Friday 21 July 2017

जनरेशन गॅप

जनरेशन गॅप

मला वाटतंय पिढ्यान पिढ्या चालत आलेला सर्वमान्य प्रश्न म्हणजे जनरेशन गॅप. आमच्या काळात असं नव्हतं हा पिढीजात संवाद मधूमेह वा रक्तदाब या आजारांबरोबर पुढील पिढीस सुपूर्द करण्यात येत असावा. माझ्या आज्जी आजोबांनी ज्या हाल अपेष्टा सोसल्या त्या मातृ पितृ वर्गाला कधी लागल्या नाहीत. आणि आमच्या पायाशी तर सुखं जणू लोळतायतच. आमच्या पुढील पिढी बद्दल बोलायचं तर... सर्व सुखं मुलांनी मागायच्या आधीच हजर करून देतो असा आमच्यावर पुराव्यांसहीत आरोप आहे. म्हणजे आम्हीच जबाबदार!

आमची चाळीशीची पिढी (३५ ते ४५ वर्षे) ही सध्या हयात असलेल्या इतर सर्वाधिक पिढ्याना जवळून पाहणारी, सोसणारी, झेलणारी आणि काळजीवाहू आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. गेल्या दोन दशकात सर्व क्षेत्रात घडलेल्या क्रांतीकारक बदलाला संपूर्णत: जबाबदार ही आमचीच पिढी आहे. हे सर्व बदल समाजात, राजकारणात, अर्थकारणात होत असले तरी त्याना केवळ आंतर राष्ट्रिय पातळीवर ठेवता अगदी प्रत्येकाच्या आयुष्या पर्यंत, घरा पर्यंत पोचवणारी ही आमचीच पिढी आहे. काँम्प्युटर, इंटरनेट, मोबाईल आदी महाक्रांतीकारक शोध आणि घरपोच प्रसार हा आमच्याच पिढीचा. तंत्रज्ञानाच्या इतिहासा पासून सखोल ज्ञानापर्यंत इंत्यंभूत माहीती असलेली साक्षिदार असलेली पण ही आमचीच पिढी. मर्फीच्या रेडीओ पासून ते युट्यूब पर्यंत, चुलीवरच्या भाकरी पासून मेक्सिकन कसेडीया पर्यंत सर्व अनुभव गाठीशी असलेली आमची पिढी. खेड्यातल्या मातीत खेळलेली आणि आलीशान इमारतीत चाळीसाव्या मजल्यावरील एअर कंडीशन्ड आॅफीसात काम करणारी पण आमचीच पिढी. टपरी वरचा चहा फुर्रकन पिणारी आणि पंचतारांकित हाॅटेल मधे हाय टी घेणारी पिढी ही आमचीच. तर अशा या आमच्या पिढीच्या दृष्टिकोनातून इतर पिढ्याना पहाताना त्या कशा दिसतात त्याना मांडण्याचा एक छोटा प्रयत्न... जरी त्याना अमान्य असला तरी! सर्व वर्णने प्रत्येकाला तंतोतंत जुळतील असा दावा नाही पण सारांश जुळेल असे वाटते.

आमचे आज्जी आजोबा (८५+ वर्षे)... बहुतांशी आम्हा पिढीच्या लोकांचे आज्जी आजोबा आता राहीलेले नाहीत. पण त्यांच्या आठवणी मात्र खुपच सुखद. डोळ्या समोर त्यांची आजही प्रतिमा उभी राहीली की निरपेक्ष प्रेमाची जाणिव होते. आजही त्यांच्या आठवणीने डोळे पाणावतात. आम्हाला कळायला लागल्या पासून त्यांचे चेहरे म्हातारेच पाहीलेत. नऊवारी साडीत आज्जी आणि धोतरामधे आजोबा असा साधारण पेहराव प्रत्येकाच्या आज्जी आजोबांचा होता. या पिढीची शिक्षणाची बाजू जरी लंगडी असली तरी छोट्या गोष्टी, कथा, म्हणी, उक्ती यांच्या मार्गे विचार समर्पक रीत्या पोचवण्याची कला होती. सोप्या शब्दात मोठा आशय अथवा सखोल तत्वज्ञान सहज सांगण्याची ताकद होती. नातवंडे पाटीवर श्री गणेशा लिहायला लागल्या पासून शिकून मोठ्ठा होई पर्यंत त्याना भारी कौतुक! प्रसंगी स्वत:च्या पोराला वा सुनेला खडसावतील पण नातवाला फक्त प्रेमच देतिल. जाता येता आमच्यावर दाब दाखवणारे आमचे माता पिता यांच्या समोर शस्त्रे टाकून सतत शरणागती पत्करलेले असत. अभ्यास हा फावल्या वेळेतील उद्योग अशी काही भावना या पिढीने करून घेतली होती. शिक्षण हे अत्यंत महत्वाचे आहे याचे ज्ञान याना कदाचित कधीच झाले नाही. बऱ्याचदा लाड या नावाखाली नातवंडांचे माफक नुकसान पण करीत असंत. या पिढीने त्यांच्या उमेदीच्या काळात अंग मेहनीतीची बरीच कामे केलेली होती. त्यामुळे नातवंडांनी अंग मोडून मेहनत केली की यांना खरा आनंद होत असे. उतार वयात ही मंडळी बरीच व्याधीग्रस्त झालेली पाहीली. त्यांच्या वेदना आम्हास निश्चितच दु:खदायक होत्या. या मंडळींचा हेकेखोर पणा त्यांच्या तब्येतीची हेळसांड होण्यास कारणीभूत होत असे आणि या उपर स्वत:च्या अज्ञानावर यांचा अचाट विश्वास! यांचे डाॅक्टर पेक्षा वेगळे विज्ञान असायचे. डाॅक्टरची अक्कल निकालात काढीत मनमानी करण्याकडे यांचा कल असे. बहुतांशी मंडळी नातू नात असा भेद करीत नसत पण काही मागास वृध्दांमधे नातीच्या तोंडाकडे पाहून उराशी खंत बाळगण्याची प्रथा होती.

आमचे पुज्य श्री आई बाबा (६५ ते ८० वर्षे)... या पिढीने अभ्यास आणि शिक्षण याचे सर्व प्रथम महत्व ओळखले. कदाचित शिक्षणाला अशक्य महत्व देणारी ही पहीली पिढी असेल. आमच्या बालपणावर अभ्यास नामक अक्राळ विक्राळ राक्षस सोडण्याचे काम या पिढीने चोख बजावले. मनात दडलेलं प्रेम रागवून आणि बडवून व्यक्त करण्याची प्रथा यानी प्रचलीत आणली. माझ्या आज्जी आजोबांपेक्षा या पिढीने जग अधिक पाहीले. शहरी सुखाची चुणूक यानी उपभोगली. तुटपुंज्या मासिक मिळकतीवर महिना ढकलण्याची कला यानी विकसीत केली. गरीबी माणसाला अनुभवी बनवते अशा प्रकाच्या अफवा पसरवल्या आणि आम्हाला पण तेच ज्ञान दिले. याना जगाचं ज्ञान चांगले मिळाले असले तरी काळाच्या बदला बरोबर हे ज्ञान वाढवू शकले नाहीत... किंवा जरी दृष्टीस पडले तरी त्यात त्याचे कुतूहल कायम ठेवले नाही. एक मोठा मध्यम वर्ग निर्माण करण्याचे काम या पिढीने केले. इंजिनीयर आणि डाॅक्टर सोडून इतर कोणत्याही क्षेत्राकडे पैसा आणि सन्मान मिळणे शक्य नाही असा शोध यानी लावला. महागाई च्या विळख्यात होरपळलेला, खर्चाचा मेळ घालताना दमून गेलेला, सुक्ष्म बचत योजनांचा पुरस्कर्ता आणि धंदा अथवा शेअर मार्केट यापासून स्वत: दूर ठेवलेला हा असा वर्ग! या वर्गाचे गप्पांसाठी महागाई, राजकारण आदी आवडते विषय. जस जसे वय वाढेल तसा आत्मसन्मान, अस्तित्व, अस्मिता हे सुध्दा वाढत गेलेले जिव्हाळ्याचे विषय. या पिढीचा एक मोठा प्रश्न म्हणजे नातवंडांशी संवाद... नातवंडांची नवीन युगाची भाषा आणि विषय हे या पिढीच्या कल्पनाशक्तीच्या बाहेरचे असल्यामुळे त्याना गोष्टी सांगून अथवा म्हणी बोलून इंप्रेस करणे याना शक्य नाही. हळू हळू व्यवहारातले विषय आवाक्या बाहेरचे होत गेले तरी यांचे मन मान्य करीत नाही. नोकरी तून निवृत्ती घेतली तरी संसारातून निवृत्ती घेणे अशक्य झाले. आधीच्या पिढीकडून कायम चेपल्या गेल्यामुळे आणि आर्थिक दृष्ट्या म्हणावी तशी मोकळीक कधी मिळू शकल्यामुळे यांच्या मनात कायम काहीतरी गमावल्याची भावना असते. अध्यात्म, अनुभव यांची जणू मक्तेदारीच. याना दिसलेला तोच खरा देव! या पिढी कडे भरपूर वेळ उपलब्ध असल्यामुळे आणि मुले नातवंडे त्यांच्या उद्योगात व्यस्त असल्यामुळे या वर्गाला मिळालेला मदतीचा हात म्हणजे टिव्ही सिरीयल्स! टिव्ही चा हा अचाट भोक्ता! मुलं, नातवंडं, सुना आपापल्या कामात गर्क असल्यामुळे या पिढीला बऱ्याचदा एकटेपणाची अथवा असुरक्षिततेची भावना वाटू शकते. मला कोणी सल्ला विचारीत नाही, माझ्या अनुभवाचा कोणी उपयोग करून घेत नाही अशी काहीतरी विचीत्र भावना त्याना सतावू लागते. या पिढीला नवीन टेक्नाॅलाॅजी वापरण्याची मात्र हौस! इंटरनेट, स्मार्टफोन आदी पटकन वापरायला शिकले तरी त्यातील खरं खोटं समजू शकत नाहीत. सोशल मिडीयावर दिसणाऱ्या गोष्टी समाजासमोर उघड्या होऊ शकतात याचे भान नसते. एटीएम चा पिन त्यावरच लिहून ठेवणारे लोक पण असतात. टेक्नाॅलाॅजी च्या सर्व गैर घटनांची तक्रार आमच्या पिढीसमोर असते. चांगल्या बरोबर वाईट गोष्टीपण तयार होऊ शकतात हे त्याना मान्य नसते. जर वाईट घडण्याची शक्यता आहे तर ती अशी गोष्ट आणलीच का असा काहीतरी विचीत्र प्रश्न ते आमच्या पिढीकडे विचारत असतात

आमचे वंशाचे दिवे आणि पणत्या.. पुढील पिढी (१२ ते २१ वर्षे) ... ही पिढी खऱ्या अर्थाने एकविसाव्या शतकातली! टिनएजर! ही पिढी तुफान वेगाने बदलणाऱ्या टेक्नाॅलाॅजीवर सहज आरूढ झालेली दिसते. नवीन गॅजेट, नवी संकल्पना, नवा विचार यावर कमालीच्या वेगाने आत्मसात करून प्रभुत्व मिळवण्याची क्षमता या पिढीत आहे. प्रत्येक कृतीतून फायदा वसूल करण्याची वृत्ती दिसतेखऱ्या अर्थाने returns on investment मिळवणारी ही पिढी! या पिढीकडे कमालीचा आत्मविश्वास दिसतो. जरी जीवघेण्या स्पर्धेमधे अडकलेली असली तरी त्याची भीती याना कधीच वाटत नाही. कदाचित यांच्या पेक्षा आमच्याच पिढीला अधिक काळजी वाटते. लहान वयात सर्व ज्ञात झाले असल्यामुळे एकतर लौकर पोक्तपणा येतो किंवा गोंधळ उडलेला दिसतो. या पिढीला चहू बाजूने नवनवीन कल्पना माहीतीचा महापूर आलेला दिसतो. त्यातून काय योग्य अयोग्य ठरवणारा नक्की यशस्वी! या पिढीचे विचार स्पष्ट आणि अपेक्षा थेट असतात. ताकाला जाऊन भांडे लपवण्याचा भीडस्तपणा या पिढीत नाही. पटणारी अथवा आवडणारी गोष्ट घाबरता जाहीर करण्याची यांच्यात क्षमता आहे. या पिढीकडे स्वत:चे मत आहे आणि ते मोठ्याना सांगण्यामधे काहीच गैर नाही या मताचे ते आहेत. "अहो बाबा" वरून "अरे डॅड" पर्यंत स्थानांतरण या पिढीने सोईस्कर करून घेतले आहे. आधीच्या पिढीच्या कोणत्याही जुन्या गोष्टींमधे याना मुळीच रस नाही. जुने उगाळायला याना आवडत नाही. कदाचित जुन्याचे महत्व समजून घेण्यास ही पिढी असमर्थ आहे असे म्हणले तरी फारसे चुकीचे ठरणार नाही. इतिहासाचा जाज्वल्य अभिमान, जुन्या संस्कृतीचा कास या अशा गोष्टींकडे "त्यात काय विशेष" असे पाहण्याची भावना. सतत नाविन्याची आवड आणि जुन्याचा उबग अशी यांची मानसिकता. जुने दाखले किंवा जुनं उगाळलेलं त्याना चालत नाही. क्षणैक सुखाची याना ओढ असते. त्याच्या प्राप्तीसाठी कोणत्याही थराला जाण्याची यांची तयारी असते. चांगलं दिसावं, तब्येत सांभाळावी, देहयष्टी कमवावी, स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे अशा गोष्टी त्याना शिकवाव्या लागत नाहीत. स्वतंत्र विचार असल्यामुळे आणि कला क्रिडा तंत्रज्ञान सर्व क्षेत्रात समान ओढ असल्यामुळे फक्त इंजिनीयर किंवा डाॅक्टर बनवणाऱ्या समाजात मोठे परीवर्तन नक्की घडू शकेल.

भविष्यातील पिढी ( ते १२ वर्षे)... या पिढीचा अंदाज लावणं तसं कठीणच आहे. सद्य परीस्थितीत ही मंडळी इतर सर्व पिढ्यान पिढ्या जन्माला आलेल्या मुलांसारखीच आहेत. त्यात आवर्जून वेगळेपणानं लिहावं असं मला काही दिसत नाही. खरी कसोटी लागणार अजून वीस वर्षानी ज्यावेळी ही पिढी कार्यकारी असेल. अजून वीस वर्षानी समाजरचना कशी असेल याचा अंदाज कोणीही केला तर तो सपशेल खोटा ठरणार इतकंच नक्की! तरीपण मला वाटते या पिढी समोर सर्वात अधिक आव्हाने असतिल. आॅटोमेशनच्या नावाखाली लाखो नोकऱ्या नष्ट होतील आणि तुटपूंज्या प्रमाणात हाय स्कील जाॅब राहतील. कला, क्रिडा क्षेत्रात अचाट क्रांती होईल. लेबरस, रिपीटेटीव कामांचे भविष्य संपल्यामुळे अभ्यासात फारशी गती नसलेल्या लोकाना उपजिवीकेचा प्रश्न अवघड बनू शकतो. अतिबुध्दीमान लोकाना मात्र खुप मागणी येईल. कदाचित गुन्हेगारी वाढू शकण्याची शक्यता आहे. नवीन कल्पना, नवीन प्रयोग याना कमालीचा प्रतिसाद मिळेल

वरील सर्व वर्णनातून एक मोठा वर्ग मी मुद्दामून गाळला आहे.. तो म्हणजे युवा पिढी (२२ ते ३५ वर्षे). जरी माझ्या परीचयाचे काही युवक असले तरी माझा त्यांच्यावर तितकासा खास अभ्यास नाही. कदाचित युवा पिढी हा खुप मोठा अभ्यासाचा स्वतंत्र विषय होऊ शकतो.

या लेखातील प्रत्येक वर्णन हे तंतोतंत जरी जुळले नाही तरी माझ्या विचाराने आणि दृष्टीकोनातून बहुतांशी लोकाना लागू पडेल. काही फारकती अथवा सुधारणा असतिल तर मला जरूर कळवाव्यात.

~संदीप कुलकर्णी

No comments:

Post a Comment

Name:
Message: