Friday 26 January 2018

फोन: राँग नंबर, टेली शॉपिंग ते कॉल सेंटर

मनुष्याला अन्न, वस्त्र, निवारा आणि फोन अशा चार गोष्टींची जगण्यासाठी नितांत आवश्यकता असते. कदाचित पहिल्या तीन गोष्टींपेक्षा चौथ्या गोष्टीची आवश्यकता सर्वाधिक असू शकेल. फोन चे स्थान श्वासाच्या बरोबरीने केले तर वावगे ठरू नये. सलग दहा मिनीटे मला जर माझा फोन दृष्टीस पडला नाही तर भयंकर कासावीस होतं. जन्माला आलेल्या पोराचं पहिलं स्वप्न असतं ते म्हणजे फोन. नाक साफ करायला येत नसलं तरी हॅलो म्हणायला एक डबडं समोर दिलं की पोर भलतं खुश! दिवसभर कानाला लावून हॅलो हॅलो करतच फिरत सुटतं मग! मुलगा शिकून कमवायला लागला की एक महागातला फोन ची चैन केल्याशिवाय त्याला चैन पडत नाही. अशा या फोनच्या उपयुक्तते बद्दल बोलावे तितके थोडेच! प्रत्येकाच्याच हातात फोन आल्यामुळं फोनचं अप्रुप वाटण्यासाठी आता रंगूनला जाण्याची गरज राहीलेली नाही. तरीपणमेरे पिया गये रंगून...” असे गाणाऱ्या प्रत्येक प्रियतमेला फोन मात्र नक्की घेऊन द्यावा लागतो. अशा या प्रियतमा आपल्या पिया बरोबर बेडरूम मधून हाॅल मधे फोन करून संवाद साधतात

या फोनच्या सदुपयोगाचे अनेक अनुभव प्रत्येकाला आहेत. आपण काहीतरी महत्वाच्या कामात असताना नेमका येणारा नकोशा व्यक्तीचा फोन हा सर्वांचाच अनुभव आहे. म्हणजे व्यक्ती नको असतो असे नव्हे पण त्या घडीला तो फोन नकोसा वाटतो. बऱ्याच वर्षांपुर्वी मी मोठ्या कौतुकानं एक फोन घेतला. त्यावरील निव्वळ काळ्या तीन ओळी उमटवणारी स्क्रीन मी दर दोन मिनीटाने निरखत होतो. वास्तविक त्यातील वेळ सोडून काहीच हलताना दिसत नव्हतं. त्याकाळी आलेला फोन उचलायला पण पैसे पडत. असे असून सुध्दा कोणाचा फोन मिसड् तर नाही ना झाला अशी मनात उगाचच शंका वाटे. बिनकामाचा डोळ्यासमोर फोन धरायची सवय तेव्हापासूनच लागली असावी. फ्रिज, फेसबुक आणि फोन यांना विनाकारण चेक करण्याच्या रोगाची सुरवात अशाच प्रकारे झाली असे म्हणतात. मी पण त्यातलाच एक पेशंट! तर पुर्वी मी घेतलेल्या फोन वर इतरानी फोन करावेत अशी माझी माफक अपेक्षा होती. सर्वाना फोन करून मी माझा नंबर कळवलेला होता. तरीपण दोन दिवस झाले, मला मात्र कोणीच फोन करेना. उगाचच रिंग होते का नाही हे चेक करण्यासाठी मी डेस्क फोनवरून रिंग करून पाहीली. फोनची रिंग पण ठिक होती. तरी कोणीही मला फोन करण्याची तसदी घ्यायला तयार नव्हता. मन खट्टू करून मी फोन बाजूला ठेवलो आणि कामाला लागलो. इतक्यात अहो आश्चर्य! फोनची रिंग वाजली. मला तर खजिना गवसल्याचा आनंद झाला. त्यावेळी अगदी शत्रूचा जरी फोन असता तरी त्याच्याशी मी प्रेमानंच बोलण्याचा निर्धार केला. होऊ दे खर्च! या आविर्भावात मी फोन उचलला. सफाईदारपणे अगदी खर्जातल्या आवाजात मी हॅलो म्हणलं. पलिकडून एक गंभीर भसाडा आवाज आला. “हॅलो केशा!” मी शक्य तितक्या आदबीनेमी केशा नाही, संदीप आहे.” अशी माहीती दिली. पलिकडूनअरे मग राँग नंबर सांग की!” अशी खोचक शिकवण देण्यात आली. मी जीभेवरून ओठावर आलेले सर्व प्राणी घशात ढकलले आणि फोन बंद केला. ती सज्जन व्यक्ती पुणेकर असणार या जाणिवेने मी मन शांत केले.

अगदी काही महिन्यांपुर्वी पर्यंत माझ्या फोनवर माझ्यापेक्षा अधिक हक्क माझ्या कुटूंबियांचाच असायचा. दिवसभरात मला कोणा कोणाचे फोन किंवा मेसेज आले हे चेक करण्यात सौ ला अधिक रस असायचा तर फोन वर असलेल्या दोन चार गेम मधे कन्येला. पण आता प्रत्येकाचे स्वतंत्र फोन झाल्यामुळे त्याचे स्वत:चेच काॅल आणि मेसेज इतके असतात की त्या कारणानं माझा फोन घ्यायला त्याना सवडच मिळत नाही. आता घरामधे फोनची संख्या वाढल्यामुळं माझा बिचारा फोन एकटाच कुठंतरी कोपऱ्यात पडून राहतो. अगदी माझ्यासारखीच त्याची अवस्था असते. तसं नाही म्हणायला माझ्या फोनवर अजून एका प्रजातीने आपला हक्क राखून ठेवला आहे. तो जनसमुदाय टेली शाॅपींग या नावाने ओळखला जातो. खुप कामात असताना हमखास येणारा फोन म्हणजे टेलीशाॅपिंग वाल्याचा. कधी माझ्या जीवाच्या काळजीपोटी लाईफ इंन्शुरन्सची मला गरज पटवतात तर कधी माझी पैशाची चणचण पहावून मला परसनल लोन घेण्याचा आग्रह करतात. कधी माझ्या लाईफ स्टाईलला मॅच होणारे क्रेडीट कार्ड घेण्यास सुचवतात तर कधी आगामी सुट्टीच्या मौसमात एखाद्या सुंदर ठिकाणी तब्बल चार रात्री पाच दिवस राहण्याची भुरळ पाडू पाहतात. या सर्वांची माझ्याबद्दलची एवढी तळमळ पाहून माझ्या अंगावर दोन तीन मुठी मास अधिक चढते आणि वजन अजूनच वाढते. या काळजी करणाऱ्या समाजाला देशाच्या सीमा नाहीत. भारतात या लोकांचा माझ्यावर सतत भडीमार होत असे. आता मी सिंगापुरात रहायला आलो; माझा नंबर बदलला तरी या मंडळींचे माझ्यावरील प्रेम तिळमात्र कमी झाले नाही. फोन बदलला तरी नशीब बदलत नाही असं पण म्हणतात का ते वपुं ना विचारायला हवं होतं. मला इनव्हेस्टमेंट प्लॅन पासून व्हॅक्यूम क्लिनर पर्यंत सर्वांचे फोन आजही येतात. एकदा मला असाच गडबडीत फोन आला आणि पलीकडून एका गृहस्थाने तो एक घर खरेदी विक्रीचा एजंट असल्याची ओळख करून दिली. मी काही पुढं बोलायच्या आधीच त्यानं सिंग्लीश भाषेत माझ्या घराला छान गिऱ्हाईक काढण्याचा वादा पण करून टाकला. तो या क्षेत्रात कसा तज्ञ आहे आणि बाकीचे एजंट कसे फसवे आहेत, याउपर मी त्याला एंजट स्विकारून या पृथ्वीवर जन्म घेतल्यानंतरचे एकमेव सत्कृत्य केल्याचे पण मला ऐकवून झाले. मी अवाक होऊन आणि श्वास रोखून सगळं ऐकत होतो. मला अजून काहीच बोलण्याचा स्कोप मिळाला नव्हता. अखेरीस त्यानंच श्वास घेण्यासाठी सेकंदभराची विश्रांती घेतली. मी मिळालेल्या संधीचं सोनं करून त्याला कसंबसं एक वाक्य ऐकवू शकलो. अरे राजा! घर विकण्यासाठी मला प्रथम विकत तरी घेऊ दे. सध्या मी भाड्याच्या घरातच राहतोय. आता तो मला घर विकत घेण्याचा आग्रह करण्याआधी मी फोन बंद करून टाकला

बँकांकडून येणारे फोन हे तर अफलातून असतात. “Hello Sir! How are doing today?” अचानक असा कोणीतरी लाडीक प्रश्न विचारला की एक तर बुचकळ्यात पडायला होतं आणि उगाचच जवळीक साधायचा प्रयत्न केल्याचा भास होतो. मी तर आजकाल थेट पुणेरी प्रश्न विचारतोहं! काय आहे?” किंवा “yes! Whatz it about?” अशा प्रतिक्रियेचा जरासुध्दा खेद मानता पलिकडून भात्यातला नवीन बाण सोडला जातो. “Sir congratulations! You are selected for a special offer. We are offering you personal loan at only 5% interest rate.” या लोकाना मी अशा वाक्यानं हुरळून जाऊन खरंच लोन घेईन असं का वाटतं? देवाच्या कृपेने माझं सर्व काही व्यवस्थित चालेलं त्याना माहीती नाही का काय? मी मात्र खिंड लढवत राहतो. “If you offer 0% interest and 0% processing fee and no obligation to repay then definitely 
I will avail your loan; otherwise I’m sorry.” यावर तरी त्यानी खजिल व्हावं असं अपेक्षित असतं; पण कोणताही विकार आवाजात दाखवता “Sorry sir, we do not have this scheme at this moment but we will inform you in case we announce.” अखेरीस मलाच “thank you” म्हणून फोन बंद करावा लागतो.

जाहीरातीचे फोन करणाऱ्यांच्या बरोबरीने माझे काॅल सेंटर वाल्यांशी जिव्हाळ्याचे नाते आहे. कधी बँक असो वा इलेक्ट्राॅनिक वस्तू ची तक्रार असो, पिझ्झा ऑर्डर करणे असो वा टॅक्सी बुकींग असो. या काॅल सेंटर वाल्यां बरोबर दिवसभरातून किमान दोन चार वेळा तरी प्रेमालाप करावाच लागतो. या लोहकाना सौजन्याने बोलण्याचे शिक्षण देतात हे माहीती आहे, पण रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी काहीतरी खास प्रशिक्षण देत असावेत असं मला वाटतं. विषयाचं संपुर्ण ज्ञान असावं अशी किमान अपेक्षा असली तरी जुजबी ज्ञान असण्याचीसुध्दा सुतराम शक्यता नसते. पाठ केलेली ठराविक वाक्यच हे लोक बोलू शकतात. या लोकाना इंग्रजीतून बोलणे जितके सहज वाटते तितकेच अवघड मराठीतून बोलताना वाटत असावे. माझे अस्सल मराठमोळं नाव उच्चारताना सुध्दा त्यांची बोबडी का वळते काय माहीत. दर दोन वाक्यानंतर किमान एकदा तरी उगाचच दिलगीरी व्यक्त करत राहणे यांच्या संवादाचा एक घटक असतो. असे तरूण चांगले नवरे बनत असतिल याची मला खात्री वाटते; आणि तरूणी दिवसभर व्यक्त केलेल्या दिलगिरीचा हिशोब नवऱ्याकडून वसूल करून घेत असणार याबद्दल मुळीच दुमत असणार नाही. एखादी गोष्ट जर त्यांच्या नियमावलीत बसत नसेल तर शांतपणे नकार देण्याची कला या लोकाना छान अवगत असते. “आपणास झालेल्या तसदी बद्दल क्षमस्व पण आपणास आमच्या कंपनीस अमूक प्रकारची फी भरावी लागेल; अन्यथा आम्हास आमची सेवा खंडीत करावी लागेल.” तुम्ही कितीही धाक-दपटशा केला किंवा माथेफोड केली, तरी  मालकाच्या आज्ञेत राहून बाणेदारपणे नकारघंटा चालूच ठेवतात

आजच्या लाईफ स्टाईलला टेलिशाॅपिंग आणि काॅलसेंटर हे अविभाज्य घटक आहेत. तुम्हाला हे लोक आवडोत वा आवडोत; या जमान्या बरोबर रहावेच लागते

No comments:

Post a Comment

Name:
Message: