Monday 28 August 2017

कर्मयोग

*कर्मयोग*

स्थित:प्रज्ञाची संकल्पना मागील लेखात समजून घेण्याचा प्रयत्न केला. पण अजूनही काही प्रश्न अनुत्तरीतच राहतात. अनेक शंका निर्माण होतात. विचार पटला असला तरी त्याच्या शक्यतेवरच मोठाले प्रश्नचिन्ह वाटते. हे कसं शक्य आहे? मनावर नियंत्रण म्हणजे नक्की काय करायला हवं? पुत्र प्रेम, पत्नी प्रेम, माता पिता प्रेम, अर्थार्जन, जिद्द, जिज्ञासा या सर्व गोष्टींचे काहीच मोल नाही का? त्यांचा त्याग कसा काय करता येईल? त्या पेक्षा संन्यास घेऊन दूर निघून जावे का? असे एक ना अनेक प्रश्न मनात घर करून राहतात.

या सर्व प्रश्नांची उत्तरे भगवत गीते मधे शोधण्याचा हा छोटासा प्रयत्न! माझ्या अल्प बुध्दीला जे समजलं, भावलं ते शब्दात मांडण्याचा एक बालीश प्रयत्न

भगवंतानी गीतेच्या तिसऱ्या अध्यायामधे कर्मयोगाचा उपाय सुचवला आहे. आपल्या कृतीला अथवा कर्तव्याला सोडून देता जर त्यातून आपण आपला स्वार्थ त्याग करू शकलो तर कर्मयोग साध्य होऊ शकतो. स्थित:प्रज्ञ असणारी व्यक्ती कर्मयोगाचे आचरण उत्तम प्रकारे करू शकते. कर्मयोगाची शिकवण ही स्थित:प्रज्ञाच्या तत्वांवरच आधारीत आहे.

परमसुख मोक्ष प्राप्तीचे दोन मार्ग आहेत. एक आहे  ज्ञानयोग, ज्या मधे बुध्दीवान व्यक्ती आत्मा शरीर यातील फरकाचे पुर्ण ज्ञान प्राप्त करून घेते. तर दुसरा मार्ग हा कर्मयोगाचा आहे. मनुष्याच्या कर्म करण्याच्या पद्धतीवर त्याची दिशा ठरते. कर्मयोगाच्या दिशेने गेल्यास संसारात राहून सुध्दा सर्व व्यवहार पार पाडून अथवा यथायोग्य भोग भोगून परमात्म्याची प्राप्ती करणे अर्थात मोक्ष मिळवणे शक्य होऊ शकते. कर्म आणि स्वार्थ यामधे अंतर ठेवण्याची शिकवण या कर्मयोगातून मनुष्याला दिलेली आहे

कोणी ही व्यक्ती कर्मापासून मुक्त होऊ शकत नाही. अगदी ज्ञानयोगी सुध्दा कर्मापासून वंचित राहून ज्ञान प्राप्त करू शकत नाही. ज्ञान प्राप्त करता केलेली भक्ती ही निव्वळ भावनेचा खेळ बनते तसेच भक्ती विना प्राप्त केलेले ज्ञान हे मोक्ष सुख देऊ शकत नाही, ते व्यर्थ जाते. ज्ञान मिळवता केलेली भक्ती ही अंध ठरते. भक्ती विना प्राप्त झालेले ज्ञान हे संपुर्ण व्यर्थ असते. म्हणूनच ज्ञान भक्ती दोन्हीच्या संयोग घडवून आणणे गरजेचे असते

कर्मयोग हा सर्व प्राणीमात्राना लागू होतो. ज्ञानयोगी अथवा प्रत्येक प्राणीमात्र हे कर्माशी बांधलेले असतात. कोणालाही कर्मा चा त्याग करून राहणे शक्य नसते. फक्त जीव नव्हे तर सर्व इंद्रिये अवयव सुध्दा कर्मापासून विलग राहू शकत नाहीत. डोळे, कान, मेंदूतील विचार आदी सर्व आपापली कर्मे करीत असतात. डोळ्याना समोर जे असेल ते पहाण्याचे कार्य करावेच लागते, जो ध्वनी कानावर पडेल तो ऐकण्याचे कार्य कर्णेंद्रियाना करावेच लागते. परंतु या इंद्रियांचा उपयोग कसा करायचा ते व्यक्तीच्या नियंत्रणात आहे. आपल्या डोळ्यानी काय पहायचे, कानानी काय ऐकायचं आणि मेंदूनं काय विचार करायचा हे व्यक्ती स्वत: ठरवू शकते. याचाच अर्थ की कर्म कोणते करायचे हे मनुष्य स्वत: ठरवू शकतो. कर्मचा उपयोग जर फलप्राप्तीसाठी अथवा स्वार्थासाठी झाला तर ते कर्म मोक्षसुख देण्यास असमर्थ ठरते. जी व्यक्ती इंद्रिय ज्ञानावर अतर्मनातून नियंत्रण ठेवू शकते तरीसुध्दा निस्वार्थ पणे कर्म करीत राहते, ती व्यक्ती मोक्ष सुखाला प्राप्त करते.

प्रत्येक व्यक्तिने नित्यकर्म आणि वेदीक कर्म करीत राहणे अतिशय आवश्यक आहे. त्या कर्मांचा त्याग करणे शक्य नाही. झोप, खाणे, आंघोळ आदी कृतीना नित्यकर्म म्हणायचे तर व्यवसाय, नोकरी, सामाजिक तसेच कौटुंबिक जबाबदारी याना वेदीक कर्म म्हणायचे. हे कर्म यज्ञातील आहूती प्रमाणे असावे. अन्यथा त्या कर्माला स्वार्थ चिकटतो. जर फलप्राप्तीसाठी कर्म केले तर ते परमात्म्यासाठी बनता केवळ व्यक्तीपुरते मर्यादित राहते. कर्माला अपेक्षेपासून वेगळे करता आले पाहीजे

त्यागातूनच परमात्म्याला समाधान मिळते. जे अन्न दुसऱ्यासाठी प्रथम बनते ते पापमुक्त होते. पण जे अन्न फक्त स्वत:पुरते बनते ते पापयुक्त बनून खाल्ले जाते. सर्व जीवमात्राना अन्नाची गरज असते. ते अन्न हे पावसाच्या पाण्यापासून बनते. पाऊस हा त्यागाचे प्रतिक आहे. नियोजीत कर्तव्याच्या कर्मामधे मधे जर स्वार्थ नसेल तर त्या कृतीमधे त्याग दडलेला असतो.

मनुष्याच्या कर्तव्यांची ओळख वेदांमधे केली आहे आणि वेदांची निर्मीती ही भगवंताने केली आहे. भगवंत हा त्यागामधे बसतो. जी व्यक्ती त्याग स्विकारू शकत नाही ती व्यक्ती पाप करीत असते. जे लोक फक्त स्वार्थासाठी जगतात, त्यांचे आयुष्य व्यर्थ आहे. परंतु जे दुसऱ्यांच्या सुखा मधे जीवन खर्च करतात त्यानाच खऱ्या सुखाची प्राप्ती होते. जो मनुष्य आत्मसुखासाठी सतत दुसऱ्यावर अवलंबून असतो तो वास्तविक कधी सुखी होऊच शकत नाही. या उलट खऱ्या ज्ञानी मनुष्याचे सुख त्याच्या स्वत:च्या कृतीवर अवलंबून असते. त्यामुळे तो स्वत:च्या सुखासाठी दुसऱ्यावर अवलंबून रहात नाही. याच कारणामुळे ऐहीक फळाचा त्याग करून कर्तव्य पुर्तीसाठी कर्म करणे. ते असे कर्म जे फळाच्या अपेक्षे पासून दूर आहे. ज्या प्रमाणे राजा अथवा नेता वागतो त्या प्रमाणे त्याची प्रजा अथवा अनुयायी अनुकरण करतात. खरेतर भगवंतासाठी काहीच कर्तव्य नसते, भगवंतासाठी काही प्राप्त करण्यासारखे पण काही नसते. तरीपण तो त्याची सर्व कर्तव्ये पार पाडीत असतो. जर तोच कर्तव्यापासून दूर गेला तर सर्व लोक त्याचे अनुकरण करतील. जर भगवंतच स्वत: कर्तव्य पराङमुख राहीला तर या विश्वाचा नाश होईल. ईश्वरच अराजकतेचे कारण बनेल आणि ज्यामुळे मनुष्यजात संपून जाईल

मुर्ख मनुष्य कर्म करताना त्याच्या फलप्राप्तीमधे मन गुंतवतो. पण शहाणी व्यक्ती निश्चितच समाजासाठी आणि धर्मासाठी फळाची अपेक्षा करता समाजा समोर योग्य मार्गाचे उदाहरण ठेवते. अशा व्यक्ती समाजाला कर्तव्ये पार पाडण्यासाठी उद्यूक्त करतात. मुर्ख व्यक्ती आत्म्याला शरीर हीच आपली ओळख समजून कर्म पार पाडणारे शरीर हे स्वत:चेच अशी गैरसमजूत करून घेते. परंतु खरा बुध्दीमान मनुष्य हा आत्म्याच्या गुण कर्म यातील भेद ओळखू शकतो. त्याना याचे ज्ञान असते की इंद्रिय, मन आदीगुण हेच इतर गुणांवर (पदार्थ स्वरूप) नियंत्रण ठेऊन असतात. यामुळे असे लोक कोणत्याही ऐहीक गुणाकडे आकर्षित होऊ शकत नाहीत. जी व्यक्ती ऐहीक सुखाच्या भोगण्यामधे समाधान शोधते ती त्याच्या फळामधे मन गुंतवते. परंतू बुध्दीमान व्यक्ती हे सत्य जाणते. प्रत्येक कर्म हे भगवंतास अर्पण केले जाते त्यावेळी ती व्यक्ती स्वार्थ आणि इच्छां पासून मुक्त होते. अशी व्यक्ती फलप्राप्ती पासून मन दूर ठेवते. ही शिकवण पाळणारी व्यक्ती खोट्या विश्वासापासून आणि दुराग्रहापासून दूर राहू शकते. जो मनुष्य ही शिकवण मानत नाहीत किंवा त्यात दोष काढतात ते ज्ञाना पासून वंचित राहतात. असे लोक या तत्वज्ञानाला समजू शकत नाहीत आणि स्वत:चे आयुष्य उध्वस्त करून घेतात.

मनुष्याने जर स्वत:चे कर्तव्य स्वत: ओळखले आणि ते पार पाडले तर त्यासारखे योग्य दुसरे काही असू शकत नाही. जे दुसऱ्याचे अनुकरण करतात, भले ते कितीही उत्तम असो, त्यामधे सर्वनाश ठरलेला आहे.

सारांश रूपात पुत्रप्रेम, पत्नीप्रेम हे जरूर असावं पण त्यात मोह नसावा. ज्या प्रमाणे श्रीरामाने सीतेची सुटका करण्याचे कर्तव्य पार पाडले पण कर्तव्य पुर्तीसाठी मनावर दगड ठेऊन सीतेचा त्याग केला, त्या प्रमाणे प्रेम असावे. नोकरी, धंदा, अर्थाजन ही सर्व कर्मे करणे आवश्यक आहे. त्यांचा त्याग करण्याची गरज नाही. पण त्यामधे मोह नसावा, इर्षा, वासना नसावी. त्यातूनच राग उत्पन्न होतो आणि पाप करण्याची वृत्ती निर्माण होते. संसाराचा त्याग करून संन्यास घेण्याची गरज नाही. आहे ते कर्म जर स्वार्थ त्यागून पार पाडले तरी मोक्ष प्राप्ती म्हणजेच परम सुखाची प्राप्ती होऊ शकते


No comments:

Post a Comment

Name:
Message: