा हा खलनायकी आनंद निव्वळ दहा मिनीटे टिकला. अकराव्या मिनीटाला ती होमवर्क मधील गणिताची शंका घेऊन हजर झाली. आता तिला माझ्या जवळच अभ्यास करीत बसायचे होते. आज माझे किमान दहा महत्वाचे फोन होऊ शकले नव्हते आणि कित्येक इमेल अपुरी राहीली होती.

दुपारचे चार वाजून गेले होते. मी पटकन उठलो. सौ ला चहा बनवण्याची विनंती केली आणि तडक स्नान करायला बाथरूम मधे पळालो. आंघोळ करून मी फ्रेश झालो होतो. आता चहा पिऊन तास दोन तास मस्त कामं करायची असा मनात प्लॅन केला. चहा पित असताना सौ ने एक सुतोवाच केले. अहो! तो नवीन चित्रपट खुप छान आहे म्हणे! मी पटकन उत्साहाने होय म्हणून गेलो. ताबडतोब सहा च्या शो ला जाण्याचा प्लॅन ठरला. मी पण आदर्श पती प्रमाणे आवरून तयार झालो आणि मुकाट्याने चित्रपट पहायला गेलो. चित्रपटा नंतर बाहेर जेवण आदी कर्तव्ये आटपून घरी पोचायला दहा वाजून गेले.

झोपण्यापुर्वी मी दुसऱ्या दिवसाचा कार्यक्रम जाहीर केला. मी उद्या ऑफीसला जाणार. सौ ने माझ्या वक्तव्यावर कुत्सित हास्यासहीत प्रतिक्रिया दिली. “इतक्या लौकर खुळ गेलं का डोक्यातलं? उगाच घरात बसून आम्हालाच कटकट करण्यापेक्षा तू ऑफीसमधेच गेलेला बरे!”

आपल्या नशीबात सुख नाही असा विचार करीत झोपून गेलो. दुसऱ्या दिवशी ऑफीसात निम्मयाहून अधिक मंडळी हजर होती. तो माझा मित्र पुन्हा एकदा माझ्याजवळ येऊन बोलून गेला. “घरातून काम करण्यात काही मजा नाही यार!” त्याच्या मताशी सहमत होण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नव्हता.

8 comments:

  1. बरोबरए. वर्क फ्राॅम होम हे कितिही रोमॅण्टिक वाटत असलं तरिही त्याचे तोटेही बरेच असतात. ऑफिसमधे गेला की सांसारिक विषय 90% कट म्हणजे कट होतात. घरून काम करताना संसार पॅरलल चालतो. त्यातून बायकांच्या मागे चार कामं जास्तच. म्हणजे किचन सांभाळा वगैरे. शिवाय पाहुणे गृहित धरतात हा सर्वात मोठा तोटा. तू काय घरीच असणार माहित होतं म्हणून फोन न करता आलो हे सर्वात पिळवणूक करणारं वाक्य आहे 😉
    असो. काॅमेण्ट मधे स्वतंत्र पोस्ट पडण्याआधी थांबते.

    ब्लाॅग छान जमलाय हे वेगळं सांगायला नकोच 😀

    ReplyDelete
  2. मस्तच. घरात बसून घरातील बॉसच जास्त कामे करून घेते...:)

    ReplyDelete
  3. मस्त. Work from Home peksha work at home jasti hota

    ReplyDelete
  4. Nice contents....actually bringing work to home is not a good concept. otherway round it affects family envirnment.

    ReplyDelete
  5. अप्रतिम लेखनशैली !!!

    ReplyDelete
  6. अप्रतिम लेखनशैली !!!

    ReplyDelete

Name:
Message: