आपल्याला मिळालेलं सर्वात मोठं स्वातंत्र्य म्हणजे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य; आणि सर्वात मोठी शिक्षा म्हणजे त्या निर्णयांचे परिणाम भोगणे.
खरं सांगू? माझ्या मते सर्वात कठीण काम कोणते असेल तर ते म्हणजे निर्णय घेणे. प्रत्येकाच्या आयुष्यात रोज काहीना काही निर्णय घ्यावेच लागतात. काही छोटे असोत वा काही मोठे. आपापल्या कुवती प्रमाणे आपण निर्णय घेतच असतो. निर्णय घेताना गोंधळून जाणे हा मनुष्याचा स्वाभाविक गुणधर्म आहे, पण तरीही आपण निर्णयापासून पळ काढू शकत नाही. तो काही ना काही घ्यावाच लागतो. कधीकधी निर्णय न घेणे हा पण एक प्रकारचा निर्णयच आहे.
दर सोमवारी “आज मी ऑफिसला जाऊ की रजा टाकू” या प्रश्नावर जगातील करोडो लोक गोंधळलेले असतात आणि नाईलाजाने कामावर जाण्याचा निर्णय घेतात. “उद्या लौकर उठून पळायला जाऊ का नको?” या प्रश्नावर सुद्धा तितकेच किंबहुना अधिकच लोक “उद्या नको पण परवा नक्की!” हा निर्णय घेतात. “मी अजून एक गुलाब जामुन घ्यावा का?” हा प्रश्न पडण्यापूर्वीच त्यावर निर्णय झालेला असतो. सगळेच निर्णय हे दिल किंवा दिमाग घेत नसतात; तर जिभेसाठी सुद्धा काही अधिकार राखून ठेवलेले आहेत.
मी रोज रात्री झोपायच्या आधी ठरवतो की आज जरा मोबाईलला हात न लावता लवकर झोपून टाकू. पण झोपायच्या आधी मोबाईल हातात घेतला जातो आणि “फक्त पाच मिनिटं” असा निर्णय घेतला जातो. त्यानंतर WhatsApp, facebook, reels, YouTube, News… असे अनेक निर्णय आपोआप घेतले जातात. आणि लक्षात येते की असाच तासभर निघून गेला. काही निर्णय आपल्यासाठी मोबाईलने घेतलेले असतात.
कधीतरी आपण ठरवतो “नेहमी एकाच रस्त्याने का जायचे, आज जरा नवीन रस्ता ट्राय करू.” गुगल काकांनी नवीन रस्ता शॉर्टकट आहे असे ठासून सांगितलेले असते. मग काय, मोठ्या विश्वासाने आपण पुढे जातो. मग अनेक खड्डे, मधेच रस्ता चुकणे आणि उशीर या सर्व प्रसंगांना सामोरे जावे लागते. अनुभवाला शॉर्टकट नसतो; कारण त्यातूनच पुढच्या निर्णयाचं शहाणपण जन्म घेतं. क्वचित आपला निर्णय योग्यही ठरू शकतो पण त्याची खात्री कधीच देता येत नाही. म्हणूनच असे निर्णय हे धाडसी समजले जातात. निर्णय घेताना आपण स्वतःला खूप हुशार समजतो; पण परिणामांचे अनुभव आपल्याला अधिक हुशार बनवतात.
आपल्याला निर्णय घेण्याची मुभा असणे ही गोष्ट आपण स्वातंत्र्य मानतो. पण खरंतर निर्णय घेऊन विषय संपत नसतो. त्याचे परिणाम भोगण्याची जबाबदारी आपल्यावर येऊन पडते. बऱ्याचदा तुमच्याकडे निर्णय घेण्याची मुभा नसते. परिस्थिती तुमच्यावर निर्णय लादत असते. काही निर्णय तुम्हाला मनाविरूद्ध घ्यावे लागतात. अभ्यासासाठी लौकर उठणे, ऑफिसमध्ये कामं करणे, आजारी पडल्यास पथ्य पाळणे… असे अनेक निर्णय आपल्या हातात नसतात. तरीपण ते घ्यावेच लागतात.
काही निर्णयांबरोबर वेळेची गुंफण घातलेली असते. शेअर मार्केटमध्ये पैसे कधी गुंतवायचे आणि ते शेअर्स विकून बाहेर कधी पडायचं… याच्या वेळा सर्वानाच जमतात असे नाही. असं म्हणतात की मार्केटमध्ये गुंतवणं सोपं आहे पण त्यातून योग्य वेळी बाहेर पडणे हे खूप कठीण. हाव आणि आशा या दोन गोष्टी आपल्याला शेअर्समधून बाहेर पडू देत नाहीत.
निर्णय घेणे ही मक्तेदारी ठराविक वयानंतरच येते हा गैरसमज आहे. दहावीनंतर आर्टस का कॉमर्स का सायन्स, बारावीनंतर मेडिकल का इंजिनिअरिंग.. एक ना अनेक. नोकरीत बॉसला खुश ठेऊ का नको, आज थांबून कामं पूर्ण करू का नको. याहून कठीण प्रश्न म्हणजे पन्नास हजाराचा फोन घेऊ का लाखाचा आयफोन घेऊ. किती ते प्रश्न आणि किती ते निर्णय! शक्यतो एकदा घेतलेला निर्णय परत बदलता येत नाही. आयुष्यात अनडू ची सुविधा नसते. आपण रिडू करू शकलोच तरी वेळ परत येऊ शकत नाही. कारण गेलेली वेळ परत येऊ शकत नाही.
निर्णय घेताना आपण भविष्य निवडत असतो. चुकण्याची भीती असली तरी निर्णय टाळून उपयोग नसतो. आयुष्य कोणासाठीही थांबत नसते. कदाचित जीवन म्हणजे घेतलेल्या निर्णयांच्या परिणामांचा अनुभव आणि न घेतलेल्या निर्णयांची खंत असावी.

Chhan 👌
ReplyDelete