Tuesday 10 October 2017

मेड इन सिंगापूर

मला आठवतंय... दहा वर्षापुर्वी ज्यावेळी मी सिंगापुरात येण्याचा निर्णय घेतला त्यावेळी माझ्या एका अनुभवी पुणेरी मित्रानं मला सल्ला दिला होता. तुला सिंगापुरात जायचं असेल तर दोन गोष्टी लक्षात ठेव. तुला भारतासारखी गाडी परवडणार नाही आणि पुण्यासारखी कामवाली बाई मिळणार नाही. त्यावेळी मी जरी हसून त्याच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले असले तरी या देशात पाऊल ठेवताक्षणी लौकरच या दोन्ही गोष्टींचे गांभीर्य माझ्या लक्षात आलं
एक वेळ तो अव्वा च्या सव्वा टॅक्स भरून कार परवडेल पण चांगली कामवाली बाई उर्फ मेड मिळणं हे केवळ नशिबातच असावं लागतं. मागच्या जन्मी तुम्ही केलेल्या पुण्यसंचयाचा इथं कुठंतरी उपयोग होतो हे माहीती असतं तर मी मागील मरणापूर्वी नक्कीच दोन तीन गाई दान केल्या असत्या. असो. जे आहे ते स्विकारायलाच हवं.

सिंगापुरात मेड ह्या आपल्याच घरी चोवीस तास राहतात या बातमीमुळे आम्हा दोघानाही एक सांस्कृतीक धक्का बसला. सौ ला चोवीस तास परक्या व्यक्तीची लुडबूड नको होती. आणि मी तर नेहमी प्रमाणे गोंधळून गेल्यामुळे सौ च्या हो ला हो म्हणत होतो. सौ ने मला आणि स्वत:ला असे समजावून सांगितले की मी तशी घरात रिकामीच असते, कशाला हवीय मेड? अडीच माणसांचं करायला कशाला हवी मेड? मला तिच्या या उदात्त विचारांचे कौतुक वाटले आणि मी एक मताने संमती दिली. तशी त्या एका मताला फारशी किंमत नसते तरी माझे समाधान. सुमारे काही दिवस बाजीप्रभू देशपांडे प्रमाणे सौ ने घरकामाची एकटीने खिंड लढवली. पण अखेरीस एक दिवस अचानक तिची फ्युज उडली आणि माझ्यावर बरेच घाव घालण्यात आले. मला एकटीला राबावं लागतं, तुमची काही मदत नाही... इत्यादी इत्यादी. बाजीप्रभूच्या ऐवजी शत्रूच घायाळ झाल्यामुळं मिशन मेड मनावर घेण्याची वेळ आली.

मी माझ्या सहकाऱ्यां मधे हा विषय काढला. त्यावेळी मला असा शोध लागला की मेड हा प्रश्न घरगुती पातळीवरचा नसून राष्ट्रिय प्रश्न आहे. अनेक जणानी अनेक अनुभव सांगून माझे डोके सुन्न करून टाकले. आता मी नक्की काय करावे याचे उत्तर मला अजून सापडले नव्हते. सिंगापूरीय चायनीज लोक हे आपल्या कुटूंबांच्या सोईसाठी आसपासच्या देशातून इथे या मेड आणतात. इंडोनेशिया, फिलीपीन्स, म्यॅनमार, नेपाळ, श्रीलंका आणि भारत अशा देशांमधून आलेल्या या मेडना महिना काही रक्कम आणि सरकारला एक रक्कम द्यावी लागते. या शिवाय त्यांचा इंन्शूरन्स, वर्षातून एकदा त्यांच्या देशात जाऊन येण्याचे विमान भाडे इत्यादी खर्च वेगळे. हा एवढा द्राविडी प्राणायाम करून एखादी मेड मिळवायची आणि तीला आपल्या कुटूंबाचा एक हिस्सा बनवून रहायचे. सिंगापूरात कायम आढळणारे दृष्य म्हणजे चायनीज पती पत्नी हसत खेळत रेस्टाॅरंट मधे जेवतायत आणि त्यांचं दीड फुटी अपत्य त्या मेडच्या अंगा खांद्यावर खेळतंय. या आया स्वत:च्या मुलाच्या डायपर ला शीऽऽऽ म्हणून स्पर्श पण करीत नाहीत. ती सगळी जबाबदारी त्या मेडचीच. बऱ्याचवेळा ते पोर चायनीज भाषेत आई म्हणायच्या आधी फिलीपिनो भाषेत आंटी म्हणायला शिकतं. कधी कधी या मेड अस्वच्छ असल्यामुळे मुलं आजारी पडतात. माता पिता जर मुलाला या मेडच्या जीवावर सोडून बाहेर गेले तर काही मेड मुलांना मारणे रागवणे किंवा त्यांचे दुध स्वत: पिणे असे प्रकार पण घडतात. या तरूण वयातील मेड सिंगापूरात जरा रूळल्या की त्यांचे बाहेर मित्र बनतात आणि संधी साधून त्याना मालकीणीच्या अपरोक्ष घरात प्रवेश मिळतो. एकंदरीत सर्व सुरस कथा ऐकल्यावर आपणच नोकरी सोडून घरची कामं करावीत का असा विचार डोक्यात डोकावून गेला

या मेड प्रकरणावर माझा असा बराच अभ्यास झाल्यावर एक दिवस एका मित्राच्या ओळखीने एका एजन्सीच्या दारात उभयतां पोचलो. तिथल्या स्टाफ ने आमचे हसत मुखाने स्वागत केले. आम्हाला एक एक फाईल दिली. त्या फाईली मधे उत्सुक मेड महिलांचे फोटो आणि बायोडाटा होते. त्या कागदांवरून निवड करणे अशक्य होते. अखेरीस काही मेड बायांची मुलाखत घ्यायचे ठरले. सौ ने स्वत: मुलाखत द्यायची असल्याप्रमाणे तयारी केली आणि काहींशी फोनवर तर काहींशी प्रत्यक्ष बोलणे केले. त्यातून काहीतरी निकष लावून एका महिलेला आमच्या घरी मेड बनण्याचा मान देण्यात आला.

सर्व फाॅर्म्यालिटी पुर्ण करून अखेरीस ती मेड आमच्या घरी आली. माझ्या मुलीना या नवीन पाहुण्याचे उगाचच अप्रुप वाटत होते. ती काय करते कधी झोपते कधी खाते याची इंत्यभूत माहीती मुलीनी चोख ठेवायला चालू केली. तिला इंग्रजीचे थोडे कमी ज्ञान असल्यामुळे घरातील सर्व व्यवहार मुकाभिनयाने सुरू झाले. नंतर हळूहळू ते एक शब्दिक संवादा मधे रूपांतरीत झाले. संपुर्ण इंग्रजी वाक्यात यायला काही आठवडे जावे लागले. ती भारतीय नसल्यामुळे तिला आमचा स्वयंपाक कशाशी खातात याचा मुळीच गंध नव्हता. सुरवातीचे काही दिवस सौ लाच तिला जेवायला करून घालायला लागले याची पण मी बोलणी खाल्ली. तीला आमच्या प्रमाणे सोवळी शाकाहारी बनलेलं आवडलं नसावं. एकदा तिनं मार्केट मधून माशाचा काहीतरी प्रकार आणला आणि तो फ्रिजमधे ठेवला. तसा त्याचा काही वास लागला नव्हता पण त्या डब्यावरील ते माशाचे चित्र पाहून आम्ही सर्व हादरलो. सौ ने तिला तिच्या कळणाऱ्या इंग्रजीमधे फैलावर घेऊन माशाचे घरातून उच्चाटन केले. सौ चा तो पवित्रा बघता त्या दिवशी घरात अन्नावर बसणाऱ्या माशा पण घाबरलेल्या होत्या. तिला तिची चुक लक्षात आली असावी. शिवाय आम्हीपण समंजसपणाने रविवारी संध्याकाळी हातात पैसे टेकवून बाहेरचं खाऊन ये जा अशी तिला मोकळीक देऊ लागलो. तिला जरी शाकाहारी बनवणे शक्य नसले तरी तिला शाकाहारी स्वयंपाकी बनवणे अत्यंत आवश्यक होते. रोज तिला विवीध पदार्थांच्या पाककृतींचे ज्ञान दान सुरू झाले. त्यावेळी नकळत एक गोष्ट आमच्या लक्षात आली की आपल्या पुर्वजानी आपले पदार्थ जरा जास्तच अवघड बनवून ठेवले आहेत. एखाद्याला ते पटकन यावेत अशी सोयच नाही. असो. तरीपण त्या महिलेने सुरवातीस अडखळत का असेना, नंतर बऱ्यापैकी वेग धरला. इडली सांबार डोसा पासून रोजचे पोळी भाजी भात आमटी या गोष्टी तिला छान जमू लागल्या. स्वयंपाकाच्या बरोबरीने घरातील इतर सर्व कामे तिने छान सांभाळली. कपडे मशिन मधून धुवून वाळवणे, इस्त्री करणे, केर फरशी करणे आदी कामे तर चोख पार पाडू लागली. आता सौ ला नकळत तिच्याबद्दल अभिमान वाटू लागला. आपल्याच तालमीत तयार झालेल्या शिष्याकडं पाहून गुरूला जो आनंद होतो तसा आनंद सौ ला झाला.

या मेड बाई ला येणारे फोन हा एक चर्चेचा, संशोधनाचा आणि आमच्या कुटूंबात उत्सुकतेचा विषय बनत चालला होता. ती नवीन असताना क्वचित येणारे फोन आता वाढू लागले होते. सुरवातीस फोन टाळणारी ही बया आता उचलून बोलण्यास सरावली होती. तशी कामं सोडून फारशी बोलत नसली तरी तिला कोणीतरी सतत फोन करतंय याची जाणिव आम्हाला झाली होती. सौ ला आता हा एक नवीनच चिंतेस पात्र विषय मिळाला होता. सौ ने तिला जरा खोदून खोदून विचारायचा प्रयत्न केला पण फारसा काही थांगपत्ता लागला नाही. साधारण आठ दहा महिन्याच्या कालावधीमधे आम्ही तिच्याबरोबर आणि ती आमच्या बरोबर चांगले रूळलो होतो. पण देवाच्या मनात काहीतरी वेगळेच होते. एक दिवस तो उगवलाच. मी आँफीसच्या कामात असताना मला सौ चा अचानक फोन होता. तिचा स्वर बराच घाबरलेला होता. मेड ला तिच्या घरातील कोणीतरी खुप आजारी असल्यामुळे अचानक भेटायला जाणे गरजेचे होते. सौ ने मला संध्याकाळी सविस्तर बोलू असे सांगितले. संध्याकाळी त्या मेड ने पुन्हा एकदा आमच्या समोर काकुळतिला येऊन घरची दु:खभरी कहाणी ऐकवली. आमच्यातील माणुसकीला तिने जागं केलं. मी ताबडतोब तिचे दुसऱ्या दिवशीचे विमानाचे तिकीट काढले. परतीचे दोन आठवड्यानंतरचे काढून तिच्या हातात ठेवले. सौ ने डोळ्यात पाणी आणून नीट जा, सांभाळून रहा असे सांगून थोडे जादाचे पैसे तिच्या हातात कोंबले. तिने पण नको नको म्हणत तिच्या पर्समधे कोंबले. त्या प्रसंगानंतर आजतागायत ती बया परतली नाही. तिनं दिलेल्या नंबर वर फोन करण्याचे आमचे प्रयत्न व्यर्थ ठरले. एजन्सीनं तिच्या बदल्यात दुसरी मेड देऊ शकतो असा मार्ग सुचवला. पण आम्हाला जरा धक्काच बसला होता. या धक्क्यातून सावरायला थोडा अवधी हवा होता.

माणूस अनुभवानं शहाणा होतो म्हणतात. पण आम्हाला आलेल्या या शहाणपणाचा तसा काहीच उपयोग नव्हता. उलट घरातील सर्व कामे पुन्हा सौ लाच करावी लागत होती. आता या घटने नंतर सौ ने अजून एका नव्या पर्यायाचा शोध लावला. आम्हाला एका नव्या एजन्सी चा शोध लागला. ती एजन्सी पार्ट टाईम मेड पाठवते. जेवढे तास काम करेल तेवढे पैसे द्यायचे. थोडं महाग वाटत असलं तरी आम्हाला तो पर्याय सोईचा वाटला. ताबडतोब नवीन सेवा सुरू करण्यात आली. या प्रकारामधे मुलाखत किंवा बाकी कोणती फाॅर्म्यालिटी नसल्यामुळे मेड चे दर्शन सहज घडले. तिच्या कामाशी आधीच्या मेड बरोबर तुलना सुरू झाली. सौ ने नाराजी व्यक्त करीत तिचा स्विकार केला. आठवड्यातून दोन दिवस येणे ठरवले असले तरी बहुतांशी दुसऱ्या वाराला तिचे दर्शन होणे दुर्मिळ होत गेले. कदाचित वेळ पाळणे हे तिच्या गावीच नसावं. दहा वाजता येते असं कबूल केलेली ही महिला दोन वाजता उगवायची. बऱ्याचदा तीन वाजता फोन करून येणार नसल्याची वर्दी देत असे. आदल्या दिवसापासून सौ चे तिला फोन चालू व्हायचे. किती येण्याचे वचन दिले तरी ऐनवेळी साॅरी बोलून सुटका करून घेत असे. एजन्सीला तक्रार केली असता त्यानी दुसरी मेड पाठवून दिली. ती पुर्वीचीच बरी अशा निष्कर्षाने पुन:श्च पहिलीचा आमचा धावा सुरू. या सर्व प्रकारात सौच्या बरोबरीने मी पण मानसिक तसेच शारीरीक छळ सोसू लागलो. अखेरीस सौ ने त्या एजन्सीला कायमचा रामराम ठोकला.

स्वत: काम करण्यामधेच सुख आहे हे आम्ही स्वत:ला समजावू लागलो. तरीपण सौ चे मन खट्टू झाले होते. एक दिवस तिला तिच्या एका मैत्रीणीकडून एका होतकरू मेडचा नंबर मिळाला. सौ ने तिला विनंती करून कामाला ठेवले. किरकोळ वेळेची चालढकल वगळता ही मेड आमच्याकडं बऱ्यापैकी रूटीन मधे येऊ लागली. ठरलेल्या दिवशी येऊन संपुर्ण घरातील कामाचा उरका ती चांगल्या प्रकारे करू लागली. सहा महिने तिच्या मेहरबानीत आमचा संसार चालू होता. एक दिवस ती अचानक यायची बंद झाली. सौ ने तिला शेकडो फोनचे प्रयत्न केले पण तिचे काहीच उत्तर नाही. फोन पण बंद. कदाचित ती पण मायदेशी परतली असावी असा विचार करून आपल्याच नशिबाला दोष देत आम्ही तिला विसरलो. पण जवळ जवळ दोन महिन्यानं ती दारात उभी राहीली. सौ मनातून खुश झाली पण तिला लटक्या रागातच विचारलं की कुठं गायब होतीस? तिनं सांगितलं की मी जेलमधे होते. ते ऐकून सौ ला घाम फुटला. आता आमच्याकडं काही काम नाही असं सांगून तिला हाकलून दिलं.

राहून राहून मला त्या हुशार मित्राचे बोल आजही आठवतात. पुण्यासारख्या कामवाल्या बाया सिंगापुरात नाहीत.



No comments:

Post a Comment

Name:
Message: