Saturday 29 July 2017

साऊथवाला ढिच् कँव!

[टिप: कोणाच्या ही भावना दुखावण्याचा उद्देश नसून केवळ करमणूक इतकाच लेखाचा हेतू आहे. जाणकार वाचकानी समजून घ्यावे.]

क्रिकेट, राजकारण आणि बाॅलिवुड यांचे ज्ञान असल्याशिवाय तुम्हाला भारतीय नागरीकत्व मिळत नाही असे म्हणतात. पंतप्रधान मोदींनी या तीन विषयांच्या बरोबरीने अर्थकारण हा सुध्दा विषय जोडलाय असं ऐकीवात आलंय. असो! गरज पडलीच तर परीक्षा द्यायला बिहार मधील एखादे सेंटर गाठावे लागेल पण आत्ता पासून फारशी चिंता करायला नको.

दक्षिणेकडच्या बांधवांनी या अटीवर एक छान तोडगा काढला आहे. त्यांनी राजकारण आणि चित्रपट यांची सुंदर गफलत करून दोन्ही विषय एकत्र मिसळून टाकले आहेत. कदाचित या मंडळीना रीयल लाईफ आणि रीळ लाईफ यातील अंतर मिटवून टाकायचे असेल. माझ्या माहीती मधे बऱेच तमिळ लोक आहेत. तसे हे लोक चांगलेच हुशार असतात पण चित्रपटाच्या बाबतीत या मंडळींचा तोल का ढळतो ते काही समजत नाही. चित्रपट हा त्यांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय. रजनी, विजय आदी मंडळी यांच्या देव्हाऱ्यातली! यांचे चित्रपट प्रदर्षित होणे हा तर एक राज्यस्तरीय सोहळाच जणू. सर्व सिनेगृह चोवीस तास चालू असतात. खुर्च्यांच्या दोन रांगामधील पायऱ्यांवरचे पण बसण्याचे तिकीट विकले जाते. बस मधे ज्या प्रमाणे उभं राहून, टपावर बसून प्रवास करण्याची मुभा असते तसेच यांच्या सिनेगृहात कुठेही कसेही उभे राहून चित्रपट पहाण्याची मुभा असते म्हणे! त्यासाठी खुर्चीची चैन करण्याची आवश्यकता नसते. परराज्यातून सिनेभक्तांसाठी खास गाड्या सोडल्या जातात. हा अट्टाहास केवळ बस गाड्यांपुरता मर्यादित राहता तर नुकत्याच प्रदर्षित झालेल्या "कबाली" चित्रपटासाठी खास विमाने पण सोडण्यात आली होती. चित्रपट हा या मंडळींच्या रक्तात भिनलेला आहे. या लोकांच्या संस्कृतीचा वारसा अशी काही चर्चा छेडली तर संपुर्ण वेळ फक्त चित्रपटावरच गप्पाच होतील. याचे कारण सांगताना ते म्हणतात की तामिळनाडू हे एक इमोशनल स्टेट आहे. मग बाकीची राज्ये काय पाषाण हृदयी आहेत का काय? पण असो. मी त्याना कबुली देऊन त्यांचा विषय पुढील चित्रपटाकडे वळवतो. या राज्याला कदाचित चित्रपटाचा शोध लागण्यापुर्वी इतिहासच नव्हता असे वाटते. काॅंग्रेसच्या राजकारण्यानी आम्हाला कोणी तमिळ स्वातंत्र्य सैनिक शिकवलाच नाही. जणू हे राज्य चित्रपटाच्या शोधानंतरच घडले. रिक्शावाल्यापासून ते आलिशान पंचतारांकित हाॅटेल पर्यंत सर्व ठिकाणी निव्वळ निव्वळ चित्रपटांचेच वर्चस्व दिसते. या राज्यातील बुध्दीवादी जनता त्यांचे विचार मांडताना अथवा गहन मुद्दे पटवून देताना पण चित्रपटातील प्रसंगांचे दाखले देते. रामायण महाभारत यांच्यापेक्षा या जनतेला चित्रपटातील कथांवर अधिक विश्वास वाटतो. येथील कितीही उच्चशिक्षीत व्यक्तीस त्यांच्या चित्रपट संस्कृतीचा सार्थ अभिमान वाटतो. चित्रपटातील नायकाची समाजातील प्रतिमा ही त्याने केलेल्या भुमिकांवर ठरते. फक्त फक्त चांगल्याच भुमिका हे यशस्वी नायक स्वत:साठी लिहून घेतात. जनमानसातील आपली प्रतिमा अशाप्रकारे जपण्याची त्याना ते गरजेचे वाटते

मला स्वत:ला तशी हिंदी वा मराठी चित्रपटांची फारशी आवड नाही. घरच्यानी जबरदस्ती नेले किंवा ऑफीसातल्या चर्चेत बोलायला काहीतरी मुद्दे मिळावेत म्हणून ज्ञानग्रहण उद्देशाने कधीतरी जातो. पण तमिळ चित्रपट पहावा असा बाका प्रसंग कधीच उद्भवला नव्हता. पण नशिबात कोणाच्या काय वाढून ठेवलंय काही सांगता येत नाही म्हणतात ना! रजनीकांतचा असाच कुठलातरी चित्रपट सिनेगृहात गर्दी खेचत होता. (टुकार शब्दाचा वापर आवर्जून टाळतोय याची नोंद घ्यावी.) पुण्यासारख्या शुध्द मायमराठी भुमीत सुध्दा या चित्रपटाने बरीच रणधुमाळी माजवली होती. माझ्या ऑफिसातल्या काही सहकाऱ्यानी एक दिवस माझ्या अनुपस्थितीत कट रचला. त्यांच्या कटात माझी मंजुरी गृहीत धरण्यात आली. आणि त्या काळ्या रविवारी मला नीटशी पुर्वकल्पना देता सिनेगृहात आसनारूढ केले. भाषा ही पुर्णत: भिन्न असल्यामुळं संवादा मधील काही समजावं अशातली काही शक्यता नव्हती. इंग्रजीतले संवाद वाचावेत म्हणलं तर अक्षरं आणि शब्द लागे पर्यंत चार वाक्य पुढं गेलेले असायचे. यामुळं मी अशा निष्कर्षा पर्यंत आलो की या लोकानी थोडं सावकाश बोललं पाहीजे. किमान माझ्या सारख्या प्रेक्षकावर दया म्हणून तरी! जर खरोखरच त्यांच्या भाषेत काही संस्कृत चा अंश असेल तर माझ्या मेंदू पर्यंत तरी पोचेल अर्थबोध होईल. पण ती शक्यता होणे अशक्य होते. अशा दक्षिणी चित्रपटांचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे कथावस्तू प्रसंग यांचे अति उदात्ती करण अति भव्यता! खरंच कसं काय जमतं याना सगळं मला कुतूहलच आहे. आमच्या सहकाऱ्यांपैकी तमिळ सहकाऱ्याचा आज भलताच भाव वधारला होता. तो डोळ्यात आसवं गोळा करून "मेरे देशकी धरतीऽऽ" या धर्तीवर चित्रपटाचे धावते समालोचन करीत होता. त्याच्यामते चित्रपटातील संवाद हे अतिशय प्रभावशाली आणि चपखल होते. पण माझ्यामते चित्रपटाच्या निर्मीतीच्या गडबडीत दिग्दर्शकाकडून कथाच घालायची विसरली होती. एका मागून एक घडणारे प्रसंग आणि आक्रस्ताळे संवाद (माझ्यासाठी फक्त आवाज) "हे तसे का" असा सोपा प्रश्न मी सोडून इतर कोणाही प्रेक्षकाला पडलेला दिसत नव्हता. चित्रपटाची नायिका सोडल्यास नायका पासून सर्वच रंगाने पक्के आणि अतिकेसाळ शरीरयष्टीचे होते. रजनी दर दहा मिनीटानी कोणातरी खलनायकाला धुवून काढीत होता. तो नक्की का मारतोय याचा बोध होई पर्यंत पुढील धुलाईचा कार्यक्रम चालू होत असे. सर्व खलनायकांचे रंग रूप एकसारखेच असल्यामुळे तो एकाच व्यक्तीला धुतोय अशी शंका माझ्या मनात येऊन गेली. पण चित्रपटाची उत्कंठा खंडीत करता मी चेहऱ्यावरील उत्सुकता कायम ठेवली. प्रत्येक धुलाई प्रसंगापुर्वी छान गोंडस सजावट केलेल्या वस्तूंचा पुढील दहा मिनीटात सत्यानाश केल्याशिवाय रजनीला चैन पडत नव्हती. तर अशा प्रकारे तब्बल तीन तास सर्व तमिळ कलाकाराना शब्दश: कानावर तसेच दृष्टीवर झेलून आम्ही बाहेर पडलो. डोके गरगरायला लागले होते. त्या नंतर बरेच दिवस कुठून तरी रजनी येईल आणि काही कारण सांगता आपली धुलाई करून जाईल अशी उगाचच भीती मनात डोकावत होती. जरी त्याने कारण सांगितले तरी मला थोडीच कळणार होते. माईंड इट! अण्णा रास्कलऽऽ! असं काही बोललं की तमिळ पब्लिक फिदा. शेंगदाण्या प्रमाणे सिगरेट तोंडात टाकली किंवा उजव्या हाताच्या बोटावर पिस्तुल फिरवले अथवा गाॅगल विचित्र पध्दतीने फिरवून स्वत:च्याच डोळ्यावर चढवला तर त्याला स्टाईल असं काहीतरी म्हणून डोक्यावर घेतलं जातं. या स्टाईली डोक्यावर घेणाऱे कोणत्याही वयाचे असू शकतात; फक्त सच्चे तमिळ असायला हवेत. बस्स!

व्हाटसॲप च्या दुनियेत या तमिळ चित्रपटांचे बरेच तुकडे पहायला मिळतात. सर्व तुकडे अतिशय हास्यास्पद आणि अचाट कल्पनाशक्तीचे असतात. एका व्यक्तीने शंभर जणाना लिलया लोळवणं ही गोष्ट तर सर्वमान्य समजली जाते. खरी मजा येते त्यांच्या त्या हून अचाट अतर्क्य प्रसंगांची. हाॅस्पिटलमधे ICU मधे पुर्णत: मोडलेला नायक जेव्हा दोनशे किलोमीटर अंतरावरून आई ने मारलेल्या हाकेने चवताळून उठतो आणि क्षणार्धात ठणठणीत बरा होऊन खलनायकाच्या अड्ड्यावर पोचतो. तिथे वाट पाहणाऱ्या खलनायकाला लिलया धूवून काढतो. अशावेळी दैवी चमत्कारावर विश्वास बसू शकतो. खलनायकानं मारलेल्या बंदुकीची गोळी सहजगत्या चिमटीत पकडून तोंडात त्याचे च्युइंग गम करणारा नायक पाहीला की राम कृष्णां पेक्षा हाच नायक श्रेष्ठ वाटू लागतो. एका नायकानं बंदुकीच्या एका गोळीत दोन गुंडाना मारण्यासाठी गोळीच्या पाठोपाठ ब्लेड फेकून त्याचे दोन तुकडे केलेले मी पाहीलेत आणि त्या भिन्न दिशेच्या दोघा खलनायकांचा खातमा सुध्दा केला. एका नायकाने तर जीप मधून हात बाहेर काढून बंदूकीची गोळी जमिनीवर मारल्यावर जीपसहीत नायक उडी मारून दहाव्या मजल्यावरील गुंडाना सहज गाठलेले मी पाहीलेय. Everything is fair in love, war and Tamil entertainment. असं वाक्य नक्कीच रजनी बोलून गेला असणार.


बाकी काही म्हणा पण या तमिळ सिनेसृष्टीकडे काहीतरी जादू आहे. गोर गरीब जनते पासून श्रीमंत लोकांपर्यंत, अशिक्षीत वर्गापासून उच्चशिक्षीत मंडळीं पर्यंत, अबालवृध्दांना चित्रपटगृहाकडे खेचून आणणे हे सोपे काम नाही. हा चमत्कार फक्त एक दोन वेळा नसून अनेक वर्षे सतत घडत आला आहे. तमिळ चित्रपट हे समाजाचे सद्य स्थितीचे प्रतिबींब दाखवतात असे फक्त त्यांचेच म्हणणे असते. समाज जे प्रत्यक्षात घडतंय ते चित्रपटात पाहतो आणि त्यावरील उपाय (मारहाण) कल्पनेत पाहतो. त्यातच त्याना समाधान वाटते. चित्रपटाचा नायक भ्रष्ट राजकारण्याना धुवून काढतो पण तोच नायक निवडणूक लढवून वास्तवात राजकारणी बनलेला दिसतो. एकंदरीत सर्वच प्रकरण समजणारं पण भव्य आहे इतके लक्षात येते. तमिळ चित्रपटसृष्टी हा दक्षिणेतली सर्वात मोठा उद्योग आहे आणि तो सर्वाधिक रोजगार निर्माण करतो. या सिनेसृष्टीला माझा मराठमोळा मानाचा मुजरा... तमिळ श्टाईल मधे ढिच् कँव!  

1 comment:

  1. good one. दाक्षिणात्य बांधवांच्या समर्पित वृत्तीला माझा पण मुजरा!
    एक महत्वाची गोष्ट म्हणजे सध्या बरेच चांगले सिनेमे तामिळमधे बनतायत. Vetrimaaran नावाच्या दिग्दर्शकाचे सिनेमे मला हटके वाटतात. जमल्यास बघा.

    ReplyDelete

Name:
Message: