Monday 9 October 2017

गुरू आणि परमेश्वर

गुरूविण कोण दाखविल वाट?

कोणत्याही क्षेत्रात आपल्याला जर प्रगती हवी असेल तर गुरू ची आवश्यकता ही असतेच. कोणाचे राजकीय गुरू असतात तर कोणाचे वैज्ञानिक, कोणाचे खेळातील असतात तर कोणाचे अध्यात्मिक. योग्य गुरू शिवाय प्रगतीची दिशा सापडणे कठीण असते. पर्यायाने मार्ग भटकण्याची शक्यता असते. गुरू हा मार्गदर्शक असतो. गुरू ला काय योग्य आणि काय अयोग्य याचे ज्ञान असते. गुरूच्या तालमीत तयार झालेल्या शिष्याला सामना हा स्वत: लढायचा असतो. तिथं त्याचे कसब, स्वत्व, मनोबल उपयोगी पडते. जरी मार्गदर्शना खाली कितीही मेहनत केली असली तरी त्याचे स्वबळ हेच त्याला विजया पर्यंत पोचवू शकते.

गुरू चे स्थान अतुलनीय आहे यात मुळीच शंका नाही. पण गुरू हा देव होऊ शकत नाही. आपली खरी गफलत सुरू होते ज्यावेळी आपण गुरूला देवाच्या स्थानी धरू लागतो. आपल्या विवंचना, दु:खे आपण त्याच्या भरवशावर सोडू लागतो. त्याच्या कडून चमत्काराची अपेक्षा करू लागतो. गुरू हा फक्त वाटाड्या आहे, अंतिम ध्येय नव्हे. अंतिम ध्येय हे परमात्म्यामधे विलीन हेच असले/ राहीले पाहीजे. त्या गोष्टीचा विसर पडता कामा नये. पिता, माता आणि गुरू हे कायमच आदरस्थानी राहणार पण ते देव नाहीत याचे भान ठेवले पाहीजे. गुरू हा एक मनुष्य आहे. त्याला पण मोक्ष प्राप्तीसाठी प्रवास करायचा आहे. त्याला पण सर्व भावना विकार आहेत. तो सुध्दा आपल्या कुवती प्रमाणे त्यांच्याशी लढा देऊन पुढे जात असतो. एक चांगला शिष्य या नात्याने गुरूची चुक काढण्याचा अधिकार आपणास मुळीच नाही. पण अंधपणाने गुरूच्या वर्तनाचे अनुसरण करणे सुध्दा चुकीचे ठरू शकते

कोणतेही पाऊल टाकताना गुरूने शिकवलेली विद्या, स्वत:ची सारासार बुध्दी, मोह, अहंकार आदी भावनांपासून सुटका करून घेऊनच पुढे जाता आले पाहीजे

अखेरीस प्रत्येक आत्मा हा एकटा असतो. त्याचा केवळ आणि केवळ परमात्म्याशी संवाद चालू असतो. बाकी सर्व नाती अगदी गुरू सहीत सर्व केवळ मार्गस्थ असतात. अंतिम ध्येय हे एकट्यालाच गाठायचे असते.

परमेश्वरी कृपा

आपण कायम म्हणतो की जे काही आहे ते सर्व देवाच्या कृपेनं आहे. ज्यानं दिलं त्याच्याच चरणाशी वाहीलं, यात मी काय विशेष केलं

तूच घडविशी, तूच फोडीशी
कुरवाळीशी तू, तूच तोडीशी

भक्ती मार्गामधे हे विचार योग्य वाटत असले तरी माझ्या दृष्टीकोनातून यात थोडी सुधारणा हवी. जर देव सर्व घडवतोय, जोडतोय किंवा तोडतोय तर रावण, दुर्योधन का निर्माण केले? कोणासमोर आदर्श घालून देतोय जर सर्वच गोष्टी त्यानं ठरवल्यात? कशा साठी अवतार घेऊन आदर्शपणाचे धडे देतोय. आपण रावणाच्या अहंकाराला अथवा दुर्योधनाच्या क्रूरतेला का नावं ठेवायची जर त्या सुध्दा त्याच इश्वराची लिला आहेत? हा सर्व अट्टाहास कशाबद्दल? अगदी मृत्यूसुध्दा इश्वरच ठरवतोय तर हे पाप पुण्य, चांगलं वाईट असे खेळ का करायचे किंवा का विचार करायचा

इश्वरानं प्रत्येक जीवाला या पृथ्वीवर जन्म दिला ही गोष्ट खरी. त्या बरोबर त्याचे प्रारब्ध, नियती त्यानं ठरवून दिलं हे सुध्दा तितकंच सत्य. एखादी चांगली अथवा वाईट घटना त्याच्या आयुष्यात घडणार हे निश्चित. पण त्या घटनेत तो जीव अथवा  ती व्यक्ती कशाप्रकारे त्या घटनेस तोंड देईल हे निव्वळ त्याची बुध्दी ठरवते. त्याच्या सदसद विवेक बुध्दीवर, त्याच्या आत्मविश्वासावर, त्याच्या अनुभवांवर, त्याच्या क्षमतेवर तो त्याची प्रतिक्रीया ठरवतो. देवानं नेमून दिलेल्या घटनेला तो टाळू शकत नाही पण तो त्याचे विचार बदलू शकतो. त्याच्या कृतीवर त्याची योग्यता ठरते; त्याच्या कृतीच्या परीणामांवर त्याची योग्यता ठरत नाही. त्याच्या विचारांवर त्याचा राम का रावण हे ठरते. याच कारणामुळे रावण तसेच दुर्योधन हे वाईट आणि शिक्षेस पात्र आहेत. त्याच्या विचाराना सक्षम करण्याचे योग्य दिशा देण्याचे काम गुरू करतो. पण गुरू त्याचे विचार अथवा कृती ठरवू शकत नाही.

तात्पर्य इतकेच की देव सगळ्या गोष्टी करत नसतो. कृती करणारे आपणच असतो. आपण फक्त त्याचे श्रेय देवाला अर्पण करायचे असते. जर श्रेय अथवा परीणाम हा स्वत:च्या फायद्यासाठी असेल तर ते विकर्म बनते. पण जर ते परमात्म्याला अर्पण केले तर ते अकर्म होते. फळापासून सुटका होते


राम कृष्ण गोविंद विठ्ठल केशव। 🙏

No comments:

Post a Comment

Name:
Message: