Tuesday 4 July 2017

एक प्रेमकथा

मी पण त्यावेळी प्रेम का काय केले होते खरे

वर्गातल्या एका गोड मुलीचे स्वप्न पाहीले बरे


प्रथम तिला पाहीले तेव्हाकाही नाही वाटले

बोलली ज्यावेळी तेव्हाहृदय काही धडधडले


गोड आवाजात तिनेमला विचारले होते काही

गुंगून गेलो क्षणभर, मजला काही सुधरले नाही


पुन्हा ती हळूच बोललीहव्यात मजला नोटस

भांबावून गेलो होतोपण वाढल्या माझ्या होपस


मला फिजीक्स मधे करशील का रे मदत

मी स्वप्नात तर नाही ना, असे बरळू लागलो स्वगत


तसा माझा फिजीक्स विषय होता जरासा बरा

तरी आता तिच्यासाठी अभ्यास चालू केला खरा


सगळे तास चुकता बसू लागलो, फक्त तिच्यासाठी

नोटस मी बनवू लागलो, केवळ तिच्या मार्कांसाठी


वाटे मजला तासनतास पहावे तिला, नको दुसरे कोणी

आई ला वाटे, अभ्यासाचे टेन्शन घेतोय, बाळ माझा गुणी


तिचा आवाज ऐकण्यास कान माझे आतुरलेले

तिला सतत पहात राहावे डोळे माझे आसुसलेले


मन एकदा घट्ट केलं अन ठरवलं लिहावे एक प्रेमपत्र

सांगावे, गं झुरतोय तुझ्याच साठी सतत दिवस रात्र


खुप विचार केला तरी सुरवात काही जमेना

प्रेयसी लिहू का मैत्रीण लिहू मायना काही सुचेना


मदत कोणाची घ्यावी, मला काही समजेना

दोस्त सगळे दुश्मन बनले, कोणी मदत करेना


लायब्ररी मधली पुस्तके ढुंडाळली काही संदर्भ सापडेना

माझे मलाच लिहावे लागणार कोणता पर्याय दिसेना


लेखक कवी घेतले बरेच माझ्या दिमतीला

मसुदा काय लिहावा, उगा नको विषय गमतीला


प्रिय सखी, तुझ्याचसाठी जन्म असे झाला माझा

तू फक्त हो म्हण प्लिज करू नको गाजावाजा


तुझाच विचार मनात माझ्या सुचत नाही काहीच

कुठंच माझं लक्ष लागेना अन्न गोड लागेना मुळीच


झुरतोय तुझ्याच साठी नजर तुझ्या हास्यावरती

दिवस माझा मस्त होतो तुझे शब्द येता कानावरती


मी तुला आवडतो का गं काहीच मला कळत नाही

तू एकदा हो म्हण ना, लग्नाची मुळीच घाई नाही


राणी सारखं तुला ठेवेन, सुखात राहशील तू

अहो रात्र प्रेम करेन, दु: पहाणार नाही तू


मुर्तीमंत सौंदर्य तू, चंद्र तारे फिके तुझ्यासमोरी

सूर्य निस्तेज दिसे, तू असता माझ्यासमोरी


अप्सरा बनूनी होकार देशील, नक्की वाट मी पाहतो

विचार करूनी हुशार होणार तू, आज मी जाणतो


येईन तुझ्या घरी ऐटीत, मोठ्या रूबाबात

मागणी घालेन तुझी, हात घेऊनी हातात


मोठी नोकरी करेन, फिरवेन तुजला दूर देशी

नोकर चाकर घरात ठेवीन, करेन तुजला आळशी


तुला ही वाटतं का गं सेमच आणि आवडतो मी पण

वाट पाहतोय तुझ्या उत्तराची, लौकर तू हो म्हण


पत्राची तयारी झाली, बंद केले एका पाकीटात

हळूच तिच्या बॅगेत टाकले, लपवून तिथल्या एका पुस्तकात


दुसऱ्या दिवशी भेटली तेव्हा खुप हसत होती

मुद्याचं सोडून भलतंच काही बडबड करीत होती


बरेच दिवस वाट पाहीली तिने उत्तर काही दिले नाही

समजावलं मनाला, तुझ्यासाठी ही बनलेलीच नाही


तशी ती होती बऱ्याच विषयात कच्ची

नकोच ही मुळी मजला पहावी दुसरी सच्ची


बायो साठी दुसरा कोणी मित्र नाव त्याचे गण्या

वर्तन त्याचे संशयाचे वाटे, विश्वास नाही ठेवण्या


एक दिवस गण्याने हलकेच गाठले एकटे मला

दोस्त तिचा तू जवळचा मी आवडतो का रे तिला


काय बोलावे काही कळेना मी विचारले काय झाले?

म्हणे, कळेना मजला काहीच, बायो पुस्तकाने काय केले


दिले होते बायोचे एक पुस्तक तिच्यासाठी

परतीला पुस्तकातून पत्र दिले तिने माझ्यासाठी


म्हणाली मी पण प्रेम करते अगणित तुझ्यावरी

मी आवडतो म्हणाली जीव ओवाळीन माझ्यावरी


म्हणते नको ऐश्वर्य आणि कसलीच नोकर भरती

जीव जडला असे माझा, फक्त तुझ्यावरती


बनेन राणी तरी दासी तुझी मी बनून राहीन

कधीही तू घरी ये बाबाना मी पटवून ठेवीन


मित्रा तुला काही बोलली काय रे, काही माझ्या भवती

मला ही आता आवडू लागलीय, मनात भरली युवती


सुन्न झालो ऐकूनी कथन, डोळ्यास आली अंधारी

पत्र लिहले मी जरी, प्रकाश पडला याच्या संसारी


बायोच्या पुस्तकाने घोळ केला, रडू फुटले उरी

पत्रात माझे नाव राहीले, कसा विसरलो तरी


जाऊदे, तिचेच नशीब फुटके, देवा तिचे भले करी

माझ्यासाठी असेल ठेवीली खास कोणीतरी


काॅलेज संपले मैत्री तुटली विसरलो माझ्या प्रेमाला

चुकूनही कधी दिसली नाही कोणत्याच गल्लीच्या टोकाला


दूर गावी गेलो निघूनी नोकरी आपुल्या करण्याला

एक दिवस आई म्हणाली बोलावलंय तुला लग्नाला


तुझी रे ती मैत्रीण लग्न तिचे पुढील रविवारी

सवड काढून जा नक्की बनशील जरा व्यवहारी


गण्या सोबत लग्न तिचे ठरले होते थाटात

पत्रिका भारी, रिसेप्शन ही ठेवले होते दणक्यात


गण्या ची होती मोठी डाॅक्टरची शिस्त

ती पण बनली होती एकदाची डेंटीस्ट


बुके हातात देऊन केले मी दोघांचे अभिनंदन

क्रेडीट त्यानी मलाच दिले, याने घडवले गटबंधन


दोघानी खुश होऊन मला मधे उभा केला

मोठ्ठाले स्माईल करीत आमचा फोटो काढला


मी पण स्माईल दाखवत फोटोला मोठा न्याय दिला

लाडवाचं जेवण करून प्रेमकथेचा अंतिम अध्याय संपवला


~संदीप कुलकर्णी

No comments:

Post a Comment

Name:
Message: