Showing posts with label Spider. Show all posts
Showing posts with label Spider. Show all posts

Friday, 20 November 2026

एका कोळीयाने!

माणसाच्या आयुष्यात कधी काय घडेल, काही सांगता येत नाही. कधी कोणाशी मैत्री होईल, तर कधी कोणाशी शत्रुत्व होईल, याचा काही नेम नाही. अशा या प्रेमास अथवा शत्रुत्वास पात्र बनण्याचा हक्क हा काही फक्त माणसांनीच प्राप्त केला आहे, असे काही नाही. उगाचच खिडकीबाहेर कोकलणारा कावळा, कानात गुंजणारा डास किंवा रस्त्यावर रात्रीच्या शांततेत उगाचच भुंकणारं कुत्रं यांनी आपल्या शत्रुत्वाची भूमिका योग्य प्रकारे निभावली आहे. कुठेतरी दूर ओरडणारी कोकीळा, लांब डोंगरांमधील गर्द झाडीतून ऐकू येणारी मोरांची केकावली, गाईचा आर्त हंबरडा, अथवा वाघाची ऐकू आलेली डरकाळी… या सर्वांचे आवाजसुद्धा आपल्या मनात काहीतरी भावना निर्माण करतात. कधी प्रेम असो वा भीती असो अथवा कुतूहल असो, आवाजाबरोबर भावनांचे आगमन आपल्या मनामध्ये होतेच.


असो! फार मोठी प्रस्तावना न देता मी घडलेल्या प्रसंगावर येतो. काही दिवसांपूर्वी मी असाच काही कामासाठी आवरून बाहेर चाललो होतो. बाहेर पडताना मला उगाचच गालावर काहीतरी खाजल्यासारखे वाटत होते. मी गडबडीत असल्याने फारसे लक्ष न देता रुमालाने गाल पुसत बाहेर पडलो. बाहेर मला माझा एक मित्र भेटला आणि त्याने विचारले, “हे काय रे? गालावर कोणीतरी जोरदार थप्पड मारली काय कुणी? गाल तुझा लालबुंद झालाय.” मला तर काहीच कळेना. मी उगाचच आठवायचा प्रयत्न केला. पण कोणी थप्पड मारावी, असा कोणताही प्रताप मला आठवेना. “अरेच्चा! हो का? काही माहिती नाही रे! घरी जाऊन बघतो मी.” एवढे बोलून मी घरी आलो.


घरी आल्यावर बायकोने दरवाजा उघडला. तिने पण सेमच प्रश्न विचारला! मी थेट आरशात जाऊन पाहिले, तर डावा गाल माकडासारखा सुजून लालबुंद झाला होता. तसे फारसे काही दुखत नव्हते, पण थोडी खाज जाणवत होती. त्याच्यावर कैलास जीवनचा लेप लावला आणि वाटले की उद्यापर्यंत सूज कमी होईल. दुसऱ्या दिवशी तर चेहरा अजूनच भयानक झाला. आता सूज कानापर्यंत गेली आणि कानाची पाळीसुद्धा सुजू लागली. गालावर एक आडवा फरकाटा मारल्याप्रमाणे व्रण दिसत होता. त्याठिकाणी हळूहळू जखम दिसू लागली.


आता मात्र मला बऱ्याच वेदना होऊ लागल्या. हे अचानक गालाला काय होऊन बसले, काहीच कळेना. आईने कसला तरी लेप बनवून गालाला चोपडला. त्यातल्या ओलसरपणामुळे थोडावेळ गार वाटले, पण तो सुकू लागल्यावर त्याचे तुकडे माझ्या अंगावर आणि घरभर पडू लागले. किती कचरा करतोयस, या आरोपाखाली मला बायकोकडून स्थानबद्धतेची शिक्षा ठोठावण्यात आली. अजूनही या अनामिक विचित्र आजाराचे रहस्य उलगडले नव्हते. मला माझ्या दाढीच्या ब्लेडची शंका आली. सहज बोलून दाखवली, तरी बायकोने दाढीच्या ब्लेडसह साबणसुद्धा बदलण्याची आज्ञा दिली. माझ्या जेन-झी मुलीने तर, “बाबा, तुम्हाला ना, डस्ट ॲलर्जी असणार किंवा तुमचा परफ्युम बदलून बघा,” असा सल्ला दिला. “अगं, मी काय परफ्युम तोंडावर मारणार आहे का?” असे बोलून तोही पर्याय खोडून काढला आणि मी विचार केला, वास्तविक धुळीतच मी लहानाचा मोठा होऊन आता म्हातारा होत आलो, अशा त्या धुळीची कसली आलीय ॲलर्जी! मी ती शक्यता मनातून पुसून टाकली.



सुजलेल्या गालामुळे मला दाढी करता येईना. बाहेर कोणासमोर जाणेसुद्धा टाळावे लागे. उगाच प्रश्न आणि नंतर शंभर सल्ले. मला एकाने कसले तरी मलम सुचवले. ते आठ दिवस लावले की जखम तर बरी होईलच, पण तुमचा रंग उजळून गोरा होईल, असा त्याने बोनस फायदासुद्धा सांगितला. हा सल्ला देणाऱ्याच्या रंगावर मी टिप्पणी न केलेलीच बरी. बायकोने कसले तरी मलम आणले आणि ते माझ्या गालावर चोपडले. जखमेला काही फरक पडला की नाही, याची मला कल्पना नाही, पण त्याच्या वासाने मला बराच फरक पडला. वासाने डोके गरगरू लागले आणि एका तासात मी गाल धुवून टाकला.


अजूनही गालावरची सूज कमी होण्याची लक्षणे दिसत नव्हती. आता मला थोडी अंगदुखी आणि ग्लानी जाणवू लागली. तशा वेदना असह्य झाल्या असं काही नाही, पण सतत गालाकडे हात जायचा. क्रोसिन घेऊन झोप काढली. सकाळपर्यंत ताप कमी झाला, पण गाल मात्र तसाच! आता तीन दिवस झाले, तरी सुधारणा दिसत नव्हती. मलाही आता जरा काळजी वाटू लागली. उर्वरित आयुष्य असे अर्धमर्कट अवस्थेत काढण्याची माझी तयारी नव्हती. आता जखमांमध्ये पस होऊन तो दुखू लागला होता. कधी जखमांवरील खपल्या निघून रक्त बाहेर येई.


अखेरीस मी आणि बायकोने एका डॉक्टरकडे जायचे ठरवले. मी गाल चोळत त्यांच्यासमोर जाऊन बसलो. त्यांनी निरखून पाहिले आणि सांगितले, “अहो, हा तुम्ही कोळी चिरडलाय.” मला ते वाक्य ऐकून कसंतरीच झालं. असा कसा आणि कधी चिरडला? मला ते तर काहीच माहिती नाही. डॉक्टर बोलले, “नकळत तुम्ही झटकताना तो चिरडला गेला असेल आणि त्याचे विष तुमच्या गालावर पसरले असेल. काही कोळी असे विषारी असतात. तुम्हाला मी पाच दिवसांचा गोळ्यांचा कोर्स देतो. कमी नाही झाले तर परत या माझ्याकडे.”


काहीतरी कारण सापडले, यातच मला आनंद झाला. घरी आल्यावर बायकोने ताबडतोब घरात पेस्ट कंट्रोल करण्याचा निर्णय घेतला. यावेळच्या पेस्ट कंट्रोलच्या भक्ष्यस्थानी झुरळं नव्हती. हा सर्व प्रकार ऐकल्यानंतर मुलीने मला विचारले, “बाबा, तुमच्या हाताच्या तळव्यामधून कोळ्याची जाळी येतात का, बघा.” असा मला Spider-Daddy बनवण्याचा तिने हट्टच धरला. तसे काही होत नाही, हे ऐकून तिचा आणि माझाही जरा हिरमोडच झाला. मी हार न मानता उगाचच भिंतीवर दोन्ही हात ठेवून चढण्याचा प्रयत्न करून पाहिला. पण व्यर्थ!


आजही मला बाहेर कुठे भिंतीवर किंवा झाडांवर एखादा कोळी दिसला तर मी आठवणीने माझा गाल चोळतो. या कोळीनामक शत्रूने माझ्यावर का सूड उगवला आणि तेही स्वतःच्या जीवाची आहुती देऊन? उगाचच मी न पाहिलेल्या कोळ्यामध्ये मला बाजीप्रभू देशपांड्यांइतकाच आदर वाटतो. पण बिचाऱ्यानं अशी कोणती खिंड लढून प्राणाची आहुती दिली, ते काही मला अजूनही समजले नाही. तरीसुद्धा त्याच्या वीरमरणाला माझा सलाम!


कोण कधी आणि कसा तुमचा शत्रू बनून तुमच्याशी सामना करेल, याचा खरंच काही नेम नाही.