Thursday 18 May 2017

स्विस, एक स्वर्गिय स्वप्न


केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहीजे. असा कुणातरी विद्वानाने दिलेला मौल्यवान सल्ला मी खुप कमी गोष्टींमधे ऐकतो. त्यामधे निद्रेचं स्थान प्रथम आहे. त्यानंतर क्रमांक लागतो तो खाद्य संस्कृतीचा. दिवसातून बऱ्याच वेळा मला उगाचच असं वाटतं की काल झोप जरा कमी झालीय किंवा आज मी खुपच कमी जेवलो. या अशा वाटण्याला घरातील पदाधिकाऱ्यां समोर जरी थारा नसला तरी असा विचार मनात घोळतोच आणि नंतर विसरावा लागता. असो. तिसऱ्या क्रमांकावर मात्र भटकंतीचे स्थान आहे. गावो गाव, देशो देश भटकायला तसेच नजरेत अन कॅमेऱ्यात सर्वाना टिपून घ्यायला मला कमालीचं आवडते. या हुंदडण्याच्या बाबतीत मात्र माझ्या अर्धांगीचे सुद्धा तितकेच मनापासून सहकार्य असते

तर एकदा आमच्या सुसंवादा मधे अचानक स्वित्सर्लंड चा विषय निघाला. कदाचित सौ स्वप्नाच्या कोणीतरी मैत्रीणीनं नुकताच स्विस दौरा केला होता. मग काय! दुखऱ्या मनाला बरं वाटावं म्हणून आम्हाला पण स्विस दौरा करणं क्रमप्राप्तच होतं म्हणा. तसा मला कधीच विरोधाला फारसा वाव नसला तरी ही कल्पना चांगलीच आवडली. मग मुलीना हा प्रवास झेपेल का, त्याना चालणं, फिरणं जमेल का? शिवाय एकूण खर्च किती होईल सर्व आदी प्रश्न तिने परस्परच सोडवले होते. मुलीना आज्जीकडे सोडण्यात येईल आणि आपण दोघानीच स्विसला जायचं असा फतवा काढण्यात आला

तारखा, तिकीटं, हाॅटेल, व्हिसा ही सर्व सोपी कामं माझ्यावर सोपवण्यात आली. आणि अवघड कामं म्हणजे बॅगा भरणे, कपडे, कोणत्या दिवशी काय घालायचं... माझ्या सहीत, कोणासाठी काय गिफ्ट आणायचं इत्यादी हक्क स्वप्नानं स्वत:कडं राखून ठेवलं. बाकी जग कितीही या इंटरनेट ला नावं ठेवो पण अशावेळी मात्र माझा इंटरनेटला मोठा सलाम. घरबसल्या सगळी तिकीटं आणि आरक्षणं हातात. कोणत्या दिवशी कुठं जायचं, कुठं रहायचं, कसं फिरायचं आणि काय काय पहायचं याची सगळी माहीती या इंटरनेट द्वारे सहज समोर हजर होते. फक्त प्रत्यक्ष उपस्थिती दाखवणं शिल्लक होतं. व्हिसा मिळवणं हा एक खास कार्यक्रम असतो. म्हणजे असतो तसा सोपाच पण तो मिळवला की मात्र त्या देशावर विजय मिळवल्याचा आनंद होतो. व्हिसा च्या मुलाखतीच्या वेळी मला कायम दडपण येतं. जणू काही मी नोकरीसाठीच मुलाखत देतोय अशी भावना निष्कारण निर्माण होते. पण स्विस एंबसी मधे आमचं मस्त हसत स्वागत झालं. बसायला छान जागा देण्यात आली. फार प्रतिक्षा करता लगेचच आम्हाला बोलावून सर्व कागदपत्रं तपासून घेण्यात आली. फारसा वेळ दवडता आम्हाला पावती देऊन चार दिवसानी व्हिसा घेण्यासाठी यावे असा सल्ला देण्यात आला. शब्द दिल्याप्रमाणे चार दिवसात आमचा व्हिसा आमच्या हातात आला. मला पुन्हा एकदा जग जिंकण्याचा आनंद झाला.

बॅगा किती करायच्या आणि त्या कोणी उचलायच्या अशा क्षुल्लक चिंता मुळीच करता आमची सर्व तयारी झाली आणि प्रवासाचा दिवस उजाडला. ठरल्याप्रमाणे प्रथम मुलीना त्यांच्या आज्जीकडे सुपूर्त करण्यात आले नंतर आमचा प्रवास मुंबई विमानतळा पासून सुरू झाला. आपल्या भारतीयाना बस मधे पळत जाऊन जागा पकडण्याची सवय असल्यामुळे विमानात जाऊन बसण्यासाठी पण बऱ्याची जणांची धावपळ झाली. आंतर राष्ट्रीय प्रवासी असल्यामुळे कुणीतरी रांग करण्याचा पर्याय सुचवला मग भली लांबलचक रांग करण्यात आली. देशी स्वभाव गुणधर्मा प्रमाणे तसेच उंची वया नुसार थोडीफार धक्काबुक्की पण लोकानी करून घेतली. काही खुप हुशार मंडळीनी काहीतरी कारणावरून विमान कंपनीच्या स्टाफ बरोबर हुज्जत घालण्याचे काम योग्य रित्या पार पाडले. आम्ही उभय मात्र गर्दी संपण्याची वाट बघत बसून राहीलो. गर्दीची पांगापांग झाल्यावर आम्ही विमानात प्रवेश केला. आत मधे प्रत्येकाचा वाजत गाजत स्थान ग्रहण सोहळा चालू होता. दरवाज्यातून आत शिरताना स्मित हास्य करून स्वागत करणाऱ्या सुंदरी कडं बघून कमालीचा आदर वाटला. इतक्या सर्व गोंधळात सुद्धा ती चेहरा कसा काय हसरा ठेऊ शकते? राग, वैताग, चीडचीड या भावनां पासून अलिप्त रहाण्यासाठी त्याना कदाचित खास प्रशिक्षण दिले असावे. आम्ही आमची जागा शोधून स्थानापन्न झालो.

विमानाचा प्रवास तसा फारसा नवा नसला तरी अतिशय कंटाळवाणा नक्कीच होतो. समोरील छोट्याशा पडद्यावर कोणते तरी टुकार चित्रपट पहाणे, किंवा पोट बिघडल्यासारख्या चकरा मारणे अथवा मस्त ताणून देणे... या व्यतिरीक्त माणूस काहीही करू शकत नाही. यात नवल काहीच नाही की मी तिसरा म्हणजे निद्रेचा पर्याय स्विकारला. काही हौशी होतकरू प्रवाशांच्या गप्पा, भांडणं अथवा हवाई सुंदऱ्यांना उगाचच बोलावून काहीतरी सतत मागणी करण्याच्या त्यांच्या प्रयत्ना मुळे माझी झोपमोड मुळीच झाली नाही. एक दोन वेळा हवाई सुंदऱ्यांनीच बेल्ट बांधा आणि जेवण आलंय अशा कारणांवरून झोपेत ढवळा ढवळ केली. स्वप्नानं मात्र एक दोन चित्रपटांचा समाचार घेतल्यावर जी काही मस्त ताणून दिली ते विमान झुरीकला पोचल्यावरच डोळे उघडले.

ठरल्या प्रमाणे आम्ही झुरीक (Zurich) विमान तळावरून लुसेन्स(Lucern) ला ट्रेनने रवाना झालो. दोघेही प्रवासाने जाम कंटाळलो असल्यामुळे बाहेरील निसर्ग बघण्याचे फारसे त्राण शिल्लक नव्हते. लुसेन्स ला हाॅटेल स्टेशनच्या जवळचेच बघून ठेवले होते. तरीसुद्धा बॅगा ओढत हाॅटेल शोधण्याचा कार्यक्रम पार पडला. रस्त्यातील बऱ्याच मंडळीना स्वप्नाच्या इंग्रजीची परिक्षा द्यावी लागली. अखेरीस हाॅटेल सापडले आणि आम्ही जरा विसावलो. मुलींच्या आठवणीने स्वप्नाला चैन पडत नव्हती. तिनं ताबडतोब फोन लावून त्यांची खुशाली विचारून घेतली. जणू महिनाभर भेट झाल्या प्रमाणे माय-लेकींचे संवाद झाले. माझ्याशी त्रोटक संवाद करून खेळायला पळाल्या. आम्ही थोडी विश्रांती घेऊन पाय मोकळे करायला लुसेन्स तळ्या पाशी बाजारपेठेत एक चक्कर मारण्यास बाहेर पडलो. तळ्यामधे मोठाली पण सुरेख अशी बदके स्वच्छंदपणे विहार करीत होती. तळ्याच्या आणि त्या पलिकडील पर्वत रांगांच्या पार्श्वभुमीवर आमचे बरेच फोटोसेशन झाले. बरीच मंडळी रोमॅंटीक पोझ घेऊन फोटो काढीत होते. आम्ही मात्र प्रामाणिक पणे एकमेकांचे आलटून पालटून फोटो काढले. आल्पस च्या पर्वतरांगा आम्हाला दुरून खुणावत होत्या. समोर पसरलेल्या तळ्याच्या पाण्यात आकाशाचे आणि पर्वतरांगाचे प्रतिबींब मोहून टाकत होते. त्या दिवशी जे मिळेल ते पोटात ढकलून आम्ही झोपून टाकलो. दुसऱ्या दिवशी लौकर उठून मध्य स्विस स्थित माउंट पिलाटस (Mt Pilatus) गाठायचे ठरले होते. ते तसे लुसेन्स पासून जवळच आहे.

स्विस मंडळींची एक गोष्ट मात्र प्रकर्षानं जाणवली ती म्हणजे स्वच्छता. अगदी विमानतळ, रेल्वे स्टेशन, माॅल्स ते अगदी फुटपाथ असो वा रस्ता... कुठंही कचरा दिसणार नाही. जागोजागी कचराकुंडी ठेवलेली दिसते. सुसाट वेगाने धावणाऱ्या वाहनांच्या दुतर्फा उंच वृक्षांची रांग सुद्धा सुंदर दिसते. आम्ही पिलाटस च्या पायथ्याशी जाणारी बस घेतली. आमच्या बरोबर दहा-बारा वर्षीय शाळकरी मुलांच्या सहली आल्या होत्या. मुलांची धक्का बुक्की आणि गोड दंगा चालू होता. शिक्षीका पण मुलांच्या आनंदात सहभागी होत होत्या. आम्हाला बसायला जागा मिळणे शक्यच नव्हते. पण प्रवास फार मोठा नसल्यामुळे आमचाही बाल गोपाळांबरोबर चटकन वेळ गेला. पिलाटस चा पर्वत चढण्यासाठी रोप वे ची सोय आहे. २१३० मीटर वर स्थित असलेल्या या पर्वत शिखरावर जाण्याचा आमचा अनुभव रोमहर्षक होता. आमच्या नशिबाने सुर्य दर्शन होत होते आणि हवेमधे ताजा टवटवीत पणा वाटत होता. साधारण ते डिग्री तपमान असावं. आम्हा उभयतांचा रोप वे मधे बसून प्रवास सुरू झाला. सुंदर दऱ्या खोऱ्यातून नेणारा तो ३०-४० मिनीटाचा प्रवास अवर्णनीय होता. हिमशिखरे आम्हाला खुणावत होते. दूर पर्यंत पर्वतरांगा आम्हाला नजरेच्या टप्प्या पलिकडं पसरलेल्या होत्या. सुर्यकिरणे वितळणाऱ्या बर्फावरून परावर्तीत होऊन आमचे डोळे दिपवून टाकीत होते. आमचा रोप वे सेल वाटेत एका टप्प्यावर थोडा सावकाश झाला. पुढच्या सेल मधून मंडळी उतरलेली पाहीली. आमच्या सेल चा दरवाजा उघडल्यावर आम्ही पण उतरण्यासाठी सरसावलो. ताबडतोब तिथला एक अधिकारी पळत आला आणि म्हणाला "मत उतरो. आगे जाओ". आम्ही परत आत बसलो पण त्या गोऱ्या माणसाच्या तोंडून हिंदी शब्द ऐकून आम्ही चाट पडलो. थोड्या वेळातच आमचे उतरण्याचे ठिकाण आले. तिथं तीन चार भाषांमधे लिहून ठेवलं होतं. "माऊंट पिलाटस के लिए यहाँ उतरे" अशा हिंदी मधील अक्षराना पाहुन मन सुखावले. तिथं उतरून बाहेर कटाक्ष टाकला. अतिशय सुरेख पर्वत रांगा दूर पर्यंत दिसत होत्या. साहसी खेळांसाठी तिथे बरेच पर्याय उपलब्ध होते. एक महा प्रचंड घसरगुंडी होती. ती त्या ठिकाणा पासून पायथ्यापर्यंत घेऊन जायची. अर्थातच सुरक्षिततेच्या सर्व खबरदाऱ्या त्यानी घेतलेल्या होत्या तरी आमचे असले खेळ करण्याचे मुळीच धाडस झाले नाही. दूरूनच छान म्हणून आम्ही सोयीस्कर दुर्लक्ष केले. तिथल्याच एका पठारावर एक माणूस एक वाद्य वाजवत होता. त्याला ॲल्पहाॅर्न म्हणतात. ॲल्पस पर्वताच्या नावाने ते प्रसिद्ध आहे. अतिशय सुरेल असे ते वाद्य दिसायला पण खुप छान होते. लांबलचक त्याची पाईप जमिनीला दूर जाऊन टेकलेली असते. वाजवणारा उभं राहूनच फुंकून ते वाजवत असतो. अजूनही आम्ही पर्वताच्या शिखरावर पोचलो नव्हतो. एका बाजूला अजूनही उंच खडा पहाड दिसत होता. आमच्या लक्षात आले की शिखरावर जाण्यासाठी अजून एक रोप वे आहे. आम्ही ताबडतोब त्यात प्रवेश करून सुटण्याची वाट पाहू लागलो. हा रोपवे थोडा वेगळा होता. यामधे एकच भला मोठा सेल होता. त्यात जवळ जवळ २५ - ३० माणसं उभी होती. सर्वाना घेऊन तो सेल वर वर जाऊ लागला तसा जणू आमचा स्वर्गातच प्रवेश होतोय असं वाटू लागलं. अथांग पर्वतरांगा आता अधिक स्पष्ट आणि जवळ वाटू लागल्यापर्वतांच्या कुशी तून डोक्यावर जातोय याची जाणीव झाली. प्रत्येक दृष्य डोळ्यात साठवू का कॅमेरात असा प्रश्न पडला. दहा-पंधरा मिनीटाच्या प्रवासानंतर आमचे शिखरावर आगमन झाले. नजरेचं पारणं फिटणारं दृष्य होतं. दूरवर पसरलेले ॲल्पस चे खोरे दृष्टीत मावत नव्हते. पर्वत माथ्यावर सुद्धा एक कलाकार ॲल्पसहाॅर्न वाद्य सुरेल वाजवून वातावरण मंत्रमुग्ध करून टाकीत होता. पांढरा शुभ्र पहाड डोळे दिपवणारा होता. माथ्यावरच दोन तीन छोट्या टेकड्यांवर जाण्यासाठी कच्च्या पायऱ्या वजा पायवाट केल्या आहेत.
आम्ही त्या चढून वर पोचलो. शरिराच्या आत मधलं हृदय अजूनही धडकतंय याचा शोध लागला. पाच मिनीट तोंडातून शब्द फुटत नव्हता. पाठीवरचं सुटसूटीत सामान सुद्धा ओझं वाटू लागला होता. वातावरण तसं प्रसन्न आणि आल्हाददायक असल्यामुळं तसा घाम वगैरे काही आला नाही. पाच दहा मिनीटातच आम्ही पुन्हा टवटवीत झालो. आमच्या सारखे बरेच गोरे प्रवासी गड चढत होते. त्यांच्यापुढं आम्ही तरूण दिसत असलो तरी आम्ही जास्त दमलेले वाटत होतो. मला वाटतंय युरोपच्या मातीतच थकण्याचं रहस्य लपलंय. कितीही वय झालं तरी हे लोक ताजे आणि टवटवीत वाटतात. दूर पर्यंत निसर्गानं केलेली उधळण डोळ्यात माऊ शकत नव्हती. आपला सह्याद्री सुद्धा असाच प्रशस्त पसरलेला आहे. क्षणात मी महाबळेश्वर, प्रतापगड ची पण सैर करून आलो. आमच्या समोर पाच सहा युरोपीयन वृद्ध महिलांचा समुदाय आलेला बसलेला होता. त्यांचे वय जरी साठी ओलांडलेले दिसत असले तरी त्यांचा उत्साह दशवर्षीय वाटत होता. वेगवेगळे हावभाव करून एकमेकांचे फोटो घेणे छान चालले होते. मी तिथंल्या एक तरूणा बरोबर ओळख केली. तो रशियन होता पण पॅरीसला स्थित होता. फिरायला तो स्विस ला आला होता. त्याला आम्हा द्वयांचे फोटो काढायला सांगितले. दोन चार कड्यांच्या पार्श्वभुमीवर आमचे फोटो काढल्यावर त्याचे धन्यवाद मानून आम्ही गड पुन्हा उतरू लागलो. परतीच्या प्रवासासाठी आम्ही जगातील सर्वात तिरकी लांब प्रवासाची ट्रेन घेतली. दोन दोन डब्यांची ट्रेन अंदाजे ४८ अंश कोनात घसरू लागली. या वेळी कड्याच्या दुसऱ्या बाजून आम्ही प्रवास करीत होतो. संथ गतीने घसरणारी ट्रेन मधून आम्ही निसर्गाचा मुक्त उधळलेला खजिना डोळ्यात कॅमेऱ्यात वेचित होतो. वाटेत खालून वर जाणाऱ्या ट्रेन ला ट्रॅक देण्यासाठी काही मिनीटासाठी आमची ट्रेन थांबवण्यात आली. तो अवधी सुद्धा आम्हाला पर्वणी वाटला. ट्रेन पायथ्याला पोचल्यावर आम्ही रंगीबेरंगी फुलानी आणि वेलीनी सुशोभीत केलेल्या स्टेशन मधून बाहेर पडलो



आमच्या कडे फेरीचा पास पण शिल्लक होता. तिथेच जवळ असलेल्या फेरी टर्मिनल वर गेलो. पुढची फेरी यायला थोडा वेळ होता. त्यावेळेत आमची मस्त पोटपुजा करून घेतली. काही वेळातच आमची फेरी सुटली. निळ्याशार पाण्यातून सुसाट वेगाने आमची फेरी मार्ग काढू लागली. अवाढव्य पसरलेल्या जलाशयाच्या दुतर्फा उंच उभे असलेले पर्वत शिखरे पाण्यात डोकावून पहात होते. जरी बसायला छान सोय असली तरी आम्ही फेरीच्या समोरील डेकवरच ठिय्या मारला. निळंशार पाणी शांत पण गंभीर वाटत होते. आमच्या सारख्या अनेक फेऱ्या पाण्यातून ये जा करीत होत्या. ट्रेन किंवा बस चा स्टाॅप यावा तसे फेरीचे पण स्टाॅप येत होते आणि बरीच मंडळी फेरीतून चढ उतार करीत होती. जल वाहतूकीचा एवढा सुंदर सदुपयोग पहाण्याचा माझा दुर्मिळ प्रसंग! दूर पर्यंत पसरलेल्या शांत पाण्यामधे चार बदकांची रांग मात्र लक्ष वेधून घेत होती. आसपास आवाज करणाऱ्या भल्या मोठ्या फेऱ्यांकडे बदके ढुंकून पण बघत नव्हते.
स्वत:च्याच मस्तीत बिनधास्त त्यांचा प्रवास चालू होता. आमचा पाण्यातील स्वर्गीय प्रवास काही वेळातच पुन्हा लुसेन्स च्या किनाऱ्यावर थांबला. आमच्याकडे अजून दिवसातला बराच अवधी शिल्लक असल्याने आता काय करावे असा प्रश्न पडला. आम्ही थोडीशी चौकशी केली असता कळाले की ट्रेनने थोड्याच अंतरावर बर्न (Bern) नावाचे एक टुमदार छानसे शहर आहे. आमच्या कडे तसा युरेल पास असल्यामुळं कितीही वेळा प्रवास करण्याची मुभा होती

घड्याळात साधारण चार वाजलेले होते. जून मधे युरोपात दिवस खुप मोठे असतात. साधारण नऊ साडेनऊ पर्यंत लख्ख उजेड असतो आणि पहाटे साडे चार-पाचला सुर्योदय होतो. वातावरण मात्र कायमच तजेलदार आणि आल्हाददायी असल्याने थकवा मुळीच येत नाही. आम्ही पटकन बर्नची ट्रेन पकडून मार्गस्थ झालो. शहर तसे फारसे मोठे नसल्यामुळे आम्ही पायीच फेरफटका मारायचे ठरवले. वाटेत काही सुबक इमारती आणि ट्रामचे फोटो काढत आम्ही भटकू लागलो. एका छोट्या बऱ्या स्वच्छ अशा रस्त्यावरील मंडई मधून आम्ही चक्कर मारली. विवीध भाज्या, फळे आणि नानाविध प्रकार मांडून ठेवले होते. विकणारे लोक पण अगम्य भाषेत ओरडून ग्राहकांचे लक्ष वेधून घेत होते. काही ठिकाणी बरीच गर्दी जमली होती. आम्ही त्यातून मार्ग काढीत पुढे सरकलो. एका चौकात मोठा बुध्दीबळाचा पट मांडला होता. बराच मोठा प्रेक्षक वर्ग भोवताली गोळा होऊन पहात उभा होता. कंबरेच्या उंचीच्या सोंगट्या मांडून ठेवलेल्या होत्या. डाव निम्म्यावर आलेला दिसत होता. दोन पटू दोन बाजूला गहन विचार करीत उभे होते. आसपासच्या वाढत्या गर्दीकडे त्यांचे मुळीच लक्ष नव्हते. जवळच्या वृक्षांच्या चौथऱ्यांवर, उभं राहून, रस्त्याकडील रेस्टाॅरंट बाहेर, दुचाकी वाहनांवर,
सायकलींवर बघ्यांची भलतीच गर्दी उसळली होती. एखाद्याचे प्यादे गेले की गर्दीतून हळहळीचा सूर उमटत असे. आम्हाला एकंदरीत सर्व प्रकार कुतूहलाचा आणि नंतर उत्कंठतेचा वाटू लागला. दोघेही जवळच्या तेजीत चाललेल्या आईस्क्रिम गाड्यावरून दोन आईसक्रिम घेऊन त्यांचा डाव पहात उभे राहीलो. बुध्दीबळात फारसा तरबेज नसलो तरी चुरस समजून येत होती. दोघा खेळाडूंचा कस लागत होता. जरी प्रेक्षक वर्ग स्तब्ध होऊन पहात असला तरी कोणी फुकटचे सल्ले देऊन खेळाडूंचे मन विचलीत करीत नव्हते. प्रोत्साहन देणाऱ्या लोकांचा दंगा वाटत नव्हता. थोड्या अवधीतच एकाची फौज संपुष्टात आली आणि त्याचा सपशेल पराभव झाला. त्याने शांतपणे विचार करून जिंकलेल्या खेळाडूचे अभिनंदन केले. सर्व प्रेक्षक वर्गाने जिंकलेल्याचे कौतुक करून हरलेल्या खेळाडूला शाबासकी दिली आणि काही सेकंदात सर्व परीसर मोकळा झाला. बुध्दीबळाचा हा मैदानी खेळ पाहण्याचा मला एक वेगळाच अनुभव आला. थोडीशी रिमझीम सुरू झाल्याने आम्ही पटकन ट्रेन स्टेशन कडे पळालो आणि ट्रेन गाठून लुसेन्स गाठले.

सकाळी लौकर उठून आम्ही ट्रेनने एंजलबर्ग (Engelberg) गाठले. खेळण्यातल्या ट्रेन सारखी दिसणारी लाल रंगाच्या ट्रेनने आम्ही एंजेलबर्गला पोचलो. माऊंट टिटलीसच्या (Mt Titlis) पायथ्याशीच असलेल्या या स्टेशनवरून आम्ही टिटलीस पर्वतशिखराच्या दिशेने चालू लागलो. साधारण दोनशे मीटर अंतरावर शिखराकडे घेऊन जाणारा रोपवे दिसत होता. चहू बाजूने आसंमत हिरवाई ची आणि पांढऱ्या शुभ्र रंगांची पर्वत रांगांवर उधळण करीत होता. आम्ही जणू पर्वतांच्या कोंदणात उभे असल्याप्रमाणे भास होत होता. एक छोटासा ओढा आणि त्यावरील इतकुसा पुल वातावरणाची रंगत वाढवित होते. आमचे सतत फोटो काढणे चालूच होते. माझ्या कडच्या कॅमेऱ्यामधे सर्व चित्रे मी जरी कैद करीत असलो तरी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत होती. ती म्हणजे आम्ही वातावरण आणि हवेतील उत्साह पकडू शकत नव्हतो. कॅमेऱ्याची क्षमता अवाढव्य पसरलेल्या निसर्गापुढे खुपच फिकी पडत होती.
माझ्या या छोट्या यंत्रात निसर्गाला पकडण्याची धडपड पाहून तो नक्कीच हसला असेल. आम्ही पुन्हा एकदा आल्पस च्या शिखराकडे मार्गक्रमण करू लागलो. एका सुंदरशा रोपवे च्या सेल मधून निसर्गाचा भरभरून आस्वाद घेत आमचा प्रवास सुरू झाला. मार्गावर दिसणाऱ्या हिरवळी मधून मार्ग काढीत आम्ही पर्वतांच्या हिमशिखरापर्यंत अद् भूत प्रवास केला. वारंवार घडणाऱ्या पर्वत रांगाच्या दर्शनाने मन भरत नव्हते. उंच शिखरावरून अफाट पसरलेल्या पांढऱ्या शुभ्र अशा कापूस पसरून ठेवावा त्या प्रमाणे पसरलेल्या पर्वतरांगा पाहून डोळे दिपून जात होते. उंच शिखरावर एक प्रशस्त मचाण तयार केली होती. तिथून निसर्गाचे भव्य स्वरूप जवळून पहाता यावे इतराच त्याचा उद्देश. आमच्यासारखे अनेक देशोदेशीचे पर्यटक त्या ठिकाणी फोटो काढून स्वत:च्या मनाचे समाधान करून घेत होते. एखाद्या योग्या प्रमाणे खडा प्रचंड पर्वत आक्राळ विक्राळ पसारा पसरून निस्त:ब्ध मनाने बसलेला होता. आजही पाऊस नसल्याने आमचे कष्ट सत्कारणी लागले. सूर्याच्या साक्षीने चमकणारे बर्फ आमच्या दृष्टीस पडले. आमचा परतीचा प्रवास पुन्हा एकदा त्याच ३६० अंशात फिरणाऱ्या गंडोला मधून सुरू झालाकिमान पन्नास साठ लोकाना घेऊन उतरणारा तो गंडोला निसर्गाचा इंच इंच आमच्या नजरेसमोर आणून ठेवत होता.

त्याच दिवसा अखेरीस आम्हाला लुसेन्स सोडून ग्रिंडेलवाल्ड ला मुक्काम हलवायचा होता. आमचा स्विस मधला हा दुसरा टप्पा. ताबडतोब आम्ही हाॅटेल सोडलं आणि रेल्वे स्टेशन गाठलं. लुसेन्स ते इंटरलाकेन आणि इंटरलाकेन वरून ग्रिंडेलवाल्ड असा आमचा प्रवास होणार होता. धावत्या रेल्वेच्या खिडकीतून त्याच निसर्गाला नजरेत साठवून घेण्याचा खेळ करीत आम्ही इंटरलाकेन गाठलं. या स्टेशन वरून एक छोटीसी ट्रेन ग्रिंडेलवाल्ड ला जाते. आमचा युरेल पास इथं चालणार नव्हता त्यामुळं मी टिसी कडून तिकीटं घेतली. ग्रिंडेलवाल्ड हे एक छोटंस टुमदार गाव हे आल्पस च्या डोंगरमाथ्यावर वसलेलं. पर्वतांचे पहाड चढत आमची ट्रेन ग्रिंडेलवाल्ड ला पोचली. या गावावर सुध्दा निसर्गानं अमाप उधळण केली होती. डोंगर उतारावर वसलेले हे गाव असल्यामुळे गावातले सर्व रस्ते चढ उताराचे. सपाट रस्ता मिळणे अशक्य. आम्हाला पोचायला थोडासा उशीर झाल्यामुळं शेवटची बस निघून गेली होती. घडाळ्यात साडे सात वाजले असले तरी बाहेर लख्ख प्रकाश होता. नाईलाजास्तव आमचा बॅगा ओढत हाॅटेलचा ठाव ठिकाणा शोधण्याचा कार्यक्रम सुरू झाला. स्टेशन जवळच्या एक दुकानदारीण बाईने आम्हाला दिशा दाखवली. दहा मिनीटावर असलेल्या हाॅटेलवर पोचे पर्यंत आमचे प्राण कंठाशी आले. गड चढून आल्याप्रमाणे आम्ही हाॅटेल पर्यंत पोचलो. तिथं पोचल्यावर लक्षात आलं की तिथली बहुतेक सर्वच घरं ही हाॅटेल आहेत. त्या लोकांचा तो मुख्य व्यवसाय असल्यामुळं प्रत्येक घरात प्रवाशाना राहण्याची सोय केलेली आहे. आमचे आधीच बुकींग असल्यामुळे आमचे स्वागत एका स्विस वृध्देने केले. त्या वृध्दे बरोबर एक अजस्त्र कुत्रं अवती भवती फिरत होतं. सौ ची त्या कुत्र्यानं भुंकताच त्रेधा उडवली. कदाचित आमच्या प्रमाणे अजून एक प्रवासी कुटूंब आले असावे असा आम्हाला अंदाज वाटला. अन्यथा बाकी काहीच हालचाल दिसत नव्हती.
यजमानीण त्याच घराच्या तळघरात रहात असावी असा आम्ही उगाचच अंदाज वर्तवला. आमची खोली दुसऱ्या मजल्यावरील होती. तिनं चावी देऊन लिफ्टकडं बोट दाखवून आमची रवानगी केली. संपुर्ण घराचे बांधकाम हे लाकडी पट्ट्या वापरून केलेले. वाऱ्यानं सतत लाकडाचा आवाज येत होता. कदाचित अतिप्रचंड थंडीपासून संरक्षण करण्यासाठी अशा प्रकारे घरांची रचना असावी. आमच्या खोलीच्या बाहेर एक मोठ्ठाली बाल्कनी होती. दिवसभराच्या प्रवासामुळं दोघेही कंटाळून गेलो होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी :५० ची ट्रेन पकडून युरोपचे अत्युच्च शिखर गाठायचे ठरले होते. मी सहज बाल्कनीत पाऊल ठेवले आणि समोरील अथांग पर्वत माथ्याचे दृष्य पाहून सर्व कष्ट विसरून गेलो. अगदी समोरच हिरव्या तसेच पांढऱ्या रंगाच्या पर्वत रांगा पसरलेल्या होत्या. त्या हिरव्या कुरणांवर चरणाऱ्या स्विस गायींच्या गळ्यातील घंटानाद हलकासा कानावर येत होता. कोणताही दंगा नाही, वाहनांची वर्दळ नाही, प्रदूषण तर मुळीच नाही. फक्त मंत्रमुग्ध करणारी आल्हाददायी हवा. बस्स! अजून काय हवं? अशा ठिकाणी माणूस दमतच नसेल असं मला वाटतं. उन्हाळा चालू असल्यामुळं दिवस मोठे होते. साडे आठ वाजून गेले तरी बाहेर लख्ख प्रकाश होता. तरीपण गारठा वाटू लागला म्हणून दरवाजे बंद करून पुन्हा खोलीत आलो. स्वप्नानं काहीतरी खाण्याचं बॅगेतून काढून समोर ठेवलं होतं. आम्ही ते उदरात ढकलून छान झोपून गेलो

दुसऱ्या दिवशी पहाटे पाचलाच गजर लाऊन उठलो. हाॅटेल पासून पहिली बस सहा वाजता होती त्यामुळं स्टेशन पर्यंत चालतच जाण्याचा पर्याय होता. आदल्या दिवशीच आम्ही चालत आल्यामुळं आम्ही सराईताप्रमाणे स्टेशनच्या दिशेने चालू लागलो. जरी हाॅटेलच्या पॅकेजमधे ब्रेकफास्ट असला तरी तो सहा नंतर मिळेल असे यजमानीण बाईनी सुचना देऊन ठेवली होती. आम्ही पुन्हा बॅगेतले दोन पराठे पोटात ढकलले आणि मार्गस्थ झालो. ट्रेन अगदी वेळेवर :५० ला सुटली. तिथून आम्ही क्लिन शिड्डेग (Klein Scheidegg) ला उतरलो आणि दुसऱ्या ट्रेनची प्रतिक्षा करू लागलो. त्या स्टेशनवर आमच्या सारख्या विदेशी नागरीकांची अतिप्रचंड गर्दी होती आणि त्यात आपल्या देशी बांधवांची संख्या लक्षणीय होती. ट्रेनची वेळ झाली तरी आपली मंडळी उतरून फोटो काढण्यात व्यस्त होते. प्रत्येक कुटूंबाचा ट्रेनला उशीर करण्यामधे किमान खारीचा तरी वाटा होता. बिचारा गोरा अधिकारी विनंती करून रागावून धमकावून सांगण्याचा प्रयत्न करीत होता तरी अनेक उत्साही वीर विनाखंत निवांत सेल्फी घेत तसेच उभे होते. अखेरीस ट्रेन थोडीशी हलली, त्या बरोबर जनता चालत चालत ट्रेनकडं येऊन स्थानग्रहण करू लागली. अधिकाऱ्यानी सर्व डब्यांचे दरवाजे घट्ट बंद केले आणि निघण्याचा इशारा केला. आता आमची ट्रेन चित्र विचीत्र आवाज करीत डोंगर चढू लागलीखेळण्यातल्या ट्रेनसारखी दिसणारी ट्रेन थांबता पर्वताचं टोक गाठू लागली. ट्रेनच्या आतमधे एका स्क्रिनवर ट्रेनबद्दल चा इतिहास तांत्रिक माहीती देणं चालू होतं. अनेक नागंमोडी वळणं आणि खडा पहाड यासाठी ट्रेनच्या रूळांची रचना वेगळी केली होती. दोन रूळाच्या पट्ट्यांच्या मधोमध एक दातेरी पट्टी होती. ट्रेनच्या खाली मध्यात दातेरी चाके लावण्यात आली होती. उतारावर ती उलटी घसरू नये म्हणून तशी सोय केली होती. पर्वतमाथ्यावर पोचण्याआधी वाटेत एक दोन स्टेशनवर पाच पाच मिनटांसाठी ट्रेन थांबली. तिथून पर्वतरांगाचे सुंदर दृष्य पहायला मिळावे म्हणून सर्व जनता उतरून आधाशा सारखी फोटो काढीत होती. आम्ही मात्र अरसिकतेने जेवढे ट्रेनमधून दिसते तेवढे आपले असं म्हणून समाधान करून घेतले. अखेरीस आमची ट्रेन युंगफ्राव (Jungfraujoch) या स्टेशनला येऊन थांबली. युरोपचा सर्वोच्च बिंदू, तब्बल ११,७८४ फूट उंचीवर आम्ही पोचलो होतो. इतक्या उंचावर स्विस लोकानी ट्रेन नेली त्याबद्दल त्याना शतश: प्रणाम! त्या उंचावर स्थित पाच मजली इमारती मधे आमचा प्रवेश झाला. पहिल्या मजल्यावर कॅफेटेरीया, सोव्हेनिअर शाॅप, फोटोसेशन पाँईंटस आणि वायफाय पण होते. प्रत्येक प्रवाशाला एक गंमत म्हणून पासपोर्ट तत्सम पुस्तिका दिली आणि त्यावर तुमच्या आगमनाचं शिक्कामोर्तब करून देण्यात आलं. त्याच बरोबर या मजल्यावर बर्फाचे विवीध आकार, प्राणी (sculptures) बनवून ठेवलेले एक संग्रहालय होते. त्या अति थंड आणि अति उंच संग्रहलयातून एक फेरी मारून विवीध फोटो काढण्याचे आद्य कर्तव्य पार पाडले. दुसऱ्या मजल्यावर स्विस रेसिटाॅरंट होते. काहीतरी खमंग आणि ताजा सुप तयार होत असल्याची वार्ता आम्हाला लिफ्ट मधून बाहेर पडताच झाली. मनावर ताबा ठेऊन तिसऱ्या मजल्यावर गेलो. बसण्यासाठी मोठा लाऊंज, वाय फाय आणि काचेतून पांढऱ्याशुभ्र पर्वतरांगाचे दर्शन अशा गर्दीत आम्ही जास्त वेळ काढता तडक चौथा मजला गाठला. या मजल्यावर अहो आश्चर्य! बाॅलिवुड रेस्टाॅरंट! मोह आवरून मी आत डोकावलं. सर्व टेबल अनेक भारतीय टुर कंपन्यानी राखून ठेवल्या होत्या. जेवणाच्या दराची चौकशी केली. दर ऐकून माझी भूक गेली आणि आम्ही मुकाट्यानं पाचव्या मजल्यावर गेलो

पाचव्या मल्यावर जणू निसर्गाचा खजिनाच उघडला होता. एका दरवाज्यातून बाहेर पांढऱ्या बर्फाचा महाप्रचंड ढिग ओतून ठेवलेला दिसत होता. दारातच शाहरूख आणि काजोल चा कटआऊट स्वागतासाठी उभे होते. भूरभूर पाऊस आणि ढगाळ हवा होती. स्वप्नानं लांबूनच पुढं येण्याचा निर्णय घेतला. मी चार पावलं पुढं जाऊन येतो म्हणून गेलो. मऊ मऊ कापसासारखा बर्फ सगळीकडं पसरलेला होता. पाय ठेवला की रूतत होता. काही ठिकाणी निसरडं झाल्यामुळं पडण्याची भीती वाटत होती. पुढं अजून बराच भाग फिरण्यासाठी आहे हे माझ्या लक्षात आले. मी परत दरवाज्यापाशी येऊन स्वप्नाला ओढून नेले. थोडे पुढे गेल्यावर तिलापण खुप छान वाटू लागले. आमच्या सारखे अनेक प्रवासी बागेत फिरल्याप्रमाणे युरोपच्या सर्वोच्च टोकाला हिंडत फिरत होते. त्यात आपले हिंदी भाषीक तर खुपच होते. मी एक सभ्य नागरीक या नात्याने अनेक देशी विदेशी प्रेमी युगलांचे फोटो काढून देण्यास मदत केली. कोणातरी देशी बांधवाला आमची दया आली आणि आम्हाचा फोटो काढण्याची मदत देऊ केली. बर्फांच्या डोंगरांमधे तो रस्ता पुढं कुठं जातोय काहीच
कळत नव्हतं. थोड्या अंतरावर एक झुलता पुल लागला. एका वेळी एकच माणूस चालू शकेल इतका अरूंद! पण धुक्याचे आवरण एवढे होते की त्या पुलाचे दुसरे टोकच दिसत नव्हते. पांढऱ्या शुभ्र वातावरणात तो पुढं जाऊन कुठंतरी हरवल्यासारखा वाटत होता. त्या पुलावर थोडे अंतर गेल्यावर स्वप्नानं परतीचा निर्णय घेतला. मलापण तो सक्तीकारक होता. तो पुल तसाच कुठं जातोय काहीच बोध होत नव्हता. या ठिकाणी जनता पण पांगली होती. इतक्या पुढं कोणीच येत नव्हतं. मी पण शहाण्या नवरोबा प्रमाणे परत फिरलो. पुलावरून बाहेर आल्यावर तिथं एक पैसे देऊन राईड होती. खुर्चीसारख्या एका बैठकी वर बसवून कुठंतरी दूर ते घेऊन जात होते. ती खुर्ची कुठंच बंदीस्त नव्हती. पाय खाली रिकामे, डोकं खांदे हात पण मोकळेच. कदाचित ढगाळ आणि धुक्याचं वातावरण असल्यामुळं पुढचं काहीच दिसत नव्हतं. पाच मीटर अंतरापासून पुढं त्या खुर्च्या कुठं अदृष्य होतायत काहीच कळत नव्हतं. वातावरण साफ असताना या राईडची नक्कीच मजा आली असती. आमच्यासारखे बरेच बघे लोक दुरूनच बघून निघून जात होते. आम्हीपण तोच निर्णय घेऊन परत फिरलो. या सर्व आसमंतात त्या क्षणाला - पेक्षा कमी तापमान गेलं होतं. सर्व थंडीचे गरम कपडे चढवले असले तरी आम्ही दोघेही पुरते गारठलो होतो. आता परत येण्याशिवाय पर्यायच नव्हता. आम्ही स्विस रेस्टाॅरंटमधे जाऊन दोघांसाठी दोन मस्त गरमागरम आणि खमंग पमकिन सुप घेतले. त्यात क्रिस्पी ब्रेड बुडवून भुरके घेत दोघानी मोठ्ठाले बाऊल फस्त केले. त्यानंतर त्याच मजल्यावर असलेल्या स्विस चाॅकलेटच्या शोरूमला भेट दिली. बिलाचा मुळीच विचार करता आद्य कर्तव्य असल्या प्रमाणे बरीच चाॅकलेटस खरेदी केली. काही चाॅकलेटचा आस्वाद तिथंच घेऊन आम्ही ट्रेन गाठली आणि घसरगुंडी करीत उलट्या प्रवासाला लागलो

परत इंटरलाकेन ला पोचल्यावर जवळच असलेल्या आऽरे जाॅर्ज (Aare Gorge) ला भेट दिली. इंटरलाकेन पासून ट्रेनने साधारण अर्ध्या तासावर असलेल्या मेरींगन (Meiringen) स्टेशन पासून जवळच आहे. स्टेशनपासून दर ३० मिनीटाला बस सुटते. ती आरे जाॅर्ज च्या प्रवेशापाशी सोडते. आरे नावाची नदी दोन डोंगरांच्या खोबणीतून वाहते. ही निसर्गाची किमया जवळून अनुभवण्यासाठी या स्विस बहाद्दरानी त्या डोंगरांच्या दरम्यान नदीपासून उंचावर साधारण १०० फूट उंचीवर एक लाकडी पायरस्ता बनवलाय. साधारण दोन ते अडीच किमी ची ही पायवाट आपणास दोन पहाडांच्या मध्यातून आणि खाली खळाळणारी नदी पहात घेऊन जाते. ठिक ठिकाणी डोंगरांमधून पडणारे पाण्याचे प्रवाह या प्रसंगाची शोभा वाढवित होते. काही ठिकाणी दोन्ही बाजूचे दगड एवढे जवळ आले होते की आपले हात दोन्हीबाजूला सहज स्पर्ष करू शकतील. नदीच्या साथीनं आमचा प्रवास सुरू झाला. खाली पाहीलं तर भीती वाटेल अशी परीस्थिती! शिवाय ती पायवाट लाकडी असल्यामुळं, मनात अजूनच भीती! भुरभूरता पाऊस आणि अनेक ठिकाणी कोसळणाऱ्या झऱ्यांचे उडणारे पाणी यांमुळे आम्ही दोघेही चिंब भिजून गेलो. पण या निसर्गाच्या तसेच स्विस मंडळींच्या किमयेला मी नक्कीच सलाम ठोकू इच्छितो. चालून बाहेर आल्यावर एक स्विस रेस्टाॅरंट आमची वाट पहातच होते. आम्ही गरमागरम मशरूम सुप, क्रिस्पी झ्झा आणि खमंग क्राॅसन्ट वर यथेच्छ ताव मारला. आता मात्र बराच उशीर झाला होता. घड्याळ्यात साडेसात वाजून गेले होते. बाहेर जरी उजेड असला तरी आमचे पाय आता बोलू लागले होते. बस स्टाॅप वर बराच वेळ थांबूनही बस आली नाही. आमच्या बरोबर एक स्विस वृध्द महिलापण
त्या बसची वाट पहात होती. तिला इंग्रजीचा गंध नव्हता. तरीपण स्वप्नानं तिच्याशी बऱ्याच गप्पा मारल्या आणि अखेरीस दोघींचा चालत स्टेशन गाठण्याचा निर्णय झाला. ती वृध्द महिला बरीच तरतरीत होती. भलत्या वेगानं पुढं चालू लागली. आम्ही आमचे पाय ओढत तिच्या मागे धावू लागलो. वाटेत असलेल्या गावामधून जाताना प्रत्येक घराच्या दारात सुशोभित केलेली फुलांची झाडं आमचे लक्ष वेधून घेत होते. या रोपट्यांमधील फुलांवर निसर्गानं सर्व रंग उधळले होते. अतिशय मोहक आणि नाजूक फुलांच्या रचना पाहून आमचा थकवा पळून गेला. स्टेशनवर पोचल्यावर थोड्यावेळात ट्रेन आलीच. तिथून इंटरलाकेन आणि त्यापुढं ग्रिंडेलवाल्ड असा प्रवास करीत आम्हाला हाॅटेलवर पोचायला दहा वाजून गेले. ग्रिंडेलवाल्ड ला सुध्दा स्टेशन ते हाॅटेल चालतच प्रवास. पण तो रस्ता आता ओळखीचा झाला होता.

दुसऱ्या दिवशी स्विसची जगप्रसिध्द गोल्डन पास ट्रेन करण्याचा आमचा बेत होता. सकाळी लौकर उठून आवराआवर केली. स्विस यजमानीण बाईने आमच्यासाठी ब्रेड आणि चहा करून ठेवला होता. तेवढा पटापट पोटात ढकलून आम्ही ग्रिंडेलवाल्ड स्टेशन गाठले. आजचा आमचा प्रवास हा स्विस ट्रेनचा एक अद्भूत आविष्कार होता. इंटरलाकेन वरून प्रथम ग्लिआॅन (Glion) ला गेलो तिथून MVR ची माॅन्ट्रूक्स (Montraux) कडे जाणारी तब्बल तीन तासाची गोल्डन पास ट्रेन पकडली. पर्वत रांगामधून, सुंदर नद्यांच्या कडेनं, तळ्याकाठानं, दऱ्या खोऱ्यातून अर्धी काचेची असलेली सुसाट वेगात धावत होती. अनेक प्रवासी ट्रेनमधे भरलेले होते. डोळ्याचे पारणे फेडणारे निसर्ग सौंदर्य वेगाने मागे पळत होते. दूरवर
फक्त स्वच्छ सुंदर निसर्गच दिसत होता. आमच्या सहप्रवाशांमधे चायनीज लोकांचा एक ग्रुप होता. त्यातील प्रत्येक जण हा दर मिनीटाला मोठ्यानं आश्चर्य व्यक्त करीत तुफान फोटोबाजी करीत करीत होता. काही मंडळाच्या फोनवर तर थकता सतत फोटो घेत राहण्याच ॲपच होतं. त्या फोनचा आवाज आणि ग्रुपचा कोलाहल यात आमचे तीन तास संपून गेले. खिडकी कडेची आम्ही जागा धरून बसल्यामुळे आमच्यापण कॅमेऱ्याने आपले काम चोख बजावले. क्षणात नदी तर क्षणात तलाव क्षणात डोंगर तर क्षणात दरी क्षणात धबधबे तर क्षणात गर्द झाडी अशा काहीशा प्रवासानंतर आम्ही माँट्रूक्स ला पोचलो

स्टेशनवरचा एक नकाशा उचलून गाव पालथं घालायचं ठरवलं. जिनेव्हा तळ्याच्या काठाला आणि आल्पसच्या पायथ्याशी वसलेले हे टुमदार गाव खुपच सुंदर आहे. आम्ही नकाशा प्रमाणे काही नवीन पहाण्यासारखं मिळतं का याचा शोध घेऊ लागलो. स्वप्नाच्या खास सुत्रानी माहीती दिली होती की तिथं एक जुना राजवाडा आहे तो म्युझियम बनवून ठेवला आहे आणि तो खुपच छान आहे. आमची तो राजवाडा शोधण्याची मोहीम सुरू झाली. आता मात्र बरीच मंडळी आमच्या इंग्रजीची परीक्षा सपशेल नापास होऊ लागली. अखेरीस स्टेशनवरील माहीती पुरवणाऱ्या महिलेला थोडा अर्थबोध झाला. ती कशीबशी परीक्षेत उत्तीर्ण झाली. तिनं आमच्या नकाशावर काहीतरी खुणा करून दिल्या. त्यांचा शोध घेण्याची माझी जबाबदारी वाढली. नकाशात दाखवल्या प्रमाणे मी फेरी टर्मिनल शोधून काढले आणि आम्ही फेरीने त्या राजवाड्याच्या दिशेने प्रयाण केले. त्या फेरीमधे पुण्याचे एक मराठी कुटूंब भेटले. एक कन्या एक पुत्र आणि पती पत्नी असे चौकोनी कुटूंब आमच्या सोबत प्रवास करू लागले. तो श्रीमान माझ्याशी इंग्रजीतून बोलायला लागल्यवर मी फोटो काढण्याच्या निमीत्ताने फेरीच्या डेकवर गेलो. तिथून पुन्हा एकदा निसर्गाला कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न करू लागलो. थोड्याच वेळात आम्ही राजवाड्यात पोचलो. भरमसाट प्रवेश फी देऊन आत गेलो. सतराव्या का सोळाव्या शतकातल्या त्याच्या राजाचा राजवाडा असावा. आमच्या शिवाजी महाराजांचा याच्यापेक्षा लै भारी असं पुटपूटत संपूर्ण राजवाडा पालथा घातला. तिथून बाहेर पडल्यावर बस पकडली आणि थेट स्टेशन गाठलं. स्टेशन जवळच्याच एका अफगाणी रेस्टाॅरंट मधे शाकाहारी च्या नावाखाली कसलातरी झाडपाला आणि बटाट्याच्या फोडी पोटात ढकलल्या. तिथून तडक ट्रेनने इंटरलाकेन गाठले. इंटरलाकेन वरून पुन्हा एकदा ग्रिंडेलवाल्ड ला पोचून पाठ टेकवली.

आता आम्ही ग्रिंडेलवाल्ड ला राम राम ठोकून इंटरलाकेन मार्गे झुरीक ला प्रयाण करणार होतो. सकाळी लौकर उठून त्या आल्पसच्या पर्वतरांगाना अखेरचा प्रणाम करून मार्गस्थ झालोपुन्हा एकदा तरी याना भेट देण्याची मनाशीच खुणगाठ बांधली आणि आठवणींच्या संगतीत झुरीकला पोचलो. आमचे परतीचे विमान रात्री उशीरा होते. तसा अर्ध्याहून अधिक दिवस आमच्या हाताशी होता पण हातात बॅगांचे ओझे पण होते. स्वप्नानं समयसुचकता दाखवून विमानतळावरील लाॅकरची सोय शोधून काढली. दिवसभराचं भाडं भरून आम्ही मोकळे झालो. तिथंच पटकन फ्रेश होऊन बाहेर पडलो. युरेलचा आजचा अखेरचा दिवस शिल्लक होता. आम्ही युरेल पासचा अगदी पुरेपूर वापर करून घेतला होता. झुरीक जवळच ऱ्हाईन वाॅटरफाॅल आहे, तिथं भेट देण्याचं ठरले. बाकी शहरात इमारती पहाण्यात आम्हा दोघानाही फारसा रस नव्हता. ट्रेनची चौकशी करून आम्ही त्या ट्रेनमधे चढलो. स्विसमधे ट्रेनसाठी शक्यतो १५-२० मिनीटापेक्षा जास्त प्रतिक्षा करावी लागत नाही. ट्रेनमधे आम्हाला एक पंजाबी कुटूंब भेटले. ते पण ऱ्हाईनफाॅल पहायलाच चालले होते. पती पत्नी आणि व्रात्य पुत्र असे त्रिकोणी कुटूंबासह प्रवास करण्याचे आम्हास अहोभाग्य लाभले. "बाँबे टू गोवा" मधील "अम्मा पकोडा!" ओरडणाऱ्या बालकाची मला प्रकर्षानं आठवण झाली. त्या पंधरा वर्षीय सुपुत्रानं अक्षरश: ट्रेनमधे धुमाकूळ घातला. मोठमोठ्यानं ओरडणं, सीटवर लोळणे, वाॅशरूमचा दरवाजा उघडा ठेऊन शंकानिरसन करणे.. असे अनेक प्रकार पहात माता पिता दोघेही हसत त्याचे कौतुकच करीत होते त्यामुळं स्वप्नाला तर अधिकच त्रास झाला. सुदैवानं ऱ्हाईन फाॅल चे स्टेशन लौकर आले.

आम्ही त्याना टाळण्यासाठी पटकन पुढं निघून गेलो आणि तिकीटाच्या रांगेत उभे राहीलो. पण त्या सुपुत्राने आम्हाला पुन्हा गाठलेच. ते पण आमच्या मागेच उभे राहीलेआम्ही दोन तिकीटे घेऊन निघालो. पण त्या माणसानं त्यांच्यासाठी ज्यावेळी दोनच तिकीटं मागितली त्यावेळी मी अचंबीतच झालो. तिकीट देणाऱ्या आॅफीसरने मुलाकडं बोट दाखवून विचारले असता त्याला फ्रि एंट्री मिळेल का अशी विचारणा करण्यात आली. एकंदरीत थक्क करणारा प्रकार मी पहात होतो. त्या आॅफीसरने स्पष्ट नकार दिल्यावर मुकाट्यानं तिसरे तिकीट काढले. आम्ही आता धबधब्याकडे जाऊ लागलो. धबधब्याचा प्रचंड होणारा आवाज ऐकू येत होता. धबधब्याच्या डाव्या बाजूला आम्ही प्रवेश केला होता. तिथं एक लिफ्टची सोय करून ठेवली होती. ती आम्हाला पाण्याच्या जवळ घेऊन गेली. पाण्याच्या काठाला अनेक चौथरे आणि बाल्कनी तयार करून ठेवले होते. पाठीमागं कोसळणारा महाकाय पाण्याचा लोट घेऊन फोटो काढण्यासाठी खुच छान स्पाॅट बनवले होते. तिथून पायऱ्या उतरून अजून बरेच खाली जाण्याची सोय होती. प्रत्येक टप्प्याला धबधबा अधिकाधीक जवळ येत होता.
अखेरच्या ठिकाणी तर पाण्यात आपला कोपरापासून हात घालता येईल इतके जवळ आम्ही गेलो. स्विस लोकांच्या कल्पकतेला आणि सर्व रचनेला मन:पुर्वक सलाम! आम्ही आमचे तसेच इतरांचे बरेच फोटो काढत होतो. कोसळणाऱ्या जलधारांचा भयंकर आवाज येत होता. नजरेत मावणार नाही एवढा मोठ्ठा त्याचा विस्तार होता. पाणी खाली कोसळून पुन्हा वाऱ्याने त्याचे थेंब उलटे उसळून आसमंतात फिरत होते. खाली पडणाऱ्या प्रवाहामधे कोसळणाऱ्या जलधारां जवळ घेऊन जाणारी अक मोठी नौका पाण्यात हिंदोळे खात होती. आम्ही मात्र ते धाडस करता शांतपणे पाण्याचे निरीक्षण करीत राहीलो. धबधब्याच्या उजव्या बाजूला पण पर्यटकांसाठी बरीच सोय केलेली दिसत होतीअगदी पाण्याजवळ असलेले रेस्टाॅरंटस, एक छोटीशी ट्रेन जी एक फेरी मारून त्या धबधब्याचा आवाका दाखवू शकेल. आम्हाला ती ट्रेन नक्कीच आवडली असती पण आम्ही विरूध्द बाजूला उभे होतो. कितीही थांबून निरीक्षण केलं तरी मन काही भरत नव्हतं. इतका आवाज करणारा पाण्याचा प्रवाह खाली गेल्यावर कमालीचा शांत झालेला दिसत होता. तो दंगा जणू आपल्या गावीच नाही अशा थाटात ती नदी संथपणे पुढे वहात होती.थोड्या वेळाने आम्ही तिथून निघालो. परतीला पण ते पंजाबी कुटूंब आमच्या संगतीला होतेच. सुदैवाने मध्यात त्याना ट्रेन बदलून दुसरीकडे जायचे असल्यामुळे शेवटचा काही मिनीटांचा प्रवास सुखाचा व शांततेचा झाला. आम्ही विमानतळावर पोचलो. आम्ही उभयतां आल्पस च्या पर्वतरांगांच्या स्मृतीमधे हरवून गेलो होतो. परत येण्याची मुळीच इच्छा होत नव्हती. पुढचा प्रवास अबोलतेनेसुरू झाला आणि रोजच्या रूटीनमधे जाणार या कल्पनेने तिटकारा आला.

3 comments:

Name:
Message: