Monday, 24 December 2018

पोटाचा प्रश्न


पोटाचा प्रश्न सुटला की सुटलेल्या पोटाचा प्रश्न आ वासून उभा राहतो असं कोणातरी व्हाटसॲपीय विद्वानाने म्हणून ठेवलंय. या विधानामधे १००% सत्यता असून मीही त्याचा एक नरबळी आहे. कोणतीही सोंगं करता येतात पण बारीक होण्याचं सोंग करता येत नाही हे तत्वज्ञान अनुभवा वरून सिध्द झालेले आहे. आजकाल मी माझ्या वाढत्या वयाला दोष द्यावा का माझ्या कामाच्या पध्दतीला का माझ्यातल्या आळसाला हा जरी आमच्या घरगुती वादाचा मुद्दा असला तरी वाढते वजन हा निर्विवाद राष्ट्रिय प्रश्न होऊ घातला आहे. दशवर्षीय कन्येपासून पंचषष्ठदश वर्षीय मातोश्री पर्यंत सर्वाना पडलेला हा एक ज्वलंत प्रश्न आहे. या प्रश्नाला अधिक क्लिष्ट करण्याहेतू अजून एक घटना माझ्या आयुष्यात घडली. ऑफिसच्या रूटीन मेडीकल चेकअप मधे माझ्या रक्ताने माझ्या स्वभावातील गोडी दाखवली. आता या घटनेमुळे सौ ने भीतीपोटी माझ्याशी गोड बोलणेच पण सोडून दिले. उगाच निमीत्त नको म्हणे!

या जगात प्रत्येक प्रश्नाला काही ना काही उत्तर नक्की असते असे कोणीतरी म्हणले आहे. पण माझ्या या कूट प्रश्नावर कदाचित जगात सर्वाधिक उत्तरे उपलब्ध असावित. गुगल वर सर्वाधीक शोधलेला प्रश्न म्हणजे “वजन कसे कमी कराल?” आणि गुगल ने सर्वाधिक दिलेले उत्तर म्हणजे “एक आठवड्यात वजन कमी करण्याचे दहा उपाय”. माझ्या घरात माझ्यावर अशा प्रकारचे अनेक उपाय लादले गेले आहेत. माझ्या सहीत संपूर्ण घरादाराने या कार्ययज्ञामधे माझी आहूती दिलेली आहे. आमच्या ओळखीचे एक बरेच वयस्कर डाॅक्टर आहेत. एकदा मी घरच्यांच्या आग्रह वजा बळजबरीमुळे या डाॅक्टरांची पायरी चढलो. पंचाहत्तर ते ऐंशी वयोगटातील या वृध्द इसमाने मला नुसते निरखले आणि ताबडतोब सुतोवाच केले. “तुझ्या आजोबाना बीपी चा त्रास होता. मीच त्याना औषध देत होतो. तुझ्या काकाना पण त्रास होता आणि माझेच औषध त्याना चालू होते.” याचा इथे संबंध काय? या प्रश्ना बरोबर आजोबा आणि काका त्यातून का बरे होऊ शकले नाहीत याचे जणू कोडं उलगडल्याचा उगाचच भास झाला. “तुझ्या वडीलाना पण माझेच औषध चालू आहे. आणि तुलाही रक्तदाब असणार. तू ताबडतोब गोळी चालू कर.” या वाक्याने मात्र मी घाबरलोच. अहो किमान ते मशीन तरी लावून बघा, असं ओरडून सांगण्याची मला इच्छा झाली. “एकतर गोळी चालू कर नाहीतर किमान पंचवीस किलो वजन कमी कर!” असा निर्वाणिचा सल्ला घेऊन मी बाहेर पडलो.

माझ्या या वजनदार आयुष्याची सुरवात झाली जीएम डाएट प्लॅन ने! कोणा एका महा विद्वानाने जीएम कंपनी मधील समस्त जाड्या लोकाना सात दिवसात बारीक करून दाखवल्यामुळे तो प्रयोग माझ्यावर यशस्वी झाल्या शिवाय माझी सुटका नव्हती. रोज कोणत्या तरी एकाच अन्न प्रकारचा माझ्यावर मारा सुरू झाला. त्या दिवशीचा तो खाद्य प्रकार सोडून इतर अन्नाकडं पाहणे सुध्दा गुन्हा ठरू लागला. सुदैवाने या जीवघेण्या खेळाला सात दिवसाची मर्यादा होती. आठव्या दिवशी मी माझे वजन करून पाहीले. छान तीन चार किलो कमी झालेले आढळले म्हणून माझ्या सहीत सर्वच खुश झाले. पण हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. दोन वेळ चे जेवण आणि एक नाश्टा या व्यतिरीक्त कधी काळी काही किरकोळ तोंडात टाकलेलं अंगलट आले. जे सात दिवसात गमावले ते महिन्या भरात कमावले.

नवऱ्याच्या बाबतीत बायको इतकी क्रूर कशी काय होऊ शकते  का कोणास ठाऊक. माझ्या आहारातून तेलकट, गोड, खारट, चीज, बटाटा, भात अशा पदार्थांचे उच्चाटन करण्यात आले. रोज सकाळ संध्याकाळ शेळी समोर गवताची पेंढी टाकतात त्या प्रमाणे जेवणात काकडी गाजराचे तुकडे टाकण्यात येऊ लागले. मी कर कर आवाज करीत त्या तुकड्यांना जगण्याचे साधन बनवू लागलो. लहानपणी जेवणापुर्वी म्हणत असलेल्या श्लोकाचा अर्थ आत्ता समजून येत होता. “उदरभरण नोहे, जाणिजे यज्ञ कर्म!” या सर्व प्रयत्ना नंतर माझे वजन वाढायचे थांबले खरे पण कमी होण्याचे लक्षण दिसेना. यावर मला असेही ऐकवण्यात आले की मी जर मनापासून प्रयत्न केले असते तर वजन पटकन कमी झाले असते. आता हा मनापासून प्रयत्न म्हणजे नक्की कसा, या विचारात कदाचित माझे एक दोन किलो अजून वाढले असावे. 

देवानं माणसाला भूके बरोबर जी जीभ दिली आहे ना, तेच त्याचं चुकलंय. एक तर नको तिथं बडबड करायला लावते किंवा नको तितकं खायला भाग पाडते. सर्व गुन्ह्या मागचं कारण म्हणजे ही जीभ! या जीभेला एकदा का चटक लागली की सगळा घोळ होतो. लग्न संमारंभात किंवा ऑफीसच्या पार्टीमधे भोजनास मध्यम वर्गीय न्याय दिला जातो. अन्न वाया न घालवता पोटात भरून घेण्याची संस्कृती खाण्यास भाग पाडते. हलदीराम, चाय हाऊस, राजधानी, बिकानेरी अशा अनेक कंपन्या उत्तमोत्तम चटकदार पदार्थ बाजारात आणतात आणि जीभेला खुणावतात. सर्व रूचकर आणि चमचमीत पदार्थ हे जंक फूड का असतात, हा माझ्या बालमनाला पडलेला प्रश्न! आणि हे जंक फुड शरीरास अपायकारक का हा मला टोचणारा प्रश्न आहे. काही लोकांचा मला खरंच हेवा वाटतो. किती पण खा, मुळीच व्यायाम करू नका... शरीर यष्टी सडपातळ कायम! त्याना इतर लाख शारीरिक तक्रारी असतील पण दिसण्यात सडपातळ! मागच्या जन्माचं पुण्यच असेल, अजून काय!

माझ्यावर आता प्रोटीन डाएट चा प्रयोग करण्याचा घरी निर्णय घेण्यात आला. माझ्या आहारातून आधीच तेल, तूप, गोड, आंबट, खारट आणि चविष्ट पदार्थ बाजूला काढले होते. आता दोन वेळची चपाती, दोन वेळचा चहा बिस्कीटे आणि सणवार म्हणून केलेले सर्वसामान्य पदार्थ हाकलण्यात आले. माझ्या समोर आता फक्त उसळी आणि डाळी आदळण्यात आल्या. आज मूग, उद्या मटकी, परवा मसूर तर नंतर चवळी. बाजारात उपलब्ध असलेल्या सर्व प्रकारच्या द्विदल धान्याने माझे जठर भरू लागले. यात तब्बल चिमूटभर मीठ घालण्याची परवानगी देऊन जीभेचे चोचले पुरवले गेले. या महत प्रयासा नंतर ही माझे वजन कमी होण्याचे लक्षण दिसेना. जणू वजन काट्यातील काटा अडकून पडला होता. उगाच शंका नको म्हणून मी काही हलक्या वस्तूंचे वजन त्या काट्यावर करून खात्री करून घेतली. पण नेमका काटा ठिकच होता. कोणीतरी माझ्या पत्नी समोर अवास्तव कौतुक केल्यामुळे माझी रवानगी एका निसर्गोपचार केंद्रामधे करण्यात आली. तब्बल दहा दिवसांच्या वास्तव्यामधे माझ्या या नरदेहावर अनेक संस्कार करण्यात आले. दिवसाची सुरवात योगासनाने होऊन, तासभराचा तैल मसाज, चिखलाचा लेप, सुर्याखालचे करपणे, वाफाळलेली होरपळून काढणारी आंघोळ आणि दिवसातून एकदाच मिळणारे मुठभर बेचव अन्न, त्याच्या जोडीला विचीत्र काढे व रस. अशा दिनक्रमात “कुपोषणाने मृत्यू” अशा पेपरात वाचलेल्या बातम्यांचा मी प्रत्यक्ष अनुभव घेतला. चिमूटभर मीठा साठी डोळ्यात अश्रू आणणाऱ्या लोकाना पाहीले आणि गांधीजींना मीठाचा सत्याग्रह का करावा लागला ते समजले. दहा दिवसात जे सात आठ किलो घसरले ते पुढील चार दिवसात भरून निघाले.

या सर्व प्रयत्नां बरोबर आवर्जून उल्लेख करण्यास योग्य विषय म्हणजे माझा व्यायाम! योग्य आहाराला व्यायामाची जोड हवी, असं कोणा एका वेड्यानं म्हणून ठेवलंय आणि स्वत: निवांत झालाय. माझ्या राशीला हा व्यायामाचा ससेमिरा खुप पुर्वी पासूनच लागलाय. लोकाग्रहास्तव मी प्रोफेशनल जिम मधे जाऊन नाव नोंदवले. तिथल्या ट्रेनरच्या कडक शिस्तीत रोज व्यायाम करणं अंगावर येऊ लागले. कितीही घाम आला तरी किंवा थकलो तरी भूत मागे लागल्या प्रमाणे त्या ट्रेड मिल वर चालण्याचा वैताग येऊ लागला. शाळेत असताना सायकलने गावभर हुंदडलो होतो पण आता त्या जिम मधील सायकल वर घाम गाळणे जीवावर येऊ लागले. जिम मधील बाकीच्या कमनीय देहयष्टीच्या तरूणांकडे बघून त्यांचा हेवा वाटू लागला. इतर कमनीय देहां बद्दल इथे चर्चा नको. एकंदरीत जिम नामक विकतच्या दुखण्याचा प्रकार नकोसा वाटू लागला. बऱ्याचदा ऑफिसच्या कामानिमीत्त प्रवास करावा लागे. त्यावेळी झालेली सुटका गोड वाटू लागली. जिमचा आलेल्या कंटाळ्याने नकळत माझ्या हातून जिमचे दरवाजे बंद करून टाकले. रोज एखादा खुन्याला गिळायला घालावे, त्या भावनेने मला दोन वेळचा शिधा मिळू लागला. “पोटाची खळगी फार वाईट!” असं कोणीतरी म्हणून ठेवलंय ते अगदी पटतं.

अशा सर्व फसलेल्या आणि फसगत झालेल्या प्रयत्नांनंतर योगाभ्यासाने माझा बळी घेण्याचे ठरवले. सौ च्या अथक प्रयत्नां नंतर मी स्वत:ला बळीच्या बकऱ्या प्रमाणे सज्ज झालो आणि एका योगाच्या क्लासमधे नाव घातले. दर शनिवार रविवार एका मोठ्या हाॅल मधे माझ्या सारखे अनेक नवशिके आपापल्या पोटांचा भार सांभाळत कसरत करताना पाहून आपण एकटे नसल्याचे समाधान झाले. या उपर वजन वाढी हा केवळ व्यक्तिगत किंवा खाजगी प्रश्न नसून तो आंतर राष्ट्रिय ज्वलंत प्रश्न घोषित करावा अशी इच्छा पण मी बऱ्याच जणाना बोलून दाखवली. त्यावर सर्वानी माझ्या पोटाकडे पहात दुजोरा दिला. योगाभ्यासा मधे सुरवातीस बराच रस वाटू लागला. आमचे योग गुरू सराईता प्रमाणे शरीर दुमडून विवीध योगासने दाखवू लागले. काही दिवसानी माझ्या लक्षात आले की आपणाला त्यातील १०% सुध्दा जमणे अशक्य आहे. उगाच काहीतरी झटापट करायला गेलो आणि अडकून पडलो तर मदतीसाठी हाक मारण्यासाठी तोंड कोणत्या दिशेला आहे ते पण सापडायचं नाही, अशी अनामिक भीती वाटू लागली. माझे सर्वात आवडते आसन म्हणजे शवासन. बऱ्याचदा थकलेल्या शरीराला डुलका लागे आणि बाकीचे उठून घरी जाऊ लागले तरी निद्रासनातून बाहेर पडणे अशक्य होई. कोणीतरी हलवून उठवले की खजिलपणाने हसण्याचा प्रयत्न करावा लागे. अपराधीपणाच्या भावनेने सर्वांच्या नजरा चोरून स्वत:चेच घर गाठणे नशिबी आले. आठवड्यातील इतर दिवशी युट्यूब वरील शिल्पा शेट्टींच्या मार्गदर्शना खाली धडे घ्यायचे ठरवले. पण तिच्या कडून नक्की कोणता अभ्यास मी करावा असा सांस्कृतिक प्रश्न सौ ला पडल्यामुळे माझा गुरू बदलण्यात आला. आता रामदेव बाबा रोज सकाळी काहीतरी वाकडे तिकडे होऊन माझ्याकडून मर्कटलिला करून घेऊ लागले. घरात मुलांच्या हास्याचा विषय होऊ नये म्हणून खास खबरदारी घ्यावी लागे. तब्बल तीन महिन्यांच्या अथक परीश्रमा नंतर माझे हात निव्वळ गुडघ्या पर्यंत कसेबसे पोचू शकतात याचे शल्य टोचू लागले. अजून पायाचे अंगठे तर भलतेच दूर होते. मी अखेरीस शस्त्रे टाकून शरणागती पत्करली. सौ ने दया दाखवित माझ्या नशिबात तो योग नाही हे ओळखून मला योगसाधने पासून दूर राहण्याची नाखुशीने परवानगी दिली. आता माझ्या अथक परीश्रमामधे रोज पळायला जाणे लिहून ठेवले होते. पहाटे तब्बल सहा वाजता उठून पळायला जाण्याचा कार्यक्रम घडू लागला. या कार्यक्रमामधे मला अनेक नयनरम्य साथीदार दिसल्यामुळे काही दिवस उत्साहात गेले. कालांतराने साखर झोपेला तिलांजली देणे जीवावर येऊ लागले आणि “सबकुछ मिथ्या है” या उपरतीने मी पळण्याचा नाद सोडला.

हा वजनाचा आकडा माझ्या वजन काट्याला फेविकाॅल ने चिकटवल्या सारखा बसून माझ्यावर हसत होता. मी आणि माझ्याहून अधिक म्हणजे सौ मात्र हार मानायला तयार नव्हती. माझ्या मधील बाजीप्रभूंच्या मॅनेत तलवार खुपसायला सिध्द अशा अनेक उत्साही व्यक्ती नावारूपाला आलेल्या आहेत. त्यातील सर्वप्रथम क्रमांक लागतो प्रथितयश श्रीमती दिवेकर यांचा. या बाईंनी भल्या भल्या नट्याना बारीक करून त्यांचे करीयर उंचावून ठेवले आहे. त्यांचे पुस्तक तर हातोहात विकले गेले म्हणे.. आणि त्याना सल्ला विचारण्याची फी जर माझ्या सारख्यानं देण्याचे ठरवले तर सहा महिने पोटाला चिमटा काढावा लागेल. खरंतर त्यातच बारीक होण्याचे रहस्य दडलेय म्हणे. तर त्यांच्या प्रसिध्द झालेल्या पुस्तका नुसार माझ्यावर प्रयोग सुरू झाले. गांधीजींच्या सत्याचे प्रयोगां प्रमाणे हे दिवेकरांचे प्रयोग करू लागलो. दर दोन तासाने खाण्याची पुरचुंडी घशाखाली सोडू लागलो. आॅफीसमधे अशा अनेक पुरचुंड्या घेऊन जाण्याचा थाट पार पडू लागला. मिटींगच्या गजराच्या बरोबरीने पुरचूंडीचा गजर वाजू लागला आणि न चुकता कार्यक्रम उरकू लागलो. या पाठीमागे त्यांनी समजावलेले विज्ञान जरी मला नाही समजले तरी हा दर दोन तासाचा कार्यक्रम सुरवातीस मात्र गंमतशीर वाटला. बऱ्याचदा प्रवासामुळे किंवा कामाच्या व्यापामुळे पुरचूंडीचे वेळापत्रक पाळणे अशक्य होऊ झाले. अशावेळी एकदम तीन चार पुड्या सोडल्या जावू लागल्या. अजूनही वजनाचा काटा तसाच कुत्सित हास्य करीत बसला होता.

बदल हे मानवी जीवनाचे अंतिम सत्य आहे. फक्त माझे वजन याला अपवाद आहे. बऱ्याचदा ते किलोभर वर सरकून बसे पण एखाद्या व्रात्य कार्ट्या प्रमाणे ते खाली उतरायला तयारच होत नव्हते. अशातच मला अजून एका गुरूने रस्ता दाखवला. ते म्हणजे साक्षात डाॅ दीक्षित. एक दिवस माझ्या एका मित्राने माझी दयनीय अवस्था ओळखून मला डाॅ दीक्षितांची क्लिप आणि इतर बरीच माहीती पाठवली. अनेक जण त्यांच्या मार्गदर्शना खाली होत्याचे नव्हते झालेले किस्से ऐकले. आता माझ्या नशिबात दीक्षितांचा अनुग्रह लिहून ठेवला होता. तीन त्रिकाळ खाण्यावरून फक्त दोन वेळच्या जेवणाची भ्रांत निर्माण झाली. निव्वळ पंचावन्न मिनीटात भरपेट जेवण्याची मुभा मिळाल्यामुळे ही एक सुवर्णसंधी चालून आल्याचा आनंद झाला. सुरवातीस थोडे दिवस भरल्यापोटी केवळ दोन वेळच्या आहारावर मला समाधान मानताना पाहून स्वत: बद्दल कौतुक वाटले पण हळूहळू सर्व मर्यादा शिथील होत गेल्या. वजनाच्या काट्यानं थोडीशी माघार घेण्याचे लक्षण दाखवले पण फार कौतुकास्पद किंवा स्फुर्तीदायक बदल दिसेना.

आता मी काही गोष्टी आवर्जून करून बघायच्या ठरवल्यात. दर दोन तासानं पंच्चावन मिनीटे जेवायचे, कोणताही पदार्थ जेवणातून वर्ज्य करायचा नाही. बीपी, शुगर असल्या कोणत्याही भुलथापाना बळी पडायचे नाही. जमेल त्यावेळी पाच सहा किलोमीटर चालून यायचे, पण उगाच अट्टाहास करायाचा नाही. डाॅक्टर च्या दरवाज्याकडे ढुंकूनही पहायचे नाही. मुख्य म्हणजे कोणा बरोबर ही वजन, रक्तदाब, रक्तातील साखर असल्या क्षुद्र व पोकळ गोष्टींवर चर्चा करायची नाही. कोणी खाजवून विषय काढलाच तर सर्रळ दुर्लक्ष करायचे. उगाच फारसं मनाला लावून घ्यायचं नाही. चर्चेसाठी आणि चिंतेसाठी आपल्याकडं मोदी, काँग्रेस किंवा ट्रंप अशा मुद्द्यांची रेलचेल असताना... कशाला उगीच!

[टिप: हा लेख निव्वळ विनोद आणि करमणूकीच्या उद्देशाने लिहला आहे. कृपया वाचकानी मला समदु:खी हळहळ अथवा सहानभुती प्रद संदेश पाठवू नये. पुणेरी पध्दतीने अपमान करण्यात येईल.]

~ संदीप कुलकर्णी

Tuesday, 28 August 2018

ब्लाॅगर मी होणार

[या लेखा मधे कोणाच्याही भावना दुखवण्याचा उद्देश नसून केवळ विनोद निर्मीती हा प्रामाणिक प्रयत्न आहे. त्यातून जर कोणाच्या भावना दुखल्याच तर दुखू देत निवांत!]

चायनीज लोकांमधे एक प्रथा अथवा विश्वास आहे की वयाच्या चाळीशी नंतर जरी पत्नी असली तरी एक प्रेयसी जरूर असावी. मन मोकळं करायला बरीच मदत होते म्हणे! नेमका मी पडलो मराठी! एकतर मोकळं करण्यासारखं काही शिल्लकच नाही आणि त्यात असल्या प्रथा मराठी संस्कृतीत परवडणाऱ्या नाहीत. तरीपण चाळीशी नंतर आपण काहीतरी नवीन आणि सनसनाटी करावं असं प्रत्येकाला वाटू लागतं. मलाही तसंच काहीतरी वाटू लागलं. म्हणजे नक्की काय करावं हे वाढत्या वजनाकडं पाहून काही समजत नव्हतं. उगाच सलमान आणि आमिर खानां प्रमाणे सिक्स पॅक देह करणे शक्य नव्हतं. कारण हा देह मेगा सिंगल पॅक पुर्वीपासूनच झालेला आहे. नवीन वाद्य शिकावे तर घरादाराला त्रास आणि शिवाय संगीत क्षेत्रातील अज्ञान अगाध! अध्यात्माला लागावं तर उगाचच लौकर वार्धक्य अवस्था आल्या प्रमाणे वाटू लागेल. तर मग मी करावे तरी काय? मुलांच्या अभ्यासात पार बुडून गेलेल्या सौ ला मी एक दिवस मुड चांगला पाहून प्रश्न विचारला, “मला काहीतरी वेगळं सनसनाटी करायचंय. हे रोजचं रूटीन ना फार वैताग आणणारं आहे.” क्षणभर हातातलं काम थांबवून तिनं माझ्याकडं कटाक्ष टाकला. “तुझी तब्येत ठिक आहे ना?” असा काळजीयुक्त उपहासाचा प्रश्न आला. “तसं नव्हे, परवाच कोणीतरी व्हाटसॲप वर लिहलं होतं. स्वत:चे आयुष्य स्वत:च्या मर्जी प्रमाणे जगायला शिका. गेलेला क्षण परत येत नाही. काहीतरी असं करा की तुम्हाला केल्याचं समाधान मिळेल. राहून गेलं अशी भावना नष्ट होईल.” मी पण जरा हट्टालाच पेटलो होतो. ‘काय वैताग आहेया त्रासिक भावनेने तिने मला स्पष्ट सांगितलेमला बरीच कामे पडली आहेत. मुलीची दहावी ची परीक्षा तोंडावर आलीय. मला असल्या युक्त्या शोधण्यात रस नाही आणि वेळ तर मुळीच नाही.”

मी अखेरीस हतबल होऊनअकेला हूं यारो..’ या गाण्याच्या चालीमधे विचार करू लागलो. काही केल्या उत्तर सापडेना. कोणीतरी सांगितलं की पुस्तकं वाचायला सुरू कर. पण त्यात सनसनाटी काय ते काही सापडत नव्हते शिवाय वाचताना डुलका लागायचा. एकानं सल्ला दिला की गाण्याचा क्लास लाव. आता या भसाड्या आवाजाला कोण सूर लावायला तयार होणार? लांबलचक बोगद्याच्या टोकाला प्रकाशाची तिरीप दिसावी आणि बाहेर पडण्याचा मार्ग दिसावा त्या प्रमाणे मला आयुष्य रूपी अंधारमयी कंटाळवाण्या बोगद्या मधे अखेरीस एक आशेचा किरण दिसला. माझा एक खुप जूना मित्र अचानक भेटला आणि त्याने मला एक भन्नाट कल्पना दिली. तो म्हणला मी ब्लाॅगर आहे. मी अज्ञान उघडे करीत त्याला विचारलेच, म्हणजे तू नक्की काय करतोस? त्यानं समजावलं.. “अरे आता नोकरी करून खुप मिळवलं, मिळवतोच आहे. पण आयुष्याला तोच तोच पणा आलाय. आज वरच्या आयुष्यात जो काही अनुभव, व्यक्ती, त्यांचे स्वभाव यांचा जो मी संचय केला आहे तो मी लिखाणाद्वारे मांडत आहे. माझे आता बरेच फाॅलोअर झाले आहेत. बरेच लोक मला मान सन्मानाने प्रश्न विचारतात. माझ्या अनुभवाचा त्याना काहीतरी उपयोग होतो यातच समाधान. पण मित्रा माझे ब्लाॅग मात्र जोरदार हिट झाले आहेत हं!” मला थोडं थोडं तो जे काय म्हणतो ते लक्षात येऊ लागलं होतं. ज्या गोष्टीच्या शोधासाठी आपण इतके दिवस तळमळत होतो, ती कल्पना स्वत:हून माझ्याकडे चालत आली होती. मी पण ठरवलं की आता आपण लिखाण करायचे.

मी थोडा अंदाज घेण्यासाठी आणि फुशारकी मारण्यासाठी घरामधे सौ समोर माझा प्रस्ताव मांडला. “अजून आहेच का ते खुळ! त्यापेक्षा मुलीच्या दहावीच्या अभ्यासात जरा लक्ष घाल”  असे उत्साहदायी विचार ऐकले. मी त्याचे फारसे वाईट वाटून घेता माझा मुद्दा पुढे दामटलाच. “अभ्यासाचं काय? तू घेतेच आहेस, जिथं अडेल तिथं मी आहेच ना. पण मी आता काहीतरी लिखाण करावं, स्वत:चा ब्लाॅग सुरू करावा. असा विचार करतोय.” माझे विचार ऐकून सौ थोडी विचाराधीन झाली. तिला माझी कल्पना पटली असे मला वाटले.. पण ईश्वराच्या मनात काहीतरी तिसरेच होते. “तुमच्या कन्येला उद्या सकाळी एक निबंध लिहून शाळेत द्यायचा आहे. जरा तिला मदत करा. बघू तुमची लिखाणाची शैली कशी काय आहे.” मला आदरार्थी संबोधन झाले की ती चिडलीय हा माझा अनुभव! पण आता हे तिचे प्रोत्साहन समजून घ्यावे का माझी फिरकी समजावी या बुचकळ्यात मी पडलो. तरीपण हार मानता माझ्या समोर फेकलेल्या आव्हानाला स्विकारले. मी ताबडतोब मुलीला कागद पेन घेऊन यायला सांगितले. विषयाची सुरवात कशी असावी? मुळ मुद्दा कसा खुलवावा आणि शेवट आपल्याला नक्की काय सांगायचे आहे त्यावर कसे घेऊन यावे? यावर विषय विचारताच भाषण ठोकू लागलो. शांतपणे सर्व ऐकून झाल्यावर तिनं मला निबंधाचा विषय सांगितला. ‘Role of Singapore government in Education System’ आता मात्र माझी विकेट क्रिजला बॅट लावण्या पूर्वीच जाण्याची वेळ आली होती. हा काय निबंधाचा विषय झाला? ‘टिळकांचा बाणेदारपणा’, ‘महात्मा गांधी’, ‘वीर सावरकरअसे निबंध लिहण्यात आमचे बालपण गेले. अगदीच वेगळेपण म्हणाल तरआमची शाळेची सहल’, ‘माझी दिवाळीची सुट्टीकिंवा अगदी जहाल विषयाची कमाल मर्यादा म्हणजेटिव्ही शाप की वरदान’, ‘विज्ञानाचे दुष्परीणाम’, ‘भविष्यातील भारत’. या अशा विषयांवर छान पैकी डोकं लावून निबंध लिहण्यात आम्ही पेनातील शाई संपवली होती. आता हा काय विषय आहे? पण युध्दात उभे राहण्या आधीच शस्त्र टाकून पळ काढण्याच्या आरोपा पासून वाचण्यासाठी मला असल्या विषयावर सुध्दा निबंध लिहणे भाग होते. अशा कठीण प्रसंगी द्रौपदीला राजसभेत खेचून आणल्यावर श्रीकृष्णाची जशी मदत झाली तशी किंवा त्याहून अधिक मदत माझ्यातील द्रौपदीला गुगल रूपी कृष्णाची झाली. मी ताबडतोब गुगल फिरवले आणि दोन चार संदर्भातील साईट उघडलल्या. त्यांचा कसाबसा ताळमेळ घालून दोन पानाचा मसुदा निबंधाच्या नावाखाली ढकलला. कन्येने नाखुशीनेच तो स्विकारला. दोन दिवसानी मला लाल भडक शेऱ्यानी भरलेला निबंधाचा कागद दाखवण्यात आला. ‘गुगलचा वापर समजून योग्य करावा.’ असा शेवटचा शेरा तर माझ्यावर वाघासारखा गुरगूरत असल्याचा भास होत होता. या उपर शिक्षीकेने कन्येला जवळ बोलवून असेपण सांगितले म्हणेअशा अवघड विषयाचे निबंध लिहीताना वडिलांची मदत घेत जा.” आणि त्या दिवसा पासून निबंधाचा ससेमिरा माझ्या मागचा कायमचा मिटला. ताईची अशी अवस्था पाहून चौथीतला छोकरा गुणाकार भागाकार ची गणिते सुध्दा मला विचारायला नकार देऊ लागला.

तीळमात्र सुध्दा माझा निग्रह ढळू देता मी लिखाणाला सुरवात केली. मी लॅपटाॅपलाच मराठी लेखनाची सोय करून घेतली आणि माझे लेख लिखाण सुरू झाले. काही विषय मनात घोळत होते ते एक एक करीत त्यावर रसभरीत लिखाण करू लागलो. ते लेख मी माझ्या फेसबुक वर टाकू लागलो. एक दोन मराठी मंडळांचा सभासद होऊन तिथे पण ते लेख टाकू लागलो. लेख आला आणि गेला, फेसबुकच्या अखंड दुथडी भरून वाहणाऱ्याफिडसमधे माझे लेख वाहून जाऊ लागले. नाही म्हणायला कोणीतरी ठराविक मित्र मंडळी लाईक वगैरे करू लागली; पण काही मित्रांचे प्रेम तर इतके अचाट होते की .२५ मिलीसेकंदा मध्ये त्यांचेलाईकयेऊ लागले. लेख वाचायला किमान पाच मिनीटे तरी लागावीत अशी माझी अपेक्षा असे, पण अखेरीस मैत्रीच श्रेष्ठ! माझ्या ऑफिसमधे मी माझ्या लेखांचा प्रचार चालू केला होताच. त्यामुळे माझे ज्युनियर इंजिनीयर नाईलाजास्तवलाईककरू लागले; अगदी अमराठी सुध्दा! एक तर लाईक चा आकडा फारच क्षुद्र होता आणि जो होता तो खरा नव्हता. या उपर अजून सनसनाटी असं काहीच घडत नव्हतं. मला काही खोचक काॅमेंटस पण मिळाल्यालिखते रहो!’ त्या पुढीलजमेल एक दिवसही गाळलेली काॅमेंट मी समजून घेतली. फेसबुकवर इतर काही सक्रिय मराठी मंडळी भसाभसा त्यांचे लेख छापत होते आणि त्याना शेकडो नी काॅमेंटस शिवाय लाईक्स मिळत होते. त्यां लेखांच्या दर्जा बद्दल मी काही टुकार किंवा भुक्कड म्हणणार नाही हं. उगाच मी कशाला नावे ठेवू? पण त्याना मिळणाऱ्या लाईक्स मुळे माझ्या लेखाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उभे राहीले होते.

एक दिवस मी असाच अंत:र्मुख होऊन बसलेला असताना माझा सहकारी इंजिनीयर माझ्या डेस्कवर आला. “सर, तुम्ही खुप छान ब्लाॅग लिहीता.” माझे डोळे अचानक आलेल्या स्तुती शब्दांमुळे विस्फारले गेले. जणू माझ्या मनात काय विषय चाललाय तोच त्यानं ओळखला. मी डोळ्यात जमा होऊ लागलेले अश्रू गिळले (कसे विचारू नका) आणि फक्त इतकंच बोलू शकलो. “हो रे! पण... “ तसा तो बोलू लागला. “तुम्ही फेसबुकला अख्खा लेख टाकू नका, फक्त लिंक द्या. तुमचा लेख एखाद्या ब्लाॅग साईट वर ठेवा. तुम्हाला कळू लागेल की किती वाचक आहेत आणि कोणत्या देशातून आहेत.” मला जरा सगळं नवीनच होतं, पण त्याच्या बोलण्यात मला दम वाटला. मी ताबडतोब माझ्या तज्ञ मित्राच्या मदतीने माझी एक ब्लाॅग साईट सुरू करून घेतली. माझे जे काही दोन चार लेख खरडून झाले होते, ते तिथं ढकलले आणि फेसबुक वर त्याची प्रस्तावना लिहून लिंक देणे सुरू केले. आणि अहो आश्चर्यंम! माझ्या लेखाचे वाचक आकडे धडाधड वाढू लागले. पुर्वी वीस पंचवीस लाईक्स वर लढाई जिंकली मानणारा मी आता हजारात वाचक गण गोळा करू लागलो. गुगल वाल्यानी तारखे नुसार, देशा नुसार सर्व हिशोब सादर केला. मला अचानक कुठंतरी पुलं च्या पंक्तीमधे दूर टोकाला जागा मिळाल्याचा आनंद व्हायला लागला. काही अनोळखी दूरच्या वाचकानी मलाउत्तम!’ असा अभिप्राय पण कळवला

पण का कोणास ठाऊक! अजूनही मला सनसनाटी वाटत नव्हतं. माझा फॅन फाॅलोअर अजूनही जरा मिळमिळीतच वाटत होता. त्यात बहुतांशी मावशी, आत्याच्या वयाच्याच होत्या. पुन्हा एकदा मन उदास होऊ लागले. या वेळी मात्र सौ ने माझा गंभीरपणा गांभिर्याने घेतला. तिला माझं असं गंभीर बसणं बरं वाटलं नसावं. एक दिवस तिनं शांतपणे हा विषय छेडलाच. “मला वाटतंय की तुझं जरा मार्केटींग कमी पडतंय! तुला थोडं सोशल सर्कल निर्माण करावं लागेल. तुझ्या कोशातून बाहेर पडून बाहेरच्या जगात डोकावायला आणि मत द्यायला सुरू करायला हवं. मत काहीही असो, अशानं बदनामी कधीच होत नसते. तर फक्त प्रसिध्दीच मिळते.” मला तिचा मुद्दा समजत होता पणनक्की ते कसं?’ हे काही समजत नव्हतं. अखेरीस मी तिच्या हो ला हो म्हणतकृपया मार्गदर्शन करा.” असे बोलून हात जोडले. तिला अशा ब्लाॅग आणि सोशल मिडीया चा गाढा अनुभव! गेली पंधरा अधिक वर्षे ती या क्षेत्रामधे खेळून बऱ्यापैकी पारंगत झाली होती. अनेक मंडळांची ती सभासद होती. ऑर्कूट, गुगल प्लस सारख्या जाळ्याना उभारताना आणि पडताना पण तिने पाहीलेले होते. तिचा व्यासंग फार मोठा होता. तिच्या अनुभवाचा पुर्ण मान ठेवून मी शिष्यत्व पत्करले.

सर्व प्रथम तू प्रसिध्द अशा स्वतंत्र मराठी मंडळांमधे नाव नोंदवून टाक. दहिहंडी.काॅम, भेळपुरी.काॅम, खरवस.काॅम आदी मंडळांमधे थोडा रूळायला लागलास आणि तुझा आत्मविश्वास दुणावला की सर्वात प्रसिध्द अशा सायओली.काॅम मंडळात नाव नोंदवून शिरकाव कर. अशा मंडळांमधे आपले खरे नाव वापरता लेखणी नावाने बिनधास्त वावर करायचा. नाव निवडताना सुध्दा त्यावरून स्वभावाचे दर्शन झाले पाहीजे. भन्नाट वारा, क्षप्र, टग्या आदी काही प्रसिध्द व्यक्ती या मंडळात स्वच्छंद पणाने वावरत असतात. तू पण असेच काहीतरी नाव वापरून प्रवेश कर. प्रत्येक मंडळाची संस्कृती, रूढी भिन्न असते. ती नीट समजावून शिकून घे. कोणा समोरही अज्ञान उघडे करून तोंडावर आपटू नकोस. सायओली सारख्या मंडळात बरीच हुशार मंडळी हिंडत असतात. त्याना बरेच विचित्र शब्दप्रयोग करण्याची आचरट सवय आहे. ते नीट समजून घे. तुला ते चटकन कळले पाहीजेत आणि चपखल पणे वापरता आले पाहीजेत. कायरे म्हणजे व्हाटसॲप, लिहून आभार म्हणजे नोटेड वुईथ थॅंक्स, गटग म्हणजे गेट टुगेदर, भशु म्हणजे भरपूर शुभेच्छा. या मंडळांवर काही लोकांचा खास दबदबा असतो. तुला त्यांच्या कंपूत सामिल व्हावे लागेल. जे इतके सहज सोपे नाही.” मी सुन्न व्हावं का थक्क व्हावं या विचारात पडलो. अखेरीस मार्गदर्शनाचे सर्व मंत्र तंतोतंत पाळण्याचे वचन देऊन कामाला लागलो.

आता मी अशा मंडळातून दिवसभर हिंडत फिरत असतो. उगाच काहीतरी बोलून लक्ष वेधून घेत असतो. आणि सनसनाटी नसेना का पण फॅन फाॅलोअर गोळा करीत असतो.