Wednesday, 28 January 2026

पुणे ते कोल्हापूर

मला खूप पूर्वी असे एक स्वप्न पडायचे. एक लांबलचक, मस्त गुळगुळीत रस्ता आहे. माझ्या हातात एक सुंदर कार आहे आणि मी सुसाट दीडशेच्या वेगाने जात आहे. वाटेत खड्डे नाहीत, अडथळे नाहीत, सिग्नल नाहीत, स्पीड ब्रेकर नाहीत… आणि माझ्यासोबत फक्त वेग!

कालांतराने समजून चुकले की हे फक्त स्वप्नातच घडू शकते. या जन्मात असे काही घडणे शक्य नाही.

अनुभवाने आलेले शहाणपण म्हणा अथवा माझे वय म्हणा, मी आता ड्रायव्हिंगचा कंटाळाच करतो. तसं मला ड्रायव्हिंग आवडत नाही असं काही नाही; पण पुण्यातल्या ट्रॅफिकमुळे मी ते शक्यतो टाळतो. लक्ष्मी रोड, टिळक रोड किंवा पेठेत जावेच लागले तर टॅक्सीचा पर्याय मला अधिक सोयीचा वाटतो. उगाच ट्रॅफिकमध्ये चिडचिड नको, पार्किंग कुठे करू हा प्रश्न नको, आणि गाडीला कोणीतरी घासून गेला तर होणारा मनःस्ताप तर मुळीच नको.


तरीपण कधीतरी गाडी चालवावीच लागते. रोज ऑफिसला जाताना किंवा कधी परगावी जाताना गाडीचा वापर आवर्जून करावा लागतो. हातात गाडी असली की सोईची वाटते. मुंबई, कोल्हापूर अशा अनेक फेऱ्या झाल्यात. कधी भटकंतीसाठीही फिरणं झालंय. या सर्व प्रवासांमध्ये आवर्जून उल्लेख करावा असा प्रवास म्हणजे पुणे ते कोल्हापूर.

प्रयत्न आणि ध्येय यामध्ये अंतर असतं असं म्हणतात… पण हे अंतर दिवसेंदिवस वाढत जातं, हे माहीत नव्हतं. पाच–सहा वर्षांपूर्वी पुणे ते कोल्हापूर फक्त चार ते साडेचार तासांत पार पडायचे. तेच अंतर आता सात ते आठ तास घेतं. कदाचित पृथ्वीच खेचली जात असावी असं वाटतंय. पूर्वी कोल्हापूरहून सकाळी निघालो तर दुपारच्या जेवणाला घरी पोहोचायचो. आता बायकोला सांगावं लागतं “रात्रीच्या जेवणाची वाट पाहू नकोस.” जगभर दोन ठिकाणांमधील अंतर किलोमीटरमध्ये मोजलं जातं; पण पुणे–कोल्हापूर हे अंतर संयम आणि BP मध्ये मोजतात, असं मला वाटतं.

प्रत्येक कोल्हापूर प्रवास आपल्याला काहीतरी नवीन शिकवून जातो. इच्छित स्थळी पोहोचल्यावर युद्ध जिंकून आल्याची अनुभूती येते. प्रवासातील खड्डे, हादरे आणि चिघळलेले ट्रॅफिक यातून जीवनाचं सार सापडल्याचा भास होतो. प्रवास सुरू झाल्यानंतर काही वेळाने तेच खड्डे आपल्याला जवळचे वाटू लागतात. मार्गात येणारा प्रत्येक खड्डा एखाद्या जुन्या ऋणानुबंधासारखा खुणावल्यासारखा वाटतो.

मी असे ऐकले आहे की कोणीतरी गुगलला खास सूचना देऊन नकाशामध्ये खड्डेही दाखवा असा सल्ला दिला आहे. गुगल यावर संशोधन करत आहे अशी बातमी आहे. रस्त्यातील प्रत्येक डायव्हर्जन तुमच्या आयुष्याचा अविभाज्य घटक असल्यासारखा वाटू लागते. एखादा किलोमीटर डायव्हर्जनशिवाय पार केला तर रस्ता चुकल्याची शंका येते. मुख्य रस्त्याच्या लांबीपेक्षा डायव्हर्जनची लांबी जास्त असते; मात्र रुंदी एक चतुर्थांश असावी लागते. तीन पदरी रस्त्याचं महत्त्व समजण्यासाठी अरुंद डायव्हर्जनची आवश्यकता मानवजातीला आहे, असं मला वाटतं. जागोजागी अशी पाटी दिसते “आगे अस्थायी मोड है।” आता या अस्थायी चा अर्थ किमान दहा पंधरा वर्षे असू शकतो.

या रस्त्यावरच्या ट्रॅफिकचं वर्णन करावं तेवढं कमीच. असं वाटतं की अख्खं पुणे नेमकं आजच कोल्हापूरच्या देवदर्शनाला निघालं आहे. सर्रास लेन बदलणे, कर्णकर्कश हॉर्न वाजवत पुढे जाण्याचा प्रयत्न करणे, या कला अवगत असल्या शिवाय तुम्हाला कोल्हापुरात प्रवेश नाही, अशी मला दाट शंका आहे. रस्त्याच्या मध्यभागातून संथ गतीने जाणारे भलेमोठे ट्रक तुमच्या सहनशक्तीचा अंत पाहतात. तुम्ही कितीही हॉर्न वाजवला तरी तो आवाज त्या ड्रायव्हरच्या कानापर्यंत पोहोचत नाही. या प्रवासात ओव्हरटेक करता येणं ही सुवर्णसंधी असते; त्यासाठी मागच्या जन्मीचे पुण्यसंचय लागते. चुकून एखाद्या वेळी मी संथ जाणाऱ्या ट्रकला ओव्हरटेक करायला लागलोच, तर तो अचानक वेग वाढवतो आणि मला माझी जागा दाखवून देतो. “अपनी औकात में रहो।” असं काहीतरी तो ओरडून सांगतोय असा भास होतो. समोरचा ट्रक, मागचा बसवाला आणि बाजूचा कारवाला — या सगळ्यांचं एकच ध्येय असतं: माझ्या गाडीला पुढे जाण्याचे कष्ट होऊ नयेत. संथ आणि आरामात माझा प्रवास व्हावा.

खरी परीक्षा असते ती टोल प्लाझावर. हे लोक टोल का घेतात यावर पुणे विद्यापीठात संशोधन चालू आहे, असं ऐकीवात आहे. तरीपण मी एक जागरूक नागरिक या नात्याने स्लो रस्त्यावर फास्टटॅगद्वारे टोल भरतो. टोल प्लाझा जवळ आला की किमान दहा गेट दिसतात आणि प्रत्येक गेटवर भल्या मोठ्या रांगा. त्यातली जी रांग छोटी वाटते, तिथे गाडी घुसवली की हमखास शेजारच्या उजव्या-डाव्या रांगा पटापट पुढे सरकतात आणि आपली रांग तशीच राहते. कोणाच्या तरी फास्टटॅगला प्रॉब्लेम असतो आणि तो बिचारा अडकलेला असतो. त्याच्या मागे उभ्या असलेल्या सगळ्या गाड्या हॉर्न वाजवून काय सांगत असतात, हे मला आजतागायत कळलेलं नाही. अशा वेळी मागे हटणं शक्य नसतं, कारण माझ्या मागेही अजून चार गाड्या उभ्या असतात आणि त्या देखील हॉर्न वाजवून आपापल्या गाड्या जिवंत ठेवत असतात. टोल भरताना मी स्वतःच्या मनाला समजावतो, हे पैसे वर्तमानकाळातील रस्त्यांसाठी नसून उज्ज्वल भविष्यातील सुंदर भारतातील रस्त्यांसाठी केलेले अल्प प्रयत्न आहेत. पुढच्या पिढ्यांना त्याचा नक्कीच फायदा होईल. आता तो नक्की कोणाच्या पिढीला, या वादात मी पडत नाही.

पूर्वी या प्रवासात लोक फक्त एक चहा आणि नाश्त्यासाठी थांबायचे. आता तीनदा चहा, एकदा नाश्ता आणि एकदा जेवण असा कार्यक्रम पार पडतो. या निमित्ताने वाटेतील सर्व उद्योगधंद्यांना चांगला हातभार लागतो, इतकाच उद्देश असावा.

भले तुमच्या असंख्य तक्रारी असतील; पण पुढच्या खेपेस कोल्हापूर फेरी करायचीच झाली, तर तुमच्याकडे काही पर्यायी रस्ता आहे का? … नाही ना? मग मुक्तपणे कौतुकच केलेलं बरं!

एकवेळ तुम्हाला तक्रार करणं जमेल, पण रस्ता बदलणं अजून कोणाला जमलेलं नाही.

5 comments:

  1. सोलापूर रस्ता छान आहे, तिकडे ये😌 , लेख छान, जययोगेश्वर

    ReplyDelete
  2. मस्तच !

    ReplyDelete
  3. मस्तच रे. कोल्हापूरला जाऊन आल्यासारखं वाटलं.

    ReplyDelete

Name:
Message: