सोशल मीडिया हा शब्द आपल्या दैनंदिन जीवनातील एक अविभाज्य घटक बनलेला आहे. जेन झी अथवा पिढी झ च्या इन्स्टापासून ते वृद्धांच्या व्हॉट्सॲप पर्यंत प्रत्येक जण कोणाला तरी काहीतरी दाखवत असतो किंवा कोणाकडून तरी काहीतरी पाहत असतो. आजकाल रेस्टॉरंट मध्ये जर मी चुकून फोटो काढण्यापूर्वी एखादा घास खाल्ला, तर माझे संपूर्ण कुटुंब माझ्याकडे मी भयंकर अपराध केल्याप्रमाणे पाहते. मला तर अशा वेळी भीती वाटते की आता मला पडलेली सगळी भांडी घासण्याची शिक्षा तर ठोठावली जाणार नाही ना! कारण त्या फोटोचे उच्च स्थान कुठेतरी इन्स्टावर किंवा व्हॉट्सॲपच्या ग्रुपवर ठरलेले असते.
आजच्या काळात शिक्षण घेण्यासाठी विद्यापीठात जाण्याची गरज उरलेली नाही. हातात स्मार्टफोन आणि व्हॉट्सअॅप असलं की माणूस थेट “व्हॉट्सअॅप विद्यापीठा”चा विद्यार्थी होतो. या विद्यापीठात प्रवेशासाठी कोणतीही पात्रता लागत नाही; उलट जितकं कमी ज्ञान, तितकी पदवी लवकर मिळते! इथे प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या विषयाचा तज्ज्ञ असतो. कोणी अर्थव्यवस्थेवर भाष्य करतं, कोणी आंतरराष्ट्रीय राजकारणावर मत मांडतं, तर कोणी आरोग्यविषयक उपाय सांगतं. इथं फक्त आवश्यकता असते ती म्हणजे दुर्दम्य आत्मविश्वास! कोणीही काहीही सांगो, पण व्हॉट्सअॅपवर आलेली माहिती त्यांच्यासाठी अंतिम सत्य असते. कारण ती “विश्वासार्ह स्रोतांमधून” आलेली असते, म्हणजे कोणाच्या तरी काकांच्या मित्राच्या भाच्याच्या बायकोच्या ओळखीच्या माणसाकडून! ज्या व्यक्तीला स्वतःच्या नाकातून वाहणारा शेंबूड थांबवता येत नाही, तो व्हॉट्सअॅपवरून “स्वास्थ्य सुधारण्याची गुरुकिल्ली” सांगत असतो. इथे निव्वळ फॉरवर्ड करूनच लोक तज्ञ गणले जातात. अशा “फॉरवर्ड”वर लगेच विश्वास ठेवायचा आणि ते पुढे पाठवायचे असतात. काही जण तर इतक्या घाईत असतात की त्यांना मेसेज वाचण्याचीही गरज नसते. कधीतरी दुःखद निधनाची बातमी न वाचताच त्यावर आपला अंगठा किंवा टाळ्या नोंदवतात. जेव्हा तुम्ही एखादा मेसेज “हा नक्की पुढे पाठवा” असे लिहिलून दहा ठिकाणी वितरीत कराल, तेव्हाच तुम्ही सच्चे सोशल मीडिया पारंगत झाले आहात, असे समजावे.
काही लोक तर फक्त मेसेज फॉरवर्ड करून थांबत नाहीत, त्यांची अपेक्षा असते की आपला मेसेज सर्वांनी वाचावा आणि ताबडतोब त्याला अंगठा दर्शवून विचारांशी सहमती दाखवावी. आमच्या नात्यातील ग्रुपमध्ये एकदा एका व्यक्तीने तर दोन-तीन वेळा अनुभवले की त्यांच्या मेसेजला कोणी अंगठाच देत नाही. मग त्यांनी रागारागाने ग्रुपच सोडला. त्यांना परत ग्रुपमधे घेण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागले होते म्हणे. त्यांचे ग्रुपमध्ये परत झालेले आगमन पाहून मी ताबडतोब अंगठा टाकून माझी प्रतिमा शुद्ध केली.
व्हॉट्सॲप नंतर मानाचे स्थान येते फेसबुक आणि युट्यूब यांचे. फेसबुकवरील प्रत्येक फोटो किंवा पोस्ट पाहून कधी कधी अशी शंका येते की अरे हा, रोज इतक्या पार्ट्या करतोय, ट्रिपला जातोय तर मग कामं करून कमावतो कधी? माझा एक सहकारी आहे, त्याचे दर पंधरा दिवसांनी फोटोसेशन फेबुवर दिसते. तो त्याची पत्नी आणि दोन मुलं यांना फेबुवर पाहून मला तरी कंटाळा आला आहे. तरीपण एक चांगला नागरिक या नात्याने मी ते सर्व नेहमी पाहत असतो आणि अंगठा दर्शवून माझी नोंद नमूद करतो. तो आणि त्याच्या बायकोने केलेली रोमॅंटिक रिल्स पाहून त्यांच्या सुखी संसाराची कल्पना येते. वास्तविक आयुष्यात एकमेकांच्या कितीही जीवावर उठलेले का असेनात? आपल्याला काय त्याचे? चुकून कधी त्याचे फोटो पहायचे राहिले तर तो आवर्जून विचारतो, अरे तुमने मेरे फोटो नही देखे! तुम्हारा लाईक तो बनता है। लाईकसाठी पैसे पडत नाहीत आणि दान केल्याचे पुण्य मिळते (कुठतरी व्हॉट्सॲप वरच वाचले होते).
युट्यूब वर बऱ्याच जणांचा गाढा विश्वास. युट्यूब वरील व्हिडिओ हेच जगातील अंतिम सत्य असल्याचे प्रमाण अनेकांकडे असते. जर मोदी आणि राहूल गांधी गप्पा मारताना किंवा एकत्र नाच करताना दिसले तर त्यांची घनिष्ठ मैत्री झाली असा दृढ विश्वास निर्माण होतो. त्या AI वगैरेचा व्हिडिओशी काही संबंध नसतो. जे तिथं दिसतंय तेवढंच खरं. युट्यूबवर प्रत्येक विषयाचा तज्ज्ञ उपलब्ध असतो. फक्त आपण कोणत्या व्हिडिओवर विश्वास ठेवायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न. युट्यूबवरील पाच मिनिटांचा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांना त्या विषयावर पीएचडी मिळाल्याची भावना निर्माण होते. युट्यूब वरील पाककृतींनी बऱ्याच गृहिणींना सुगरण बनवलंय असा त्यांचा स्वतःबद्दलचा गैरसमज असतो. पण त्यांच्या या प्रयोगामध्ये ग्रोसरीवाल्यांचा धंदा मात्र चांगला चालतो.
सोसायटीच्या व्हॉट्सॲप ग्रुपची तर अजूनच एक मजा असते. पाणी गेलंय, गाडी चुकीची लावलीय, आमच्या बाल्कनीत कचरा पडला… अशा अनंत कारणांवरून या ग्रुपला महापूर आलेला असतो. ग्रुपवर हमरातुमरी करून भांडणारे चुकून कधी भेटले तर हसून जणू काही घडलंच नाही या अविर्भावात गप्पा मारताना दिसतात. अशा ग्रुपमध्ये काही विद्वान सतत काहीबाही सूचना लिहीत असतात. समाजात कसे वागावे, आपली सोसायटी कशी स्वच्छ आणि सुंदर ठेवावी, देशहितासाठी आणि समाजहितासाठी आपली आद्य कर्तव्ये कोणती आहेत? पाणी, वीज बचतीचे उपाय? सण कसे साजरे करावेत? फटाके कसे उडवावेत अथवा उडवू नयेत?… अशा नानाविध विषयांवर या लोकांकडून ज्ञान वाटपाचे काम चालू असते. सापडला विषय, की द्या ठोकून!
शहाणे करून सोडावे । सकळ जन ॥”
अशी ओळ गुणगुणत हे लोक फिरत असतात. एखादा ज्ञानदानाचा मेसेज टाकून हे लोक जेव्हा कुठे बाहेर दिसतात त्यावेळी त्यांचे चारचौघात सर्वांनी प्रचंड कौतुक करावे अशी त्यांची अपेक्षा असते.
पिढी झ तर केवळ अन्न, वस्त्र, निवारा आणि इन्स्टा यावर जगते. दोन श्वासांच्या मधे उसंत घेऊन यांचे फोटोसेशन चालते. रील बनवण्याचे रूटीन त्यांच्या दिनचर्येत ठासून बसवलेले दिसते. खरी गंमत असते जेव्हा तो सगळा कचरा पोस्ट करतात. फोटोवरून तो मुलगा की मुलगी हे आकलन होण्यासाठी बरेच कष्ट पडतात. यांचे चेहरे शक्यतो केसाने किंवा टोपीने अन्यथा फोनमुळे झाकलेलेच असतात. एकच फोटो हा दोन भिन्न व्यक्तींचा असं सहज खपवता येतो. रिलमधील माकडचाळे पाहून माकडे सुद्धा या मराठी शब्दावर आक्षेप घेतील अशी मला वाटणारी भीती.
असो! खरं पाहिलं तर सोशल मीडिया हे एक साधन आहे — संवादासाठी, माहिती देण्यासाठी, संपर्कासाठी. पण आपण त्याच्या इतके आहारी जातो की आपण आपले वास्तविक आयुष्य विसरून तेच आभासी आयुष्य खरे मानू लागतो. माहिती आणि अफवा यांच्यातला फरक ओळखण्याची जबाबदारी मात्र आपलीच असते.
म्हणून कधी कधी एखादा मेसेज पुढे ढकलण्यापूर्वी थोडा विचार करायला काय हरकत आहे? फेबुवरील इतरांचे आभासी जग पाहून जळण्यापेक्षा स्वतःच्या विश्वात रमण्याचे सुख अमुल्य नाही का? इन्स्टाच्या क्षणिक फ्रेम बाहेरचे जग केवढे तरी विशाल नाही का? सोशल मीडियाच्या विश्वाबाहेरील सामान्य ज्ञानाची पदवी आजही मेहनतीनेच मिळते.