Tuesday, 18 November 2025

उंदरावरचे शहाणे

उंदीर हा एकमेव असा प्राणी आहे की ज्याची घृणा केली जाते आणि पूजा सुद्धा. गणपती बाप्पांनी उंदराला वाहन करून भलतेच धाडस दाखवलं आहे. ते त्यांच्या आईला भेटायला गेल्यावर बिचारी माऊली त्याला रागवून सांगत असणार, “अरे! तुला दुसरा प्राणी नाही का मिळाला? त्याला अजिबात घरात घेऊन यायचं नाही. कालच नवीन साडी आणलेली कपाटात ठेवलीय. दादाकडं बघ, त्यानं मोर पाळलाय. तुझ्या वडिलांनी बैल पाळलाय. आणि तू उंदीर! काय ही दरीद्री लक्षणं! अरे, वाघ, सिंह, गेंडा, घोडा पाळ... हे कसलं खुळ डोक्यात घेतलंयस?” असो! बाप्पाला त्याची आई रागवत असेल का नाही, हे माहीत नाही. पण उंदीर मात्र घरोघरी डोकेदुखीचा विषय आहे. एकवेळ कितीही घृणा वाटली तरी पाल कधी डोकेदुखी होऊ शकत नाही... पण उंदराचं अस्तित्व हे घरात भूत शिरल्या प्रमाणे वाटू शकतं.

गावाकडील घरांमध्ये पाळीव प्राण्यांच्या बरोबरीने उंदरांचा संचार हमखास आढळतो. तिथे राहणाऱ्या लोकाना उंदराच्या दर्शनाने मुळीच कुतूहल अथवा भीती वाटत नाही. छताच्या तुळईवर, अडगळी मधे, कपाटामध्ये, धान्याच्या साठवणी जवळ हे उंदीर हक्काने संचार करीत असतात. त्यांच्या पाळतीवर मांजरे पण फिरत असतात. मांजराला हुलकावणी देण्यात तिथले उंदीर बरेच तरबेज असतात. तिथली मांजरे सुद्धा ‘कष्टाविण फळ नाही’ या नियमाने ‘पळल्याविण उंदीर नाही’ हे समजून चपळ असतात. गावाकडे उंदरामधे सुद्धा अनेक प्रकार आढळतात. पिटूकल्या उंदरांपासून ते मोठ्ठाले उंदीर.. यामधे पिटूकले उंदीर अतिशय चपळ आणि नाठाळ असतात. भारताच्या सीमेवरील घूसखोरीच्या प्रकारावूनच 'घुस' हे नाव पडले असावे. मातीच्या भिंतींना फोड्यात यांचा दातखंडा. हा प्राणी भीतीदायक आणि धान्य साठवणीचे मोठे नुकसान करण्याची ताकद. चिचुंद्री हा प्राणी लांब तोंडाचा आणि घराच्या काना कोपऱ्यात चुक-चुक असा विचित्र आवाज काढत पळणारा प्राणी. या सर्व प्रजातींचा उद्देश ठरलेला असतो.. खादाडी आणि नासाडी!

पिटूकल्या उंदरांना शहरात फिरण्याचा परवाना मिळालेला असतो. बाकीच्या प्रजाती शहरवासीयांना तशा दुर्मीळच. शहरी भागात मात्र उंदरांची दहशत ही बिबट्यांच्या दहशतीपेक्षा अधिक असते. तसं उंदरांचं दर्शन दुर्मीळ असले तरी बऱ्याचदा ते आपल्या घरी हजेरी लावतात. जर कधी घरच्या मालकीणीची आणि त्या उंदराची नजरा नजर झालीच तर घरात प्रचंड हलकल्लोळ माजतो. अशा प्रसंगात उंदीरही बुचकळ्यात... मी घाबरू का, ही महिला घाबरेल का? नक्की कोणी कोणाला भॉकऽऽ केलंय या गोंधळात घरात बरीच पळापळ होते. घरचे यजमान मात्र गोंधळलेल्या अवस्थेतच उंदीर हटाव मोहीम राबवू लागतात. शहरात काही लोक मांजर पाळतात. पण ते लाडावलेले मनीमाऊ किंवा बोकूली उंदीर पाहताक्षणी मालकीणीच्या मागे लपून बसतात. उंदीर हा विषय त्यांच्या अभ्यासक्रमातून वगळलेला असतो.

खूप वर्षांपूर्वी आम्ही एका छानशा टाऊनशिपमध्ये राहात होतो. मुंगीला सुद्धा आत शिरण्यासाठी सिक्युरिटीची परवानगी घ्यावी लागे. तरीही त्यांची परवानगी न घेता उंदीरांचा टाऊनशिपमध्ये बराच सुळसुळाट झाला. टाऊनशिपमध्ये जर साप आढळला तर एका सर्पमित्राला बोलवण्यात येई. पण आमच्या ओळखीचा कोणी उंदीरमित्र नव्हता. घरातील बऱ्याच कापडी गोष्टींना उंदराने आपल्या मुखस्पर्शाने अपवित्र करून टाकल्या होत्या. त्याचं अस्तित्व जाणवलं पण त्याचं दर्शन होत नव्हतं. घरात एखादा अतृप्त आत्मा वावरत असावा असं बायकोला वाटू लागलं. दिवसभर मी ऑफिस गेलो की ती घरात एकटी राहायला घाबरू लागली. रोज संध्याकाळी घरी आलो की आजचं उंदराचं प्रताप यावर चर्चा घडू लागल्या. रोज सकाळी उठल्यावर त्याच्या 'रात्रीस खेळ चाले' आढावा घेणं असं रूटीन सुरू झालं. असेच पाच-सहा दिवस उलटले. तरीही या बहादूराने आम्हाला त्याचं दर्शन दिलं नव्हतं. अखेरीस तो दिवस उगवला. एका महान संध्याकाळी बायकोला अचानक तो दृष्टीस पडला. 'आजी म्या ब्रह्म पाहीले' या सुरात घरात हाहाकार उडाला. आता मात्र माझ्यावर पडलेल्या जबाबदारीची जाणीव झाली. दुकानातून उंदीर मारण्याचे औषध आणलं. गणपती बाप्पाला नमस्कार करून माफी मागितली आणि ते औषध घराच्या काना-कोपऱ्यात पसरून ठेवलं. दुसऱ्या दिवशी पासून काहीच हालचाल दिसली नाही. कदाचित उंदराला आमच्या कृष्णकृत्याचा अंदाज आला असेल आणि त्याने पळ काढला असेल असं मी समजूत करून घेतलं. पण दोन दिवसांनी अडगळीच्या खोलीतून घाणेरडा वास येऊ लागला. तिथल्या एका कोपऱ्यात बिचाऱ्याचा धारातीर्थ पडलेला देह मला दिसला. पुन्हा एकदा बाप्पाची माफी मागून मी उंदराला घराबाहेर कचऱ्यात टाकून दिला.

तसे आयुष्यात बरेच उंदीर आले आणि गेले, काही आवर्जून स्मरणात राहीले तर काही दूर पळून गेले. अलीकडेच माझा एका अदृश्य उंदराचा सामना झाला. आमच्या सोसायटी मधे बऱ्याच लोकानी उंदीर पाहिल्याच्या बातम्या पसरवल्या. कोणाच्या बाथरूम मध्ये तर कोणाच्या किचन मध्ये! कोणाच्या कारच्या टपावर तर कोणाच्या बाल्कनीत… अनेकांनी अनेक ठिकाणी अनेक उंदीर पाहिले. काही जणानी तर नुकसानीचे किस्से आणि आकडे रंगवून आणि फुगवून सोसायटीच्या ग्रुपवर टाकले. या सर्व कथांमधे तथ्य किती आणि अफवा किती यावर आमच्या घरात चर्चा रंगल्या. आम्ही कथाकाराच्या व्यक्तिमत्वावर कथेची सत्यता निश्चित ठरवली. कोणीतरी यावर अशी बौद्धिक टिप्पणी केली की हे उंदीर मुळचे आपल्या सोसायटीचे नाहीतच… ते जे अमुक त्यांचे सामान घेऊन आले ना, त्यावेळी त्यांच्या सामानातून हे उंदीर आले. बिच्चारे अमुक अजून सोसायटीच्या ग्रुपमधे सामील झाले नव्हते. तर या अशा सर्व रंजक कथा आणि चर्चेचा आम्ही उभयतांनी यथेच्छ आनंद घेत होतो. आणि अचानक तो दिवस उजाडलाच… त्या भल्या सकाळी आमच्या ड्राय बाल्कनीची डासांची जाळी फाटलेली दिसली. ते पाहल्यावर घरात उंदीर शिरल्याची जाणीव झाली आणि पुन्हा एकदा भीतीचे सावट पसरले. घरात सर्व काने कोपरे पाहिले पण कुठेच मागमूस लागेना. काहीही कुरतडलेले नव्हते, ना फाटलेले होते, काही सांडलेले नव्हते, ना विस्कटलेले होते. तरीपण त्याच्या येण्याची चाहूल मनात कुरतडत होतीच. कुणीतरी आहे तिथे या मालीकेची शृंखला सुरू होणार हे माझ्या लक्षात आले. पण अचानक मला आमच्या बाल्कनीचे जाळीचे दार सुद्धा कुरतडलेले दिसले… आणि भांड्यात जीव पडला. उंदराने ड्राय बाल्कनी मधून शिरून बाल्कनीतून पोबारा केला यावर शिक्कामोर्तब झाले. पण घरात त्याने काहीच नासधूस न करता गेला याची खंत वजा आश्चर्य वाटत राहिले. कदाचित घराचे इंटेरिअर आणि नीटनेटके पणा पाहून तो खुश झाला असावा आणि आम्हाला माफ केले असावे. त्यानंतर जाळीवाल्याला जाळी अशी तकलादू का अशी विचारणा केली असता, त्याचा उलट प्रश्न आला. “तुमच्या घरी उंदीर येतील ते बोलला नाही! मी फक्त डासांसाठी जाळी बसवून दिली होती.” माझ्या कडे यावर उत्तर नव्हते. त्याने पुन्हा एकदा भरीव रक्कम वसूल करून डास व उंदीर दोघां पासून सुरक्षित अशी जाळी बसवून दिली.

त्यानंतर आम्ही पण सोसायटी ग्रुपवर आमची रसभरीत कथा प्रकाशित केली आणि आमच्या व्यक्तिमत्वाला साजेसे असे नुकसानीचे आकडे सजवून रंगवून इतरांना सांगितले.

No comments:

Post a Comment

Name:
Message: