Monday 28 August 2017

स्थित:प्रज्ञ


[टिप: या लेखाचा विषय हा माझ्या कक्षेच्या कुवतीच्या बराच बाहेरचा आहे. तरीपण हे धाडस करून काही ओळी लिहून काढल्या आहेत. तज्ञ वाचकानी जर काही त्रुटी आढळली तर कृपया प्रांजळपणे स्पष्ट शब्दात माझी कान उघाडणी करावी ही नम्र विनंती. मी आपल्या अभिप्रायाच्या सदैव प्रतिक्षेत राहीन.🙏🙏🙏 ]

प्रत्येक माणसाचं आयुष्य हे सुख आणि दु: यांनी भरलेले आहे. आनंद वार्ता ऐकून सुखावलेला माणूस क्षणार्धात दु:खी घटनेने अथवा विचाराने त्रस्त होतो. माणसाचे मन हे सतत सुख दु:खाच्या झोपाळ्यावर बसून उंच झोके घेत असते. जितका उंच झोका जाईल तेवढ्या उंचावरून खाली येणार हे निश्चित. काही लोक हा हिंदोळा सहन करू शकतात तर काहीना अश्रू अनावर होतात. काही लोकांच्या भावना दुखावतात तर काही लोक भाव शुन्य होतात. सुख आणि दु: हे एकटे कधीच भेटत नाहीत. रात्री नंतर दिवस उजाडतो त्याप्रमाणे दु:खानंतर सुखाचा सूर्य उगवणार हे नक्की आणि कालांतराने तो सूर्य अस्ताला पण जाणार हे ही तितकेच सत्य! तर मग यावर उपाय काय? हे चक्र थांबवणं शक्य आहे का?

चक्र थांबवणं कुणाच्याच हातात नाही. माणूस परीस्थितीचा फक्त एक घटक आहे. परीस्थिती माणसाचा घटक नाही. माणूस परीस्थिती नुसार स्वत:ला बदलण्याचा प्रयत्न करू शकेल पण परीस्थिती बदलू शकणार नाही. त्याहून महत्वाचे म्हणजे त्याला हे चक्र थांबवणं कदापी शक्य नाही. चक्र हा तर निसर्गाचा नियम आहे आणि त्यातील बदल हे अंतिम सत्य आहे. मग याचा अर्थ माणूस हा कायच सुख दु:खाच्या चक्रात अडकून राहणार का? यावर मार्ग काय? नक्कीच काही मार्ग आहेत. अनेक धर्म ग्रंथांमधे विवीध मार्ग सुचवले आहेत.

भगवद गीते मधे यावर खुप छान भाष्य केले आहे. हजारो वर्षांपूर्वी लिहली गेलेली ही गीता आजच्या काळात सुध्दा आपल्याला मार्गदर्शक ठरू शकते. भरकटलेल्या माणसाची अवस्था अर्जुना च्या भुमिकेतून अभिप्रेत होते. या ग्रंथाकडे केवळ धार्मिक ग्रंथ म्हणून पाहता जर एखादा मार्गदर्शक म्हणून पाहीले तर विषयाचे आकलन चांगल्या प्रकारे होऊ शकेल. नक्कीच सुख दु:खाच्या चक्रातून सुटका करून घेण्याचे मार्ग दिसू शकतील

मनुष्याच्या सुख दु:खाचे मुळ कारण आहे त्याच्या मनाची अवस्था आणि जडण घडण. मनुष्यावर या मनाचं अधिपत्य असतं. मन जे सांगेल ते तो ऐकत असतो. मनाला पटेल तीच कृती. मन उधळलेल्या वासराप्रमाणं स्वैर संचार करू पाहतं आणि त्यातच माणसाची कृती ही प्रकृती राहता विकृती बनत जाते. चांगुलपणाची आणि सज्जनतेची सीमा ओलांडून मन कधी दूर निघून गेले याचा बोध ही होत नाही. या अशा मनावर लगाम घालणं अतिशय आवश्यक असतं. याचा अर्थ मन मारणं असा नाही. मनाला सदसदविवेक बुध्दीची ओळख करून देणे, त्या प्रमाणे वागायला शिकवणे आणि अंतत: सुख दु:खाच्या चक्रातून सुटका करून घेणे ... इतकाच उद्देश आहे. स्वच्छंदी पणाचं तर आम्हाला कौतुक! स्वातंत्र्याची परीभाषा! मग त्या मनाला पारतंत्र्यात ठेवावं का? हे समजून घेणं आवश्यक आहे की हे पारतंत्र्य नसून केवळं वळण लावणं आहे. डोंगर माथ्यावरून बेफान वाहणाऱ्या पाण्यामुळे दरडी कोसळतात. पण निसर्ग याच पाण्याला ज्यावेळी मार्ग करून देतो त्यावेळी ते सुंदरशा झऱ्याच्या रूपात वाहू लागतात. आपल्या मनाला झऱ्याच्या स्वरूपात वाहू द्या. त्याला बेफान कोसळू देऊ नका

प्रत्येकाला सुखी होण्याची घाई असते. चिरंतन सुखासाठी अधिक तपस्या करावी लागते. जो आजार तात्काळ नष्ट होतो तो पुन्हा उद्भवण्याची शक्यता असते. या उलट जो आजार बरा करण्यासाठी योग्य कालावधी पर्यंत औषधोपचार घेतो त्याचा समूळ नाश होतो. जे सुखाचे सोपे मार्ग दिसतात ते क्षणभंगूर असतात. त्यातून दु:खाची उत्पत्ती होऊ शकते. पण अभ्यासपूर्ण केलेले मनावर  संस्कार त्याला शुध्द करतात. सुखाची परीभाषाच बदलतात. तुम्ही धार्मिक असण्याची गरज नाही. तुम्ही अस्तिक बनण्याची गरज नाही. पण श्रध्दा हवी, दृढ विश्वास हवा. संयम हवा, प्रयत्न हवेत. पहिला एक प्रयत्न आहे स्थित:प्रज्ञ. चंचल मनावर लगाम घालून योग्य वळण लावलेल्या व्यक्तीस स्थित:प्रज्ञ म्हणतात

गीतेच्या दुसऱ्या अध्याया मधे एक महत्वाचा विचार मांडलेला आहे. तो म्हणजे स्थित:प्रज्ञ. मनावर नियंत्रण ठेवणाऱ्या योगी व्यक्तिस स्थित:प्रज्ञ म्हणतात. पण हा स्थित:प्रज्ञ असतो कसा? तो नक्की ओळखायचा कसा? काय केल्यावर आपण स्थित:प्रज्ञ बनू शकतो? या अशा सर्व प्रश्नांची उत्तरे या अध्याया मधे वर्णन केली आहेत. अशा व्यक्तीचे काही गुण सांगितले आहेत. ते गुण जी व्यक्ती धारण करू शकेल ती स्थित:प्रज्ञ म्हणून ओळखली जाईल.

स्थित:प्रज्ञ व्यक्ती आकांक्षा रहीत असते. अशा व्यक्ती सदैव समाधानी वृत्तीची असतात. त्यांच्या आचरणात, मनात सतत समाधान दिसते. तरीपण ही व्यक्ती कर्तव्यांचा त्याग करत नाही. पण कर्तव्य पार पाडत असताना या व्यक्ती मधे हाव अथवा इर्षा नसते. वृत्ती कायम स्थिर समाधानी राहते. दुसऱ्याला हरवण्याचा उद्देश मनामधे नसतो. केवळ कर्तव्य करीत राहणे इतकेच उद्दीष्ट असते. या व्यक्तीची बुध्दी स्थिर असते. कोणत्याही दु:खद अथवा सुखद परीस्थितीत ही व्यक्ती भावनाविवश होत नाही. कोणत्याही परीस्थिती मधे ही व्यक्ती उत्तेजीत होत नाही. या व्यक्ती मधे मनाचे संतुलन दिसून येते. या व्यक्ती स्वत:ला सुख अथवा दु: यापासून दूर ठेवतात. या कारणामुळे या व्यक्ती क्रोध, मत्सर, भय अथवा इर्षा यापासून स्वत:ला दूर ठेऊ शकतात. या व्यक्तीची मानसिक स्थिती इतकी स्थिर असते की कोणत्याही भावनेच्या आवेगाचे चिन्ह दृष्टीस पडता ही व्यक्ती स्वत:च्या मनाला सावरून घेतात पण त्याना वाहू देत नाही. भावनेचा उद्रेक होऊ शकत नाही. ज्याप्रमाणे आपत्कालीन परीस्थितीत कासव आपले पाय, डोकं आणि शेपूट कवचाच्या आत घेऊन स्वत:चे संरक्षण करते. त्याप्रमाणे ही व्यक्ती सर्व भाव भावनांना नियंत्रणाच्या कवचामधे आकुंचित करून मनाचे संरक्षण करते. स्थिर भाव ठेवणारी व्यक्ती स्वत:ला सुख दु:खाशी जोडता केवळ एका निरीक्षकाचे काम करीत असते. घटना, वस्तू यांचे अस्तित्व बदलत नाही पण त्यांच्याकडे पहाण्याचा दृष्टीकोन बदलतो. ज्याप्रमाणे उपवास करणाऱ्या व्यक्तीला खाद्यपदार्थ जरी प्रिय असले तरी ती त्यांचा त्याग करते त्या प्रमाणे स्थिर व्यक्ती ही कोणत्याही वस्तू अथवा घटनेकडं त्रयस्था प्रमाणे दृष्टी ठेवते. या व्यक्तीचे भाव आणि मन हे त्याच्या नियंत्रणात कार्य करतात

ज्या व्यक्ती स्थित:प्रज्ञ होण्याचे प्रयत्न करतात त्याना साधक म्हणतात. माणसाची इंद्रिये ही घोड्यांप्रमाणे असतात. कोणत्याही आकर्षणाला ती सहज बळी पडू शकतात. दिशाहीन उधळून ती चंचल मनाला भरकटवू शकतात. साधकाचे काम या घोड्यांवर नियंत्रण ठेवण्याचे असते. ते मुळीच सोपे नाही. परंतु अतिआवश्यक आहे. ऐहिक वस्तुनिष्ठ गोष्टींकडं मन लावून धरल्यास त्या बद्दल प्रेम आणि ओढ निर्माण होते. या आकर्षणातून अपेक्षा आणि अपेक्षांमधून क्रोध उत्पन्न होतो. क्रोध निर्माण झाला की बुध्दी चालत नाही. ज्या प्रमाणे धुक्याने सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोचू शकत नाही, त्या प्रमाणे क्रोधाचे धुके बुध्दीच्या किरणाना योग्य दिशा देऊ शकत नाहीत. ते अडसर निर्माण करतात. मनुष्य चुक करण्यासाठी उद्युक्त होतो. मनाला सदसद विवेक बुध्दीचे भान रहात नाही.परंतू या श्रुंखलेला उद्भवू देण्यासाठी मनावर आणि इंद्रियांवर नियंत्रण ठेवणे अतिशय महत्वाचे आहे. आकर्षण अथवा प्रेम तयार होऊ देणं हे अकृतिम अथवा अशक्य असे वाटू शकते पण याच कारणासाठी ते आकर्षण प्रेम जर योग्य दिशेला जे चिरंतन टिकणारे आहे, ज्या मधे स्पर्धा नाही, ज्या मधे अपेक्षा नाहीत अशा परमात्म्याच्या केंद्री ठेवले तर अशक्य वाटणारी गोष्ट शक्य होऊ शकते. या प्रयत्नानी एक आंतरीक उर्जा प्राप्त होऊ शकते जी मनाला शांतता देते आणि सर्व सुख दु:खा पासून मुक्ती देते. परंतू ज्याप्रमाणे एक वादळी वाऱ्याचा प्रवाह पाण्यातून जाणाऱ्या नौकेला मार्गापासून विचलीत करू शकतो त्याप्रमाणे एका इंद्रियाचा प्रभाव हा बुध्दीमान मनाला पदभ्रष्ट करू शकतो. ऐहिक सुखामधे आनंद शोधणाऱ्या लोकांना त्याच्या प्राप्तीमधे सुखाची अनुभूती होते. त्याला ते दिवस संबोधतात. पण जर ते सुख मिळू शकले नाही तर ते दु:खी होतात, ज्याला ते रात्र संबोधतात. या उलट साधकासाठी ऐहिक सुखाची कामना करणे हीच रात्र ठरते तर या सुख दु:खा पासून मनाला वेगळे करणे हा त्यांचा दिवस असतो. ज्याप्रमाणे महासागर हा कधीच वाहून जात नाही अथवा आटून कोरडा होत नाही. त्यामधे अविरत नद्या पाणी ओतत असतात पण महासागर आपल्या सीमा उल्लंघन करीत नाही, त्या प्रमाणे साधका च्या समोर जरी अनेक इंद्रियासक्तीच्या घटना घडल्या तरी त्याला मन अचल शांत ठेवावे लागते. जी व्यक्ती ऐहिक वस्तुनिष्ठ गोष्टींपासून स्वत:ला दूर ठेवण्यात यशस्वी होते तीच व्यक्ती अहंकार, क्रोध, हाव यांपासून दूर राहू शकते.

स्थित:प्रज्ञ व्यक्ती संसार करीत नाही का? जर डोळ्या समोर ध्येय नसेल तर कर्तव्य पार पाडू शकेल का? का त्यानं यातून विरक्ती स्विकारून संन्यास घ्यावा? संसाराचा त्याग करूनच फक्त स्थित:प्रज्ञ होता येतं का? संसारातील उपभोग्य वस्तूंचा सुखाचा त्यानं त्याग करणं आवश्यक आहे का? या अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न मी पुढील लेखात देण्याचा प्रयत्न करेन. तो लेख कर्मयोग विषयावर आधारीत असेल.

No comments:

Post a Comment

Name:
Message: