Showing posts with label हॅलोविन. Show all posts
Showing posts with label हॅलोविन. Show all posts

Tuesday, 28 March 2017

अनेक भुतांची एक गोष्ट

 💀👻
प्रत्येकाच्या मनात कधीतरी कुठेतरी भूत या कल्पनेबद्दल अनामिक भीती कुतूहल लपलेलं असतं. लहानांपासून थोरांपर्यंत, उत्तर ते दक्षिण, पूर्व ते पश्चिम कोणी सुध्दा याला अपवाद नाही. जगभरात सर्व संस्कृतींमधे नक्की सापडणारी गोष्ट म्हणजे "भूत".

नुसत्या शब्दोच्चारानंच मनात कुठंतरी भीतीची लाट उत्पन्न होते. घाबरून "भीती" शब्द उच्चारताना तो "भूत" असा उमटला आणि हा शब्द तयार झाला असावा. प्रत्येक लहान मुलाला घाबरवण्यासाठी त्याच्या भावंडांनी वापरेलेलं हमखास हत्यार म्हणजे भूत. लाखोनी पुस्तके, कथा या भूतांवर लिहीली गेली गेली आहेत. कदाचित देवा पेक्षा मोठा वाचक वर्ग या भूताचा असावा. या भुतानी कित्येक कलाकार, मोठे नट, संगीतकार आणि निर्मात्याना टिव्ही सिरीयल्स, हिंदी, मराठी, इंग्रजी आदी हजारो चित्रपटांवर पोटं भरायला खाद्य पुरवलं आहे.

सर्वमान्य मराठी संकल्पनेनुसार भूतं ही पांढऱ्या रंगाची असतात. हीच भूतं जीवंत माणसं असताना घडोघडी रंग बदलतात अशी जरी तुमची तक्रार असली तरी आता भूतात परीवर्तन झाल्यावर बिचाऱ्याना फक्त एकाच रंगावर समाधान मानावं लागतं. चालण्यापेक्षा ती हवेत तरंगत जाणं पसंत करतात. या भुताना गुरूत्वाकर्षणाचा त्रास कसाकाय होत नाही कोण जाणे! न्युटनचं भूत तरंगतं का चालतं?.... सहज शंका. पायाचा फारसा उपयोग नसल्याने ते उलटे झालेले असतात असही सांगितलं जातं. बरं झालं तरंगत चालतात ते, याच्या मापाचं चप्पल मिळवणं कठीण झालं असतं. मग एखाद्या चर्मकार भुताला चांगला उद्योग मिळाला असता. किरकोळ हात चलाखीयुक्त जादूचे खेळ याना चांगले अवगत असतात. प्रत्येक भुताची कोणतीतरी अतृप्त इच्छा असायला हवी असा हिंदू संस्कृतीत आग्रह आहे. तरीपण मला अशी बरीच भूतं ज्ञात आहेत जी बिनकामाची रिकामटेकडी उगाचच दिशाहीन भटकत असतात. या भूतांचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे यांच्या जबड्याचा खालचा भाग हा भलताच खाली घसरलेला असतो. या कारणामुळे त्याना तोंड मिटवण्याचा थोडा त्रास होत असावा आणि यांचे तोंड सतत उघडेच राहते. त्याचा परीणाम असा की यांच्या तोंडातून हवा सतत वहात राहते. अर्धवट पडलेल्या दातांमधून हवा वाहत असल्यानं तोंडातून शिट्टी सदृश ध्वनी निर्माण होत असतो. या आवाजाला घाबरून जाता तो केवळ या भूताचा नाईलाज समजून सहानभूती व्यक्त करावी अशी सुज्ञ वाचकाना विनंती. ही भुतं नक्की खातात काय हा एक सुटलेला प्रश्न. माणासाना खातात म्हणावं तर माणसं नुसतीच घाबरतात. त्याना मी कधी आज माझा एक हात भुतानं खाल्ला असं काही सांगताना ऐकलेलं नाही. ही भुतं तशी बरीच निरर्थक कामं करीत असतात. उगाच मोकळी खुर्ची हलवायची, रिकाम्या झोपाळ्याला झोका देत बसायचं, दरवाज्याला कड्या लावत जायचं किंवा सगळे झोपले की हातात मेणबत्ती घेऊन फिरायचं.. कसं काय जमतं बुवा हे? काही कलाप्रेमी भुतं तर गाणं गात हिंडत असतात, शिवाय पायामधे पैंजण घालून सदैव नृत्य सादर करायला उत्सुक असतात. त्या उलट्या पायात कसंकाय पैंजण बांधतात ते पण शोधून काढलं पाहीजे. एकंदरीत या सर्व कृतींसाठी लागणारी शक्ती कुठून मिळवतात हे केवळ भुतानाच ठाऊक! तसं नाही म्हणायला कोणी तरी शितं समोर टाकून भुतं बोलवण्याचा प्रयोग यशस्वी करून दाखवलाय पण ती शितं त्या भुतानी खाल्याचा पुरावा अजून सापडलेला नाही. काही मंडळीनी रक्त पिणारी भुतं असं काही वर्णन करून ठेवलंय. पण मग शिल्लक राहीलेल्या शरीराचं हे भुत लोक काय करतात याचा अजून शोध लागलेला नाही.

जाऊ दे! भुतांवर फार विज्ञान खर्च नको करायला. भौतिक शास्त्र हा विषय भूता सारखा भीती दाखवत शाळेत दरवर्षी मानगुटी वर बसलेला असायचा. याच कारणावरून या विषयाचं नाव भौतिक पडलं असावं असं वाटते. या भुतांचं आवडतं पार्कींग चं ठिकाण म्हणजे वडाचा अथवा पिंपळाचा डेरेदार वृक्ष. गावाबाहेर वाहणाऱ्या थंड वाऱ्यानं मुळीच थंडी वाजत नसल्यामुळं याना असले सोस परवडतात हो! रात्रभर सोडा, तासभर जरी असा गावाबाहेर फिरून आलो तर लगेच सर्दी व्हायची. कदाचित यांचं शरीर म्हणजे पापुद्र्यासारखं असल्यामुळं वाऱ्यानं झाडपाल्या बरोबर आपण सुध्दा उडून जाऊ अशी याना भीती असावी. याच कारणासाठी ते स्वत:ला झाडावर लटकून घेतात. आला वाऱ्याचा झोत तर घ्यायचा एखादा झोका पण झाड सोडायचं नाही. ही भुतं कधी घड्याळ वापरत नाहीत तरीपण वेळेच्या बाबतीत अतिशय कडक! रात्रीचे बारा वाजले की यांची रात्रपाळी सुरू होते. दिवसभर उन्हाची कामं करायला नकोसं वाटत असेल. बिचाऱ्याना कोणी पंखा पण देत नाही. पण रात्री बारा वाजले की लगेच कामाला लागतात. कर्तव्य म्हणजे कर्तव्य! अशा कमजोर दिसणाऱ्या भुतांच्या अंगात शक्ती येते अमावस्येला. याचा अर्थ ही भुतं चंद्रावर पण नजर ठेऊन असतात. जसजसा चंद्राचा प्रकाश कमी होत जाईल तसतशी यांची शक्ती वाढत जाते आणि प्रकाश वाढेल तशी शक्ती घटत जाते. चंद्र प्रकाशानं भरती येते आणि अमावस्येला ओहोटी येते हे शिकलो होतो. पण भुतांचं हे उलटं तंत्र जरा कळण्याच्या बाहेरचं आहे. मला तर अशी दाट शक्यता वाटते की या भुतांमुळंच चंद्राची दशा पोर्णिमेपासून अमावस्येपर्यंत बदलत जाते आणि त्याचा परीणाम म्हणून भरती ओहोटी होतात.

या भुतांच्या कुवतीनुसार त्यांची विभागणी विवीध प्रकारामधे केलेली असते. त्यांच्या विभागणीनुसार त्याना कामे वाटून दिलेली असतात. प्रत्येकानं आपापली भुमिका पार पाडली की झालं. संपुर्ण भूतव्यवस्था याच तत्वावर अविरत चालू असते. त्यामधे कधी गडबड गोंधळ, भांडणं, जातीयवाद, मूकमोर्चे असे प्रसंग दिसून येत नाहीत. एक प्रसिध्द पावलेला स्त्रीलिंगी भूतांचा प्रकार म्हणजे "हडळ". भूतांचीच एक बहीण म्हणा हवंतर! ही हडळ काहीशी विद्रुप दिसते शिवाय तिचा अवतार सुध्दा अजागळ आणि विचीत्र असणं अपेक्षित असतं. पुर्वीच्या सासवा आपल्या सुनेला लाडानं "हडळ" असं संबोधित असंत. या हडळ जमाती मधे पुल्लींगी प्रकार माझ्या ऐकीवात नाही. या कारणानं यांची पैदास झपाट्याने घटलेली दिसून येते. दुर्मिळ प्रजातींच्या यादी मधे यांचे नाव घालायला हवे असे मला वाटते. भुताचा अजून एक प्रकार पिशाच्च! हा प्रकार तसा घाबरट! गावा बाहेर लांब यांचे वास्तव्य! चुकून कोणी माणूस वाट चुकून त्यांच्या वस्तीत गेला तरच ही पिशाच्च त्याच्या वाटेला जातात. पिशाच्च बाधा झालेल्या माणसाला बुवा-बाबांचा बराच मार खावा लागतो. कोणत्यातरी झाड पाल्यानी ते बडवून काढतात. मार खातो माणूस आणि हे पिशाच्च मात्र राहते नामानिराळा. हडळी ची मानवीय स्त्री साथीदार चेटकीण. भारतातल्या चेटकीणी या म्हाताऱ्या आणि कुबड असलेल्या असणं आवश्यक असतं. या महिला वर्गाकडं माणसाचं पोपटात, पोपटाचं माणसात असे परीवर्तन करण्याची कला अवगत असते. पाश्चिमात्य चेटकीणी मात्र सुस्वरूप नटमोगऱ्या असतात. महत्वाचं म्हणजे या चेटकीणीचे घर अतिशय गलिच्छ किळसवाणे ठेवलेले असते. तिच्या कडं स्वच्छतेसाठी झाडू नसतो अशातला भाग नाही. पण त्या झाडूचा उपयोग या चेटकीणी वाहन म्हणून करतात. या कारणानं घरातली स्वच्छता होऊ शकत नाही. कृपया अशी कोणी चेटकीण कोणास दृष्टीस पडल्यास त्याना एखादा फिलीप्स चा व्हॅक्युम क्लिनर गिफ्ट द्यावा ही विनंती. भारतीय चेटकीणी शक्यतो झोपडीत राहणं पसंत करतात. पाश्चिमात्य चेटकीणींचे मात्र मोठ्ठाले वाडे, महाल असतात. तरी ते स्वच्छ नसतातच. रशियन चेटकीणीना बाबायागा म्हणतात. नावात जरी बाबा असलं तरी हा स्त्रीलिंगी प्रकार आहे हे जाणकार वाचकानी समजून घ्यावे. या चेटकीणींचे नावच बाबायागा असते. त्याना अजून दुसरे नाव ठेवण्याचा प्रयत्न करू नये

चायनाच्या भूतांची एक वेगळीच गंमत. ही भूतं बेडकासारखी उड्या मारत चालतात. ही भूतं भारतीय भूतांसारखी प्रगत नसल्यामुळं तरंगत प्रवास करीत नाहीत. याना तांदूळ आणि मांजर यांची भीती वाटते. बाकी वाघ समोर आला तरी घाबरणार नाहीत. तशी ही भूतं क्वचित प्रसंगी लांब उडी घेण्याची तयारी ठेऊन असतात. महत्वाचं म्हणजे ही भूतं सुध्दा मिचमिच्या डोळ्याची आणि लोंबणारी लांबलचक मिशीवाली असतात. पाश्चिमात्य भुतांचे सुध्दा बरेच प्रकार. त्यांचा आवडता रंग काळा. काही प्रसिध्दी पावलेले प्रकार म्हणजे झाँबी, हॅलोविन, ड्रॅक्युला इत्यादी. पाश्चिमात्य भूतं भलतिच प्रगत. भोपळ्यात डोकं अडकवून आत लाईट लावण्याचा खेळ याना खुप आवडतो. या सर्व प्रकारातील भूतांना माणसाला पकडून त्याच्या मानेवर मागं दोन दात रूतवायला फार आवडतं. या भूतांचा आवडता प्राणी म्हणजे लांडगा. चंद्राला पाठीमागं धरून उर्ध्व बांग दिली की या सर्व भूतांची शक्ती जागृत होते. ही सर्व भूतं विलासी रसिक. त्याना रात्रभर नाच गाणी दंगा करायला अतिशय आवडतं. झाँबी प्रकारातील भूतांची गोष्ट थोडी वेगळी. या भूताना डोक्याचा भाग जरा कमीच म्हणायला हरकत नाही. सतत गुरगुरत हे फिरत असतात आणि माणूस तावडीत सापडला की त्याच्या मानेचा मुका घेतात. या भूताना जगातील कोणत्याही गोष्टीची भीती वाटत नाही पण फक्त लांबडं अधिक चिन्ह दाखवलं की "क्राॅस" ओरडत दूर पळतात. पाश्चिमात्य भूतं तर इतकी प्रगत की ती सर्रास आपला एक सण सुध्दा साजरा करतात. भारतीय आणि चायनीज मात्र पक्ष पंधरवडा पाहून भूतांच्या आत्म्याला शांत करू पहातात.

एकंदरीत असे बरेच भुतांचे प्रकार आणि विचार आपल्या समोर सतत मांडणारे चित्रपट, कथा, कादंबऱ्या निव्वळ करमणूक उद्देश ठेऊन असतात. त्यांचा वस्तुस्थितीशी संबंध लावणे हे हास्यास्पद होऊ शकेल. वास्तविक पाहता द्वेष, मत्सर, इर्षा, क्रोध, हाव आदी खरी भूतं आहेत. त्यांच्यापासून सुटका जी व्यक्ती करू शकेल त्याला कोणतीच कधीच भीती स्पर्श करू शकणार नाही