Sunday, 6 April 2025

टायगर जिंदा है।

लेखाचा विषय आपल्या लक्षात आलाच असेल. अर्थातच आपला राष्ट्रीय प्राणी “वाघ”. आता या महान प्राण्यावर मी पामर काय लिहणार? तरीपण हा एक क्षुद्र प्रयत्न!


शतकानुशतके अबालवृद्धांना नेहमीच कुतूहल, भीती आणि आकर्षण वाटणारा एक सर्वसामान्य हिंस्त्र प्राणी. शक्यतो कोणाच्या वाटेला न जाणारा आणि निव्वळ पोटासाठी हत्याकरून गुजराण करणारा हा इवलासा जीव! कथा कादंबऱ्यात आणि सर्व चित्रपटात बिच्चाऱ्याची प्रतिमा उगाचच मलिन करून ठेवली आहे. आपण भलं, अन आपलं भक्ष्यं भलं! अशा साध्या सरळ शांत विचाराचा… असो! तर या अशा प्राण्याला मी फक्त चित्रपटात आणि पिंजऱ्यातच पाहीला होता. प्रत्यक्षात कधीतरी मुक्त संचार करताना पहायला मिळावे असे मला नेहमीच वाटे.


सुमारे पंधरा वर्षापुर्वी मला एका जंगलाला भेट देण्याचा योग आला. माझे आई बाबा, बायको आणि माझ्या दोन कन्या असा आमचा ताफा रणथंबोर ला भेट देण्यासाठी सज्ज झाला. आमच्या मुली तशा छोट्या होत्या. त्याना फारसं काही समजत नसलं तरी वाघोबाऽऽऽ असं काही तरी बोलून आम्ही त्यांच्या मनात भीती व कुतूहल निर्माण करण्यात आम्ही यशस्वी झालो होतो.


रणथंबोर जंगलच्या कर्मचारी वर्गाला श्रीमंत करण्याच्या उदात्त उद्देशाने आम्ही उपलब्ध असलेल्या सर्व सेवा आणि सुविधा विकत घेतल्या होत्या. मी आणि बाबानी तर हंटर कॅप घालून तेथील कर्मचाऱ्यांचा आणि वाघांचा उत्साह द्विगुणीत केला होता. मुलीना सर्वांकडून सतत सुचना चालूच होत्या. जंगलात मोठ्याने बोलायचे नाही, वाघाला हाय-हॅलो करायचे नाही, त्याच्या नजरेत रोखून पहायचे नाही… अनेक शास्त्रीय/ अशास्त्रीय सुचनांचा भडीमार केला गेला.



अखेरीस आम्ही आणि आमच्यासारखे अजून काही उत्साही प्रवासी एका मोठ्या कॅंटर उर्फ बिनछताच्या मिनीबसमधून जंगलात प्रवेश केला. सुमारे तीन तास आमच्या वाहनाने जंगलातील बरेच उंच सखल, रूंद अरूंद, खडकाळ सपाट, उन्हात, सावलीत अशी आमची रपेट घडवून आणली. जंगलातील झाडं, वेली, माकडं, बरीच हरणं आणि काही रंगबिरंगी पक्षी यांना निरखून आम्ही समाधान मानले. गरीब बिच्चारा वाघ मात्र कुठेतरी लपून बसला होता. मुकं जनावर, घाबरलं असेल! अशी आईनं सर्वांची समजूत घातली. आम्ही मात्र ऊन्हानं काळवंडलेले आणि धुळीने माखलेले चेहरे घेऊन मॅच हरलेल्या टिम प्रमाणे परत फिरलो. त्याचवेळी मी एक निर्णय घेतला, परत वाघासाठी जंगलाच्या दिशेने पाऊल टाकायचे नाही.


त्या नंतर बरीच वर्षे खुणावणाऱ्या वाघाला मुळीच भाव दिला नाही. नाही म्हणजे नाही! कशाला उगाच गरीब प्राण्याला कोड्यात पाडायचे? कशाला त्याची मानसिक कुचंबणा करायची? वाघांचे अनेक चित्रपट आले, ते दाखवून मी माझ्या मुलीना मोठे केले. प्राणी संग्रहालयात वाघाची ओळख शाबूत ठेवली.


बऱ्याच वर्षानंतर आमचा काझीरंगा जंगलात जाण्याचा प्रसंग आला. छोट्याशा जिपमधे बसून आम्ही चौघे जंगलात घुसलो. हे जंगल गेंड्यासाठी प्रसिद्ध आहे. आम्हाला आश्चर्याचा सुखद धक्काच बसला. अहो! पावलो पावली, गेंडे फिरत होते. अक्षरशः दहा मीटर वर गेंडे मस्तपैकी चरत फिरत होते. आम्ही त्यांना बघतोय, त्यांचे फोटो काढतोय, त्यांच्या जाडी आणि वजनावर त्यांची चेष्टा करतोय.. त्याना काहीच फरक पडत नव्हता. स्वतःच्याच धुंदीत निवांत फिरत होते. गेंड्यांना बरोबरी म्हणून का काय, पण जंगली हत्ती, विविध हरणे, माकडे पण मुक्तसंचार करीत होते. जणूकाही आमच्या येण्याने त्यांचे जीवन आनंदीत झाले होते. एकंदरीत या अनुभवा नंतर मी जंगलावरील गैरसमज दूर करण्याचे ठरवले. कसेही असले तरी ते सुध्दा हाडामासाचे प्राणीच आहेत! त्यांना सुध्दा कोणीतरी आपल्याला भेटायला यावे, आपले फोटो काढावेत, इंस्टावर टाकावेत.. असे नक्की वाटत असणार. बिचारे बोलत नसले म्हणून काय झाले! भावना तर नक्की असणार ना!



काझीरंगाच्या ताज्या अनुभवावरून उत्क्रांती वादाच्या सिद्धांतांवर विश्वास बसला. गेल्या पंधरा वर्षात प्राणी आता खुपच सुधारले असणार अशी खूणगाठ मनाशी बांधली. आणि नव्या उत्साहात मी अजून एक जंगल सफारी करायचे ठरवले. आता वाघ स्वतःहून पुढे येऊन गुड आफ्टरनून म्हणेल अशी एक शक्यता मनात घोळून गेली. तर यावेळेस आता आम्ही जिम कॉरबेट ला जायचे ठरवले. मी, सौ आणि आमच्या दोन्ही कन्या असा आमचा बेत ठरला.


आमची पुन्हा एकदा उत्सुकता शिगेला पोचली. वाघाच्या ओढीने आम्ही लांबचा प्रवास न थकता करून जिम कॉरबेटला पोचलो. जिप्सी आणि कॅंटर अशा दोन्ही वाहनाच्या पर्यायाचे बुकींग करायचे ठरवले. वाघाला दोन वेळा भेटून ऋणानुबंध दृढ करावे असे ठरवले. हॉटेल वर पोचल्यावर आम्हाला सांगण्यात आले की कॅंटर चे बुकींग फुल्ल आहे. पण जिप्सी चे बुकींग होऊ शकते.


आम्ही ताबडतोब दुपारच्या जिप्सीचे बुकींग केले. टायगर को दोबारा देखने केलिये कल सुबह को हम फिर से जायेंगे। अशी आगाऊ सुचना जिप्सी वाल्याला देऊन ठेवली. वाघाच्या ओढीने आमचा थकवा पळून गेला होता. जंगलच्या प्रवेशद्वाराजवळ आमच्यासारख्या पंचवीस जिप्सी उभ्या होत्या. आमच्या सारखेच वाघाच्या ओढीने व्याकुळलेली जनता जिप्सी च्या रांगेत वाट पहात होती. इतक्यात एका इसमाने आमच्या जवळ येऊन त्याच्याकडील दुर्बिण आम्हाला दिली वजा लादली. दूरसे आप टायगर को देख सकते हो। ले लो। आमच्या ड्रायव्हरने पण आग्रह केला त्यामुळे नाही म्हणण्याची काही मुभाच नव्हती. वापस आने के बाद चारसो रूपये देना। असं सांगून तो पसार झाला. सुमारे तीन तास हे दोन किलोचे ओझे गळ्यात वागवण्याचे त्याला चारशे रूपये द्यावे लागणार होते.


आमचा नंबर आल्यावर एक जंगलचा कर्मचारी आमच्या गाडीत येऊन बसला. आपको टायगर दिखेगा और मै पुरे जंगलके बारेमें सब इन्फरमेशन दुंगा। असे म्हणत त्याने त्याचे हजार रूपये वसूल केले. जंगलच्या कायद्यात त्याची सेवा नाकारण्याची परवानगी नव्हती. जंगलात प्रवेश केल्यावर त्याने माहीती द्यायला सुरू केली. कोणी मोठ्यानं बोलू नका, गाडीतून उतरू नका.. अशा सुचनाच जास्त होत्या. बाकी या जंगलात दोनशेहून अधिक वाघ आहेत या माहीतीने मला हायसे वाटले. आता कदाचित झुंडच दिसणार अशी आम्ही मनाची तयारी केली. आमचा ड्रायव्हर वाघ मागं लागल्या प्रमाणे तुफान वेगाने गाडी पळवू लागला. बहोत अंदर जाना पडेगा। बाघ अंदर रहता है। त्याच्या बोलण्यातून एक प्रकारचा विश्वास दिसत होता. किमान अर्धा तास प्रवास केला तरी तुरळक हरणं वगळता कोणताच खास प्राणी नजरेस पडला नाही. अरे भैया, ये वाघ किधर लपून बैठा है? असा सौ ने विचारलेल्या प्रश्नावर गाईडला थोडासा राग आला. मैडम को बाघ तुरन्त दिखना चाहीये। अरे ये तो अपने मर्जी के मालिक होते है। आपको उसे देखना है तो मेहनत करनी पडेगी। असे काहीसे तत्वज्ञान देऊन त्याने आम्हाला गप्प केले.


आता जवळ जवळ आम्ही दिडतास फिरत होतो. गाडी कधी दगडातून तर कधी नदीच्या कोरड्या पात्रातून, कधी उंचवट्यावरून तर कधी खड्यातून तशाच वेगाने धावत होती. काही माकडं, बरीच हरणं या व्यतिरिक्त काहीही दृष्टीस पडले नव्हते. खरंतर बराच प्रवास करून आलो होतो आणि नीटशी झोपही झाली नव्हती. वाघाच्या दर्शना अभावी आमची झोप आम्हाला जाणिव करू लागली. 


आमची चुळबूळ थोडी शांत झालेली गाईडच्या लक्षात आले. त्यानं एका ठिकाणी त्या ड्रायव्हर ला गाडी थांबवायला लावली. दूर एका ठिकाणी छोट्याशा गुहे सारखे काहीतरी दिसत होते. उधर बाघ रहता है। अशी उपयुक्त माहीती दिली. वाघ जरी दिसला नाही तरी कधीतरी पत्र पाठवायला त्याचा पत्ता उपयोगी पडेल या भावनेने मी हो म्हणले. थोडी गाडी पुढं नेऊन त्या ड्रायव्हरने कचकन ब्रेक दाबला आणि गाडी मागं आणली. मातीकडं बोट दाखवत, ये टायगर के पंजोंके निशान है। मला तर तिथं फक्त विसकटलेली मातीच दिसत होती. तरीपण मी हो ला हो म्हणले. अजून पुढे गेल्यावर त्याने असाच ब्रेक दाबला. ये देखो, बाघीन और उसके बछडे के पंजे के निशान है। वोह छोटा है ना वो बछडे का है। देवाशप्पथ सांगतो, मला अजूनही तिथं फक्त माती आणि फिरणाऱ्या जिप्सीची चाकंच दिसत होती.



अशा आमच्या दोन अडीच तासांच्या भ्रमंती मधे आम्हाला अजूनही व्याघ्र दर्शन झाले नव्हते. आता मात्र आमचा सर्वांचा धीर सुटत चालला होता. कुठंतरी वाटेत थांबून तो गाईड माझ्या गळ्यात असलेली दुर्बीण मागून घ्यायचा आणि लांब फोकस लावून बोलायचा.. नही है। त्याने दिलेल्या माहीती नुसार काही हरणे वाघ जवळ असेल तर विशिष्ट आवाजात ओरडतात. आम्हाला असाच काहीतरी आवाज आला. त्या आवाजाच्या दिशेने आमची गाडी पळाली पण तो आवाज लुप्त झाला आणि वाघ काही दिसला नाही.


आता वाटेत एक छोटासा पाणवठा लागला. गाईडने सांगितले की टायगर इधर पानी पिने के लिए आता है। आम्ही थोड्या अंतरावर गाडी उभी करून वाघाची वाट बघत बसलो. वाघाला कडाडून तहान लागावी आणि तो इथं पाणी प्यायला यावा अशी प्रार्थना करीत आम्ही गाडीत बसून राहीलो. तब्बल अर्धा तास थांबून एखादा ससा सुध्दा तहानेन व्याकुळ झालेला पाहीला नाही. वाट पहाण्यात आमच्या जवळची पाण्याची बाटली मात्र रिकामी झाली.


असेच पुढे एका ठिकाणी काळ्या रंगाची घाण पडलेली होती. गाईडने ती वाघाचीच विष्ठा आहे अशी अमुल्य माहीती पुरवली.. एका झाडावर बरेच ओरखडे ओढलेले दिसत होते. ते सर्व वाघानं केले आहेत असे आम्हाला सांगण्यात आले. वाटेत भेटलेल्या एका  होतकरू प्रवाशाने सांगितले की ती काळी विष्ठा आणि त्या पाऊलखुणा त्याच्या दोन दिवसांपूर्वीच्या सफारी मधे पण दाखवल्या गेल्या होत्या. अजून एका पाणवठ्याजवळ आमची गाडी थांबली. साधारण दहा पंधरा मिनिटांनी मी त्याला नम्र विनंती केली, भैया, आज टायगर का मुड नही है। कही सो गया होगा। चलो अब वापस चलते है।


ड्रायव्हर ने पडत्या फळाची आज्ञा मानून गाडी परतीच्या मार्गावर पळवायला सुरू केली. मी पुन्हा एकदा एक मॅच हरण्याच्या भावनेने परतलो. दुर्बीणीचे चारशे रूपये वसूल करून तो इसम पोबारा झाला. टायगर दिखा क्या? अशी एक साधी चौकशी करण्याची तसदी त्याने घेतली नाही. वाघाची त्या दुर्बीण वाल्या बरोबर, त्या गाईड बरोबर आणि ड्रायव्हर बरोबर काहीतरी मिलीभगत असणार अशी शंका वाटून गेली.


आम्ही दुसऱ्या दिवशीची सफारी रद्द करून हॉटेलवर मस्त आराम केला.



2 comments:

  1. छान लिहिलाय लेख!!

    ReplyDelete
  2. पुढच्या वेळेस उन्हाळ्यात जा, वाघाला तहान लागेल नक्की

    ReplyDelete

Name:
Message: