Showing posts with label बँक. Show all posts
Showing posts with label बँक. Show all posts

Tuesday, 28 March 2017

बँकेसी जावे

शहाण्या माणसानं कोर्टाची पायरी चढू नये म्हणतात पण तो नियम बँकेच्या पायरीसाठी नाही. वास्तविक मी तर म्हणेन की तुम्ही शहाणे आहात ना? मग तर चढाच बँकेची पायरी. हे बँकवाले तुम्हाला तुमची पायरी दाखवूनच सोडतील. अनेक वर्षांपासून या विवीध बँका आपल्या सर्वसामान्य माणसाच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक बनलेल्या आहेत. पुर्वीच्या काळी तर पोर कमवायला लागलं रे लागलं की ताबडतोब त्याच्या नावानं बँकेत एक खातं उघडण्याची प्रथा होती. आता तर अतिउत्साही पालक आपल्या पाल्याचं नाक पुसण्या आधीच खातं उघडून ठेवतात. जर ते आपल्या हौसेचं मोल चुकवत असतिल तर का काळजी म्हणा!

पुर्वी स्टेट बँक, कॅनरा बँक, देना बँक, युनियन बँक आदी भारदस्त नावाच्या बँका होत्या.. म्हणजे त्या अजूनही आहेत पण त्यांच्यातला भारदस्तपणा आता संपलाय. संपूर्णत: देशी कारभार असूनही यांची इंग्रजी नावं का हे कोडं मला कधी उलगडलं नाही. यांच्या शाखेतला व्यवहार हा सरकारी व्यवहारापेक्षा फारसा भिन्न नसे. बँकेच्या भिंती जुन्या रंग उडलेल्या असत. भिंतीवर एक भले मोठे कॅलेंडर टांगलेले असे. तारखेचा अचूक आकडा आणि योग्य वाराची काळी अक्षरं दाखवणारा पांढरा कागद भिंतीवर लटकवलेला असे. बँकेमधे फिरणारे पांढरे भलेमोठे पंखे माझा कायम आकर्षणाचा विषय असे. उंच लाकडी कपाटांवर वर्षानुवर्षे साठलेली धूळ आणि जळमटे त्या बँकेचा इतिहास सांगत असे. बँकेच्या स्ट्राँगरूम चा दरवाजा दहा हत्तीना पण तोडता येणार नाही इतका भक्कम असे; पण भींतीना पोखरायला एक छोटासा उंदीर सुध्दा पुरेसा असे. अशा बँकांमधे काम करणारा वर्ग हा आर के लक्ष्मण च्या काॅमन मॅन प्रमाणे दिसत असे. कर्मचाऱ्या पासून ते अधिकारी वर्गापर्यंत सर्वांच्या चेहऱ्यावर कमालीचा उत्साह झळकत असे. कोणी उदास अथवा मरगळलेल्या चेहऱ्याची व्यक्ती तिथं पाहीलेली मला आठवत नाही. तरीपण त्या उत्साहाचा गिऱ्हाईकाच्या कामाशी कधी काही फारसा संबंध येत नसे. साडे दहा शिवाय तुच्छ गिऱ्हाईकाना आत प्रवेश नसे. एकदा आत प्रवेश मिळवला की तेथील शिपाई "काय आहे?" अशा अविर्भावात विचारणा करी. त्याच्या खांद्यावर अडकवलेल्या बंदुकीचे निरीक्षण करीत पैसे भरायचेत किंवा काढायचेत किंवा
डिमांड ड्राफ्ट काढायचाय अशा कामाचा तपशिल त्याला सांगण्यात येई. त्याकाळी कर्ज काढलेली व्यक्ती अपराधीपणाची भावना घेऊन उर्वरीत आयुष्य जगत असे. मग तो शिपाई वितभर लांबीचा आखूड उंचीचा रंगीत कागद पुढ्यात ढकलत असे. तो कागद बरोबर का चुक अशी शंका मनात जरी डोकावत असली तरी त्या शिपायाच्या शब्दाबाहेर जाण्याचे धाडस नसल्याने गप गुमान त्याचा स्विकार करीत असू. अगदी कितीही शिकलेला माणूस तो फाॅर्म किमान तीन शंका विचारल्याशिवाय पूर्ण करूच शकणार नाही याची कल्पना शाखाधिकाऱ्यांना नक्कीच असावी. याच कारणा साठी त्यानी विद्वान व्यक्तीची शिपाई म्हणून नियुक्ती केली असावी. त्या शिपायाच्या मदतीने भरलेला तो रंगीत कागद घेऊन एका अरूंद लाकडी बाकावर नंबर लाऊन बसण्याचा कार्यक्रम करावा लागे. काही वेळाने आपला नंबर आला की लाॅटरी लागल्याच्या आनंदाने कौंटरकडे धाव घेत असू. कॅशियर आणि टेलर अशा दोन खिडकी पैकी आपण कोणत्या खिडकीत डोकवावे असा माझा व्यावहारीक गोंधळ कायम उडे. बँकेमधे टेलरचे काय काम असला प्रश्न विचारण्याचे मी धाडस कधीच केले नाही. तरीपण मी अंगात घातलेला शर्ट मापाला ठिकठाक आहे ना याची खात्री करून घेत असे. त्या उंच खिडकीच्या पलीकडं बँकेतले नक्की काका बसलेत का मावशी बसल्यात हे फक्त आवाजावरूनच लक्षात येई. त्या बसलेल्या काकांच्या कोणा सहकाऱ्याबरोबर मोठमोठ्यानं काल झालेल्या क्रिकेटच्या मॅचवरील चर्चा कानावर येत असे. बँकेचे काम हा केवळ फावल्या वेळेत जोपासलेल्या छंदाप्रमाणे ते खिडकीकडं कटाक्ष टाकीत असंत. अखेरीस धाडसाने "पैसे काढायचे आहेत" असे बोलून हातातला रंगीत कागद पुढे सरकवला की ते काका त्या कागदावर भलत्या शक्तिनीशी थप्पा मारीत असत. तो धपाक असा आवाज ऐकून कदाचित त्यांच्या मनात पैसे द्यायचं नाही वाटतं असंही मला वाटून जाई. बँकेतून बऱ्याच दिशेने असे धपाक धपाक आवाज ऐकायला येत असत. काही आवाज हे मारलेल्या शिक्क्यांचे असत तर काही भली मोठी पुस्तकं अथवा वह्या आपटलेल्याचा असे. दहा वीस किलो वजनाच्या दांडग्या वह्याना समोर धरून टेबलांवर विखुरलेली वयस्कर माणसं काहीतरी आकडेमोड करताना दिसत असत. या वजनदार वह्यांमुळेच त्याना रोजच्या रोज लेजर बॅलन्स करावे लागत असावे असा माझा समज होता. त्याकाळी नोटा मोजण्यासाठी मशिन उपलब्ध नसल्यामुळे कॅशियर काका त्यांच्या तोंडातील लाळेत हाताची बोटं बुडवून नोटांची बंडलं फर्रार करत मोजत असत. त्या नोटांवर काहीतरी अगम्य भाषेत लिहून त्यांच्या वहीमधे नोंदी करून घेत असंत. त्यानंतर त्यांच्या थुंकमिश्रीत नोटांचे बंडल आपल्या समोर फेकले जाई आणि आपलेच पैसे आनंदानं खिशात घालून आम्ही चालते होत असू

बँकांच्या आधुनिकतेमधे पुर्वीची सर्व कामे आता आपोआप मशिन द्वारे पार पडू लागलीत. अशा परीस्थितीत पुर्वीची बँकेची कामं करायला माणसांची गरज पडणार का नाही अशी शंका माझ्या मनाला स्पर्शून गेली. तरीपण मला जागोजागी या नवीन बँका पसारा मांडून बसलेल्या दिसतात. या बँकींग क्षेत्रामधे आता आमुलाग्र बदल होत आहेत. सुहास्य स्वागत, सौजन्यपुर्ण वागणूक असे नानाविध अतिरेकी प्रयोग गिऱ्हाईकावर या बँका करू पहात आहेत. खाजगी बँकांच्या शिरकावामुळं संपूर्ण व्यवस्थाच बदलून गेली आहे. पुर्वीचं पुणं राहीलं नाही या धरतीवर मला पुर्वीची बँक राहीली नाही असं म्हणायचा मोह होतो. आता बँका चकचकीत आणि लखलखीत असतात. फरशा इतक्या गुळगुळीत असतात की घसरून पडू का काय अशी भीती वाटते. वातानुकूलीत वातावरणात गळ्याला टाय लावलेले बरेच कर्मचारी येणाऱ्या जाणाऱ्याचे सुहास्य स्वागत करीत असतात. अचानक इतक्या होणाऱ्या सौजन्याच्या कहरामुळे या लोकांचा काही गैरसमज तर नाही ना? चुकून मला कोणी भलताच समजत नाही ना? अशी शंका मनात येते. जर गर्दी असेल तर प्रतिक्षेकरीता सोफा, टिव्ही अशीपण सोय असते. क्वचित प्रसंगी चहा ची सुध्दा सोय केलेली असते. सर्वसाधारण तिशीतला हा कर्मचारी वर्ग मधाळ इंग्रजीतून बोलत असतो. बँकेतील महीला वर्ग हा खास आकर्षक दिसण्याच्या प्रयत्नात असतो. या सर्व मंडळीना इतकं फर्रडं इंग्रजी कोणत्या शाळेनं शिकवलं असा एक प्रश्न मनात येऊन जातो. आपला नंबर आल्यावर बँकेचा एखादा
अधिकारी जातीनं आपणास प्रतिक्षा स्थानापासून त्याच्या केबिन पर्यंत घेऊन जातो. तिथं छोट्याशा आॅफीस डेस्क समोरील खुर्चीत बसण्याची तो विनंती करून आपला ताबा घेतो. जरी तुम्ही कोणत्याही क्षुल्लक कारणासाठी गेला असला तरी तो इंन्शुरन्स, युनीट ट्रस्ट, म्युचल फंड अशा कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी भरीला पाडू लागतो. तुम्ही कमवत असलेली रक्कम किती तुटपुंजी आहे आणि तुमच्या भविष्यात ती कशी नगण्य होणार असून तुम्ही एका मोठ्या संकटात सापडणार असल्याची नांदी तो तुम्हाला करून देतो. या अनामिक संकटापासून वाचण्यासाठी केवळ केवळ ती व्यक्तीच तुम्हाला मदत करू शकते. अशी काहीतरी भावना निर्माण करून देण्यात तो नक्की यशस्वी होतो. महिना फक्त दहा हजार भरले की पुढील दहा वर्षात तुम्ही कोट्याधीश होण्याची स्वप्नं तुमच्या डोळ्या समोर रंगवलेली असतात. इतक्या उज्वल भविष्याचा आव्हेर करणं तुम्हाला अशक्य होऊन जातं. त्यात जर का ही माहीती पुरवणारी कोणी सुंदर महीला कर्मचारी तुमच्या समोर बसली असेल तर तिला तसे फारसे कष्ट मुळीच घ्यावे लागत नाहीत. तिची चुकीची आकडेमोड पण आपणास बरोबर वाटू लागते. पाच हजाराची ठेव पावती करायला गेलेली व्यक्ती दरमहा दहा हजाराच्या हप्त्याची धोंड गळ्यात बांधून बाहेर पडते.

बँकेच्या कक्षा आता इतक्या विस्तारलेल्या आहेत की त्या तुम्हाला पावलो पावली त्यांच्या आधार घेण्याची वेळ येते. कुत्र्याच्या छत्री प्रमाणे या बँकांचे जाळे आपल्या भोवताली विणले जाते. चोवीस तासाचे मशिन असो वा माॅल मधे पत्रकं वाटणारी टोळी असो. आॅफीसच्या दारात असो वा रेल्वे स्टेशनवर असो अथवा अगदी गल्ली बोळात असो. येन केन प्रकारेण या बँका सतत गिऱ्हाईकाचं लक्ष वेधून घेत असतात. परसनल लोन, इंन्शुरन्स, क्रेडीट कार्ड, इनव्हेस्टमेंट, होम लोन, व्हेहिकल लोन... नानाविध पर्याय आपल्या समोर थकता मांडत असतात. बँकेचा एक जीवघेणा प्रकार म्हणजे फोन करून वैताग! तुम्ही आॅफीसच्या कामात असाल अथवा कोणत्यातरी उद्योगात व्यस्त असाल, अशा वेळी या लोकांचा फोन हमखास कडमडतो. आपण प्रामाणिकपणे "कोणाचा बरे हा नंबर" असा विचार करीत फोन उचलतो. पलिकडून उगाचच लाडीकपणे बोलणारी व्यक्ती तुमचा हालहवाल विचारते. बुचकळ्यात पडून तुम्ही काही उत्तर देताय तितक्यात ती व्यक्ती आपलं अभिनंदन करते. तुम्ही अजून एकदा क्लिन बोल्ड होता. आता हे अभिनंदन कशासाठी हे विचारल्या वर खरा शोध लागतो. या विश्वातील अब्जावधी लोकांमधून आपली निवड करण्यात आली आहे. कशाच्या आधारे हे कोणालाच माहीती नसते. एखादे क्रेडीट कार्ड किंवा परसनल लोन तुम्हाला बहाल केलेले असते. या अशा त्रासावर चिडून काही उपयोग होत नाही. पलीकडून बोलणारी व्यक्ती आपले कार्य चोख पाडीत असते. तिचा बोलविता धनी कोणीतरी वेगळाच असतो. अशावेळी थोडक्या शब्दात स्पष्ट नकार देऊन फोन कट करणे हा एकमेव उपाय असतो.

मनुष्याच्या वाढत्या गरजा आणि हातात खेळणारा पैसा या बदलत्या जगाची ओळख सांगतात. बँक आणि विविध अर्थ संस्था या काळाची गरज भागवत असतात. त्याच्या बदलत्या प्रवाहा बरोबर आपणासही बदलून त्यांचा योग्य तितका पण फायद्यासाठी वापर करून घेता आला पाहीजे.

~संदीप कुलकर्णी