कुठेतरी वाचनात आलं की “काय रे विद्यापीठाच्या” (WhatsApp University) संशोधनानुसार रक्तदाब, मधूमेह यासारखे आजार हे फक्त आणि फक्त सर्वसामान्य माणसांसाठी अस्तित्वात आणलेले आहेत. कोणता मोठा सेलिब्रिटी गेली वीस वर्षे रक्तदाबाच्या गोळ्या घेत आपल्या कार्यक्षेत्रात छान काम करतोय.. असं कधी ऐकिवात आहे का? कधीच नाही. पण आपण मात्र चाळीशीला लागलेली गोळी पुढील तीस वर्षे गोळ्या घेत सत्तर-ऐंशी वयाचा टप्पा सहज पार पाडतो.
या प्रवासात समस्त डॉक्टर प्रजातीचा सिंहाचा वाटा असतो. हे डॉक्टर लोक रक्तदाब, मधूमेह यांच्या अस्तित्वाची जाणिव करून देतात आणि आपल्या मागे एक ससेमिरा लागल्याची जाणीव होते. खरंतर तसे आपल्याला प्रत्यक्ष काहीच होत नसते. तरीपण हा बागुलबुवा आपल्याला सतत भॉऽक करत भीती घालत असतो. आपल्याला दुसऱ्या काही तरी झालेल्या व्याधीचं मूळ कारण हे मधूमेहच आहे असे पटवून दिले जाते.
तर या जोडगोळी मधील मधूमेह हा पन्नाशी नंतर तुमचा साथी बनलाच पाहिजे असा नियम आहे. तुम्ही सेलिब्रिटी नाही आणि तरी पण तुम्हाला मधूमेह नाही, असे झाले तर तुम्ही मेले आहात असे समजावे. असंही कुठंतरी काय रे विद्यापीठात लिहून ठेवलंय. असो, तर अखेरीस मला माझ्या जीवंत पणाचा दाखला मिळाला… किंबहुना डॉक्टर लोकांनी बहाल केला. तसा थोडा उशीरच झाला म्हणावे लागेल, पण वयाच्या ४५ व्या वर्षी माझ्या स्वभावातील गोडपणा रक्तात उतरला. तसा मी चालता बोलता ठिक ठाक असूनही मला असल्या आजारपणाचा शाप दिला गेला. मधूमेह.. आणि माझा एक प्रवास सुरू झाला.
अचानक घरामध्ये भीतीचे सावट पसरले. सर्वजण माझ्याकडे बघून हळहळ व्यक्त करू लागले. मी सुद्धा स्वतःला आजारी समजू लागलो. गेली वीस वर्षे गोळ्या घेणाऱ्या आईने माझ्याकडं बघून काळजी व्यक्त केली. जी चॉकलेट मी कधीच खात नाही ती सर्व लपवून ठेवण्यात आली. मुलींनी यातूनच पितृप्रेम प्रदर्शित केले. बायकोनं माझ्या आहारातून नव्वद टक्के गोष्टी काढून टाकल्या. शिल्लक राहिलेल्या दहा टक्के गोष्टींमधे फक्त काकडी गाजरंच राहिली.
या इलेक्ट्रॉनिक्स गॅजेटच्या जगात अजून एका खेळण्याची घरात भर पडली. ग्लुकोमीटर… एका छानशा डब्यामधे ते उपकरण घरात आले. त्यातली सुई आणि छोटूशा फोनसारखे दिसणारे एक मशीन. एकंदरीत सुरवातीला सर्वच गंमतीशीर आणि छान वाटत होते. दर पंधरा दिवसांनी सकाळी उठले की रक्त तपासणे ही एक प्रथाच पडली. शेअर मार्केटच्या आकड्यां प्रमाणे आजचा साखरेचा आकडा काय याकडे सर्वांचे डोळे लागू लागले. माझ्या बोटातून रक्त काढणे या महान व अवघड कामाची जबाबदारी बायकोने स्वखुशीने स्वीकारली. मला एक वेळ खुद्द वाघ समोर आला तरी एवढी भीती वाटणार नाही तेवढी त्या सुईची वाटते. थेंबभर रक्तासाठी जीव पणाला लावावा लागतो. माझा साखरेचा आकडा फारसा बदल दाखवायला तयार नव्हता. सव्वाशे ते दोनशे दरम्यानच्या या खेळाचा मला पण कंटाळा आला. माझ्या ऑफिस मधल्या एका हुशार इसमाने तर दंडालाच एक मशीन बसवून घेतले. ते म्हणे दर मिनीटाला साखर तपासते आणि इंटरनेटवर अपडेट करते. आपण ते मोबाईलच्या ॲपवर पाहू शकतो. जेवतानाच्या प्रत्येक घासागणिक साखरेचा हिशोब ठेवू शकतो. बापरे! खाल्लेला प्रत्येक घास पचायच्या आधीच त्याचा पंचनामा करण्याची ही आधुनिक पद्धत मला फारसी रूचली नाही.
इतर सर्व आजार आणि मधूमेह यातील अतिशय महत्वाचा फरक… इतर आजारात तुम्हाला घरचे प्रेमाने खाऊ घालतात; पण इथे प्रेमाने खाऊच देत नाहीत. जे छान आणि चवीष्ट ते इथे वर्ज्य! जेवणातून भाताचे उच्चाटन झाले. चपातीचं प्रमाण कमी होऊन हिरव्या भाज्या वाढल्या. सॅलेडचा एक डबा माझ्या टिफिन मधे समाविष्ट करण्यात आला. सणावाराचं काही गोडधोड खाणं पाप ठरू लागले. घरात मुलींसाठी काही चमचमीत पदार्थ बनलाच तर तो मी घरी येण्यापूर्वी संपवून किचन मधून त्याचे पुरावे नष्ट केले जाऊ लागले. एकंदरीत मला बिनसाखरेची कडक शिक्षा ठोठावण्यात आली. चहा, कॉफी यातून साखर गायब झाल्याने त्याचा कडवटपणा मी गोड मानून घेऊ लागलो. या कठोर परिस्थितीत मला काही बऱ्याच गोष्टींचा शोध लागला. फक्त गोड पदार्थातच नव्हे तर फरसाण, चिवडा, चकलीसारखे खमंग पदार्थही साखर वाढवू शकतात. थोडक्यात म्हणजे जे काही खाण्यास गोड वाटतात ते सर्व साखर वाढवू शकतात. एक मोठ्ठा शोध… मनात पुरणपोळी, गुलाबजाम यांचा विचार जरी आणला तरी रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढू लागते. (संदर्भ अर्थातच - कायरे विद्यापीठ)
तर या मधूमेह नामक राक्षसाला हरवण्याचे मी सुद्धा शर्थीचे प्रयत्न सुरू केले. पहाटे उठून चालायला सुरुवात केली. महिन्याभराच्या परिश्रमानंतर माझ्यातील “उद्या नक्की” या उदात्त विचाराने उत्साहावरती विजय मिळवला. ऑफिस मधील चहा कॉफी बंद करून मी ग्रीन टी बनवून प्यायला सुरू केले. आठवड्याभराच्या उत्साहानंतर बेचव हिरव्या पाण्याचा आणि ते बनवण्याचा कंटाळा येऊ लागला. कामाच्या व्यापातून सवडच मिळत नाही या सबबी वर मी ग्रीन टी थांबवला. सर्वात अधिक त्रास होतो, जेव्हा कोणीतरी जेवायला बोलवते. “असू दे रे! आजचा चीट डे!” असल्या प्रेमळ आग्रहाला बळी पडावे लागते. कधी एकटाच बाहेर गेलो असेन तर वडापाव चे दुकान खुणावते, पण निग्रह मी शक्यतो ढळू देत नाही. क्वचित प्रसंगी मीच स्वतःला समजावतो.. “असू दे रे! आजचा चीट डे!”
मधूमेह मागे लागल्यापासून मी एका डॉक्टरला नियमित भेट देत असतो. त्याचे नेहमीचे सल्ले “वजन कमी करा. व्यायाम भरपूर करा. खाण्याचे पथ्य पाळा. कामाचा ताण घेऊ नका.” मी प्रत्येक वेळी हे सर्व नव्याने ऐकतो आणि तसेच वागण्याचे त्यांना वचन देऊन बाहेर पडतो. मी कसा सांगू की मी खरंच प्रयत्न करतोय हो! पण सातत्यच रहात नाही.
आता हळूहळू हा मधूमेह माझ्या आयुष्याचा अविभाज्य घटक झालेला आहे. थेट कोणताही त्रास दिसत नसला तरी माझ्या इतर व्याधींचे प्रमाण वाढू लागले आहे. नजर कमजोर होणे, वारंवार बाथरूमला जाणे, सतत तहान लागणे असे अनेक प्रश्न भेडसावू लागले आहेत. एक गोष्ट नक्की, निरामय जीवनशैली कशी असावी याचे ज्ञान अवगत झाले. किमान पक्षी जे काही करतोय ते सर्व अयोग्य याचे तरी ज्ञान प्राप्त झाले. या रोगातून या जन्मी सुटका नाही हे नक्की असले तरी त्याचे परिणाम कमी व्हावेत एवढेच प्रयत्न महत्वाचे!
मला वाटते, मधूमेह हा आजार नसून तुम्हाला योग्य जीवनशैली जगण्यासाठी प्रेरित करणारा निसर्गाने दाखवलेला धाक आहे. त्याला घाबरून का असेना आपण योग्य वळण लावून आयुष्य जगावे. गोड खाण्यापेक्षा गोड जगण्याचा प्रयत्न करावा.

उत्तम लेख.
ReplyDelete