Sunday, 29 June 2025

कावळा - एक तुच्छ शोध

कावळा.. तसा तुच्छ असला तरी मुळीच दुर्लक्षित पक्षी नाही. आपण फारसे महत्त्व द्यायचे नाही ठरवले तरी ते दिले जातेच. मोबाइलच्या युगात चिमण्या दुर्मिळ झाल्या असल्या तरी कबुतरं आणि कावळे मात्र आपल्या खिडकीबाहेर ठाण मांडून बसलेले दिसतात. आणि जाता जाता पोटं साफ करून जातात. तसा मला या पक्षांवर फारसा राग अथवा प्रेम नसले तरी मी कावळ्यावर एखादा लेख लिहावा असा एक क्षुद्र विचार.



एखाद्या दिवशी निवांत झोपावं, आणि उशीरा उठावं असं ठरवलं तर सहाच्या आधीपासून खिडकी बाहेर कावळा कर्रकश्श्य ओरडायला चालू करतो आणि झोपेचा सत्यानाश होतो. दुपारी थोडं आडवं व्हावं म्हणलं तर हा हमखास बोंबलून वैताग आणतो. याच्या कर्ण कर्कश्श “काव! काव!!” गजराने भयंकर चिडचिड होते. कदाचित याचमुळे चिडण्याला ग्रामीण भाषेत “कावणे” म्हणत असावेत. लोकांना मी पोपट पाळलेलं पाहीलं आहे, चिमण्या पाळलेलं पाहिले आहे, अगदी कबुतरं सुद्धा पाळलेलं पाहीलं आहे. पण कोणी कावळा पाळलेला माझ्यातरी माहितीत नाही.


खरं म्हणजे त्याच्या काळ्या रंगाचा मला मुळीच राग नाही पण का कुणास ठाऊक तो उगाचच बेरकी असल्या सारखा वाटतो. आणि इतरांना त्रास देण्यातच आनंद मानत असावा असा भास होतो. चोचीतून टपकणारी लाळ, काहीतरी लंपास करण्याच्या तयारीत असलेली भिरभिर नजर... यामुळे तो कोणाला आवडावा असा पक्षी मुळीच वाटत नाही. बंर, पळवलेला माल खाऊन टाकेल असेही नाही, हा बावळट, सगळं खाद्य वाटेत सांडत जातो. अरे! जर तुला खायचं नव्हतं तर पळवलंसच का? आमच्या बाल्कनीत अनेकदा पावाचे तुकडे, भजाचा घास, हडूक.. असलं काहीतरी पडलेलं दिसतं. त्या सर्वांचे श्रेय या काक महाराजांनाच जातं. कधी चुकून बाल्कनीत काही खात उभारलो तर हमखास हा कुठूनतरी अचानक येऊन झडप मारतो आणि खाद्य लंपास करतो. अशा अचानक होणाऱ्या आक्रमणाची मलाच भीती वाटते. त्याला मात्र माझी कधीच भीती वाटली नाही. कितीही हटकलं तरी हा जागचा हलत नाही. या वरून एक गोष्ट नक्की… मरणोत्तरांत माझ्या पिंडाला कावळा शिवण्यासाठी फारसे प्रयत्न करावे लागणार नाहीत.


लहानपणीच्या चिऊ काऊ च्या कथेतील लाचार कावळ्यांची कधीच किव वाटली नाही; याउलट शेणाचं घर बांधणाऱ्या कावळ्याची फक्त घृणाच वाटली. रांजणात दगडं टाकून पाणी पिणारा चतुर कावळ्याची गोष्ट मला कधीच पटली नाही. हे डोकं कावळ्याचं असूच शकत नाही. कदाचित घारीला कथाकाराने चुकून कावळा समजलं असावं.


याच्या कोकलण्याच्या स्वभावाला अगदी ज्ञानेश्वरांनीही ओळखले होते. पैलतोगे काऊ कोकत आहे.. असे त्यांनी कौतुक केलेले आहे. रामायणात याच चावट कावळ्याने सीतेला त्रास दिला होता म्हणून रामाला त्याचा एक डोळा फोडावा लागला होता. याचा अर्थ कावळ्याच्या व्रात्यपणाला हजारो वर्षांची परंपरा आहे. हिंदी भाषिक लोकानी “झूठ बोले, कौवा काटे। काले कौवे से डरीयो।” असे बोलून काहीतरी भयंकर गैरसमज समाजात पसरवले आहेत. एकतर सगळे कावळे हे काळेच असतात. “काले कौवे” काय? नीळा, पिवळा कावळा मी तरी पाहिलेला नाही. फारतर ठार काळा किंवा धुरकट काळा अशा दोनच शेड मी पाहिल्या आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे खोटारड्या व्यक्तीला चावायचा या महाभागाला कोणी अधिकार दिला? असो! कदाचित उत्तरेकडील कावळे मराठी कावळ्यांपेक्षा जास्त सुज्ञ असतील.


कावळ्याच्या संदर्भातील सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे कावळा शिवणे. याचा अर्थ कावळ्याने भाताचा घास खावा हे अपेक्षितच नसतं, त्यानं ते फक्त शिवावे! बिच्चारा कावळा! स्वर्गवासी व्यक्तीला बाकीचे सर्व पशू पक्षी सोडून कावळ्याच्या रूपातच का यावेसे वाटते हे एक नवलच! कोणी पोपट बना, मांजर बना… पण असो! जे धर्मग्रंथात नियम लिहिलेत ते मृत्यू नंतर ही पाळावेच लागतात. तर, चार पाच भाताच्या पिंडांमधून अचूकपणे योग्य ती पिंड निवडण्याची परीक्षा प्रत्येक मनुष्यामागे बिचाऱ्याला द्यावी लागते. अरे हा माणूस सदा सर्वकाळ मला हाकलत असतो आणि आज का एवढा उदार? अशी शंका त्यावेळी कावळ्याच्या मनात नक्कीच येत असणार. एखादा कावळा हुशार असलाच तर म्हणेल की माणसानं काहीतरी सापळा रचलेला दिसतोय. कावळ्याने पिंड शिवावा यासाठी याचना करताना मी पाहिलेले आहे. याचा अर्थ कावळा मराठी समजू शकतो. कदाचित सर्व भारतीय भाषांचे ज्ञान त्यांना अवगत असावे. परदेशी कावळे मात्र भाषेच्या ज्ञानात कुठंतरी मागास असावेत. त्यामुळे तिथं अशी रिस्क कोणी घेत नसावेत.


पुलंनी एकदा परदेशी प्राणीसंग्रहालयात कावळ्याला पाहील्यावर तो “क्रो क्रो” असे ओरडतो का अशी एक सहज शंका व्यक्त केली होती. त्यानंतर मी परदेशात गेल्यावर आवर्जून कावळ्यावर नजर ठेऊन होतो. त्याचा काव काव आवाज ऐकल्यावर मराठी भाषेची महती पटली. मनुष्य कितीही प्रगत झाला तरी त्याच्या दिनचर्येत कावळ्याचे स्थान अबाधित आहे. तसं त्याच्यावर भरपूर काही लिहावं इतकं काही मोठं त्याचं कृतृत्व नाही. तरीपण चार ओळी खरडून त्याला न्याय देण्याचा हा रिकामा प्रयत्न!

No comments:

Post a Comment

Name:
Message: