Thursday 23 November 2017

मोदी... नॉट मोदी

आजकाल आपल्या भारतात देशभक्तीचे वारे हे डिजीटल स्वरूपात वाहू लागले आहे. एका व्हाटसॲप मधून दुसऱ्या व्हाटसॲप मधे, एका फेसबुक अकौंट मधून दुसऱ्या अकौंट मधे हे देशभक्तीपर मेसेजेस प्रवास करीत असतात. तुम्ही जेवढे लाईक करता अथवा जेवढे पोस्ट टाकता तेवढे तुम्ही देशप्रेमी. इतकेच नाही तर सच्चा देशभक्त होण्यासाठी आपणास डिपी किंवा प्रोफाईल पिक्चर बदलून तिरंगी झेंडा ठेवणे गरजेचे असते. बाकी काही म्हणा पण आपली जनता आवर्जून हे सर्व कष्ट नक्की घेते. हे असे देश प्रेमाचे वारे वाहू लागले की माझेही मन भरून येते. लहानपणी इतिहासाच्या तासाला आमचे अध्यापक त्वेषाने टिळक गांधी सावरकर यांच्या कथा सांगायचे. त्यावेळी इतके स्फुरण चढायचे की उगाचच कोणातरी गोऱ्याला पकडून धुऊन काढायची प्रबळ इच्छा व्हायची. आता डिजीटल देशभक्तीत अशी प्रबळ इच्छा जागृत झाली की मी किमान दहा देशभक्तीपर पोस्ट किमान वीस कळपांमधे ढकलतो. यालाच माझा सक्रिय सहभाग मानून समाधान पावतो.

या देशभक्तीचाच एक अविभाज्य घटक म्हणजे राजकीय घडामोडींवर आपले ठाम मत असणे. वास्तविक पहाता ही काळाची गरजच आहे. त्या क्षेत्रातलं आपलं ज्ञान किती आहे या गोष्टीला इथं फारसं महत्व नसतं. बस्स! तुमचं काहीतरी मत असायला हवं आणि ते सुध्दा ठाम! मुद्दा कोणताही असो. आरक्षण, बजेट, टोल, कायदा सुव्यवस्था, पोलीसांची दंडुकेशाही ते भारत पाकीस्तान मॅच.. या सर्वच बाबतीत तुम्हाला मत असायला हवं, ज्ञान नसलं तरी! आणि ते सुध्दा जाज्वल्य अभिमानासहीत! या सर्व विषयांमधे एक महत्वाचा विषय फक्त भारतातच नाही तर देशोदेशी चर्चीला जाणारा तो म्हणजे मोदी भक्त विरूध्द ॲन्टी मोदी

चौका चौकातील चर्चा असोत वा चहा पितानाच्या शिळोप्याच्या गप्पा असोत. पानाच्या टपरीवर असो वा नाभिकाच्या खुर्चीत असो. गणेशोत्सवाचे मंडळ असो वा व्हाॅटसॲपचा ग्रुप असो. एक विषय अगदी चघळून चोथा झालेला आहे. तो म्हणजे मोदी भक्त विरूध्द ॲंटी मोदी! स्वत:च्या नाकावर बसलेली माशी उठवण्याची क्षमता नसलेला माणूस पण हा विषय चर्चेला आला की ढाण्या वाघ होतो. मोदी भक्ताना या देशाचे जे काही भविष्य आहे ते निव्वळ आणि निव्वळ मोदींच्याच हातात दिसते. तर या उलट ॲंटी मोदी ना हाच देश मोदी पंतप्रधान झाल्यापासून कसा रसातळाला जात आहे ते स्पष्ट दिसू लागते. ॲंटी मोदी वाल्याना काँग्रेस ने देशाचे काय वाटोळे केले ते मुळीच दिसत नाही पण मोदीच्या सुटाच्या बटणापासून सगळ्या गोष्टी यांच्या डोळ्यात खुपतात. याउलट मोदी भक्ताना नेमका या दोन तीन वर्षातच असा शोध लागला की गेली सत्तर वर्षे हे काँग्रेसजन आपल्या देशाला फक्त लुटत होते. हा वाद तर कधी कधी इतका विकोपाला गेलेला मी ऐकला आहे की ठरलेली लग्ने पण मोडली आहेत. वधू आणि वराच्या पिताश्रीं मधे जर असा काही वाद झालाच तर त्या नवदांपत्याला पळून जाऊन लग्न करावे लागलेली पण उदाहरणे आहेत. आता नक्की हे लव मॅरेज म्हणावे का ॲरेंजड मॅरेज हा वेगळा मुद्दा होऊ शकतो

डिमाॅनीटायझेशन, जीएसटी, ब्लॅक मनी आदी विषयात प्राविण्य प्राप्त केलेल्या महान विद्वानांमधे जोरजोरात चर्चा झडतात. पुर्वी राजे लोक जसे विद्वानाना एकत्र बोलवून गंभीर विषयावर वाद घालायला लावत तसेच काहीतरी मोदी करतायत असे मला वाटते. इथे तर सगळेच विद्वान! एकदा असाच सौ चा खुप छान मुड बनला होता. मुलीनी तिच्याकडे काहीतरी खास मेनूची मागणी केली आणि तिनं ताबडतोब बनवून खायला घालण्याची मंजुरी पण दिली. मुली पण त्यामुळे चांगल्याच खुश झाल्या. सहज बोलता बोलता सौ ने मोदीनी घेतलेल्या एलपीजी सबसीडी च्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. त्यावर मी मोदींचे धोरण, भारतीय अर्थव्यवस्था इत्यादी माझ्या महान ज्ञानाचा प्रकाश पाडण्याचा प्रयत्न केला. बस्स! सौ चिडली की हो! अखेरीस घरच्या मेजवानी चा मेनू हाॅटेलात जाऊन मुलीनी वसूल केला. त्या वेळी मात्र खरंच मला एलपीजी सबसीडी च्या निर्णयाचा चांगलाच राग आला. आम्हा सहकाऱ्यांमधे जर कोणाचा वाढदिवस असेल तर दुपारचा चहा बिस्किट सर्वाना देण्याची एक चांगली परंपरा आहे. मी पण इमाने इतबारे या प्रथेला दरवर्षी पाळत आहे आणि वसूलही करीत आहे. एकदा असाच आमचा सात आठ जणांचा ग्रुप चहापानाला गेलेला असताना जीएसटी चा विषय निघाला. नेमकी माशी तिथेच शिंकली. ग्रुपमधे एकसुरात जीएसटीचे कौतुक झाल्यावर ॲंटीमोदी वाला इतका भडकला की त्याचा वाढदिवस असूनही चहाचे पैसे देता निघून गेला. आम्हाला सर्वाना हकनाक खर्च झाल्याची चुटपूट काही पुणेरी मंडळीनी व्यक्त करून दाखवली. माझ्या एका व्हाॅटस ॲप मधील ग्रुप मधे तासन तास दिवस रात्र या विषयावर वाद झाले. दोघा तिघा ॲंटी मोदी मंडळीनी तब्बल दहा मोदी भक्तांची खिंड लढवली. पण या वादाचा शेवट असा झाला की एक जण ग्रुपमधून बाहेर पडला आणि दोन मित्र कायमचे बोलायचे बंद झाले. नंतर अनेक जणानी त्याना समजावून सांगितल्यावर तो बाहेर पडलेला मित्र परत सामिल झाला. वाईन शाॅप हायवे पासून दोनशे मीटर दूर नेण्याच्या निषेधार्थ एका ग्रुप मधील मंडळीनी सायंकाळी बैठक घेतली. त्यांची ती बैठक रात्री उशीर पर्यंत चालली असे नंतर ऐकिवात आले. दुसऱ्या एका ग्रुपमधील मंडळीनी तर तावातावाने गाड्या काढल्या आणि चक्रधारी बांधवांच्या वेदना जाणून घेण्यासाठी तब्बल दोनशे मीटर अंतरावरील दुकानातून खरेदी केलेले अपेय पान अगदी हायवे पासून निव्वळ एक मीटर अंतरावर केले. सर्व कायद्याच्या चौकटीत राहून हं!

मलासुध्दा अशा चर्चा किंवा वाद सुरू झाले की माझेपण काहीतरी मत असावे असे वाटू लागते. काहीच बोलता गप्प बसणे हे भ्याडपणाचे अथवा मुर्खपणाचे लक्षण वाटू लागते. अशा अनेक जीवघेण्या लज्जास्पद प्रसंगातून मी एक धडा घेतला. माझं पण एक मत आहे. ही स्वत:ला जाणिव करून दिली. सुरवातीला मी वादाचे पारडे ज्या दिशेला झुकते ती बाजू घेऊ लागलो पण त्यात माझे मला मन खाऊ लागले. अखेरीस घट्ट डोळे मिटून निर्णय घेतला. मी एक मोदी भक्त!



5 comments:

  1. Sandeep, this was too good. Because of WA and FB everybody has got forum to express and many cases the comments are on the fly.

    ReplyDelete
    Replies
    1. I like your writings. There is a flow, topic you have selected is of common concern. Avinash Dharmadhikari

      Delete
  2. Be it a Modi fan or anti, at least people started thinking something about the Country....awareness is important.....good write up Sandeep

    ReplyDelete

Name:
Message: