Sunday, 22 December 2024

मोडेन पण वाकणार नाही

वयाच्या पन्नाशी नंतर जर एकही अवयव दुखत नसेल तर तुम्ही मेलेला आहात असे समजावे. असं मी नाही, खुद्द पुलं म्हणून गेलेत. माझ्या बाबतीत जिवंतपणाचा पुरावा मी पन्नाशीच्या एक दोन वर्षे आधीच निर्माण केला असं म्हणायला हरकत नाही. तसं माझ्या इतिहासात डोकावून पाहिलं तर मला क्वचितच सर्दी खोकला ताप झाल्याचे आढळून येईल. 

तर मुद्दा असा की माझ्या मागे पाठदुखीचा ससेमिरा लागला. सुरवातीचे काही दिवस मी ह्या दुखऱ्या पाठीकडे थोडी पाठच फिरवली पण नंतर मात्र तिने माझी पाठच सोडली नाही. ही पाठदुखी कधी अचानक डोकं वर काढायची आणि माझं जगणं असह्य करून टाकायची. चार पेन किलर गोळ्या घेतल्या की परत गायब होत असे. नक्की हे दुखणं खरं आहे का उगाच माझ्याशी खेळ खेळतेय हेच कळायचं नाही. बरं मी कुठं पडलोय, धडपडलोय असं पण कधी झाल्याचं मला आठवत नाही. संसाराची आणि नोकरीची बरीच ओझी उचलणारा बैल असलो तरी खरेखुरे अतिजड वजन उचलेले मला मुळीच आठवत नाही. मग ह्या पाठदुखीने माझीच का पाठ धरली, हा प्रश्न मात्र मला सतावत होता.

जेव्हा पेनकिलर कुचकामी ठरायला लागल्या त्यावेळी डॉक्टरची पायरी चढायची ठरवली. जवळच्याच एका डॉक्टरकडे भेट देऊन त्याला हजार रूपयांची दक्षिणा देऊन श्रीमंत करायचा निर्णय घेतला. त्या होतकरू डॉक्टरने मला न्याहाळत बडबडायला सुरू केले, “तुमचे बैठे काम असते का? वजन कमी करायला हवे. किमान महिनाभर ऑफिसला जाऊ नका.” त्या क्षणाला वेदनेत मी विव्हळत असल्यामुळे “हो” बोलणे भाग होते. तीन प्रकारच्या गोळ्या आणि दोन प्रकारची मलमं लिहून दिली. किमान पंधरा दिवस फिजीओथेरेपी करण्याची अत्यंत गरज आहे असा पण सल्ला लिहून दिला. औषध दुकानदाराकडून कळले की दिलेली औषधे सुध्दा पेनकिलरच आहेत. नवीन ब्रॅंडच्या पेनकिलरने दुखणे कमी झाले. दोन दिवस फिजीओथेरपीस्टला भेटून त्याला पण हजार रुपयानी श्रीमंत केले. आणि तीन चार दिवसातच माझे रूटीन पुर्ववत सुरू झाले.




काही दिवसांनी पुन्हा एकदा माझ्या दुखण्याने माझी पाठराखण केली. चार पावले चालणे कठीण झाले. तशाच अवस्थेत पुन्हा एकदा होतकरू डॉक्टरकडे जावे लागले. सर्वप्रथम त्याने मी महिनाभर विश्रांती का घेतली नाही आणि पंधरा दिवस फिजीओथेरपी का केली नाही याबद्दल तोंडसुख घेतले. माझ्या कडे सॉरी बोलण्याशिवाय पर्याय उपलब्ध नव्हता. बैठ्या कामामुळे पाठीत एक स्पॅझम तयार झाला असून त्यावर फिजीओथेरपी हाच एक उपाय आहे. असे पुन्हा एकदा सुतोवाच केले आणि पुन्हा एकदा दोन नवीन गोळ्या लिहून दिल्या. पंधरा दिवसांच्या फिजीओमधे महिन्याचा पगार फुंकायची माझी तयारी होत नव्हती. पण मुकाट्यानं हो म्हणून मी बाहेर पडलो. यावेळी मी तब्बल आठ दिवस फिजीओथेरेपी घेतली. पाठीला एक मशिन लावून तिथली बया इतर बायां बरोबर गप्पा ठोकत बसे. पंधरा मिनीटे पाठीला मुंग्या चावल्या प्रमाणे ते मशिन काम करीत राही. मी आपला असहाय होऊन त्यांच्या बायल्या गप्पा नाईलाजास्तव ऐकत पडून राही. या सर्व खटाटोपीचा तसा फारसा काहीच परिणाम होत नव्हता. वेदना माझी पाठ सोडायला तयार नव्हती. समोर आलेल्या संकटाला पाठ दाखवण्याचा माझा स्वभाव नाही पण इथं तर प्रत्येक संकट मीच ओढवून घेत होतो आणि पाठ पण दाखवत होतो.

या बरोबरीने घरामधे माझ्या पाठीवर बरेच अत्याचार चालूच होते. आयोडेक्स, मुव्ह, व्हॉलीनी, मसाज, गरम पाण्याचा शेक, विचित्र रंग व गंधाचे लेप… अशा अनेक नरक यातना माझ्या पाठीशी लागल्या होत्या. दरम्यान एका पैलवान मसाज वाल्याकडे मी माझी पाठ सुपूर्त केली. त्याला पाठीच्या दुखण्याची कल्पना देऊन मी चुक तर नाही ना केली असा प्रश्न पडला. त्याला काहीतरी सुवर्ण संधी चालून आल्याचा आनंद झाला. “भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे” असा त्याने दिलासा दिला. त्याने सर्व बळ पणाला लावून अतिभयंकर शक्ती प्रदर्शन सुरू केले. संपत आलेल्या टुथपेस्ट च्या ट्युब मधून पेस्ट बाहेर काढण्यासाठी जे शर्थीचे प्रयत्न करावे लागतात तसे काहीसे प्रयत्न त्याने माझ्या पाठीवर सुरू केले. अखेरीस मला सांगावे लागले.. माझी आधीची पाठदुखीच बरी होती. पण हे असले अत्याचार नकोत. आठवड्याच्या त्याच्या प्रामाणिक सेवेनंतर मी स्वतःला निवृत्त केले.

आता मात्र माझी पाठ माझ्या हाता बाहेर चालली होती. मला ताठ मानेने जगणे अशक्य झाले होते. उजव्या बाजूला वेदना असल्यामुळे माझा एक खांदा झुकला गेला होता. माझी चाल अल्लू अर्जून च्या पुष्पा सारखी झाली होती. सोसायटीच्या आवारात चार पावले चालणे अशक्य झाले होते. वाटेत भेटणारा प्रत्येक जण आवर्जून विचारपूस करीत होता. कधी ओळख न दाखवणारा माणूस ही अचानक आपुलकी दाखवू लागला. जणूकाही भेटणाऱ्या प्रत्येकाने माझी पाठ बरी करण्याचा विडाच उचलला होता. मला बरे करणे ही निव्वळ त्यांचीच नैतिक जबाबदारी असल्याप्रमाणे सल्ले मिळू लागले. “आमच्या ओळखीचे एक डॉक्टर आहेत, त्यानी माझी पोटदुखी चार दिवसात बरी केली होती.” अहो पोटदुखी आणि पाठदुखी हे भिन्न आजार असून त्याचे डॉक्टर वेगळे असतात.. हे समजावण्याचे माझ्यात बळ नव्हते. एका प्रेमळ काकांनी तर डॉक्टरांचा फक्त नंबर देऊन न थांबता स्वतः जातीने फोन करून अपौंटमेंट पण घेऊन टाकली. काहीतरी कारण काढून टाळल्यावर ते काका माझ्यावर नाराज झाले. “बघा बुवा! ज्याचं करावं भलं…”

अशाच एका प्रेमळ काकूंकडून एका हाडवैद्याचा शोध लागला. “अहो बिन औषधाचं ते वैद्य फक्त पाच मिनीटात बरं करून देतात.” मी पण वेदनेनं त्रस्त झालो होतो. ठरवले, आता हाही प्रयोग करून बघूया. ठरल्या वेळे प्रमाणे मी त्या इप्सित स्थळी पोचलो. तिथं एक हॉल पुरूषांचा आणि एक हॉल स्त्रीयांचा होता. मला पुरूषांच्या हॉल मधे धाडण्यात आले. तिथं सात आठ लोक जमिनीवर आडवी पडलेली होती. एक माणूस प्रत्येकाच्या पाठीवर पाय रोवून त्यांचे हात ओढीत होता. आडवा माणूस मुकाट्यानं ते सहन करीत होता. तो उभा इसम एकाला तुडवला की दुसऱ्याच्या पाठीवर पाय रोवायला सज्ज! मी प्रवेश केल्यावर मला कोणताही प्रश्न न विचारता तिथंच आडवं होण्याची आज्ञा झाली. मी अंदाज बांधला की तो तुडवणारा इसमच हाडवैद्य असणार. त्यानं माझ्या पाठीवर पाय रोवून माझा हात वर ओढला. तीव्र वेदना या पलीकडे काहीही घडले नाही. मी तसाच धडपडत उठलो आणि पैसे हातात ठेऊन पाठ कुरवाळत घर गाठले.

माझ्या पाठीने तसे बरेच चढ उतार बघितले आहेत. साधारण आठवडाभर मला बेजार करून झाले की पाठदुखी कुठंतरी दडी मारून बसायची. काही दिवसांनी परत पाठीवर थाप मारत हजर व्हायची. माझी अशी अवस्था पाहून सोसायटीच्या वॉचमनने मला एक दिवस सल्ला दिला. “साहेब, सकाळी लौकर इथं खाली या आणि उघड्यानं या लाईटच्या खांबाला पाठ घासा.” पाठदुखीमुळं मला वाकता येत नव्हते पण ताबडतोब त्याला तिथंच साष्टांग दंडवत घालण्याची इच्छा झाली. ऑफिस मधे एकाने मला आवर्जून एक मलम आणून दिले. यानं नक्की फरक पडेल. दोन तीन दिवस मलम चोळल्यावर वेदनेत फरक पडला नाही पण शरीराला एक भयंकर दुर्गंध येऊ लागला. त्यानंतर चार दिवस पाठीला साबण घासून त्या वासातून सुटका करून घेतली.

आता डॉक्टर बदलण्याची वेळ आली होती. एका नामांकित हॉस्पिटल मधील प्रख्यात डॉक्टरना पाठ दाखवण्याचे ठरले. त्यांची अपौंटमेंट एक आठवड्या नंतरची मिळाली. आठवडाभराच्या प्रतिक्षेनंतर डॉक्टरना भेटण्याची वेळ आली. वाटेत टॅक्सी वाल्याला सावकाश चालव रे बाबा! अशी विनंती केल्यामुळे त्याच्यापासून पाठदुखी लपून राहिली नाही. पुढील सुमारे पंचवीस मिनीटाच्या प्रवासात त्याने त्याच्या मामाचे दुखणे इचलकरंजी जवळच्या एका खेड्यातील वैद्याने कसे बरे केले याची इत्यंभूत कहाणी ऐकवली. मी वेदना सांभाळत त्याच्या कथेला योग्य न्याय दिला. दर वाक्याला “हो का?” “अरेरे!” “वाऽ” असे उद्गार काढले आणि प्रवास संपवला. मी पुढील खेपेस इचलकरंजी जवळच्या खेड्याला जरूर भेट देईन हो, असे आश्वासन पण दिले.

आता माझ्या पाठीवर नवीन अध्याय सुरू झाला होता. डॉक्टर वयस्कर आणि अनुभवी दिसत होते. त्यानी काही प्रश्न विचारले, पाय हलवून दाखवा, बोटं हलवून दाखवा अशा काही परिक्षणानंतर सुतोवाच केले.. हे स्लिपडिस्क असण्याची शक्यता आहे. ताबडतोब MRI करून घ्या. आता आमचा मोर्चा तिकडे वळला. पंधरा हजाराचे देणे देऊन आम्ही पुन्हा त्या डॉक्टरना भेटलो. रिपोर्ट पाहून ते बुचकळ्यात पडलेले दिसले. तरी त्यांनी स्लिपडिस्क चा ठेका चालूच ठेवला होता. पण उगाच शंका नको म्हणून तुम्ही CT Scan आणि रक्त तपासणी करा असा सल्ला दिला. आता मात्र मला नक्की काय झालंय याची उत्सुकता व भीती दोन्ही गोष्टी सतावू लागल्या. अजून दहा हजारांची आहूती दिल्यावर चार दिवसांनी माझे सर्व रिपोर्ट त्यांना दाखवले. त्यानी हे स्लिपडिस्कच आहे पण थोडी वेगळी केस आहे असं काहीतरी समजावलं. मला त्यातलं काहीच समजलं नाही. चार औषधांची यादी हातात ठेवून पुढच्या आठवड्यात परत भेटा असा सल्ला वजा धमकी दिली. एकंदरीत माझ्या वेदनेच्या जोडीला भीतीने पण साथ द्यायला चालू केले होते. भीत्या पाठी ब्रह्मराक्षस या म्हणी मधे भीत्या पोटी किंवा डोकी असं न म्हणता पाठी का म्हणतात त्याचा शोध लागला.

पुढच्या आठवड्यात डॉक्टरना भेटल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर एक शोध लावल्याचा आनंद दिसत होता. चार सोपे व्यायाम करायला सांगितले आणि आज एका नव्या व्याधीच्या नावाचे ज्ञान आम्हाला दिले. DISH .. हा आजार मणक्या जवळच्या स्नायूंचा असतो. वयानुसार आणि राहणीमानामुळे मणक्या जवळ calcium जमा होते आणि स्नायूंमधे एक आखडलेपणा येतो. असाच व्यायाम कायम करीत रहा…

आणि आता माझ्या आयुष्यात DISH नामक राक्षसाचा प्रवेश झाला होता. 

Sunday, 6 June 2021

ताक

अख्ख्या भारतात ताक आवडत नाही असा माणूस सापडणे कठिण! आणि त्यात मराठी माणसाला तर ते आवडतेच आवडते. आपल्या पूर्वजांनी ज्या काही पाककला विकसित केल्या आहेत, त्यात ताकाचा शोध हा महत्वपूर्ण म्हणायला हरकत नाही. बनवण्यास अतिशय सोपा, अत्यंत पुरवठी, आणि रोजच्या जेवणा पासून ते शाही भोजना पर्यंत आवर्जून एक महत्वपूर्ण घटक बनलेले असे हे ताक. पिणाऱ्या व्यक्तीला खुष करून टाकणारे हे ताक. प्रत्येकाच्या फ्रिजच्या अडगळीत हमखास सापडणारे असे हे ताक.


आपल्या पूर्वजांनी ताकाचा शोध लावून संपूर्ण मनुष्यजातीवर … किंवा किमान भारतीय खाद्य संस्कृती मधे तरी भरीव योगदान केले आहे, असे मला म्हणावेसे वाटते. या सांस्कृतिक यादीतून विदेशी लोकांना वगळण्याचे कारण म्हणजे त्याना ते बटर मिल्क, कर्ड वॉटर असलं काही बोलून ताकाची महती पटवून देता येत नाही. कदाचित याच आसूये पोटी त्यानी योगर्ट ड्रिंक नामक काहीतरी रसायन घशात ओतण्याचे प्रकार सुरू केले असावेत, पण त्याला ताकाची उंची गाठता येणे शक्य नाही. ताक ते ताकच!

रोजच्या जेवणातल्या तजेलदार ताकाला लग्न समारंभात खास सजवले जाते. त्याला कोथिंबीर, आले यांचा शृंगार चढवून मठ्ठ्याचे रूप दिले जाते. पंक्तीचा आकडा वाढला तर मसाले भात, पुऱ्या यांच्या पुरवठ्यामुळे यजमानाची दमछाक उडू शकते. पण मठ्ठा मात्र कधीच कमी पडत नाही. घाऊक पाणी पुरवठ्यावर मठ्ठा मोठ्या दिमाखाने प्रत्येकाच्या वाटीत ओसंडून वहात असतो. … प्या कितीपण! कितीही पोटभर जेवले तरी मठ्ठ्या विना भोजनपूर्तीचे समाधान मिळत नाही. लग्न कार्यात आग्रहाने मठ्ठा वाढतात आणि तृप्ततेची ढेकर ऐकून यजमान खुष होतात. 


आयुर्वेदामधे ताकाचे स्थान अनन्य साधारण आहे. पचनाला पोषक आणि पित्तशामक अशा या पेयाला उष्माघात आदी त्रासांपासून सुटका करण्यासाठी रोज पिण्याचा सल्ला दिला जातो. तुम्ही त्यात चिमूटभर चाट मसाला आणि कणभर मीठ टाका.. आणि मग झकास पैकी पेला संपवून टाका. कशाला हवेत महागडे सॉफ्ट ड्रिंक आणि सरबतं? मला त्या ताकामधे कितीही पाणी घातले तर मुळीच तक्रार नाही पण जर कोणी दूध घालून पिले तर तो ताकाचा धडधडीत अपमान आहे असा माझा आरोप आहे. अहो! ताकालाही भावना असतात… ताकाला ताका सारखे जगू द्या!! असे मला ओरडून सांगावे वाटते.

साधारणत: प्रत्येक पेयपान करण्याची वेळ ठरलेली असते. उगाच कोणी रात्री झोपताना चहा पित नाहीत. ताक मात्र कधीही चालू शकते. जेवणा आधी, जेवणा नंतर, झोपेच्या आधी, अथवा सहजच. तुम्ही कधीही ताक प्या, तुम्हाला प्रसन्नच वाटेल. झोपणार असाल तर झोप छान येईल किंवा काम करणार असाल तजेलदार वाटेल.

ताकाला फक्त खाद्य पदार्थातच नव्हे तर मराठी भाषेमधे सुध्दा मानाचे स्थान आहे. मराठी माणसाला ताकाला जाऊन भांडे लपवण्याची सवय नसते. मराठी महिला वर्ग  केवळ सुगरणच असतात असं नाही तर अगदी ताकास तूर लागू देत नाहीत. माझ्या समोर कितीही पक्वान्ने आणून ठेवली तरी दूध का दूध आणि ताक का ताक करायला फारसा वेळ लागणार नाही.

तक्रम शक्रस्य दुर्लभम्। इंद्र देवाला ताकाचे दुर्भिक्ष्य का याचे ज्ञान मला नाही. पण गरीबा पासून श्रीमंता पर्यंत सर्वाना परवडेल असे ताक घरो घरी सहज उपलब्ध असते. शिळे झाले, आंबट झाले तर वृक्षवल्ली ना आवडते. एका सर्वेक्षणा नुसार ९९.७९% गृहीणींची त्यांच्या शेजारणी बरोबरची मैत्री ही विरजण मागण्यापासून होते.

ताकाची महती वर्णावी तेवढी कमीच! इतके असूनही कोणी आवडीचा पदार्थ काय असे विचारले तर चटकन ताकाचा उल्लेख करीत नाही. ताक प्रजातीच्या या अपमाना बद्दल मला अत्यंत वाईट वाटते. 

पिझ्झा पास्त्याच्या जमान्यात एक दिवस ताक हरवून जाऊ नये एवढीच इश्वर चरणी प्रार्थना!


ता.क.: ताकाचे कौतुक वाचून कोणी नाक फुगवून बसू नये. उगाच विनोदावर विरजण पडायला नको.

Saturday, 7 March 2020

पडू आजारी

काही लोक जन्माला येतानाच चांदीचा चमचा घेऊन येतात असं म्हणतात. उदाहरणा दाखल, शाळेत कितीही उनाडक्या करून कसेबसे पास झाले असले तरी नोकऱ्या पटापट मिळवतात. नोकरीत बाॅस ची मर्जी सांभाळू शकतात आणि स्वार्थ साधून घेऊ शकतात. यांना संसारातल्या वाळक्या कटकटी कधी त्रास देत नाहीत. यांना बायको धाकात ठेवत नाही. यांची मुलं कशी अगदी आज्ञेत असतात. यांच्या फेसबुकच्या फोटोना हजार काॅमेंटस आणि तीन हजार लाईकस मिळतात. थोडक्यात काय तर यांचे आयुष्य कसे अगदी छान चालू असते. खरंच! मला अशा लोकांचा अगदी मनापासून हेवा वाटतो. माझं आयुष्य ना कायमच बाॅस, बायको, आणि क्लाएंट याना घाबरण्यात संपत आलं. काय करणार? नशीब!

आता नुकतीच घडलेली गोष्ट! आमचा असाच एक सुखी शेजारी श्रीमान जोशी अचानक ताप, सर्दी, खोकल्या मुळे आजारी पडला. सौ जोशी नी पतीसेवेची सुवर्ण संधी मिळाल्याच्या आनंदात सर्व महिला वर्गात व्हाटसॲपीय दवंडी पिटवली. शिवाय जड अंत:करणाने त्याना अत्यंत महत्वाच्या गाॅसिपींग च्या कार्यक्रमाला गैरहजर राहण्याचा निर्णय घ्यावा लागला. बायको ने मला ही बातमी अतिशय सनसनाटी पध्दतीने सादर केली आणि जोशाच्या घरी धडकून येण्याचा निर्णय तिच्या एकमताने घेण्यात आला. शेजार धर्म पाळण्याच्या विरोधात मी मुळीच नाही पण तो फाजील जोशा माझ्या डोक्यात जातो. असो. तरीपण आम्ही दुसऱ्या दिवशी संध्याकाळी डजझनभर संत्री घेऊन त्यांच्या घरी पोचलो. दरवाजा बाळ जोशीने उघडला आणि ओरडून आम्ही आल्याची वर्दी दिली. “डॅड, कुलकर्णी अंकल आणि आंटी तुम्हाला भेटायला आलेत. तुम्ही आत जाऊन झोपा.” कदाचित जोशा किचन मधे काहीतरी खुडबूड करीत असावा. त्याला हातातला घास टाकून बेडरूम कडे पळ काढावा लागला. आम्ही हाॅल मधे वाट पहात बसलो. दोन मिनीटातच सौ जोशी बाहेर आल्या. आमच्या हातातली संत्र्यांची पिशवी बघून त्या उत्साहाने बोलू लागल्या. “अहो! तुम्हाला सांगते, अगदी परवा पर्यंत ठिक होते. बघा!” मी मनात म्हणलं “हो. हो. त्याला बाल्कनीत दात टोकरत बनियन वर उभा असलेला मी पाहीला होता.” जोशी बाईंचे पुराण चालूच होते. “अचानक ताप भरला हो! मग मी त्याना रजा काढून घरी बसा असा आग्रह केला. तेव्हा कुठे हे तयार झाले. याना ऑफीसच्या कामाचे फार टेन्शन असतंय हो!” आता याना काय माहीत की हा जोशा ऑफीसात रोज कशा पाट्या टाकतो आणि चकाट्या पिटत फिरत असतो! तरीपण मी होय होय म्हणत जोशाला उगाचच सहानभुती युक्त कौतुक दिले. “या ना आत मधे! आत्ताच झोपेतून जागे झालेत. केवढे अशक्त झालेत! काही काही खात नाहीत हो!” वास्तविक त्याच्या हनुवटीच्या खाली चिवड्याचा कण चिकटलेला दिसत होता आणि अशक्त? छे! मला तरी कोणत्याच कोनातून बारीक झाल्यासारखा वाटत नव्हता. मला पुन्हा एकदा होय होय म्हणावे लागले. “काय जोशी बुवा! लौकर बरे व्हा” मी असं काहीतरी बोलायचं म्हणून बोललो. आमच्या आगमना मुळं थोडासा गोंधळलेला जोशा उठून बसला. मला त्यानं समोरच्या खुर्ची वर बसण्याचा आग्रह केला. सौ जोशी नी “तुम्ही बसा बोलत मी पटकन चहा टाकते.” असा पाहुणचार दाखवत स्वयंपाक घराकडे धाव घेतली. त्याच्या मागोमाग माझी सौ पण नको नको बोलत गेली. खरंतर जोशा मला चांगलाच फ्रेश दिसत होता. मीच ऑफीसमधून आल्यामुळे दमून गेलो होतो आणि जांभया आवरायचा प्रयत्न करीत होतो. “अरे हक्काची मेडीकल लिव मिळते ना? ती वापरायची तरी कधी? शिवाय बायको कडून जरा सेवा करून घेतली तर काय बिघडतंय?” असा काही तर्क सांगत त्याने फक्त किरकोळ सर्दी झाल्याची कबुली दिली. या उपर त्याने बायकोला सुध्दा कसा पत्ता लागू दिला नाही याची फुशारकी मारून झाली. सौ जोशी परत आल्या. त्यांच्या हातात चहा नव्हता. माझ्या बायकोने त्यांचा आग्रह उधळून लावला होता. मी नाईलाजाने उठलो आणि जोशाकडे बघून पुन्हा एकदा “लौकर बरा हो रे! असा तुला आजारी बघून माहीत नाही.” असा खोटा भाव देत मी बाहेर पडलो. जोशाला स्वत:च्या ढोंगीपणाचे उगाचच कौतुक वाटत होते.

घरी आल्यावर सौ ने जोशीण बाई केवढ्या त्या फुशारक्या मारत होती याचा पाढा वाचून दाखवला. “नवरा आजारी पडला म्हणून ही बया एकदम सेलिब्रिटीच झाली का काय? असली ही कसली जगावेगळी हौस?” मी हं हं म्हणत साफ दुर्लक्ष केले आणि थोडा अंत:र्मुख होऊन विचार करू लागलो. खरंच किती राबतोय मी? थोडासुध्दा स्वत:चा विचार करत नाही. एकतर जीव तोडून ऑफीसमधे राबा आणि जर कधी रजा काढलीच तर सह कुटूंब हिंडवून या. म्हणजे नशीबात आराम नाहीच. नशीबाला दोष देत मी झोपून गेलो. दुसऱ्या दिवशी आवरून ऑफीसला गेलो आणि बातमी आली की बाॅस आजारी! किमान दोन तीन दिवस तोंड बघायला मिळणार नाही. म्हणजे दोन दिवस बाॅसची तरी कटकट नाही या सुखी विचाराने कामाला लागलो. संध्याकाळी कोणीतरी आतल्या गोटातली बातमी सांगितली की बाॅस वास्तविक आजारी नाहीच. उगाचच ढोंग करून घरी बसलाय. आता मात्र माझी खरंच सटकली. हे जरा जास्तच होतंय. पण काय करणार? जाब तरी विचारू शकत नाही. माझ्या चांगल्या तब्येतीचा मला प्रथमच मनस्वी राग वाटू लागला. ताप वगैरे राहू दे; साधा कधी खोकला सर्दी पण होत नाही. तशी माझी काही फार मोठी अपेक्षा आहे का? आनंद मधल्या राजेश खन्ना सारखा दमदार असाध्य रोग व्हावा अशी कधी मागणी केलीय का? निव्वळ एक साधा ताप आणि किरकोळ खोकलाच तर मागतोय. तसा मी सुध्दा ढोंग करू शकतो पण तसलं आपल्या तत्वात बसत नाही ना!

मनातूनच स्वत:चा वाटलेला तिरस्कार हळूहळू मी गिळून टाकला आणि माझी गाडी रोजच्या रूळावरून धावू लागली. साधारण महिन्याभराने माझ्या आयुष्यात काहीतरी घडणार असावे पण मला मात्र मुळीच कल्पना नव्हती. एक दिवस सकाळी आवरून बाहेर पडलो आणि जोराचा पाऊस आला. आडोसा शोधे पर्यंत क्षणार्धात चिंब भिजून गेलो. ऑफीसला उशीर झाल्यामुळे तसाच तडक गेलो आणि भिजलेले कपडे ऑफीसच्या एसी मधे अंगावरच वाळवले. कामाच्या नादात दिवस कसा संपला लक्षातच आले नाही. संध्याकाळी घरी आलो. घरात टिव्ही वरील कोणतीतरी टुकार मालिका कर्णकर्कष्य आवाजात प्रदुषण करीत होती. एकंदरीत सर्व प्रकाराने माझे डोके गरगरायला लागले. पटकन जेवण करून बेडरूम मधे गेलो. अचानक थंडी वाटल्यामुळे पांघरूण ओढून झोपायचा प्रयत्न करू लागलो. थोड्या वेळाने बायकोच्या बोलण्याने जाग आली. “अगो बाई! हे काय? काही होतंय का?” मला तर बोलण्याची इच्छाच नव्हती. बायकोने अंगाला हात लावून “अय्या! हे काय? चांगलाच ताप आहे की अंगात! उद्या ऑफीसला आजीबात जायचे नाही.” असा हुकूम सोडण्यात आला. पडत्या फळाची आज्ञा स्विकारून मी ताबडतोब प्रस्तावाला दुजोरा दिला आणि पांघरूण तोंडावर ओढून घेतले. सौ ने एक क्रोसीन ची गोळी आणि पाणी आणून दिले. गोळी घेऊन मी निद्रादेवीची आराधना करीत पडून राहीलो. 

सौ ला आता भलताच आनंद झाला होता. अतिशय उत्साहाने तिने ही आनंदाची बातमी अख्या सोसायटी मधे वाऱ्यासारखी पसरवली. अचानक सौ ला आणि ओघाने मला सोसायटीत मानाचे स्थान निर्माण झाले. सौ ला धडाधड फोन येऊ लागले. “अगं काय सांगू? सकाळी ऑफीसला जाताना एकदम ठिक होते गं!” अशी सुरवात झाली की साधारण अर्ध्या तासाच्या संक्षिप्त संवादा नंतर “पडलेत आता गोळी घेऊन.” असा शेवट होऊ लागला. तब्बल दीड तास हा प्रेमळ संवाद मी पांघरूणा आडून ऐकला.अखेरीस मलाच झोप लागली. सकाळी ऑफीस ला जायचे नसल्यामुळे निवांत उठलो. कन्या आवरून कधीच शाळेला पळाली होती. खरंतर मला आता एकदम फ्रेश वाटत होतं. तरीपण ऑफीसमधे माझ्या आजारपणाची बातमी पोचवली. गरमागरम ब्रेकफास्ट आणि चहा पिण्यासाठी आवरून बाहेर येऊन बसलो. “अरेच्या! हे काय? आता फ्रेश दिसताय ना! अजूनही ऑफीसला गेलं तरी चालू शकतंय.” सौ ने ब्रेकफास्ट पुढे ढकलत मला निरोगीपणाचे प्रमाणपत्र देऊन टाकले. आणि मला वाटलं की आता ऑफीसला खरंच पिटाळते का काय! “आता राहू दे ना!” अशी विनंती वजा गयावया केली. कदाचित सेलिब्रीटी स्टेटस मेनटेन करण्यासाठी तिने माझी जाहीर विनंती मंजूर केली. त्या बरोबरीने काही सुचना पण देण्यात आल्या. “कोणी बघायला आलं तर त्याना तुम्ही आजारी असल्याचं वाटू दे. मला ढिगभर कामं पडलीत. त्यात उगाच लुडबूड नको.” आता ही ढिगभर कामं म्हणजे नक्की काय याचा उलगडा मला आज पर्यंत झालेला नाही. आणि इतक्या ढिगभरातून गाॅसिपींगला वेळ कधी मिळतो हा एक संशोधनाचा विषय. माझ्या नव्हे...


उगाच पेपर चाळत सोफ्यावर लोळत पडलेलो असताना बेल वाजली. मी पटकन दार उघडायला उठलो पण समय सुचकता दाखवून मला सौ ने थांबवले. ताबडतोब बेडरूम मधे पळण्याचा इशारा केला. आणि खोकण्याची आठवण करून दिली. मी सर्व सुचना लक्षात ठेऊन बेडरूमकडे पळ काढला. सौ ने दरवाजा उघडला. आमचे सख्खे शेजारी कानडी श्रीयुत बेनगिरी आणि त्यांच्या मातोश्री यांचे आगमन झाले. “कसे आहेत साहेब? आजारी आहे कळलं, म्हणून बघायला आलो.” अशी दमदार आवाजात एंट्री केली. सौ ने जोशी बाईचा कित्ता गिरवत “खुप अशक्त झालेत हो! रात्रभर ताप होता. अजून खोकतायत.” असं म्हणत त्याना माझ्या खोलीचा रस्ता दाखवला. मी सुध्दा प्रशिक्षीत प्राण्यासारखे खोकून त्यांचे स्वागत केले. बेनगिरी चा आवाज अजूनही टिपेलाच होता. “काय झालं रे? बाहेरचं काही खाल्लास काय रे? घरचं जेवण ते घरचंच असतं. जरा पार्ट्या कमी कर.” मी त्याच्या विद्वत्तापुर्ण संवादावर उडालोच. “तसं काही नाही, काल जरा भिजलो.” माझा आवाज त्याच्या समोर भलताच मिळमिळीत होता. उगाचच “हा हा हा” अशी त्यानं न केलेल्या विनोदाला त्यानं स्वत:च दाद दिली. मी पण नाईलाजास्तव त्याला हासून साथ दिली. “हे तापाचं लै अवघड काम असतंय बघा. आमचं नणदेचा पुतण्या असतंय बघा, तिकडं धारवाडला.. असंच तापानं फणफणलं की हो. महीनाभर उठलंच नाही. कसंबसं वाचलं बघा.” बेनगिरी आज्जी नी ज्ञान दिले. “#%#% टायफाईड #%#%” अशी काहीतरी मुलानं कानडी भाषेत आईला माहीती पुरवली. “ते काय मला कळत नाही.” आज्जी नी स्वत:ची बाजू सावरून घेतली. मी मात्र माय लेकाचे संवाद शांतपणे खोकत ऐकून घेतले. मला आता खरंच ताप आल्याचा भास होऊ लागला. साधारण पाऊण तास बसून मायलेक चहा बिस्कीटं वसूल करून गेली. जाता जाता आज्जीनी खोकल्यावर कसलातरी काढा घ्या असा सल्ला देऊ केला. मी उगाचच “हो घेतो.” अशी मंजुरी दिली. साधारण तासाभराने आज्जी स्वत:च एका कपातून काहीतरी रसायन घेऊन आल्या. त्यांच्या प्रेमापुढं नकार देण्याची हिम्मत सौ मधे आणि माझ्यामधे मुळीच नव्हती. अशा हौशी वैद्यांचा एक मोठा प्राॅब्लेम असतो. ते निदान करून थांबत नाहीत. त्यावरील औषधं घश्यात उतरवे पर्यंतची जबाबदारी चोख पार पाडतात. मी कसेबसे ते रसायन दोन घोट प्याले आणि मला पोटात ढवळून आले. सकाळी जरा बरं वाटायला लागलेलं पण आता पुन्हा डोकं गरगरू लागलं. मी थोडा झोपतो असं सांगून कपात उरलेल्या काढ्या पासून माझी सुटका करून घेतली. थोड्या वेळाने आज्जी परत गेलेल्या पाहून कप बेसिन मधे रिकामा केला.

माझं डोकं त्या काढ्यानं खरंच गरगरू लागलं होतं. मी जवळच्याच एका डाॅक्टरला भेटून येतो अशी इच्छा बोलून दाखवली. सौ ने तिला आता मुळीच वेळ नाही, कारण कामवाली बाई येणार आहे असे सांगून स्वत:ची सुटका करून घेतली. मी एकटाच डाॅक्टरची पायरी चढायला गेलो. माझ्या आधी चार पाच लोक नंबर लावून बसले होते. सर्वां पासून स्वत:ला शक्य तेवढं दूर ठेवत मी वाट बघत बसून राहीलो. साधारण अर्ध्या पाऊण तासाने माझा नंबर आला. वृध्द डाॅक्टरनी गळ्यातला स्टेथो कानाला लावून माझी तपासणी सुरू केली. मला काहीच प्रश्न विचारला नाही तरी मीच माहीती द्यायला सुरवात केली. कोणतीही प्रतिक्रीया न देता त्यानी गोळ्यांच्या तीन पुड्या बांधल्या आणि सकाळ दुपार संध्याकाळ घ्यायला सांगितल्या. सरते शेवटी पाचशे रूपये दक्षिणा देऊन बाहेर पडलो. कालचं भिजणं आणि बेनगिरी आज्जींचा काढा मला पाचशे रूपयाना पडला.

तसा दिवसभरात बऱ्याचवेळा फोन वाजला पण आजारी असणे सिध्द करण्यासाठी मी एकदा सुध्दा उचलला नाही. फोनची रिंग वाजली की मी खोकून दुर्लक्ष केले. दिवसभरात कामवाली बाई, इस्त्रीवाला, पेपरवाला, वाॅचमन, वर्गणी मागायला शेजार पाजारची पोरं, सौ च्या रिकाम टेकड्या मैत्रीणी यानी सतत बेल वाजवून मला मुळीच निवांतपणा दिला नाही. बाॅसचा फोन वाजल्यावर मात्र नाईलाजानं घ्यावा लागला. “कशाला आजारी पडलास?” आता या प्रश्नाचं काय उत्तर द्यावं? “कोणी मुद्दामून आजारी पडतं काय?” असं न बोलता “काल जरा भिजलो ना.. त्यामुळं” असं काहीतरी बोलून गेलो. “ बंर. पटकन बरा हो आणि लौकर कामावर ये.” या बोलण्याला क्रूर न समजता बाॅसची मर्जी समजून मी स्वत:ला धन्य मानून घेतले. दुपारी कन्या शाळेतून आली. पाठीवरची बॅग आदळतच तिचा प्रश्न आला. “आज बाबा का घरी?” अगं जरा मी आजारी आहे अशी सहानभुती मिळवायचा मी व्यर्थ प्रयत्न केला. तिनं फक्त “सो लकीऽऽऽ” अशी प्रतिक्रीया देऊन सुटका करून घेतली. मी बेडवर उगाचच झोपण्याचा प्रयत्न करीत लोळत राहीलो. दुपारी झोपायची सवय नसल्यामुळे वेळ जाता जाईना. सौ पण तिच्या ढिगभर कामात व्यस्त असल्यामुळे मी उपेक्षित जीव पेपर मधल्या त्याच त्याच बातम्यांची उजळणी करीत पडून राहीलो. एक आदर्श बाप या नात्याने मुलीचा अभ्यास घ्यावा असा विचार माझ्या मनात आला. पण मुलीने कावेबाज पणाने मैत्रीणी बरोबर अभ्यास करणार असल्याचा कार्यक्रम जाहीर करून माझ्या योजनेवर पाणी फिरवले. दुपारचे जेवण, चारचा चहा इत्यादी गोष्टी वेळापत्रका प्रमाणे घडत होत्या. दिवसभर घरात बसून अगदी उबल्यासारखं झालं होतं. संध्याकाळी पाय मोकळे करायला बाहेर पडावे म्हणलं तर सौ ने विरोध केला. उगाच कोणी बघितलं तर! अशा अनामिक भीतीने माझी नजर कैदेतून सुटका होऊ शकली नाही. 

आज संध्याकाळी जोशाची भेट नशीबात होती. जोशा स्वत: माझ्या भेटीला उगवला. त्याच्या हातात संत्र्याची पिशवी होती. पण आम्ही दिलेल्या संत्र्यांच्या संख्येपेक्षा कमी वाटत होती. कदाचित खाऊन शिल्लक राहीलेली परत द्यायला आलाय अशी शंका माझ्या मनात येऊन गेली. ठरल्या प्रमाणे मी बेडवरच बसून राहीलो आणि जोशा तिथंच खुर्ची ओढून बसला. “पडु आजारी, मौज हीच वाटे भारी... मग काय? किती दिवस आराम?” अशी त्यानं सुरवात केली. “नाही रे! आता बरं वाटतंय.” मी प्रांजळ कबुली देऊन टाकली. त्यानं हेका न सोडता बडबड चालूच ठेवली. “मस्त पैकी आठवडाभर आराम कर. बायको कडून सेवा करून घे. जरा स्वत: साठी वेळ दे.” त्याचा पट्टा चालूच होता. “असं अंथरूणावर पडून कंटाळा येतो यार!” माझ्या वाक्या कडे पुर्ण दुर्लक्ष करीत तो बोलतच होता. “हक्काची मेडीकल लिव वाया कशाला घालवायची? टिव्ही बघ, पुस्तकं वाच. जरा स्वत:साठी जगा.” मला होय म्हणण्या शिवाय पर्याय नव्हता. इतक्या वेळात त्यानं चार बिस्कीटं आणि कपभर चहा संपवला. “चल ना. बाहेर एक चक्कर मारून येऊ. घरात बसून कंटाळा आलाय.” असं बोलून मी पटकन उठलो. माझ्या या अचानक पवित्र्यामुळे तो जरा गडबडला. “आलो असतो रे पण जरा कामं आहेत घरी.” असं बोलून त्यानं काढता पाय घेतला.


सर्वांच्या फोनला उत्तरं देऊन आणि आलेल्या लोकाना चहा देऊन बायको पण वैतागली. “आजारपणाची हौस पुरी झाली. आता एकदम छान दिसताय.” असा प्रेमळ संवाद सुध्दा ऐकावा लागला. मला घरामधे बिनकामाचं बसल्यामुळे उगाचच अपराधीपणा वाटू लागला होता. एकतर खरंच मी तसा काही आजारी नव्हतो आणि मी सोडून बाकी सर्व भलतेच बिझी होते. हे आजारपणाचं सोंग माझ्या सारख्याला परवडण्या सारखे नव्हते. हे ओळखून मी दुसऱ्या दिवशी मुकाट्याने ऑफीस गाठायचा निर्णय घेतला.

Tuesday, 18 February 2020

लॉस्ट (अमेरीकन टिव्ही मालिका २००४-१०)

नेटफ्लिक्स च्या मासिक वसूलीला न्याय देण्यासाठी मी बऱ्याचदा माझा अमूल्य वेळ काही मालिकांवर खर्च करीत असतो. अगदी रोजच्या रोज स्क्रिनला चिकटून राहणे शक्य नसले तरी कधीतरी एखादा चित्रपट पाहणे मी पसंत करतो. शक्यतो मी स्वत:हून नवीन काही बघायला जात नाही. पण कोणीतरी आवर्जून शिफारस केली तर बघण्याचा प्रयत्न नक्की करतो.

माणसाला कायमच अचाट आणि अमानवी शक्तीचे कुतूहल वाटते. अमेरीकन लोकानी अशा अनेक कथा सादर केल्या आहेत आणि प्रत्येक कलाकृती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अतिशय सुंदर प्रकारे जीवंत केल्या आहेत. अलिकडेच कोणीतरी सुचवल्यामुळे मी लाॅस्ट नावाची मालिका बघायला सुरू केली. एखादा भाग पाहून सोडून द्यावी अशा विचाराने चालू केली. तब्बल सहा सिझन मधे १२० भागांची ही प्रचंड मालिका माझ्याकडून संपणे शक्य नाही याची मला खात्री होती. या मालिकेचा प्रत्येक भाग ४३ ते ४५ मिनीटाचा आहे. ही मालिका २००४ ते २०१० या कालावधीत अमेरीकन टिव्हीवर प्रसारीत झाली होती. एकापाठोपाठ सर्व सिझन मी कधी संपवले माझे मलाच समजले नाही.

एक विमान अपघात आणि त्यातून वाचलेल्या लोकांचा परतीचा प्रवास अशी सोपी कथा असावी असा काहीसा माझा अंदाज होता. काहीतरी अनपेक्षित असू शकेल असे मला मुळीच वाटले नव्हते. आणि वास्तवीक पहील्या सिझन मधे तसे काही फारसे विचीत्र घडतही नाही. तरीपण पहिल्या एक दोन भागात जशा पध्दतीने कथा उलगडत नेली त्यावरून मला कलाकार आणि दिग्ददर्शकांचे कौतुक वाटले आणि पहिला सिझन कधी संपला कळलेच नाही. हळू हळू कथा अधिकच क्लिष्ट बनत गेली आणि कल्पनाशक्ती पलिकडील अचाट व अशक्य घटनाक्रमांची शृखला डोळ्यासमोर उलगडत गेली. कथानकामधे प्रत्येक पात्र हे स्वतंत्र अस्तित्व राखून आहे. प्रत्येकाचा स्वभाव विशेष आणि त्याचे वर्तन यामागे काहीतरी रहस्य दडलेले अतिशय सुंदर उलगडलेले आहे. प्रेम, राग, मत्सर, वात्सल्य, इर्षा, जिज्ञासा अशा सर्व मानवी भावना अतिशय परिणामकारक साकारल्या आहेत. या सर्व मानवी गोष्टींच्या बरोबरीने अनेक अद् भुत आणि अमानवी गोष्टी कथेत गुंफल्या आहेत. स्मोक माॅन्सटर, टाईम ट्रॅव्हल, धर्मा इनिशेएटिव्ह सायन्स रिसर्च, एजलेस रिचर्ड किंवा आयलंड प्रोटेक्टर जेकब अशा असंख्य अतर्क गोष्टी एका पाठोपाठ येऊन आपल्यावर आदळू लागतात. उत्कंठा आणि रोमहर्षकता वाढवण्यासाठी या सर्व गोष्टींचा वापर सुरेख केला आहे. महत्वाचे म्हणजे कथेच्या कोणत्याही परिस्थितीमधे पात्रांच्या भावना आणि त्यांचे महत्व कमी होऊ दिलेले नाही.


संपुर्ण मालिकेत मला आवडलेले पात्र जाॅन लाॅक. टेरी ओ क्विन कलाकाराने अतिशय सुंदर काम केले आहे. त्याच्या अभिनयाची क्षमता उच्च दर्जाची आहे. एक सामान्य मनुष्य ते शांत पण ध्येयाने पछाडलेला, त्यानंतर टोळीचा नेता आणि एक बेदरकार व्हिलन अशा सर्व स्थित्यंतराला या कलाकराने योग्य न्याय दिला आहे. दुसऱ्या क्रमांकावर मी साॅयर चे नाव घेईन. जोश हाॅलोवे या कलाकाराने साॅयर मधे जान ओतली आहे. मालिकेचा प्रमुख कलाकार जॅक शेफर्ड असला तरी साॅयर एक वेगळाच भाव खाऊन जातो. एक यशस्वी डाॅक्टर पण व्यक्तिगत आयुष्यात हरलेला जॅक. वास्तविक हे पात्र कथेचा महत्वाचा भाग आहे आणि मॅथ्यू फाॅक्स नटाने छान काम केले असले तरी मी याला पहिल्या पाच मधे ठेवणार नाही. मला तिसरे आवडलेले पात्र डेसमंड. स्काॅटिश कलाकार हेंरी ने ही भुमिका सुंदर वठवली आहे. त्यानंतर मी हुगो आणि चार्ली यांच्या कामाचे कौतुक करेन. जाॅर्ज गार्सिया आणि डाॅमनिक मोनागन या दोघानी या भुमिका अतिशय सुंदर वठवल्या आहेत. ड्रग ॲडिक्ट चार्ली आणि आकड्यांधे वेडा झालेला हुगो यांची पात्र रचना अफलातून! कदाचित हुगोच्या आकड्यांते रहस्य उलगडायचे विसरून गेला असे वाटते. केट आणि ज्युलिएट या दोन मध्यवर्ती भुमिका सुंदर रीत्या जीवंत करण्यामधे इव्हांजेलिन लिली आणि एलिझाबेथ यांचे योगदान उत्तम आहे. सईद आणि क्लेअर यांच्या भुमिका लक्षात राहण्यासारख्या आहेत. सईदला नंतरच्या काही भागात इतका खुनशी केला नसता तरी चालले असते. मला न आवडलेली पात्रे म्हणजे मायकल आणि ॲना लुसिया. पुत्रप्रेमात आंधळा झालेला मायकल दाखवताना त्याच्यामधे वेडेपणाची छटा वाटते. ॲना लुसिया उगाचच क्रूर आणि माथेफिरू वाटते. दिसायला सुंदर असली तरी तिच्या अभिनयाची ओळख होण्यापुर्वीच ती मरते आणि मालिकेतून गायब होते. पाॅल आणि नीकी या पात्राना एक-दोन भागात घेतले आणि लगेच का मारून टाकले ते कळले नाही. इको नावाच्या डाॅन उर्फ पार्द्री ला सुध्दा लौकर संपवून टाकले नसते तरी चालले असते. अल्पशी पण सुंदर पात्र रचना दाखवली आहे रोज आणि बर्नाड या नवरा बायकोची. कदाचित त्यांची भुमिका अधिक रूंद केली असती तर बरे झाले असते. कोरीयन दांपत्य सन आणि जीन यांनी सुध्दा छान भुमिका वठवल्या आहेत. बहुतांशी भांगांमधे जीन ला इंग्रजी येत नसल्यामुळे त्याचा अबोला किंवा देहबोली फारशी परिणामकारक वाटत नाही. एक आवर्जून नाव घ्यावे असे पात्र म्हणजे बेन लायनस. मायकल इमरसन या कलाकाराने या पात्राचे सोने केले आहे. त्याची वेगळ्या पध्दतीची संवादफेक, त्याच्यातला न दिसणारा पण क्रूर खलनायक आणि मानलेल्या मुलीच्या प्रेमात हतबल झालेला बाप. पात्राच्या सर्व छटा अतिशय सुंदर वठवण्यामधे या कलाकाराने कुठेही कसर सोडली नाही आहे.

या मालिकेचा पाया बऱ्याच तत्वज्ञानी लोकांवर झाला आहे. बऱ्याच पात्रांची नावे जुन्या नावाजलेल्या विचारवंतांवरून घेतलेली आहेत. बरेचसे संवाद हे कोणातरी तत्वज्ञानाची असावीत असे वाटते. Live together, die alone. किंवा Don’t tell me what I can’t! तसेच Whatever happened is happened. किंवा Everything happens for a reason. अशा प्रकारची वाक्ये कथेच्या अनुषंगाने खुपच परिणामकारक वाटतात. कदाचित ही वाक्ये माझ्या मनात बरेच दिवस रेंगाळतील आणि मालिका सुध्दा लौकर विसरेन असे वाटत नाही. बरेचसे तपशील अनुत्तरीत किंवा न पटणारे वाटत असले तरी या मालिकेला मी निश्चितच एक चांगल्या दर्जाची कलाकृती असे म्हणेन.

जर आपणास उत्कंठापुर्ण अनुभव हवा असेल तर ही मालिका आपण जरूर पहावी.

Friday, 31 January 2020

थरार

लेखाचे नाव काय द्यावे हे सुचत नव्हते. पण काहीतरी भन्नाट नाव दिल्या शिवाय वाचक वर्ग आकर्षित होणार नाही या निखळ भावनेने मी “थरार” नाव दिलेले आहे. तसा हा अनुभव माझ्यासाठी कितीही थरारक असला तरी वाचकाना तो तितका वाटलाच पाहीजे असं काही बंधनकारक नाही. तर असो, माझ्या तोळामासाच्या जीवाला घाबरवून टाकलेला असा एक किरकोळ पण चित्तथरारक प्रसंग इथं मांडण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे. जमलं तर हळहळा अन्यथा हसा.. पण जरूर वाचा.

काही वर्षांपुर्वी मी असाच पोटासाठी इंडोनेशियातून वणवण भटकत होतो. जाकार्ता ते चिलाचाप असा माझा विमान प्रवास होता. त्या ठिकाणी फक्त एकच विमान जाते असं मला सांगण्यात आले. विमानाचे नाव Susi Airline. सकाळी ११ ला सुटण्याची वेळ होती. मी आणि माझा एक सहकारी जाकार्ता आंतरराष्ट्रिय विमानतळावरून त्यांच्या एका छोट्याशा विमानतळावर पोचलो. आमची बॅग घेऊन बोर्डींग पास देणाऱ्या व्यक्तीने बॅगेचे वजन करून झाल्यावर आमचे पण वजन करून नोंद करून घेतले. भीतीयुक्त उत्सुकता अशा विचीत्र भावनेने स्वत:चे वजन डाॅक्टर नसतानाही कोणालातरी सांगावे लागल्याची हळहळ मनाला चटका लावून गेली. कदाचित प्रथमच मला वाढीव वजनाची अगदी मनापासून भीती वाटली असावी.

ठरलेली वेळ निघून गेली तरी विमानाच्या आगमनाची काही चिन्हे दिसेनात. लहानपणी ST Stand वर बसची वाट बघताना इतर नको असलेल्या बसेस आणि त्यासाठी उडालेली झुंबड बरीच पाहली होती. आज तोच अनुभव इंडोनेशियाने विमानांसाठी दिला. गंमत म्हणजे या विमानाच्या प्रतिक्षेत मी आणि माझा एक सहकारी असे दोघेच दिसत होतो. नक्की विमान उडणार का नाही अशी शंका सतत माझ्या मनात घोळत होती. माझा सहकारी देशी तमिळ असल्यामुळे तोही एकंदरीत प्रकाराला नवखा होता. मी उगाचच चाळा म्हणून या विमानाचे झालेले अपघात असं गुगल केलं. बऱ्याच भयानक गोष्टी गुगलने दाखवून मला घाबरवून सोडले. फोन बंद करून देवाचे नाव घेतले आणि मुकाट्याने वाट बघत बसून राहीलो. स्थानिक भाषेचे ज्ञान शुन्य असल्यामुळे तडक जाब विचारण्याची सोय नव्हती. मुकाट्याने वाट बघण्याशिवाय पर्याय नव्हता. अखेरीस आमचे विमान आल्याची वर्दी तिथल्या स्क्रिनवर देण्यात आली. विमान सुटण्याची वेळ आता ३ दाखवण्यात आली होती. 

आम्हाला चालतच विमाना पर्यंत नेण्यात आले. आमच्या बरोबर आमच्या बॅगा घेऊन एक माणूस पोचला. विमान अगदीच लुटूपूटूचे खेळण्यातले वाटत होते. विमानात २ पायलट आणि ३ प्रवासी एवढेच होतो. पायलटनी आम्हाला विमानाच्या मधोमध बसायला सांगितलं, कारण विमानाचा बॅलन्स राहीला पाहीजे. विमानात ताठ उभारता सुध्दा येणार नाही एवढे ते बुटके होते. बसण्यासाठी सीट आणि सुरक्षेसाठी बेल्ट या खेरीज कोणतीच सुविधा दिसत नव्हती. एखाद्या टॅक्सी सारखं विमान धावू लागलं आणि हळूच धावपट्टीचा संपर्क सोडून हवेत वर चढू लागलं. विमान उडालं खरं पण आम्ही मात्र जीव मुठीत घेऊन बसलो होतो. माझ्या समोरच पायलट बसले होते. काही क्षणातच विमान हवेत सरळ दिशेने जावू लागले. रिक्षानं रस्त्यातले खड्डे चुकवावेत तसे पायलट ढग चुकवत विमान हाकू लागला. पायलटच्या समोर हिरव्या रंगाच्या स्क्रिनवर रडारचे स्कॅनिंग फिरत होते. पायलट शांतपणे त्याकडे पहात त्याच्या सहकाऱ्या बरोबर गप्पा विनोद करीत निवांत होता. थोड्या वेळात जोराचा पाऊस आला. आधीच डगमगणारे विमान आता चांगलेच झोके घेऊ लागले. ढगातल्या वीजा खिडकीतून आत येतात काय वाटू लागले. दोघे पायलट मात्र एकदम निवांत! खिडकीतून बाहेर बघावं तर मनात भीती! उगाच माझ्यामुळं विमानाचा तोल गेला असं निमीत्त नको. संपुर्ण प्रवास हा घनदाट जंगलावरून होता. त्या जंगलातले ओरांग उटान प्रसिध्द आहेत असं कुठंतरी ऐकलं होतं. आता वाटलं की ओरांग उटान बरोबर ती रात्र काढावी लागते वाटतं. विमानाचं नाव सुसी का ठेवलं असावे असा विचार मनात येऊन गेला. कारण शू किंवा शी ची सोय विमानत नव्हती. मुख्य म्हणजे कितीही घाबरलं तरी शू लागण्याची परवानगी नव्हती. राम राम करीत बसून राहीलो. डोळे मिटण्याची पण भीती वाटत होती. पायलट नक्की नीट चालवतोय की नाही याकडं लक्ष लागलं होतं. मी गियर टाकायला मदत करू का असं विचारावंस सारखं वाटत होतं. साधारण दिड तासाच्या प्रवासात लाख वेळा जप झाला असेल. अखेरीस त्या पायलटनी चिलाचॅप च्या विमानतळावर विमान उतरवलं. उतरल्या उतरल्या त्यानं गर्रकन वळवून रिक्षा स्टॅंडला लावतात तसं विमान कडेला उभं केलं. विमानतळ आपल्या गावा कडच्या स्टॅंड च्या आकाराचं पण नव्हतं. सहीसलामत उतरल्यावर रामाचे शतश: आभार मानले.

परत येताना मात्र आम्ही टॅक्सी करून आलो. तब्बल १० तासाचा प्रवास केला पण त्या विमानात पाय ठेवणार नाही म्हणून सांगितलं.

Sunday, 10 November 2019

फक्त पंच्चाहत्तर ...

बाबांच्या पंच्चाहत्तरी च्या निमीत्ताने मला विनंती वजा आदेश करण्यात आला की मी बाबांच्यावर काहीतरी लिहावं. कदाचित माझ्या वैवाहीक जीवनातला हा अनेक कठीण प्रसंगांपैकी एक! आजतागायत बरेच प्रसंग कसेबसे निभावले पण आता यातून सुटका होणे शक्य नाही. नक्की काय लिहावं आणि कसं मांडावं. दस्तुरखुद्द सौ चेच पिताश्री असल्याने फारच कडक परीक्षण होणार यात शंका नव्हती. असो. तरीपण मी धाडस करून चार ओळी खरडण्याचे आव्हान स्विकारले. पर्यायच नव्हता.

तसे बाबा हे जरी अख्या कोल्हापूरचे “देवळे सर” असले तरी माझा आणि त्यांचा परिचय हा सासरे-जावई असाच! आमचे लग्न ठरल्या नंतर माझे त्यांच्या घरी येणे जाणे वाढले आणि हळू हळू त्यांचा स्वभाव समजत गेला. बाबा स्वभावाने अतिशय  साधे आणि बिनधास्त! त्यांच्याशी बोलताना कधीही संकोच वाटत नाही. मला खात्री आहे, त्यांचे विद्यार्थी सुध्दा त्यांच्याशी असेच अगदी मित्राप्रमाणे बोलत असणार. बाबांचे क्रिकेट आणि राजकारण हे भलतेच आवडीचे विषय! त्यांच्या इतर नातलगां बरोबरच्या क्रिकेट विषयावरील गप्पा या मॅच पाहण्यापेक्षा अधिक रंगतदार असतात. या माणसाला आयुष्यात कधी राजकारण करता आले नसले तरी राज्य पातळी वरील असो किंवा राष्ट्र पातळीवरील असो, याना राजकारणातील इत्यंभूत ज्ञान! कोण काय बोलला, कोणाची काय राजनीती, कोण चाणक्य आणि कोणाची काय प्रतिमा अशा सर्व महत्वपूर्ण माहीतीचा महासागर म्हणजे बाबा! निवडणूका असोत अथवा कोणतीही सनसनाटी घडामोड असो, बाजारात छापून येणाऱ्या सर्व वर्तमानपत्रांची घरी हजेरी लागते. मुख्य म्हणजे सर्व वर्तमानपत्रांतल्या बातम्या वाचल्या शिवाय त्यांची गणती रद्दी मधे होत नाही.

आमच्या लग्नाला तब्बल १९ वर्षे झाली आणि माझ्या पाहण्यात बाबा रिटायरच झालेले आहेत. तरीपण या माणसामधे कमालीचा उत्साह ठासून भरलेला आहे. शाळेतून निवृत्ती घेतली तरी त्यानी त्यांची कामं कधी थांबवली नाहीत. कधी क्लासेस घेणे तर कधी पुस्तके लिहणे, कधी पेपर सेट करणे तर कधी पेपर तपासणे. सतत कार्यमग्न. तीन्ही मुलींची लग्नं झाल्यावर मुलीनी त्याना सर्व बंद करण्यासाठी बरेच समजावले, पण त्याना स्वस्थ बसणे मान्य नव्हते. कार्यमग्न असण्याचा एक फायदा असतो, माणूस आनंदी राहू शकतो. बाबांचा एक मोठा गैरसमज आहे.. तो म्हणजे ते स्वत:ला अजूनही तरूणच समजतात. कोल्हापूरच्या आसपासच्या परीसरात बरेच दिवस ते इवल्याशा स्कुटीवरून मस्त फिरत असायचे. कदाचित त्यांची स्कुटी च म्हातारी झाल्यामुळे त्यांचा हा प्रवास कमी झाला असावा. त्यांच्यामधे अजून एक सळसळणारी तरूणाई म्हणजे आमच्या बॅगा उचलणे. जर कधी आम्ही एकत्र प्रवास करीत असू तर माझ्या आधी बॅगा उचलून पुढं चालू लागतात. आता मी हमालाचा सौदा पटवू का बाबाना सांभाळू अशा बाक्या प्रसंगाला मी हजारदा सामोरा गेलोय. गडबडीनं हातातली कामं टाकून त्याच्या हातातली बॅग काढून घेण्याची झटापट करावी लागते. बाबांच्या बरोबर जर कधी रिक्षाने प्रवास करायचा प्रसंग आलाच तर भाड्याचे पैसे देण्यासाठी त्यांची भलती गडबड! त्या रिक्षावाल्याला जादा भाड्या बद्दल विचारू का बाबांना पैसे देण्या पासून थोपवू असा यक्ष प्रश्न मला आजही पडतो.

समस्त कोल्हापूर कराना मिसळ आवडणे हा नियम असला तरी शहरातील विवीध मिसळी सविस्तर वर्णन करून दुसऱ्याना खायला घालणे हा सच्च्या कोल्हापूरकराचा एक छंदच असतो. आई आणि बाबा या गोष्टीला मुळीच अपवाद नाहीत. वास्तविक मी कोल्हापूरातच शिकलो असलो तरी नोकरी निमीत्ताने बाहेर असतो. तरीपण ज्यावेळी कधी मी सासुरवाडीला भेट देतो त्यावेळी किमान एकदा तरी खासबाग मिसळ वाल्याला माझ्या नावाने दक्षिणा दिल्याशिवाय त्याना चैन पडत नाही. बाबाना अख्खं कोल्हापूर ओळखत असल्यामुळे पावलो पावली “नमस्कार सर” म्हणणारे लोक भेटतात. प्रत्येकाला “आमचे जावई” अशी ओळख एखाद्या युध्दवीराच्या थाटात करून देतात. त्यांच्या कन्ये बरोबर संसार करणे हे काही युध्दवीरापेक्षा कमी नाही याची जाणिव त्यानी ठेवली असावी. बाबांचा अजून एक जाज्वल्य अभिमान म्हणजे परदेशात गेलेले जावई. आम्ही सिंगापूरला राहू लागल्यावर बाबाना अतिशय आनंद झाला. माझ्या ओळख परेड मधे सिंगापूरचे जावई असा तुरा खोचला गेला. बाबांच्या असलेल्या प्रचंड ओळखीचा फायदा सुध्दा आम्ही पुरेपूर करून घेत असतो. RTO असो वा income tax चे, जन्म दाखला असो वा आणि काही, बाबांच्या ओळखीने कामे पटापट होतात.

आई बाबा यांच्या काही गोष्टींमधे कमालीची एकवाक्यता असते. इतर किरकोळ वाद वगळता त्यांच्या बऱ्याचशा आवडी निवडी अफलातून जुळतात. चित्रपट नाटकां पासून ते छोट्या मोठ्या प्रवासाच्या आवडी पर्यंत अनेक बाबतीत त्यांचे एकमत असते. दोघांच्या कितीही तब्येतीच्या तक्रारी चालू असल्या तरी त्यांचे साहसी प्रवास थांबत नाहीत. अचानक कधीतरी आईंचा डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेला वारीतला फोटो पाहीला की स्वप्ना घाबरून जाते. बऱ्याचदा एखाद्या चित्रपटाला आम्ही जावे का जाऊ नये अशी चर्चा चालू असतानाच आईंकडून चित्रपटाचे रेटींग ऐकायला मिळते. आई बाबानी तो चित्रपट कधीच पाहिलेला असतो. बाबांच्या कुतूहलाचा अजून एक विषय म्हणजे जावयाचा पगार. मला थेट कधीही विचारले नाही तरी मुलीला दरवर्षी हा प्रश्न विचारला जातो. आम्ही सुखात आहोत, आमची मुळीच काळजी करू नका असे जरी सुकन्येने निक्षून सांगितले तरी त्याना चैन पडत नाही. कोणत्याही बापाला मुलीचा संसार सुखाचा चालू आहे यापेक्षा अजून काय हवं असतं!

बाबांची पंच्चाहत्तरी करायची म्हणजे बाबा म्हातारे झालेत असे मुळीच नाही. आजही ते कॅरम खेळताना नातवंडांच्या वयाचे होऊन भांडतात. पत्ते खेळताना त्यांच्यात चैतन्य संचारलेले असते. क्रिकेटची मॅच पाहताना तल्लीन होऊन जातात. आम्ही पंच्चाहत्तरी साजरी करू अथवा उद्या शंभरी करू.. त्यांच्यातला तरूण हा चिरतरूणच राहणार.

Monday, 25 March 2019

अर्थाचा अनर्थ

प्रत्येक जीव जंतू आणि प्राण्यांकडून काहीतरी शिकावं अशी आपली संस्कृती सांगते. ही गुंतवणूकीची कला आपण कोणत्या प्राण्या पासून घेतली काय माहीत! कदाचित ते श्रेय मुंग्याना आणि मधमाशाना जात असावे. पोर कमवायला लागलं की वडीलांचा पहीला सल्ला असतो कीचार पैसे गाठीला ठेव रे! सगळे उधळून टाकू नको.” हे गाठीला ठेवलेले पैसे परत नक्की कधी गाठ पडणार अशा माझ्या प्रश्नावर पिताश्रीनी मला बरंच अनाकलनीय लांबलचक उत्तर दिले होते. उत्तराची एकंदरीत लांबी रूंदी पाहता आणि खोली समजता मी सगळं मान्य करून टाकलं होतं.

तर मुद्दा इतकीच की माणसानं कमावायला लागल्यावर कुठं ना कुठं आर्थिक गुंतवणूक करीत राहीलं पाहीजे. असं केल्याने त्याला भविष्यकाळ सुखाचा वाटू लागतो. वर्तमानकाळात कळ सोसून भविष्याची गोड स्वप्ने पहाणे असा माणसाचा स्वभावच आहे. मी पण त्यातलाच एक. सरकारी नोकरीत पेन्शन नामक भविष्याची हमी दिली जाते. पण माझ्या खाजगी नोकरीतल्या माणसाचे अशा प्रकारचे फाजील लाड पुरवले जात नाहीत. जे काही कमवायचे ते नोकरीत असे पर्यंतच! सुमारे वीस बावीस वर्षांपुर्वी नुकताच नोकरीत चिकटलो असताना हातात थोडाफार पैसा खेळू लागला. महिना अखेरीस शिलकीत पडणारा इवलासा ऐवज मला भलताच खुश करीत होता. तब्बल पाच हजाराचा ऐवज माझ्या खात्यात पाहून मला जग विकत घेण्याची कुवत मिळवल्याचा आनंद झाला. पिताश्रींच्या सल्ल्याकडे सोयिस्कर दुर्लक्ष करून मी एक रंगीत टिव्ही खरेदी केला. त्याच्या पुढील हप्त्यांमधे आगामी महिन्यांची शिल्लक सुध्दा गमावून बसलो होतो. 

बॅंका मधील सुस्मित करीत स्वागत करणारा कर्मचारी वर्ग हा  सर्वात घातक असतो. सुरवातीस गोड बोलून स्मित हास्य देत भुरळ पाडतात आणि नंतर दरमहा हप्त्याची माळ गळ्यात मारतात. नंतर तीच गुंतवणूक गळ्याशी आली की तेच सुहास्य चेहरे सापडत नाहीत. फारच खटाटोप करून जाब विचारलाच तर “थोडासा धीर धरा. मार्केट थोडं डाऊन आहे. आखाती प्रश्न सुटला की अमेरीकेत पुन्हा तेजी येईल आणि तुमची गुंतवणूक नक्की फायदा देईल.” आणि उगाचच आपल्या गुंतवणूकीला आंतरराष्ट्रीय महत्व प्राप्त झाल्याच्या कल्पनेने सुखावून गप्प बसवले जाते. काही गुंतवणूका कधी कधी फायदा सुध्दा करून देणाऱ्या असतात. पण कदाचित त्यासाठी पुर्व पुण्याई किंवा त्या वेळची ग्रहांची स्थिती आणि थोरा मोठ्यांचे आशिर्वाद असावे लागतात. पुर्वी कधीतरी कोणी मला सोन्यात पैसे गुंतवण्याचा सल्ला दिला. मी पण जमेल तसे थोडे थोडे सोने खरेदी करून बॅंकेच्या लाॅकर मधे धुळ खायला ठेवू लागलो. दहा हजार तोळा किमती पासून तीस हजार तोळा असा प्रवास पाहून मन सुखावून गेले. पण गेल्या बऱ्याच महिन्यात तोच दर तीस हजारात अडकून पडलेला पाहून सोन्यावरचा विश्वासच उडाला आहे. आता “आम्हा साधू संता सुवर्ण मृत्तीके समान” या न्यायाने मी सोनेच नाही तर घरात एखादे स्टीलचे भांडे पण खरेदी करण्याच्या विरोधात आहे.

स्थावर मालमत्ता या मधील गुंतवणूक खुपच फायद्याची ठरते असे बऱ्याच तज्ञांचे मत आहे... माझी पुर्ण सहमती नाही. माझे स्पष्ट मत आहे की त्यात उगाचच मानसिक त्रास होतो. प्लाॅट घेतला तर त्याच्या सीमा अबाधित ठेवण्या कडे लक्ष द्यावे लागते. पण विकताना निश्चित नफा होतो. जर फ्लॅट घेतला तर तो रिकामा ठेऊन चालत नाही. त्या साठी भाडे करू पहावा लागतो. लांब बसून पटकन भाडेकरू मिळत नाही. रिकामे राहीलेले घर तिथे न राहताच खायला उठते. एकदा का भाडेकरू मिळाला की तो वेळच्या वेळेले घरभाडे देतो का, घर नीट ठेवतो का, त्याच्या कार्ट्याची चित्रकला भींतीवर चितारल्या तर जात नाहीत ना, शेजार पाजार कोणी तक्रार तरी करीत नाहीत ना... एक ना हजार प्रश्न. आणि त्याहून मोठा प्रश्न म्हणजे विकण्याचा. पटकन चांगली किंमत मिळेल याची खात्री नसते. चोखंदळ गिऱ्हाईक घराची किंमत झोपडीच्या भावाने करून मागतात. पंधरा वीस वर्षापुर्वी किंमती पटापट वाढत होत्या, आता ते ही थंड झाले आहे. लोक काळा पांढऱ्या च्या प्रश्नात अडकून पटकन खरेदी साठी तयारच होत नाहीत. मी या मालमत्ते मधे का गुंतवणूक केली असा प्रश्न पडू शकतो. तरीपण माझे मत असे की जर कर्ज काढून घर घेणार असाल तर मुळीच घेऊ नका. त्यातल्या त्यात स्वत:च्या रहाण्यासाठी कर्ज काढले तर एकवेळ चालू शकेल. पण गुंतवणूकी साठी मुळीच तसल्या फंदात पडू नका. नीट विचार करून चांगल्या ठिकाळी केलेली गुंतवणूक नक्की फायदा देऊ शकते. त्या साठी तुमच्या अटकळी बरोबर यायला हव्यात आणि तात्काळ पैसा मिळणार नाही याची तयारी ठेवायला हवी.

लोन, क्रेडीट कार्ड, गुंतवणूक यांची गळ घालणारे फोन मला कायम येत असतात. कधी मला पैशाची नितांत गरज आहे किंवा माझ्या चंगळखोर स्वभावाला पुरक क्रेडीट कार्डाची गरज आहे अथवा माझ्या अकौंटवर बराच पैसा वाह्यात लोळत पडलाय असा काहीतरी गैरसमज मनाशी धरून हे फोनवाले बोलू लागतात. नेमका मी जर काही महत्वाच्या कामात असेन तर असे फोन हमखास येतात. तर एकदा मला असाच फोन आला. मी थोडासा रिकामा होतो म्हणा किंवा तो आवाज मंजूळ होता म्हणा; मी नेहमी प्रमाणे धुडकावून न लावता बोलायला सुरू केले. पलिकडून गोड शब्दात मला देऊ घातलेल्या सुवर्णसंधीची कुंडली ऐकवण्यात आली. मला पण आता थोडी उत्सुकता वाटली आणि प्रत्यक्ष भेटीची तारीख वेळ ठरली. मी आॅफीस मधून थेट सांगितलेल्या पत्त्यावर हजर झालो. छानशा सजवलेल्या आॅफीस मधे मी जाऊन धडकलो. मला रिसेप्शनीस्ट ने स्मित स्वागत करीत प्रतिक्षा करायला सांगितले आणि माझ्या समोर काॅफीचा कप सरकवण्यात आला. ठरलेल्या वेळे नुसार तो मंजूळ आवाज प्रत्यक्ष प्रकट झाला. साधारण तिशीतील सुंदरी माझ्या समोर येऊन बसली. अपेक्षे पेक्षा अधिक सुंदर रूपडं नसलं तरी फेरी अगदीच फुकट गेल्याचं दु:ख नक्की नव्हतं. त्या पुढील तब्बल तासभर ती सुंदरी माझ्या आर्थिक परिस्थितीची गंभीर अवस्था समजावून सांगत होती. चांगली धडधाकट नोकरी चालू असून सुध्दा तिच्या वर्णना वरून अचानक मी खुप मोठ्या आर्थिक संकटाच्या दाराशी घुटमळतोय असा भास होऊ लागला. मी अखेरीस शरण जाऊन त्या महिलेला यातून मार्ग दाखव असे साकडे घातले. तिने त्यावर मिश्किल हसत निव्वळ माझ्यासाठीच बनवण्यात आलेला गुंतवणूकीचा प्रस्ताव माझ्या समोर सादर केला. या भवसागरातून तुच माझी नौका पार पाडणार अशा भावनेने मी ताबडतोब ती सांगेल तिथे सह्या करून टाकल्या. त्या नंतर गेली कित्येक वर्षे मी इमाने इतबारे हप्ते भरतोय आणि माझा गुंतलेला पैसा बाहेर कधी पडेल याची वाट बघतोय. दरम्यान च्या काळात जागतिक मंदीमुळे माझे शंभराचे सत्तर झालेले पाहून उर भरून आले. त्या सुंदरीला फोन करण्याचा किंवा प्रत्यक्ष जाऊन भेटण्याचा प्रयत्न विफल ठरला. चुकून फोनवर सापडलीच तर “अहो थोडा धीर धरा” अशा पोकळ समजूतीने माझे समाधान करण्याचा प्रयत्न तीने केला. आता किमान गुंतवणूकीची रक्कम जरी पदरी पडली तरी ते मी माझे भाग्य समजेन.

मी गुंतवणूकीतून घवघवीत फायदा मिळवलेल्या लोकांच्या बऱ्याच कथा ऐकल्यात. एक तर ते लोक तद्दन खोटारडे असावेत किंवा त्यांच्या कडे भविष्य पहाण्याची काहीतरी युक्ती असावी. माझ्या नशिबात असा घवघवीत फायदा देणारा योग लिहलेलाच नाही. माझ्या एका मित्राने तर हातातली चांगली नोकरी सोडून शेअर मार्केट मधे पुर्ण वेळ लक्ष केंद्रीत केले. सकाळी नऊ वाजल्या पासून तीन वाजे पर्यंत सतत फोन वर कोणाशी तरी बोलत असतो असतो आणि “इसमे पचास हजार लगावो, उसको आज निकल दो” असल्या गौडबंगाल भाषेत बरळत असतो. मित्राच्या काळजी पोटी एक दिवस त्याला मी गंभीरपणे प्रश्न विचारला. तुझं कसं चाललंय मित्रा? बरं चाललंय ना? काही मदत हवी असेल तर नि:संकोच पणे सांग. यावर तो हसून म्हणाला, अरे बरं कसलं! मस्तच चाललंय. महिन्याला लाख दोन लाख सहज सुटतात. मी तर त्याच्या बोलण्यावर उडालोच. या सट्टे बाजारातून इतका पैसा मिळू शकतो? माझा तर विश्वासच बसेना. एक दिवस मी पण धाडस करून डिमॅट अकौंट चालू केले. बैंकेच्या मदतीने पैसे कसे गुंतवावेत आणि कसे परत काढावेत याचे प्रशिक्षण घेतले. गुंतवणूकीवरच्या लेखांचे अध्ययन सुरू केले. बऱ्याच तज्ञ लोकांचे अगम्य शब्दातले लेखन वाचण्याचा प्रयत्न करू लागलो. आणि कोणाच्या तरी सल्यावरून काही चांगल्या कंपन्यांमधे पैसे गुंतवायला सुरू केले. महिन्याभरात त्यातील बऱ्याचशा कंपन्या तेजीत वर चढू लागलेल्या पाहून खजिन्याची किल्ली सापडल्याचा आनंद होऊ लागला. मार्केट अजून वर जाणार असे अंदाज वाचून मनाला अधिकच उभारी येऊ लागली. काही संथ गतीने चढणारे स्टाॅक मी विकून किरकोळ फायदा वसूल करून घेतला. बाकीच्या चढ्या कंपन्या मला रोज दिलासा देत होत्या. नियतीला माझा हा आनंद फार दिवस बघवला नाही. एक दिवस अचानक मार्केट घसरले. मला पत्त्याचा बंगला कोसळावा तसा भास झाला. तज्ञानी “घाबरू नका, हे फक्त करेक्शन आहे” असा दिलासा दिला तरी त्या नंतर मी गुंतवलेल्या कंपन्या घसरतच गेल्या. माझ्या गुंतवणूकीच्या निम्या किमतीला येऊन त्या स्थिरावल्या. दोन चार लाखाचा सहज चुराडा झालेला पाहून हे जग मिथ्या आहे याची प्रचिती आली. नाही म्हणायला काही कंपन्यानी मला चांगला हातभार दिला होता, पण एकंदरीत गोळाबेरीज करता दोन वर्षात दोन तीन टक्के कमावले होते. या पेक्षा एफडी मधे गुंतवले असते तर सात-आठ टक्के नक्की कमावले असते या विचाराने नंतर वाईट वाटून घेत शेअर मार्केट मधील गुंतवणूक बंद करून टाकली.

कितीही पैसा मिळवला तरी माणसाची सुखाची व्याख्या रात्रीच्या शांत झोपेतच संपते. उगाच कटकटी, चिंता, काळजी जर पोखरत असतील तर सगळा पैसा काय कामाचा? माझ्या एफडी च्या निर्णयावर सौ ने शिक्का मोर्तब केल्याने मी अधिक उत्साहाने आणि विश्वासाने एफडी, पोस्टाच्या अल्पबचत योजना, पीपीएफ आदी खात्यांमधे डोळे झाकून पैसे गुंतवू लागलो. एक दिवस माझ्या मित्रा बरोबर असताना त्याच्या ओळखीच्या एका तज्ञाची माझी ओळख झाली. त्याने मित्राचा परीचय गेल्या पाच सहा वर्षाचा असून तब्बल बारा ते पंधरा टक्के वार्षिक परतावा दिल्याची गोष्ट माझ्या कानावर आली. मी पण माझे कान टवकारले आणि त्यांच्या चर्चेत लक्ष देऊ लागलो. म्युचल फंड मधे दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवत राहीले तर काही वर्षात आपण चांगला नफा मिळवू शकतो. मार्केट कोसळले तर अधिक युनीटस मिळतात आणि मार्केट चढले तर अधिक फायदा मिळवता येतो. पण यामधे घाई करून चालत नाही. शांतपणे वाट पहाणे आणि महिन्याच्या महिन्याला गुंतवत राहणे गरजेचे असते. अशा अनेक मोलिक सल्यात मी बुडून गेलो. त्या तज्ञाने माझा रस पाहून माझी विचारपूस सुरू केली. मी केलेल्या गुंतवणूकीचा त्याने आढावा घेतला. जर तोच पैसा मी म्युचल फंड मधे गुंतवला असता तर आत्ता पर्यंत मी कैक लाख बँकेत पडलेले पाहून सुखानं झोपू शकलो असतो. असा काहीसा टोमणा मारून त्याने मला उगाचच खजिल केले. मी ताबडतोब महिना दहा हजाराची एसआयपी चालू करून त्या तज्ञाच्या प्रयत्नाना यश आणि मला मन:शांती दिली. त्यानंतर बरीच वर्षे दहा हजाराचे हप्ते भरीत राहीलो, अजूनही भरतोच आहे. पंधरा टक्क्या पर्यंत पोचलेला परतावा घसरून आता पाच टक्क्या पर्यंत आलेला आहे. पण मी माझा विश्वास ढळू दिलेला नाही. तज्ञाच्या सांगण्यावर माझा अजूनही विश्वास आहे. निवृत्ती पुर्वी नक्की बारा टक्क्याने मी नफा मिळवेन याची आजही मला खात्री वाटते.

एका गोष्टीचे मात्र मला कायमच आश्चर्यच वाटते. चंगळखोर अमेरीकन देशवासीय जगात आर्थिक साम्राज्य गाजवतात पण संचयी वृत्तीचा देश जपान सतत आर्थिक संकटात गर्तेत अडकलेला दिसतो. इतके असूनही आपल्या वर पिढ्यान पिढ्या संचयी वृत्तीचेच संस्कार केले जातात.