Thursday 26 July 2018

ब्रेनस्ट्रोक


[बाबांवर झालेला ब्रेनस्ट्रोक चा आघात हा केवळ त्यांच्या शरीरावर झालेला घाव नसून तो आम्ही कुटुंबीयानी झेललेला महाप्रचंड वज्राघात होता. या मरणप्राय आघाताचा तब्बल २६ दिवसांचा प्रवास माझ्या काही अपुऱ्या शब्दात मांडण्याचा एक प्रयत्न]


सहा जून दोन हजार अठरा बुधवारचे माझ्या घडाळ्यातील साधारण पाच वाजून गेले होते. मी ओमानमधे मस्कतला प्रोजेक्टच्या कामात व्यस्त असताना मला ऑस्ट्रेलिया वरून भावाचा फोन आला. अशा वेळी फोन पाहून मला काही विचीत्र शंका आली. सहा तास पुढे असलेल्या ऑस्ट्रेलिया मधे त्यावेळी रात्रीचे अकरा वाजून गेले असणार या जाणिवेने मनात भीती उत्पन्न झाली. ऑस्ट्रेलिया मधे धाकटा भाऊ पंकज सकुटूंब रहात होता. आई बाबा पण त्याच्या बरोबर होते. त्यांच्या काळजीने क्षणभर मन कासावीस झाले. मन घट्ट करून फोन उचलला. पलिकडून त्याचा घाबरलेल्या अवस्थेत आवाज ऐकला. “दादा, बाबा ना हाॅस्पिटल मधे ॲडमीट केलंय. त्याना ब्रेनस्ट्रोक झालाय.” हा ब्रेनस्ट्रोक म्हणजे काय याचा मला काहीच गंध नव्हता. कधीतरी हा शब्द ऐकलेला असला तरी त्याच्या व्याप्तीची मुळीच कल्पना नव्हती. पण नक्कीच काहीतरी गंभीर असेल या कल्पनेनेबापरे! डाॅक्टर काय म्हणतायत? आणि आता बाबा कसे आहेत?” असा प्रश्न उमटला! “डाॅक्टर तपासत आहेत, उद्या सकाळी त्यांच्याशी बोलून मी सांगेन.” 

पंकजची ती रात्र हाॅस्पिटल मधेच गेली तर माझी भयाण! रात्रभर नानाविध विचार डोक्यात येऊ लागले. त्या रात्री ॲडमीट केलेल्या हाॅस्पिटल मधून दुसऱ्या हाॅस्पिटल मधे बाबाना हलवावे लागले. मी सकाळ होण्याची वाट पाहू लागलो. पहाटेच उठून सिडनेला फोन लावला. पंकजचा सूर अधिकच चिंताग्रस्त वाटला. डाॅक्टरनी अगदी निर्वाणीचा संदेश दिला होता. आता मात्र मी ताबडतोब सिडनीला जाण्याचा निर्णय घेतला. सिंगापूरच्या विमानाचे तात्काळ बुकींग केले आणि संध्याकाळी सिंगापूरच्या दिशेने उड्डाण केले. सिंगापूरात शुक्रवारी सकाळी वाजता पोचलो आणि ताबडतोब १० वाजता व्हिसा ऑफीसमधे अर्ज देण्यासाठी पोचलो. तात्काळ व्हिसा साठी जास्त फी बसेल असे गोड शब्दात सांगून आमचे स्वागत करण्यात आले. सर्व कागदपत्रे तपासल्यावर अगदी तात्काळ म्हणजे किमान सोमवार उजाडेल असे सांगून आमची रवानगी करण्यात आली. दरम्यान बाबांची शस्त्रक्रिया करून मेंदू मधे झालेला रक्तस्त्राव बाहेर काढणे सुरू झाले. पंकज वर सगळी जबाबदारी येऊन पडली होती. शस्त्रक्रिये पुर्वी डाॅक्टरनी पंकजला सांगितले कीशस्त्रक्रिया करून फारसा फायदा होणार नाही. तुम्ही करण्याचा निर्णय घेऊ शकता.” अशा परिस्थितीत पंकजची मानसिक अवस्था खुपच कठीण झाली होती. काय करावे त्याला सुचत नव्हते. त्याने मला पुन्हा फोन लावला आणि सर्व कल्पना दिली. यातून काय मार्ग काढावा हे समजतच नव्हते. “जर यातून वाचण्याची संधी % जरी असेल तरी आपण या शस्त्रक्रियेस नकार देता कामा नये. अखेरीस जे काही होणार ते देवाच्या हाती.” या माझ्या वाक्याने त्याला थोडा धीर आला आणि त्याने ताबडतोब शस्त्रक्रियेसाठी मंजुरी दिली. मला बाबांच्या ओढीने कधी एकदा तिथे पोचतो असे झाले होते तर पंकजला मनावरचे दडपण हलके करण्यासाठी मी लौकरात लौकर यावे असे वाटत होते. शनिवार रविवार फक्त वाट पहाण्यात गेले. स्वप्ना आणि मुलीना पण धक्का बसला होता. अशा प्रसंगी शाळा, अभ्यास सोडून आजोबाना भेटण्याची ओढ मुलीना लागली होती. स्वप्नाचे डोळे सतत पाणावत होते. तिने आता सर्वांचीच बॅग भरून ठेवली

सोमवार ११ जून रोजी ऑस्ट्रेलिया एंबसी मधून फोन आला. त्यानी अडचण समजून घेऊन हळहळ व्यक्त केली. पण आम्हा चौघाना ताबडतोब मेडीकल चेकअप केल्याशिवाय व्हिसा मिळू शकणार नाही याची गोड शब्दात कल्पना दिली. या नवीन आलेल्या अडथळ्यामुळे मन अधिकच सैरभैर झाले. सत्तेपुढे शहाणपण दाखवता ताबडतोब त्यानी सांगितलेल्या पत्त्यावर दाखल झालो आणि चेकअप करून घेतले. आता चेकअप करणाऱ्या डाॅक्टरला त्याची भुमिका वठवायची होती. त्यानं मला आणि स्वप्नाला अनफिट घोषीत केले आणि सुखानं श्वास घेतला. मी त्याला सर्व परीस्थिती नीट समजावून सांगितली होती पण तरी त्यानं कायदा दाखवून आम्हाला गप्प केले. आता मात्र काय करावे काहीच समजेना. हतबल होऊन तिथेच बसून राहीलो. इतक्यात तिथल्याच एका स्टाफ ला आमची दया आली असावी. तिने आम्हाला जवळच्या लॅब मधे जाऊन ताबडतोब रक्त तपासणी करून येण्यास सांगितले. जर रक्त ठिक असेल तर आजच्या आज रिपोर्ट एंबसी ला पाठवण्याची हमी दिली. आम्ही तेवढेच सुखावलो आणि सर्व सुचना मुकाट्याने पाळल्या. चार वाजता एंबसी चे ऑफीस बंद होणार होते. त्या आधी आमचे रिपोर्ट तयार करण्याची त्या लॅब ना विनंती केली. तो पर्यंत पंकज बरोबर फोन चालूच होते. आज बाबा ना थोडीशी शुध्द होती. पंकजनं व्हिडीओ काॅल वरून बाबांच्याशी माझा संवाद घडवला. बाबांना सर्व नळ्या आणि वायरीच्या विळख्यात अडकलेलं पाहून मी अक्षरश: हादरलो. बाबानी मला अडखळत शब्दात सांगितलेसंदीप लौकर ये. मी वाट बघतोय.” माझे व्हिसाचे अचाट प्रश्न त्याना काय सांगणार! तरी पण उद्या नक्की येतोय असा खोटा दिलासा दिला. आईनं पण मला लौकर येण्याची विनंती केली. तिला थोडंसं समजावण्याचा प्रयत्न केला पण तरी उद्या येण्याचा प्रयत्न करतोय हेच सांगून संवाद संपवला. आता चार वाजून गेले होते. मेडीकल चेकअपचा काहीच रिझल्ट हातात आला नव्हता. माझे दहादा फोनचे प्रयत्न झाले पण कोणीच फोन उचलत नव्हते. आजचा दिवस फुकट गेला या जाणिवेने मन उदास झाले. अजून विमानाचे बुकींग केले नव्हते. पाच च्या दरम्यान फोन वाजला. “सर्व रिपोर्ट ओके आहेत आणि एंबसीला पाठवले आहेत.” हे शब्द कानावर पडले आणि जरा हायसं वाटलं. पण आता एंबसी तर कधीच बंद झाली असणार, या कल्पनेने फार काही उत्साह वाटला नाही. एंबसीला दोन तीन फोनच्या प्रयत्ना नंतर मी नाद सोडून दिला आणि स्वत:ला शांत करीत बसून राहीलो. “एंबसी आता बंद झाली आहे. आपण उद्या सकाळी फोन कराअसे सांगून माझा फोन कट केला गेला होता. साडे पाच वाजता माझा फोन पुन्हा वाजला. एका चायनीज महिलेने मी एंबसी मधून बोलतेय आणि आपली केस आम्ही ऑस्ट्रेलियाला तात्काळ मंजूरी साठी पाठवली आहे. आपल्याला उद्या सकाळ पर्यंत आम्ही मंजूरी कळवतो. अशी माहीती दिली. आता अजून वाट पाहणे आले. क्षणभर उत्साहीत झालेले मन पुन्हा हिरमुसले. आज प्रवास नाही यावर शिक्कामोर्तब झाले. अखेरीस दुसऱ्या दिवशी सकाळी साडे सात वाजता त्याच महिलेचा फोन आला आणि तिने सर्वांचे व्हिसा मंजूर झाल्याची बातमी दिली. ताबडतोब तिने इमेल करून सर्व कागदपत्रांची पुर्तता केली. एक मोठा टप्पा पार पाडल्याचा आनंद झाला. आता ओढ होती बाबाना भेटण्याची. पुढचे विमान संध्याकाळी साडे सात ला होते. म्हणजे अजून एक दिवस वाट पहावी लागणार.

मंगळवार १२ जून रोजी संध्याकाळी आम्ही चौघे विमानात बसलो. या वेळचा प्रवास हा सुट्टीचा किंवा मजेचा नव्हता. बाबाना भेटण्यासाठी आतूरलेला प्रवास सुरू झाला. अलीकडच्या काही वर्षात बाबा सतत आजारी पडायचे; त्यांच्यातली शक्ती, उत्साह क्षीण होत चालली होते. चालण्यातला वेग मंदावला होता. कानाला कमी ऐकू येऊ लागल्यामुळे त्यानी बोलणे कमी केले होते. एकंदरीत त्यानी वृध्दावस्थेत यथायोग्य प्रवास सुरू केला होता. माझ्या आठवणीतले बाबांचे रूप मात्र काहीसं वेगळे आहे. अतिशय उत्साही, आनंदी आणि छोट्या छोट्या प्रसंगातून विनोद निर्मीतीने वातावरण हलकं करून टाकण्याची त्यांच्याकडं कला होती. उगाच वाळली कटकट किंवा किरकिर त्याना माहीती नव्हती. चिडणं, ओरडणं, संतापणं त्याना ठाऊकच नव्हतं. आम्ही कितीही व्रात्यपणा केला तरी आमच्यावर हात उगारणं दूरच पण साधं रागावणं सुध्दा त्याना कधी जमलं नाही. त्यांचा त्यांच्या भावंडांवर अतिशय जीव होता. मोठ्या काकाना ते वडील स्थानी मानत आणि पाठच्या बहीणी अतिशय लाडक्या. मी मोठा मुलगा असल्यामुळे माझ्यावर त्यांचा खास विश्वास होता आणि काही प्रमाणात अपेक्षा पण होत्या. कितीही बिकट परिस्थिती आली तरी डगमगून जायचं नाही, शांतपणे विचार केलास तर नक्की मार्ग सापडेल. हे तत्व फक्त सांगतच नव्हते तर बऱ्याचदा त्यानी सिध्दपण करून दाखवले होते. त्यांच्या खंबीरपणा मधे कुठेतरी अव्यक्त हळवेपणा दडलेला होता. मनानं खंबीर असलेले बाबा आता शरीरानं ढासळू लागले होते. प्रवास दगदग त्याना नकोशी वाटू लागली होती. आमच्या करीयरच्या सुरवातीस बाबानी आम्हाला परदेशात संधी शोधण्यास प्रोत्साहन दिले होते; पण आता मात्र त्याना अशा वृध्दापकाळी परदेशात येऊन राहण्याचा तिटकारा वाटत होता. त्यांच्या तब्येतीची काळजी म्हणून आई-बाबा दोघानाच भारतात ठेवणे आम्हाला शक्य नव्हते. थोडे फार त्यांच्या मनाविरूध्दच कधी ऑस्ट्रेलिया तर कधी सिंगापूर असे त्याना रहावे लागे. गेल्या काही महिन्यां पासून त्यानी व्यवहारातून, संसारातून विरक्तीच घेतली होती. आई बरोबर ग्रंथ वाचन, काही टिव्ही वरील मालिका आणि सतत राम नामाचा जप एवढ्या गोष्टी त्याना दैनंदिनासाठी पुरेशा होत्या. “तुम्ही कुठेही जा, काहीही करा पण मला बाहेर कुठेही घेऊन जाऊ नका. मला बाहेर येण्याचा त्रास होतो.” इतकीच माफक अपेक्षा त्यांनी ठेवली होती. एक इच्छा मात्र ते कायम बोलून दाखवतमाझा शेवट तेवढा भारताच्या मातीतच होऊ दे.” या अपेक्षेची पुर्ती करण्याचे सामर्थ्य आम्हा भावांमधे नव्हते. ते केवळ दैवाच्याच हातात होते.

बुधवार १३ जून रोजी सकाळी वाजता आम्ही सिडने ला पंकजच्या घरी पोचलो. आमची ताबडतोब हाॅस्पिटलमधे जाण्याची इच्छा होती. पण सकाळी सर्वाना परवानगी देणार नाहीत म्हणून फक्त मी एकटाच पंकज बरोबर भेटायला गेलो. ऑस्ट्रेलिया मधील ते सर्वात मोठे हाॅस्पिटल होते. अवाढव्य पसारा होता. एका विभागा मधून दुसऱ्या विभागात जायला आजारी लोकांसाठी आतमधे वाहनाची सोय केली होती. आम्ही मात्र चालतच न्यूरो सर्जरी डिपीर्टमेंट गाठले. वास्तविक सकाळी ११ नंतरच भेटण्याची वेळ असे. पण सकाळी वाजता डाॅक्टरांची फेरी असे. आम्ही दोघे बाबांच्या जवळ पोचलो. अंथरूणावर सर्व नळ्या आणि वायरींच्या विळख्यात गुरफटलेले बाबा पाहून मी अश्रूंना थोपवू शकलो नाही. बाबा अजून ग्लानी मधेच होते. त्याना कदाचित अजून मी आलेलं कळले नसावे. पंकजनं मला बसायला खुर्ची दिली. मी आवंढा गिळून पुन्हा उभा राहीलो. डाॅक्टर आले होते. पंकज त्यांच्याशी बोलत होता. फिजीओ आणि स्पीच थेरपी चालू करण्याचा त्यानी सल्ला दिला. थोड्या वेळात बाबा जागे झाले. मला ओळखल्याचे भाव त्यांच्या चेहऱ्यावर उमटले. जीभ जड झाल्यामुळे काहीतरी अस्पष्ट आणि क्षीण पुटपुटले. मला काहीच बोध झाला नाही. तरीपण त्यांच्या बोलण्याच्या प्रयत्नाने आम्हाला बरे वाटले. थोड्या वेळात फिजीओ थेरपी वाले आले. त्यानी बाबां कडून हाताचे पायाचे बरेच व्यायाम करून घेतले. अंगात त्राण नसल्यामुळे दमल्यासारखे झाले आणि त्याना बसल्या जागीच डुलका लागला. डोक्या मधून एक पाईप बाहेर आलेली दिसत होती. त्यातून सतत रक्त बाहेर काढणे चालू होते. केवढे तरी सारे रक्त त्यांच्या मेंदूमधे पसरले होते. पुर्ण रक्त बाहेर यायला डाॅक्टरांच्या मते किमान सात आठ दिवस तरी लागणार होते. मुख्य म्हणजे जिथं रक्तवाहीनी फुटली होती तिथं खपली बसून रक्त वाहण्याचं थांबणं गरजेचं होतं. बाबाना झोपेतच व्यायाम करून घेणं चालू होतं. त्यांची उजवी बाजू पुर्णत: थंड झाली होती. डाॅक्टर कसोशीनं त्यात जिवंतपणा आणण्यासाठी प्रयत्न करीत होते. अर्धवट झोपेतच बाबानी डावा हात पाय हलवले पण उजव्या बाजूसाठी त्याना बरेच कष्ट घ्यावे लागले. आम्हाला उजव्या बोटांची थरथर जाणवली. अनेक वेळा प्रयत्न करूनही साधी मुठ पण बंद करता येत नाही या विचाराने त्याना बराच त्रास झाला असणार. अखेरीस त्यानी प्रयत्न सोडून दिले आणि पुन्हा झोपी गेले.

गुरूवार १४ जून आमच्यासाठी सुखाचा दिवस ठरला. आज सकाळ पासून बाबा जागे होते आणि अस्पष्ट बोलू शकत होते. आज आई बाबांच्या लग्नाचा ४५ वा वाढदिवस होता. आमच्या बरोबर मोकळेपणाने गप्पा जरी मारू शकले नाहीत तरी खुणेने आमच्या बोलण्यांमधे सहभाग घेऊ शकत होते. कदाचित त्याना तारखेचे भान नसावे. आई ने एक दोनदा विचारण्याचा आणि सांगण्याचा प्रयत्न केला पण फार समजल्याचे चिन्ह त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले दिसले नाही. अजून नळ्या आणि वायरींचे जाळे त्यांच्या भोवती विणलेले होते. तोंडातली ऑक्सिजनची नळी काढून फक्त नाकाच्या बाहेर ठेवण्यात आली होती. आज फिजीओ थेरपीला सुध्दा बराच चांगला प्रतिसाद देऊ लागले होते. त्याना बेड वरून उचलून एका आराम खुर्चीत ठेवण्यात आले. स्पीच थेरपीस्ट ने आज हलका आहार चालू करून पाहीला. बाबानी पण चांगला प्रतिसाद दिला. तोंडाने घास घेऊन तो व्यवस्थित गिळला. नाकात घातलेली फूड सप्लाय पाईप आता निघेल याचा आनंद आम्हाला झाला. अजून खायला हवाय का या प्रश्नावर त्यानी होकार दर्शवला. मी पण उत्साहाने बाबाना काही घास भरवले. आज सर्वांनाच बाबांची प्रगती पाहून बरं वाटत होतं. आता हळू हळू सर्व नळ्या निघून जाणार या कल्पनेने आम्हाला बरं वाटलं. बाबानी तब्बल कपभर सफरचंदाचा गर खाल्ला होता. तो दिवस आणि नंतरची रात्र आमची खुपच समाधानाची गेली.

शुक्रवार १५ जून हा दिवस आमच्यासाठी काही विचीत्र दिवस उगवला होता. सकाळीच आम्हाला सांगण्यात आले की बाबांनी गिळलेल्या अन्नाचे कण श्वास नलीकेत जाऊ लागलेत. या शिवाय बाबाना बराच कफ झाला होता आणि तो त्याना गिळायला बराच त्रास होत होता. तोंडात साठलेली लाळ, घशात भरलेला कफ श्वसन नलिकेमधे पाझरू लागला होता. त्यांचे बीपी, ऑक्सिजन लेवल, पल्स आणि रेस्पिरेशन बऱ्यापैकी सामान्यच होती. पण बाबाना सतत ग्लानी येत होती. मोठमोठ्याने श्वासाचा आवाज येत होता. तोंड करून भरलेला कफ बाहेर काढण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत होते पण त्याना ते मुळीच जमत नव्हते. डाॅक्टर आणि सिस्टरनी तोंडातला कफ सक्शन करून काढणे चालू केले. कफ पातळ होण्यासाठी तोंडाला न्युंम्बलायझर लावण्यात आले. सक्शनच्या प्रक्रियेमधे तोंडातील त्वचा पण खेचली जायची. बाबांच्या वेदना पाहून आईचा हुंदका थांबणे अशक्य होते. बाबांना वेदना सहन करायला लागत होत्या तर ते पाहून आमच्या काळजाचे पाणी होत होते. स्पीच थेरपीस्ट ने तोंडावाटे अन्न बंद करण्याचा निर्णय घेतला. पुन्हा नळी वाटेच अन्न सुरू झाले. आज बाबा जरा अधिकच ग्लानी मधे होते. आमच्या बोलण्याकडे त्यांचे मुळीच लक्ष जात नव्हते. बाबाना तुमचं नाव काय? मुलांची नावं काय? हा कोण? ती कोण? अशा अनेक प्रश्नांनी सतत भेंडावून सोडण्याचं काम आम्ही गेले काही दिवस चोख पाडत होतो. आज रोजच्या ओळख परेड मधे त्यांचा सहभाग शून्य होता. मी सुन्न डोक्याने बाहेर जाऊन बसून राहीलो. संध्याकाळी डिपार्टमेंट हेड डाॅक्टर अचानक आले. त्यानी बाबांचे रेस्पिरेशन खुपच खालावत चालल्याचे निदर्शनास आणून दिले. बाकीच्या डाॅक्टरना त्यानी बऱ्याच सुचना दिल्या. पंकज शेजारीच उभा होता. त्याला स्पष्ट शब्दात सांगितले की फुफ्फूसामधे त्रास चालू झाला आहे. असंच ठेवलं तर मृत्यू अटळ आहे. त्याना ICU मधे हलवावे लागेल. तुमचा कुटूंबाचा काही वेगळा निर्णय असेल तर ताबडतोब बोला. पंकज ने ICU साठी संमती दिली आणि मला ताबडतोब बोलावले. माझी पण त्याच्या निर्णयाला अनुमती होती.

शनिवार १६ जून रोजी बाबाना भेटायला आम्ही ICU मधेच गेलो. बाबाना न्युमोनियाची लक्षणे दिसत असल्यामुळे त्याच्या ॲंटी बायोटीकचा डोस सुरू केला होता. अंग थोडे गरम लागत होते. आॅक्सिजन पुरवठा ५०% ठेवलेला होता. बाबाना काचेच्या बंद खोलीत ठेवण्यात आले होते. आम्हाला प्रत्येकवेळी त्यानी दिलेला गाऊन घालूनच जावे लागे. कोणत्याही प्रकारची लागण होऊ नये याची खबरदारी घेतलेली असायची. मी ड्यूटीवर असलेल्या डाॅक्टरना भेटलो. त्यानी मला स्पष्ट सांगितले. स्ट्रोक मधून पुर्ण बरे होण्याची शक्यता खुपच कमी आहे. यातून माणूस फार कमी दिवस जगतो. मेंदू हा शरीराचा फार महत्वाचा अवयव असल्यामुळे जर तो कार्यरत नसेल तर बाकी सर्व यंत्रणा हळू हळू अकार्यक्षम होऊ लागतात. त्याच्या या स्पष्टोक्तीमुळे मन खट्टू झाले. बाबांना संपुर्ण वेळ ग्लानीत पाहून त्याचे शब्द कटू असले तरी सत्य वाटत होते. तरी सुध्दा मनात कुठेतरी एक आशा होती की काहीतरी चमत्कार घडेल आणि त्या डाॅक्टरचे भाकीत सपशेल खोटे ठरेल. आई आज त्यांच्या जवळ बसून रामरक्षा म्हणू लागली. राम नामाचा जप ऐकून बाबा क्वचित डोळे उघडायचे. आईच्या सुरात सूर मिसळून राम नाम घेऊ लागायचे. पण पुन्हा काही मिनीटात त्याना ग्लानी यायची आणि भान हरपायचे.

रविवार १७ जून सुध्दा आमच्यासाठी फार काही विशेष दिवस ठरला नाही. ग्लानी चे प्रमाण थोडे कमी झाले होते पण आता आम्हाला ओळखणे त्याना कठीण जात होते. आईला सुध्दा ते ओळखू शकले नाहीत. मला त्यानी काकांच्या नावाने संबोधले तर पंकजला काही तिसऱ्याच नावाने. त्यांच्या भावंडाचे फोटो सुध्दा त्याना अनोळखी वाटत होते. बाबांची नजर आता अनोळखी वाटू लागली होती. भाव हरपले असावेत अथवा भावना करपल्या असाव्यात. मला काय हवंय हे या लोकाना कसं समजवावं हाच त्याना प्रश्न भेडसावत असावा. कदाचित काय माहीत यातलं त्याना काहीच समजत नसावं. सर्व केवळ आमच्याच कल्पनेचे खेळ. खरी कसोटी आईची होती. बाबांची ढासळत जाणाऱ्या सामान्य परिस्थितीची जाणीव तसेच वाढत चाललेले विस्मरण लक्षात जरी येत असले तरी पचवणे तिला खुप अवघड होते. रोज संध्याकाळी बाबाना एकट्याला हाॅस्पिटल मधे सोडून जाणे आईला मान्य नव्हते. पण नियमां समोर आमचे काही चालत नव्हते. कित्येकदा तिनं ओठावर आलेला हुंदका गिळलेला आमच्या लक्षात येत होता. माझे तर हृदय पिळवटून जायचे. बाबांची ही अशी अवस्था पाहून माणसाची अवस्था किती पराधीन आहे याची कल्पना येत होती. बळ, सामर्थ्य, उर्मी, धाडस, जिद्द, स्वाभिमान, अहंकार, पैसा, सत्ता या सर्व गोष्टी अशा अवस्थेत पोचल्यावर क्षुद्र वाटू लागतात. स्वत:च्या तोंडाला लागला कण सुध्दा काढण्याची क्षमता नष्ट झालेली असते. बऱ्याचदा बाबांच्या पाठीखाली वायरी अडकत. त्याचे व्रण उमटत, टोचत. त्याना नक्कीच त्याचा त्रास होत असणार, खाज सुटत असणार, नकोसं वाटत असणार. पण ते बाजूला काढणं दूर, साधं ते आम्हाला सांगू पण शकत नव्हते. रोज संध्याकाळी बाहेर पडताना आई बाबांच्या जवळ जाऊन खुप बोलायची. तुम्ही एकटं वाटून घेऊ नका. आम्ही बाहेरच आहोत. लगेचच परत येतो. असं बरंच काही बोलायची. बाबाना त्यातलं काहीच समजत नसावं. ते शून्य भावनेने ऐकत असंत. आम्हाला कुठे जाताय असा साधा प्रश्नही विचारला नाही. या सर्व गोष्टींची कल्पना असली तरी आम्ही आई ला बोलण्या पासून थांबवलं नाही. क्वचित सांगण्याचा प्रयत्न केला. पण तिला तिच्या मनाचं समाधान करू दिलं. कदाचित तिलाही सर्व कल्पना असेल पण भावनेचा बुध्दीवर विजय होणं तिला पसंत असावं.

सोमवार १८ जून जसा उगवला तसा मावळला. कोणत्याही खास बदलासाठी हा दिवस नव्हताच मुळी. जसे काल घडले तसेच आजपण. अगदी बाबांच्याच बोलीत सांगायचे तरदिवसा मागून दिवस चालले...” अशी काहीशी आमची अवस्था झाली होती. आज ICU च्या नर्सने कोणत्यातरी इंग्रजी गाण्याची सीडी लावली होती. बाबाना कदाचित ती गाणी आवडली नसावीत. त्यांच्या निर्वीकार चेहऱ्याच्या आतमधे दडलेला त्रास आम्ही ओळखला. पंकजने अनुप जलोटा, भीमसेन जोशी अशा काही सीडीज आणून लावल्या. पंडीत भीमसेन जोशींच्या सर्व अभंगाला बाबा छान प्रतिसाद देऊ लागले. त्यांच्या मेंदू मधील कला संगीत यांचे ज्ञान ठेवणारा कप्पा अजूनही शाबूत होता. आम्हाला बरंच हायसं वाटलं. डाव्या हातानं बाबा छान ताल धरू लागले. त्यांच्या प्रतिसादाला पाहून कधी आशा पल्लवीत व्हायच्या पण आमच्या नावाच्या विस्मृतीने आमची घोर निराशा व्हायची. फुफ्फूसाच्या त्रासातून बाबा आता बरे व्हायला लागले होते. आॅक्सिजन आता ३०% आणि नंतर २५% केला गेला. बाबांचा श्वसनाचा त्रास पुर्ण थांबलेला पाहून आम्हाला हायसं वाटलं. तरी अजून नाकातून फूड पाईप घातलेलीच होती. बऱ्याचदा नकळत त्यानी ती पाईप ओढली होती. मीटर भर लांब नळी नाकावाटे खरडत खरडत पुन्हा जठरा पर्यंत घुसवावी लागे. ते करत असताना त्याना अशक्य वेदना होत असणार याची कल्पना सुध्दा करवत नाही. आमच्या दृष्टीस त्या वेदना दिसू नयेत म्हणून नळी घुसवताना आम्हाला बाहेर जायला सांगत असंत.

मंगळवार १९ जून तसा काही खास दिवस नक्कीच नव्हता. हाॅस्पिटल मधे सकाळी उठून येणे आणि दिवसभर बाबांच्याकडे बघत बसणे एवढाच आमचा उद्योग झाला होता. काय करावे काही कळत नव्हते; म्हणावे तशी काहीच सुधारणा होत नव्हती. बाबाना रोज थोडं थोडं मृत्यूच्या निकट जाताना पाहून रोज ओक्साबोक्शि रडण्याची इच्छा होत होती. आईला त्रास होवू नये म्हणून अश्रू गिळण्याचे प्रयत्न करीत होतो. जणू मृत्यू रोज दरवाजा ठोठवून जात होता पण आम्हीच दरवाजा उघडू देत नव्हतो. बाबांच्या श्रीरामाला आता बाबांची ओढ लागली असावी. बाबांच्या खोली मधला सीडी प्लेअर खराब झाला होता. पंकजने ताबडतोब नवीन प्लेअर आणला आणि बऱ्याच मराठी गाण्याच्या सीडी आणून ठेवल्या. बाबाना गाणी ऐकत बरे वाटत असावे. डाव्या हाताने ताल धरून गुणगुणायचे. त्यांची संगीतामधील एकरूपता पाहून आम्हीपण गोंधळून जायचो. एका बाजूला ते कोणालाच ओळखत नाहीत तर दुसऱ्या बाजूला त्याना गाणी पाठ, तेही अगदी चाली सहीत. बाबा नक्की बरे होतायत का नाही! मला एकंदरीत सर्व प्रकार गोंधळात टाकणारा वाटला. बाबांची प्रगती होणार का नाही याचं उत्तर मिळणे गरजेचे होते. मी ICU मधील एका तज्ञ डाॅक्टरना बोलावून हाच प्रश्न विचारला. त्यानी आम्हाला दुसऱ्या दिवसा पर्यंतची मुदत मागितली. उद्या सकाळी सर्व सविस्तर बोलू असे त्यानी वचन देऊन आमची त्या दिवशी रवानगी केली

बुधवार २० जून चा दिवस. आज ऑक्सिजन काढून टाकला. इतर सर्व गोष्टी अगदी सामान्य होत्या. जरी खुप सुधारणा नसली तरी तब्येत ढासळत मुळीच नव्हती. फिजीओ थेरपीचे सर्व प्रयत्न व्यर्थ जात होते. आजची आमची तज्ञ डाॅक्टर बरोबरची मिटींग महत्वाची ठरणार होती. ठरल्या प्रमाणे त्यानी आम्हाला मिटींग साठी बोलावले. मिटींग मधे आमच्या बरोबरीने समाजसेविकाना पण बोलवण्यात आले होते. डाॅक्टरांच्या उत्तराने वा निदानाने आमचे पुर्णत: समाधान होते का नाही या गोष्टीची काळजी या समाज सेविका घेतात. “मेंदू अजूनही पुर्णत: बरा झालेला नाही. आणि तो होण्याची शक्यता आता नाही. फिजीओ थेरपी आणि स्पीच थेरपींच्या मते बाबांमधे काहीच सुधारणा दिसत नाही. सर्व साधारणत: अशा रूग्णाना आठवड्यामधे सुधारणेची लक्षणे दिसू लागतात. आकुंचन पावलेल्या धमन्या आणि चेतासंस्थेच्या तारा पुन्हा कार्यरत होऊ लागतात. पण आज बारा दिवस झाले तरी काहीच सुधारणा दिसत नाही. या पुढे ते कायमच असे परावलंबी आणि स्मृतीशून्य राहतील. सर्वात कठीण गोष्ट म्हणजे त्याच्या घशामधील अन्न नलिका श्वासनलिके मधील झडप आता मेंदूच्या नियंत्रणा बाहेर गेली आहे. या कारणाने त्याना ठसका, खोकला, शिंक असे काही होऊ शकणार नाही. आणि त्याहून मोठा परिणाम म्हणजे श्वास अन्न यांचे स्वतंत्र कार्य होऊ शकणार नाही. अन्न कण, लाळेचे कण आदी सहजगत्या श्वास नलिकेत पाझरणार आणि मेंदूला त्याचे ज्ञान होणार नाही. श्वसनाच्या या अडथळ्यावर उपाय म्हणजे ट्रायकोस्टोमी. या मधे घशाला एक छिद्र करून श्वसनाचा मार्ग स्वतंत्र केला जातो. यात त्याना त्रास तर बराच आहे आणि आयुष्य फारतर दोन ते चार महिन्या पर्यंत वाढू शकेल. मुख्य जो स्मृती आणि मेंदूचा प्रश्न आहे, तो मुळीच सुटणार नाहीत.” डांक्टरांचा प्रत्येक शब्द उकळत्या तेला प्रमाणे आमच्या कानावर पडत होता. आम्हाला यावर काही मत द्यावे किंवा शक्यता विचारायला त्यानी जागाच ठेवली नव्हती. डाॅक्टरांचा आवाज कंप पावत होता पण आम्हाला परीस्थितीचे गांभिर्य स्पष्ट करीत होता. आई ला जरी प्रत्येक शब्द समजला नाही तरी अंतिम सत्य लक्षात आले होते. सरते शेवटी डाॅक्टरनी आम्हाला ट्रायकोस्टोमी वर विचार करून निर्णय घ्यायला सांगितला. माझी आणि पंकजची वाचाच बसली होती. त्यांचा बोललेला प्रत्येक शब्द सहस्त्र बाणां प्रमाणे टोचत होता. आम्ही शांतपणे पुन्हा बाबां कडे गेलो. बाबा थोडे जागे होते. आईने बाबां बरोबर रामरक्षा, भीमरूपी, गणपती अथर्वशिर्ष म्हणायला चालू केले. तिची होणारी कसरत मला बघवत नव्हती. आज जिवंत दिसणाऱ्या प्रिय व्यक्ती च्या समोर दिसणाऱ्या मृत्यूच्या भीतीने दु: अनावर झाले होते पण ते स्वत: राम नामाचा जप करीत होते. दुसरे दिवशी स्वप्ना आणि मुली सिंगापूरला परत येणार होत्या. त्यामुळे दोघी नाती आणि स्वप्ना बाबाना भेटायला आल्या. बाबाना थोडी जाग होती. त्यानी दोघी नातींना आणि स्वप्नाला ओळखले. आशिर्वाद पण दिला. मला तर काहीच समजत नव्हते. समोर दिसणाऱ्या जिवंत बाबांवर विश्वास ठेवावा का डाॅक्टरांनी सांगितलेल्या गोष्टीवर!

गुरूवार २१ जून रोजी सकाळीच मी स्वप्ना आणि मुलीना विमानात बसवून सिंगापूरच्या दिशेने रवानगी केली. माझ्या डोक्यात डाॅक्टरांनी बोललेला प्रत्येक शब्द शंखनादा प्रमाणे घुमत होता. लौकरच मी पोरका होणार या भीतीने मन कासाविस होत होते. आज डाॅक्टर ना ट्रायकोस्टाॅमी बद्दल निर्णय सांगायचा होता. पंकज बरोबर माझे बोलणे झाले. बाबाना आता अधिक त्रास देणे योग्य ठरणार नाही. असे आमचे एकमत झाले. डाॅक्टरना आम्ही आज पुन्हा भेटलो. त्याना आमचा निर्णय सांगितला. माझ्या तोंडातून तर शब्दच फुटत नव्हते. डाॅक्टरनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि सांत्वनाचा प्रयत्न केला. तुमच्या जागी मी असतो तर मी सुध्दा माझ्या वडीलांसाठी असाच निर्णय घेतला असता. असे बोलून आम्हाला दिलासा देण्याचा त्यानी प्रयत्न केला. एक आनंदाची गोष्ट म्हणजे कृत्रिम ऑक्सिजन काढून सुध्दा बाबांचे श्वसन गेले २४ तास ठिक चालू होते. अजून तरी त्याना श्वसनात कोणताही अडथळा आलेला नव्हता. डाॅक्टरनी सांगितले की जर अशीच परीस्थिती सुधारत गेली तर ट्रायकोस्टोमी ची गरजच पडणार नाही. आता मात्र खरोखर आम्हाला वेड लागायची वेळ आली होती. सुख आणि दु: जणू आमच्या घरामधे लपाछपीचा खेळ खेळत होते. क्षणात सुखावलेले मन पुढच्या क्षणाला दु:खाने कोलमडून जात होते. बाबांची ग्लानी वाढतच होती. आई बाबां बरोबर खुप गप्पा मारण्याचा प्रयत्न करीत होती पण एकही शब्द बाबां पर्यंत पोचत नव्हता

शुक्रवार २२ जून आज बाबाना हाॅस्पिटल मधे आणून तब्बल दोन आठवडे झाले होते. आम्ही सर्वजण बाकी सगळी व्यवधानं विसरून त्यांच्या जगण्याच्या आशेनं हाॅस्पिटलच्या चकरा मारीत होतो. रोज हाॅस्पिटल मधे प्रवेश करताना आज काहीतरी विपरीत घडणार अशा तयारीनेच जात होतो. पण अक्षरश: काहीच घडत नव्हते. विपरीत नाही तर काही सुखद तर मुळीच नाही. बाबाना आज खुर्चीत बसवण्यात आले होते. त्यांची खुर्ची आज बाहेर ट्रेरेस वर नेण्यात आली. तिथल्या ताज्या हवेनं आणि सुर्याच्या कोवळ्या उन्हाने त्याना बरे वाटण्याची शक्यता होती. पण कदाचित त्याना त्यातील काहीच समजत नव्हते. त्यांचे जिवंत असणे एखाद्या वृक्षा प्रमाणे होते. श्वास चालू आहे, हृदय धडधडत आहे आणि क्वचित जागेपण राम नाम घेतात म्हणून त्याना जिवंत म्हणत होतो. बाकी सर्व व्यवहारीक दृष्ट्या बाबा आमच्यापासून बरेच दूर निघून गेले होते. बाबा आता आपला आपण श्वासोश्वास करू लागले होते. बाकी सर्व शारीरीक प्रक्रिया सामान्य घडत होत्या. पुन्हा एकदा दिवसभराच्या प्रयत्नांती हाती काहीच लागल्या प्रमाणे आम्ही घरी परतलो

शनिवार २३ जून आता आम्हाला जरी बाबा ठिक वाटत असले तरी डाॅक्टर मान्य करायला तयार नव्हते. फिजीओ थेरपीस्ट बरेच प्रयत्न करून हार मानीत होते. स्पीच थेरपीस्ट त्याना तोंडावाटे अन्न द्यायला घाबरत होते. बाबाना ना गिळायचे ज्ञान होते ना थुंकण्याचे. जे काही तोंडात आहे ते तसंच साठून रहात होतं. आता पुन्हा एकदा सक्शन सुरू झाले. तो प्रकार पाहून माझ्या अंगावर पुन्हा एकदा शहारे आले. तशा ग्लानीत सुध्दा त्यांचा चेहरा वेदनेने वाकडा तिकडा होत असे. आमचे मन मारण्या शिवाय आम्हाला पर्यायच नव्हता. मी तर समोर उभं राहून त्रास होईल म्हणून खोलीच्या बाहेर तासंन तास बसून राही. आईला मात्र चैन पडत नव्हती. कितीही अश्रू गोळा झाले तरी ती त्याना आवरून बाबांच्या डोक्याशी बसून राही. आई ने आता भागवत वाचायला घेतला. बाबांच्या अंतिम समयी त्यांच्या कानावर भागवताच्या ओव्या पडू लागल्या. आता मात्र आम्ही सर्वानी हात टेकले होते. आई सहीत देवाकडं आता एकच मागणं मागत होतो. भगवंता, तुला जर बाबाना यातून बरं करायचं नसेल तर किमान त्यांचा शेवट वेदना विरहीत कर. मरताना या महाप्रचंड यातना नकोत. आत्म्याला देहातून बाहेर पडताना इतका त्रास नको देऊ. लौकर त्यांना मुक्त कर

रविवार २४ जून आज स्पीच थेरपीस्ट नी तोंडावाटे अन्न देण्याचा प्रयत्न केला पण तो फोल ठरला. फिजीओ थेरपीस्ट नी व्यायाम करून घेण्याचा प्रयत्न केला पण बाबांची ग्लानी काही केल्या संपेना. डाॅक्टरनी बाबाना आता ICU मधून बाहेर काढण्याचे ठरवले. पण अजून योग्य वार्ड मधे जागा उपलब्ध नव्हती. बाकी मशिनवर सर्व आकडे बाबांची तब्येत एकदम व्यवस्थित सांगत होते. आता मात्र एक वेगळीच शंका आमच्या मनात आली. जर बाबा याच स्थितीत कायम राहीले तर! ही त्रिशंकू सारखी अवस्था मरणाहून भयानक! या परीस्थितीत हाॅस्पिटल बाबाना किती दिवस सांभाळणार? त्याना घरी आणले तर त्यांची सेवा कशी करणार? सर्वजण आपापल्या उद्योगात रममाण होतील पण आईचे काय? तिला बाबांची सेवा करावी लागेल. तिला ते शक्य होऊ शकेल का? घरी बोलावून नर्सिंगची सेवा घेता येईल का? त्यांचा दर किती असतो? तो आपल्याला परवडू शकेल का? काही बाहेर नर्सिंग होम असतात. तिथंच जर बाबाना ठेवलं तर काय होईल? मुख्य म्हणजे असा हा सर्व खेळ किती दिवस? अशा नानाविध प्रश्नानी आणि शंकांनी डोक्यात काहूर माजले होते. हताश पणे आलेल्या परीस्थितीकडे त्रयस्था प्रमाणे पहात राहण्याशिवाय पर्याय नव्हता. कोणतीच गोष्ट निश्चित नव्हती. कोणताही निर्णय आमच्या हातात नव्हता. काल मर्यादेची मुळीच कल्पना येत नव्हती. मी आणि पंकज या सर्व शक्याशक्यतेवर फक्त चर्चा करीत होतो. पण कोणत्याच निर्णया पर्यंत पोचणे आमच्या हातात नव्हते.

सोमवार २५ जून आज बाबा पुन्हा ग्लानीतून जागे झाले. सकाळच्या वेळी बऱ्यापैकी तजेलदार वाटत होते. विस्मृतीत असलेतरी डोळे उघडून आमच्याकडं बघतायत यातच आम्हाला समाधान होते. आज फिजीओ थेरपीस्ट पण खुश झाला. हाताची हालचाल पायाची हालचाल थकता छान केली. आमच्या मनात पुन्हा एकदा आशा पल्लवीत झाली. मी समोर उभे राहून त्यांच्या समोर बोट धरले. ते पकडण्यासाठी त्यानी खांदे उचलून पुढं येण्याचा प्रयत्न केला. लहान बाळाचे पहिले पाऊल पाहून पित्याने खुश व्हावे तसा मी खुश झालो. फरक इतकाच होता की पुत्राच्या भुमिकेत खरे वडील होते तर पित्याच्या भुमिकेत खरा पुत्र! कागदावर पेनानं लिहून बाबां कडून अक्षर ओळख सुध्दा पडताळून घेतली. बाबांनी अस्पष्ट अक्षरे उच्चारल्यावर आमचा आनंद गगनात मावेना. बाबाना + किती विचारल्यावर मात्र अभ्यासक्रमाच्या बाहेरचा प्रश्न विचारल्या प्रमाणे त्यानी सर्रळ दुर्लक्ष केले. कला, संगीत, खेळ आदी संबंधीत स्मृती अजूनही जागृत होत्या. पण तर्कज्ञान तसेच सामान्य अस्तित्व ज्ञान पुसून गेले होते. आज पुन्हा एकदा त्याच डाॅक्टरना भेटायचे ठरले होते. त्यानी आज पुन्हा सर्व प्रयत्न फोल जात असल्याचे सांगितले. तरी पण बाकी सर्व शरीर संस्था कार्यरत असल्यामुळे असेच किती दिवस चालू राहील याचा अंदाज देण्या बद्दल असमर्थता दर्शवली. यातून सुटका नाही हे निश्चित! आमचे मन आता निर्ढावले होते. घडणारे सर्व प्रसंग सहज पचवण्याचे बळ आता गोळा केले होते. डोळ्या मधले अश्रू आटून गेले होते. घडणाऱ्या प्रसंगाला निर्वीकार चेहऱ्यानं स्विकारण्या शिवाय पर्याय शिल्लक नव्हता. जाता जाता डाॅक्टरलाच रहावले नाही. त्यानी मला मिठी मारली. तुम्ही चांगली मुले आहात. तुमच्या वडिलाना तुमचा नक्कीच अभिमान वाटत असेल. असे बोलून त्यानी स्वत:चे डोळे पुसले. मी मात्र शून्य नजरेत पहात बसून राहीलो.

मंगळवार २६ जून बाबाना आता पुन्हा घशाचा आणि श्वसनाचा त्रास सुरू झाला होता. त्यांच्या श्वसनाचा आवाज भलताच मोठा झाला होता. तो आवाज ऐकून आम्हाला पण भीती वाटत होती. बाबाना आता दुसऱ्या डिपार्टमेंट मधे हलवणार होते. त्या विभागाचे प्रमुख डाॅक्टर आम्हाला भेटायला आले. त्यानी आम्हाला परीस्थितीची कितपत कल्पना आहे याचा अंदाज घेतला. पंकज ने आम्हाला समजलेल्या सर्व गोष्टींची माहीती दिली. त्या डाॅक्टरनी त्यावर समाधान व्यक्त केले. या पुढं काय यावर त्यानी आमचे मत विचारले. आम्ही यावर मात्र काहीच बोलू शकलो नाही. डाॅक्टरनी यावर काही पर्याय सांगितले. एक तर त्याना एखाद्या नर्सिंग होम मधे हलवण्यात येईल. पण अजून किती दिवसानी ते सांगता येत नाही. त्याना घरी घेऊन जाण्याची परवानगी मिळेल पण घरी २४ तास नर्स ची सोय उपलब्ध झाली पाहीजे. अन्यथा तिसरा पर्याय म्हणजे त्याना भारतात घेऊन जाणे. आम्हाला तर काहीच सुचत नव्हते. डाॅक्टरनी नीट विचार करून शांतपणे सांगा असे सांगितले. आज बाबा पुन्हा थोडे जागे झाले होते. रामरक्षा आणि राम नाम चालूच होते. फक्त ग्लानीत असताना ते जप करू शकत नव्हते. त्यांच्या जागं होण्याच्या आणि अस्पष्ट बोलण्याचा आनंद मानावा का नाही या संभ्रमात आम्ही पडलो होतोपराधीन आहे जगती पुत्र मानवाचा.

बुधवार २७ जून बाबाना आज Aged Care विभागामधे हलवण्यात आले. या विभागात अगदी जरा जर्जर वृध्दाना ठेवण्यात येते. असे वृध्द जे आयुष्याच्या अंतिम घटका मोजत आहेत. या लोकांची सेवा करणाऱ्या हाॅस्पिटलच्या स्टाफचे विशेष कौतुक! अनेक वृध्द मरणाच्या दारात उभे. त्यांचे मल मुत्र सर्व काही पहावे लागे. काही जण तर उगाचच चिडचीड करणारे! नर्स च्या अंगावर खेकसणारे, काही भ्रमिष्ट, अचानक उठून कुठेतरी चालू लागणारे. काही उगाचच बोलवून काहीतरी मागणारे! अशा विभागामधे बाबाना एका कोपऱ्यात ठेवण्यात आले. आसपासच्या सर्व वृध्दांना पाहून जणू आयुष्याचे अंतिम सत्य समोर उघडल्या प्रमाणे वाटत होते. बाबाना मात्र ग्लानी मधून जागच येत नव्हती. त्याना हलवल्याची जाणिवच नव्हती. आम्ही मात्र एका विभागातून दुसऱ्या विभागात येऊन बसलो होतो आणि पुन्हा त्याच दु: सागरात बुडून गेलो होतो. बाबाना काही वेदना होतायत का? ते काही विचार करीत असतील का? करत असतील तर काय विचार करीत असतील? त्याना आमचा राग तर येत नसेल ना? त्याना काही सांगायचे राहून तर गेले नसेल ना? त्यांची काही अंतिम इच्छा अपूर्ण तर राहीली नसेल ना? एक ना अनेक! अनेक प्रश्नांचे काहूर माझ्या आणि पंकजच्या मनात माजले होते

गुरूवार २८ जून आज तब्बल २२ दिवस झाले होते पण भविष्य अजून अंधारातच होते. आम्ही काहीच निर्णय घेऊ शकत नव्हतो. प्रवाहात अडकलेल्या वस्तू प्रमाणे फक्त वहात जाणे आमच्या हातात होते. प्रवाहाला विरोध करणे तर दूरच, प्रवाहाची दिशा बदलणे सुध्दा आम्हाला शक्य नव्हते. बाबांची एक इच्छा होती की शेवटचा श्वास भारताच्या मातीत घ्यावा. किमान ते तरी शक्य करता येईल का? प्रयत्न करून पहावा. आता मी ठरवले, बाबांची अंतिम इच्छा पुर्ण करायचीच. पंकजला मात्र बाबाना प्रवास जमणे शक्य नाही या बद्दल खात्री होती. मी मात्र ठरवले किमान प्रयत्न तरी करू. डाॅक्टर काय म्हणतात ते तरी पाहू. मी सोशल वर्कर ला भेटलो. सर्व शक्यता बोलून दाखवल्या. भारतात घेऊन जाण्याचे पर्याय विचारले. त्यांचा अंदाजे खर्च किती विचारले. तिच्या कडे माहीती काहीच नव्हती. पण तिने भारतीय दूतावासा मधे विचारायला सांगितले. अजून काही माहीती मिळवण्याचा प्रयत्न करते असे वचन दिले. मी सर्व प्रथम भारतीय दूतावासाच्या सिडनी ऑफिसमधे फोन केला. अपेक्षे पेक्षा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानी शक्य ती सर्व मदत करण्याची हमी दिली. शिवाय आर्थिक निकषावर दहा हजार डाॅलर पर्यंत मदत करण्याची तयारी दाखवली. या शिवाय एअर इंडीया आणि सिंगापूर एअर लाईन्स सुध्दा या मधे बरीच मदत करू शकतील अशी माहीती दिली. त्यानंतर मी एअर इंडीया, सिंगापूर एअरलाईन्स ना एक एक करून फोन केला आणि बरीच माहीती गोळा केली. जरी बराच खर्च होत असला तरी अगदीच अशक्य नाही हे लक्षात आले. आता फक्त डाॅक्टरांच्या बरोबर चर्चा करणे गरजेचे होते. डाॅक्टरानी दुसऱ्या दिवशी भेटण्याचे कबूल केले.

शुक्रवार २९ जून रोजी सकाळ पासून बाबांची तब्येत खालावत चालली होती. सकाळ पासून दोन तीन वेळा पोट साफ झाले होते. बाबा अजूनही ग्लानी मधेच होते. अंग थोडे गरम लागत होते. डाॅक्टरनी सकाळी तपासले आणि न्युमोनिया ची लक्षणे असण्याची शक्यता सांगितली. बाबाना आता पुन्हा श्वसनाचा त्रास सुरू झाला. घशामधे साठलेला कफ आता फुफ्फूसा मधे पाझरू लागला होता. ताबडतोब बाबाना ॲंटी बायोटिक चा डोस दिला. न्युमोनिया पुन्हा नियंत्रीत करण्याचे प्रयत्न सुरू झाले. आता बाबांच्या शरीरात मुळीच शक्ती उरलेली नव्हती. गेल्या तीन आठवड्यां पासून चाललेल्या शरीरा बरोबरचा यातनांमुळे प्रतिकार शक्ती संपलेली होती. निव्वळ केविलवाणा देह अबोलतेने नको नको सांगत होता. आमचेच कान ठार बहिरे झाले होते किंवा आमची हृदये पाषाणा पासून बनल्यामुळे आमच्या कानावर पडत असलेला त्यांचा टाहो आमच्या अंतर्मनाला ऐकू जात नव्हता. कधी कधी वाटे की आपणच घ्यावे एखादे जालिम औषध आणि सुटका करून टाकावी या त्रासातून! नरक यातनां मधून सुटका तरी होईल त्यामुळे! आज डाॅक्टरांशी भेटायचे ठरवले होते. पण ही बदललेली परीस्थिती पाहता मी विचार बदलला. काही वेळातच बाबांच्या संपुर्ण शरीरावर वर्तुळाकार चट्टे उमटले. त्यांचा तांबूस रंग पाहून याची कल्पना आली ते बाबाना अतिशय वेदना देणारे असणार. बाबांच्या नकळत त्यानी डाव्या हाताने खाजवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याना छातीवर आणि बऱ्याच ठिकाणी जखमा होऊ लागल्या. डाॅक्टरनी खाज शमवणारे औषध लावायला सांगितले. त्यामुळे त्याना थोड्या वेळाने थोडा आराम पडला असावा. त्याना पुन्हा झोप लागली. ॲंटी बायोटीकची ती रिॲक्शन आली होती. मी पुन्हा एकदा डाॅक्टरना भेटलो. त्याना हात जोडून कळकळीची विनंती केली. यातून बाबा वाचू शकणार नाहीत हे आम्ही आता स्विकारलंय, पण कृपा करून त्याना कोणतीही वेदना होणार नाही असे काहीतरी औषध द्या. त्यांचा शेवट तरी शांततेत होऊ दे.

शनिवार ३० जून सगळ्यांचाच उत्साह मावळला होता. हाॅस्पिटल मधे जाऊन पुन्हा बाबाना तशा अवस्थेत पाहण्याची भीती वाटत होती. डोळ्या समोर त्रास नकोच असे वाटत होते. तरी पण त्याना एकट्याला टाकून दूर राहणे आम्हाला शक्य नव्हते. अक्षरश: पाय ओढतच आम्ही हाॅस्पिटल गाठले. तिथं पोचता क्षणी आम्हाला ड्युटी वरील डाॅक्टरनी ताबडतोब मिटींगला बोलावले. आम्हाला सांगण्यात आले की बाबांचे आता अखेरचे काही मोजकेच क्षण शिल्लक आहेत. अशा अवस्थेत कदाचित तीन ते चार दिवसात मृत्यू येऊ शकतो. आमचे सर्व प्रयत्न करून झालेले आहेत. पण आता त्यांचा न्युमोनिया भलताच वाढलेला आहे. त्यांच्या नाकावाटे घातलेल्या फुड पाईप मधील अन्न उलटून फुफ्फूसात जाऊ लागले होते. आता सर्व ट्रिटमेंट बंद करून निव्वळ झोपेचे आणि वेदनाशामक औषध देवून सुटकेची वाट पाहू. इतके बोलून डाॅक्टर नी मला आणि पंकज ला मिठी मारली. तुमच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत असे सांगितले. बाबां जवळ आम्हाला अधिकाधीक काळ रहाता यावे म्हणून त्याना एका स्वतंत्र खोलीत हलवून देण्याचे त्यानी सांगितले. आम्हाला रात्री सुध्दा त्यांच्या जवळ थांबण्याची परवानगी दिली. आम्ही जणू काही सर्व अपेक्षितच घडत असल्या प्रमाणे थंड डोक्याने ऐकून घेतले. बाबाना दुसऱ्या खोलीत हलवल्यावर तिथे जाऊन बसलो. बाबाना इंजेक्शन ने गुंगीचे औषध दिले होते. बाबा तसेही सतत ग्लानीतच होते. पण आता पुर्णवेळ तसेच राहणार होते

रविवार जूलै आता दिवस रात्र आमचा बाबांच्या सानिध्यात होता. बाबांच्या श्वासा बरोबर आम्ही त्यांच्या आठवणींची उजळणी करीत होतो. आमच्यावर जीवापाड प्रेम करणारा आणि आमचा खंबीर आधार आता ढासळणार होता. त्याना ढासळताना पाहून आम्हाला पोरकेपणाची भावना आमच्या मनात भीती निर्माण होत होती. त्यांचा एखादा अडखळलेला श्वास आमच्या हृदयाचा ठोका चुकवत होता. त्यांच्या जवळ बसून त्यांचा निस्तेज चेहरा पाहताना रडू फुटत होते. महादु:खात सुखाची एकच बाब होती, ती म्हणजे बाबाना शांत झोप लागली होती. कदाचित झोपेत त्याना शरीरव्याधींचा विसर पडला असावा अशी आमची अपेक्षा. बाबांचे गेले २५ दिवस चाललेल्या हालास केवळ आपणच कारणीभूत असल्याची भावना मन खात होती

सोमवार जूलै या दिवसात तसे काही खास असावे असे काहीच नव्हते. कालच्या सारखा आजचा दिवस. बाबांच्या श्वासाचे मोजमाप करीत आम्ही रात्रभर बसलेलो होतो. सकाळी मी आणि पंकज आवरायला घरी गेलो. आई आणि तृप्ती बाबांच्या जवळ बसून रामरक्षा म्हणू लागल्या. आम्ही रात्री नीटशी झोप झाली नसल्यामुळे घरी थोडा डुलका काढून दुपारी दीड पर्यंत परत आलो. बाबा तसेच झोपलेले होते. जोर जोरात श्वास तेवढा चालू होता. साधारण तीनच्या सुमारास त्याना श्वासाला त्रास होत असलेला मला जाणवला. त्यांच्या घशात साठलेल्या कफामुळे श्वास पोचत नव्हता. मी नर्सला बोलवून त्यांचा बेड ॲडजस्ट करून घेतला. तरीपण श्वसनाला त्रास होतच राहीला. मी त्यांच्या छातीवरून हात फिरवू लागलो. अडकलेला कफ मोकळा होऊन श्वास चालू होण्यासाठी प्रयत्न करू लागलो. बाबांच्या डोळ्यात अश्रू आले. पंकज ते अश्रू पुसायला जवळ आला. मी बाबांचा एक हात हातात धरला आणि दुसऱ्या हाताने छातीवर सावकाश चोळू लागलो. इतक्यात बाबानी एक मोठा श्वास घेण्याचा प्रयत्न केला आणि सर्व प्रक्रिया बंद झाली. त्यांचा श्वासाचा आवाज, हृदयाची धडधड, शरीराची हालचाल, पापण्यांची उघडझाप... सर्वकाही थांबले. आमच्या मनात उठलेले काहूर थांबले, इतके दिवस उठलेले वादळ थांबले, आमचा रोखून धरलेला बांध फुटला, आईच्या थोपवलेल्या अश्रूंना वाट सापडली. अनंत वेदना, यातना आणि भोगांचा शेवट झाला. संपूर्ण कुटूंबाला झालेल्या ब्रेनस्ट्रोक चा आघात अखेरीस शांत झाला. आत्म्याने नरदेह सोडून श्रीरामाच्या चरणाशी आश्रय मिळवला. बाबांच्या च्या आवडीच्या गीतेच्या ओवीत सांगायचे तर...

नैनं छिंदन्ति शस्त्राणि
नैनं दहति पावक:
चैनं क्लेद्यन्त्यापो
शोषयति मारूत:

11 comments:

  1. 🙏🙏 I feel truly feel sorry for your loss. I realize how close you were to your father and what an influence he had on your life. He will stay with you forever.

    ReplyDelete

  2. जो सहन करतो त्याच्यापेक्षा त्याच्या कुटुंबियांना जास्त तणावाला सामोरं जावं लागतं. नित्य व्यवहारही चालू ठेवावे लागतात. एक प्रकारची बधिरता येऊन जाते.कशा परिस्थितीतून तू गेला असशिल याची कल्पनाही करायला नको वाटतंय.

    ReplyDelete
  3. हे वाचताना मी तुमच्याच समवेत असलेल्याचा भास होत होता.
    भावपूर्ण श्रद्धांजली

    ReplyDelete
    Replies
    1. मलातर समोरच आहेत असा भास होत होता

      Delete
  4. दुःख आणि भावना यावर बुद्धीचे नियंत्रण असल्याने कुठेही तोल न ढळू देता कर्तव्य पार पाडले, कौतुकास्पद आहे.

    ReplyDelete
  5. Sandip, it was video shoot of kaka's health. Not only me but every reader will see the shades of pains that all of you went through last days.

    ReplyDelete
  6. संदीप,अगदी सगळे प्रसंग आमच्या समोर घडत आहेत असे वाचताना जाणवत होते.अश्रूंचा पडदा सारखा बाजूला करावा लागत होता.त्यांनी त्यांचे जीवन अत्यंत प्रामाणिकपणे व सरळमार्गाने व्यतीत केले,आणि भोग ही भोगून संपवले.पुढील प्रवास नक्कीच शांतीमय असेल.

    ReplyDelete
  7. भावपूर्ण श्रद्धांजली!��

    ReplyDelete
  8. भावपूर्ण श्रद्धांजली!!!

    ReplyDelete

Name:
Message: