Sunday 10 November 2019

फक्त पंच्चाहत्तर ...

बाबांच्या पंच्चाहत्तरी च्या निमीत्ताने मला विनंती वजा आदेश करण्यात आला की मी बाबांच्यावर काहीतरी लिहावं. कदाचित माझ्या वैवाहीक जीवनातला हा अनेक कठीण प्रसंगांपैकी एक! आजतागायत बरेच प्रसंग कसेबसे निभावले पण आता यातून सुटका होणे शक्य नाही. नक्की काय लिहावं आणि कसं मांडावं. दस्तुरखुद्द सौ चेच पिताश्री असल्याने फारच कडक परीक्षण होणार यात शंका नव्हती. असो. तरीपण मी धाडस करून चार ओळी खरडण्याचे आव्हान स्विकारले. पर्यायच नव्हता.

तसे बाबा हे जरी अख्या कोल्हापूरचे “देवळे सर” असले तरी माझा आणि त्यांचा परिचय हा सासरे-जावई असाच! आमचे लग्न ठरल्या नंतर माझे त्यांच्या घरी येणे जाणे वाढले आणि हळू हळू त्यांचा स्वभाव समजत गेला. बाबा स्वभावाने अतिशय  साधे आणि बिनधास्त! त्यांच्याशी बोलताना कधीही संकोच वाटत नाही. मला खात्री आहे, त्यांचे विद्यार्थी सुध्दा त्यांच्याशी असेच अगदी मित्राप्रमाणे बोलत असणार. बाबांचे क्रिकेट आणि राजकारण हे भलतेच आवडीचे विषय! त्यांच्या इतर नातलगां बरोबरच्या क्रिकेट विषयावरील गप्पा या मॅच पाहण्यापेक्षा अधिक रंगतदार असतात. या माणसाला आयुष्यात कधी राजकारण करता आले नसले तरी राज्य पातळी वरील असो किंवा राष्ट्र पातळीवरील असो, याना राजकारणातील इत्यंभूत ज्ञान! कोण काय बोलला, कोणाची काय राजनीती, कोण चाणक्य आणि कोणाची काय प्रतिमा अशा सर्व महत्वपूर्ण माहीतीचा महासागर म्हणजे बाबा! निवडणूका असोत अथवा कोणतीही सनसनाटी घडामोड असो, बाजारात छापून येणाऱ्या सर्व वर्तमानपत्रांची घरी हजेरी लागते. मुख्य म्हणजे सर्व वर्तमानपत्रांतल्या बातम्या वाचल्या शिवाय त्यांची गणती रद्दी मधे होत नाही.

आमच्या लग्नाला तब्बल १९ वर्षे झाली आणि माझ्या पाहण्यात बाबा रिटायरच झालेले आहेत. तरीपण या माणसामधे कमालीचा उत्साह ठासून भरलेला आहे. शाळेतून निवृत्ती घेतली तरी त्यानी त्यांची कामं कधी थांबवली नाहीत. कधी क्लासेस घेणे तर कधी पुस्तके लिहणे, कधी पेपर सेट करणे तर कधी पेपर तपासणे. सतत कार्यमग्न. तीन्ही मुलींची लग्नं झाल्यावर मुलीनी त्याना सर्व बंद करण्यासाठी बरेच समजावले, पण त्याना स्वस्थ बसणे मान्य नव्हते. कार्यमग्न असण्याचा एक फायदा असतो, माणूस आनंदी राहू शकतो. बाबांचा एक मोठा गैरसमज आहे.. तो म्हणजे ते स्वत:ला अजूनही तरूणच समजतात. कोल्हापूरच्या आसपासच्या परीसरात बरेच दिवस ते इवल्याशा स्कुटीवरून मस्त फिरत असायचे. कदाचित त्यांची स्कुटी च म्हातारी झाल्यामुळे त्यांचा हा प्रवास कमी झाला असावा. त्यांच्यामधे अजून एक सळसळणारी तरूणाई म्हणजे आमच्या बॅगा उचलणे. जर कधी आम्ही एकत्र प्रवास करीत असू तर माझ्या आधी बॅगा उचलून पुढं चालू लागतात. आता मी हमालाचा सौदा पटवू का बाबाना सांभाळू अशा बाक्या प्रसंगाला मी हजारदा सामोरा गेलोय. गडबडीनं हातातली कामं टाकून त्याच्या हातातली बॅग काढून घेण्याची झटापट करावी लागते. बाबांच्या बरोबर जर कधी रिक्षाने प्रवास करायचा प्रसंग आलाच तर भाड्याचे पैसे देण्यासाठी त्यांची भलती गडबड! त्या रिक्षावाल्याला जादा भाड्या बद्दल विचारू का बाबांना पैसे देण्या पासून थोपवू असा यक्ष प्रश्न मला आजही पडतो.

समस्त कोल्हापूर कराना मिसळ आवडणे हा नियम असला तरी शहरातील विवीध मिसळी सविस्तर वर्णन करून दुसऱ्याना खायला घालणे हा सच्च्या कोल्हापूरकराचा एक छंदच असतो. आई आणि बाबा या गोष्टीला मुळीच अपवाद नाहीत. वास्तविक मी कोल्हापूरातच शिकलो असलो तरी नोकरी निमीत्ताने बाहेर असतो. तरीपण ज्यावेळी कधी मी सासुरवाडीला भेट देतो त्यावेळी किमान एकदा तरी खासबाग मिसळ वाल्याला माझ्या नावाने दक्षिणा दिल्याशिवाय त्याना चैन पडत नाही. बाबाना अख्खं कोल्हापूर ओळखत असल्यामुळे पावलो पावली “नमस्कार सर” म्हणणारे लोक भेटतात. प्रत्येकाला “आमचे जावई” अशी ओळख एखाद्या युध्दवीराच्या थाटात करून देतात. त्यांच्या कन्ये बरोबर संसार करणे हे काही युध्दवीरापेक्षा कमी नाही याची जाणिव त्यानी ठेवली असावी. बाबांचा अजून एक जाज्वल्य अभिमान म्हणजे परदेशात गेलेले जावई. आम्ही सिंगापूरला राहू लागल्यावर बाबाना अतिशय आनंद झाला. माझ्या ओळख परेड मधे सिंगापूरचे जावई असा तुरा खोचला गेला. बाबांच्या असलेल्या प्रचंड ओळखीचा फायदा सुध्दा आम्ही पुरेपूर करून घेत असतो. RTO असो वा income tax चे, जन्म दाखला असो वा आणि काही, बाबांच्या ओळखीने कामे पटापट होतात.

आई बाबा यांच्या काही गोष्टींमधे कमालीची एकवाक्यता असते. इतर किरकोळ वाद वगळता त्यांच्या बऱ्याचशा आवडी निवडी अफलातून जुळतात. चित्रपट नाटकां पासून ते छोट्या मोठ्या प्रवासाच्या आवडी पर्यंत अनेक बाबतीत त्यांचे एकमत असते. दोघांच्या कितीही तब्येतीच्या तक्रारी चालू असल्या तरी त्यांचे साहसी प्रवास थांबत नाहीत. अचानक कधीतरी आईंचा डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेला वारीतला फोटो पाहीला की स्वप्ना घाबरून जाते. बऱ्याचदा एखाद्या चित्रपटाला आम्ही जावे का जाऊ नये अशी चर्चा चालू असतानाच आईंकडून चित्रपटाचे रेटींग ऐकायला मिळते. आई बाबानी तो चित्रपट कधीच पाहिलेला असतो. बाबांच्या कुतूहलाचा अजून एक विषय म्हणजे जावयाचा पगार. मला थेट कधीही विचारले नाही तरी मुलीला दरवर्षी हा प्रश्न विचारला जातो. आम्ही सुखात आहोत, आमची मुळीच काळजी करू नका असे जरी सुकन्येने निक्षून सांगितले तरी त्याना चैन पडत नाही. कोणत्याही बापाला मुलीचा संसार सुखाचा चालू आहे यापेक्षा अजून काय हवं असतं!

बाबांची पंच्चाहत्तरी करायची म्हणजे बाबा म्हातारे झालेत असे मुळीच नाही. आजही ते कॅरम खेळताना नातवंडांच्या वयाचे होऊन भांडतात. पत्ते खेळताना त्यांच्यात चैतन्य संचारलेले असते. क्रिकेटची मॅच पाहताना तल्लीन होऊन जातात. आम्ही पंच्चाहत्तरी साजरी करू अथवा उद्या शंभरी करू.. त्यांच्यातला तरूण हा चिरतरूणच राहणार.

1 comment:

  1. खुप छान. देवळे सरांना पण अनेक शुभेच्छा!

    ReplyDelete

Name:
Message: